दिवाळी संपली.. आता मार्केटकडे परत वळायला हरकत नाही, नाही का?
तर आधी मार्केट चे काही साधेसे मुलभूत नियम :
- शेअरमधून पैसे कमवायचे तर शेअर खरेदी-विक्री करायला हवेत
- ते करताना योग्य किमतीला खरेदी-विक्री होतीये हे लक्षात ठेवायला हवचं
- योग्य किंमत कळण्यासाठी त्या शेअरच्या नेहेमीच्या किमतीची किंवा भावाच्या रेंज ची कल्पना हवी
माझा थोडा प्रोब्लेम झाला तो या शेवटच्या मुद्द्यावर. आता हि किंमत कळणार कुठून? शेअरचे रोजचे भाव आणि त्यातला बदल समजणार कसा? आणि जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत मी शेअर विकणार कसे? आजच्या भागात याचबद्दल सांगणार आहे मी.
सर्वात पहिलं उत्तर सापडल ते यजमानांकडून – ‘ पेपर मध्ये येतात कि शेअरचे भाव ’ .. उत्तर तसं बरोबर होतं पण पेपर चुकीचा होता. सांगायचा मुद्दा असा कि आमच्या कडे त्याकाळी यायचा लोकसत्ता आणि लोकसत्ता मध्ये शोधून काही शेअरचे भाव दिसले नाहीत. मग काय तर , पेपर बदलला. इकॉनॉमिक टाईम्स मध्ये शेअर्स चे कालचे भाव येतात असं लक्षात आलं. आता मार्केट म्हटलं कि भाव हे कायम बदलणार हे आलचं पण रोजचे भाव बघून थोडा अंदाज बांधता येत होता.
थोड्या दिवसा नंतर असं पण लक्षात आलं कि सगळ्या शेअर चे भाव काही पेपर मध्ये येत नाहीत. तब्बल ६००० शेअर्स ची उलाढाल मार्केट मध्ये होतं असते , पण त्यात सतत उलाढाल ज्या शेअर मध्ये होते त्यांचेच भाव रोजच्या रोज समजतात. माझा पेपर बद्दल एक वेगळा प्रोब्लेम होता आणि अजूनही आहे. पेपर ची जागा वाचवण्यासाठी कि काय पण अक्षर हे लोक अगदी लहान ठेवतात. डोळे धडधाकट असलेल्या माणसाला पण वाचायला कठीण ते , माझ्यासारख्या ५० वर्षाच्या बाईच्या डोळ्यांना काय दिसणार !!
तसे अजून दुसरे मार्ग आहेत किंवा होते म्हणा. इंटरनेट वरून ज्या पाहिजे त्या शेअरचे भाव कळू शकतात पण त्यासाठी कॉम्पुटर यायला पाहिजे 🙂 . त्या काळात कधी वाटलं नाही कि कॉम्पुटर निरक्षरता वगैरे काही प्रोब्लेम्स निर्माण होतील म्हणून.. त्यामुळे कॉम्पुटर काही शिकलेला नव्हता. आता थोडा थोडा शिकतीये. पण त्या वेळी इंटरनेट चा मार्ग तसा बंदच होता म्हणाना..
अजून एक सोपा मार्ग म्हणजे दूरदर्शन.. टीव्ही हो .. तेव्हा १-२ वाहिन्या होत्या ज्या फ़क़्त शेअर मार्केट बद्दल चालायच्या. आजकाल तश्या पैश्याला पासरी आहेत. या वाहिन्यांवर स्क्रीन च्या खालच्या बाजूला सतत शेअर चे भाव दाखवत असतात. मार्केट वाले लोक त्याला ‘टिकर’ म्हणतात. त्यात काही शेअरचे भाव कळतात..
अगदी कुठूनही भाव कळले नाहीत तर ब्रोकर कडे फोनकरून नक्की कळतात. पण तेव्हा कुठल्या शेअर चा भाव माहित करायचा आहे हेच ठरत नव्हतं आणि तसं ब्रोकर बरोबर इतकं तंत्र जुळलेल नव्हतं. त्यामुळे तेंव्हा तरी हा मार्ग आमच्या साठी खुला नव्हता.
काहीतरी करून भावाचा प्रश्न सोडवता येईलच हे नक्की होतं पण तो भाव योग्य आहे हे अजून ठरवता येत नव्हतं. आता ते ठरवायचं म्हणजे आजपर्यंतचा सर्वात जास्त भाव किती होता, कोणत्या कालावधीत कोणता शेअर वाढतो, आजपर्यंतचा सर्वात कमी भाव किती होता हे सगळं माहिती असायला हवं.
ते कसं शोधून काढलं ते पुढच्या भागात सांगते.. तो पर्यंत जमलं तर एक काम करा, इकॉनॉमिक टाईम्स नसेल तर एक दिवस घेवून या आणि बघा कळतंय का काही शेअरच्या किमतीबद्दल. बघा तुमच्याकडे असलेल्या शेअर ची किंमत शोधता येते का तुम्हाला..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा