तर भाव कसा कळणार याचं उत्तर तर मिळालं … पण प्रश्न तिथे संपत नव्हता. नुसता भाव माहित करून चालणार नव्हतं. विकायला योग्य भाव कुठला? हे कसं कळणार?? आता तुम्ही म्हणाल कि त्यात काय मोठं !! ज्या भावाला शेअर विकत घेतला त्या पेक्षा जास्त भाव असला कि विका … मला पण आधी तसच वाटलं पण तसं नव्हतं. का ते आधी सांगते. काही मुद्दे आता मी सांगणार आहे, त्याचा विचार करा. कारण याच मुद्द्यांवर आजचा भाग आधारित आहे
- शेअर मार्केट मध्ये शेअर विकायची किंवा खरेदी करायची जबरदस्ती नसते
- शेअरचा भाव हा रोज बदलत असतो आणि तो थोड्या वेळात जास्ती किंवा कमी होवू शकतो
- मार्केट मधून पैसे कमवायचे असतील तर शेअर विकायलाच हवेत. जो पर्यंत तुम्ही विक्री करत नाही तो पर्यंत नफा किंवा तोटा फ़क़्त कागदोपत्री…
- ‘योग्य भाव’ हि संकल्पना माणसामाणसा बरोबर बदलणारी. त्यामुळे जो भाव मला कमी वाटेल कदाचित दुसऱ्यालाच जास्ती वाटेल किंवा उलटहि होवू शकतं
- शेअर च्या भावावर तुमचा काही कंट्रोल नाही पण शेअर कधी/ किती/कोणत्या भावाला खरेदी करायचे किंवा विकायचे हे तुम्ही ठरवू शकता
- तुम्ही जरी ठरवलं तरी त्या भावाला तुम्हाला शेअर मिळतील किंवा तुमचे शेअर विकले जातील कि नाही हे मार्केट ठरवत असतं
त्याकाळी माझा प्रश्न शेअर खरेदी करण्याचा नव्हता. मी सांगितल ना तुम्हाला कि मला रद्दीतून पैसे कमवायचे होते. त्यामुळे मला आधी माझ्याकडे होते ते शेअर विकण्यासाठी योग्य भाव कुठला हे माहिती करून घ्यायचं होतं. इथे येतो पहिला मुद्दा , मला शेअर विकायची जबरदस्ती नव्हती किंवा कोणतीही शेवटची तारीख नव्हती. मला पाहिजे तितका वेळ मी थांबू शकत होते आणि पाहिजे तितकी माहिती काढून घेवू शकत होते. तशी मला स्वता:ला घाई होती पण ती वेगळ्या कारणामुळे. हे शेअर मार्केटचं लचांड चालू करून खूप दिवस झाले होते आणि अजून पैसे काही उगवले नव्हते. मला उगाच दडपण वाटत होतं.
असा विचार करा कि तुम्ही मार्केट मध्ये गेलाय, आणि तुम्हाला कांदे घ्यायचे आहेत. तुम्हाला असं लक्षात आलं कि आज कांदे खूप महाग आहेत. पुढे काय कराल? तुमच्याकडे २ पर्याय असतील, एक तर कांदे विकत घ्या किंवा नका घेवू. आता जर तुमच्या घरी कांदे संपले असतील आणि तुम्ही आज काही बेत केला असेल तर तुम्हाला खरेदी करावीच लागेल. पण जर तुम्हाला कांद्याशिवाय चालवता येत असेल तर?
तर कदाचित तुम्ही असं काहीतरी कराल, तुम्ही दुकानदाराला विचाराल कि ‘बाबा रे आज कांदे इतके महाग का?’. आता जर तो म्हणाला कि ‘वाहिनी कांदा आहे कुठे मार्केट मध्ये?, आता कांद्याचा भाव आसाच राहणार अजून १५-२० दिवस, त्यानंतर काही कमी झाला तर झाला’. तर तुम्ही कांदे विकत घ्याल , नाही का? पण आता जर तो असं म्हणाला कि ‘ या आठवड्यात जरा माल कमी आलाय, ४-५ दिवस थांबा होईल भाव कमी’ , तर तुम्ही कदाचित थांबाल , नाही का?
या सगळ्यात महत्वाचा मुद्दा कि कांदे साठवून ठेवता येत नाहीत जर ते साठवून ठेवता येत असते तर तुम्ही पुढच्या आठवड्यात जाऊन १० किलो कांदे कमी भावाला घेतले असते!! अजून एक मुद्दा असा कि कांद्याशिवाय जेवण बनवणं थोडं मुश्कील आहे :). हे शेवटचे दोन मुद्दे शेअर मार्केट थोडं कठीण करतात. माझ्या कडे जे ३-४ पडीक शेअर होते, ते वर्षानुवर्ष तसेच होते, आणि मी जर विकले नसते तर वर्षानुवर्ष तसेच राहिले असते. त्यामुळे ते कधी विकायचे आणि किती भावाला विकायचे हे मलाच ठरवायला लागणार होतं.
आज जर मला विचारलात तर मी तुम्हाला घडाघडा ‘या शेअर चा yearly high, yearly low, average, stop loss’ वगेरे सांगून एकदम मस्त सल्ला देईन. पण त्या काळी इतकं काही कळत नव्हतं. माहित होतं ते इतकचं कि आपण शेअर इतक्याला, इतके वर्ष आधी घेतले आहेत, आजच्या घडीला त्यांचा भाव इतका आहे. त्यामुळे मला स्वत:चं असं काही तरी गणित मांडायला लागणार होतं. ते कसं जमवलं ते पुढच्या भागात सांगतेच..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा