पुस्तक

शेअरमार्केट हे एक गूढच! हे गूढ उकलणे साध्य झाले नाही म्हणून की काय टीकेचा विषय बनलेले हेच ते शेअरमार्केट. हे शेअरमार्केटचं गूढ उकलण्याची मी गेले ४ वर्ष माझा ब्लॉग लिहीत आहे. मला बरेच लोकांनी विचारलं कि तुम्ही पुस्तक का लिहीत नाही. २०१७ साली तो योग्य जुळून आला. मित्रांनो आपलं पुस्तक आता प्रकाशित झालेल आहे आणि तुम्हा सगळ्यांसाठी विशेष किमतीत या वेबसाइट वर उपलब्ध आहे –
https://pothi.com/pothi/book/bhagyashree-phatak-market-aani-me-0

माझ्या वयाच्या चाळिशीमध्ये या शेअरमार्केटने माझ्या आयुष्यात प्रवेश केला. नंतर हे मार्केट माझा सखा, सोबती, जीवश्च कंठश्च मित्र बनले. मी या शेअरमार्केटच्या सागरात रममाण झाले. या मार्केटची सगळी रूपे, भरती, ओहोटी मी फार जवळून अनुभवली. मला मार्केटचे आकर्षण वाटू लागले. प्रत्येकवेळी मला मार्केटचे वेगवेगळे स्वरूप दिसले. त्याचवेळी जे लोक मार्केटला नावे ठेवत होते त्यांचा राग येऊ लागला. मार्केटचा उपयोग करून घेण्याऐवजी लोक मार्केटला दोष का देतात हे समजत नव्हते. त्यातून दूरदर्शनचा उपयोग करून हा व्यवसाय करता येतो हे पटवून देणे कठीण जात होते. दूरदर्शनवरील वाहिन्यांवरुन शेअरमार्केटचे विश्लेषण मराठीत समजाऊन दिले जात नव्हते, त्यामुळे जवळीक निर्माण होत नव्हती.
ज्या ज्या लोकांशी माझा परिचय होता त्यांच्याशी जेव्हा शेअरमार्केटबद्दल मी बोलत असे, तेव्हा ते म्हणत शेअरमार्केट आणि त्याची प्रक्रिया कोणीतरी सोप्या मराठी भाषेत समजावण्याची खूप गरज आहे. जसा व्यापार अशिक्षित आणि सुशिक्षित दोघेही करतात; फायदयाचे गणित घालणे दोघांनाही जमते तर मग शेअरमार्केट का जमणार नाही हा विचार मनात आला आणि त्यातूनच मी माझा ‘मार्केट आणि मी’ हा ब्लॉग सुरू केला. मासिकांत, वर्तमानपत्रांत लेखन करायला सुरूवात केली. त्यावेळी अनेकांचे फोन आले आणि अनेकांनी तुम्ही शेअरमार्केटविषयी पुस्तक का लिहित नाही अशी विचारणा ब्लॉगवर केली. त्यातूनच या पुस्तकाची कल्पना साकार झाली.
मी स्वतः मार्केटमध्ये १४ वर्षे व्यवहार करीत असल्याने या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक लेख हा माझ्या अनुभवातून साकारलेला आहे. मार्केटमध्ये सतत बदल होत असतात. नियम, प्रक्रिया, दर सतत बदलत असतात. नवनवीन गोष्टी काही वेळ वाचविण्यासाठी तर काही गुंतवणूकदारांच्या रक्षणासाठी अंमलात आणल्या जातात. परंतु प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याचा शेअर्सच्या खरेदीविक्रीच्या संबंधात करायचा विचार या दृष्टीने या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. जास्तीतजास्त सोप्या भाषेत मांडणी केली असल्याने मराठी बोलणाऱ्या आणि अगदी इंग्लिश येणाऱ्या सुशिक्षित गुंतवणूकदारांनाही याचा उपयोग होईल. तसेच या पुस्तकातील माहिती वाचून नवीन गुंतवणूकदार शेअर मार्केटकडे आकर्षित व्हावेत हा हेतू आहे. नुसते शास्त्र शिकवण्याचा उद्देश नसून व्यवहारात या ज्ञानाचा, माहितीचा उपयोग करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग म्हणजे हे पुस्तक होय.