मला माझ्या कोड्याचे उत्तर शोधायचं होतं आणि ते पण लवकर. शेअर विकायचे ते कोणते आणि कोणत्या भावाला ? मी माझी शेअर्सची यादी घेवून ऑफिसमध्ये जावू लागले. एक दिवस माझ्या बाजूला एक ग्रुहस्थ बसले होते. त्यांची आणि माझी तशी तोंडओळख झाली होती. ते सिरीयस वाटले आणि का कोणास ठाऊक पण ते माझी मस्करी करणार नाहीत असं वाटलं.
तेव्हा मी त्यांना माझी यादी दाखवली आणि विचारलं
“कि तुम्हाला काय वाटतं कि यापैकी कोणते शेअर्स विकावेत व कोणते शेअर्स विकू नयेत?”
त्यांनी माझ्या तोंडाकडे पाहिलं आणि शेअर्सच्या यादीवर नजर टाकून म्हणाले
“मला जेवढ मोडकतोडक समजत तेवढ्या खुणा केल्या आहेत”
• अ – खूण केलेले शेअर्स ब्लू चीप आहेत. हे शेअर्स आयुष्याची ठेव म्हणून राहिले तरी चालतील.
• ब – खूण केलेले शेअर्स मध्यम प्रतीचे आहेत .तुम्हाला भाव योग्य वाटला कि विकून टाका .
• क – खूण केलेले शेअर्स मात्र ताबडतोब विका, पुन्हा घेवू नका.या शेअर्सचा भरवसा नाही.
मग म्हणाले “पण भावाचा प्रश्न मात्र तुमचा तुम्हीच सोडवा. तो सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवा”
• तुमचा खरेदीभाव
• तुमची गरज
• तुम्हाला हवा असणारा फायदा
• तुम्ही किती काळ शेअर्स ठेवू शकता म्हणजेच holding capacity
अजून एक गोष्ट सांगतो म्हणाले –
“ तुम्ही घर खरेदी केलत तर त्याच्या किमतीत registration charges, stamp duty मिळवता कि नाही? तसच शेअर्सच्या बाबतीत करा. शेअरच्या खरेदीभावात ब्रोकरचं commission वगैरे आणि तुम्हाला हवा असणारा फायदा मिळवा म्हणजे तो विक्रीभाव होईल. पण हाच भाव मिळेल असे मात्र नाही. कदाचित जास्त किवा कदाचित कमी मिळेल. रोजच्या रोज लक्ष द्या . भाव वाढतो आहे का ते पहा. नंतर थोडे-थोडे शेअर्स विका. समजा २५ शेअर्स १०० रुपयाला २५ शेअर्स ११४ रुपयाला १० शेअर्स १२० रुपयाला १० शेअर्स १३० रुपयाला असे छोट्या छोट्या lot मध्ये विकले तर सरासरी भाव चांगला मिळतो. भांडवल निघालं कि धोका टळतो मग उरलेले सावकाश विका ”
मग त्यांचा चेहेरा एकदम खुलला. म्हणाले कि “आज मी तुम्हाला एक गुरुमंत्र देतो. जोपर्यंत शेअर मार्केटमध्ये आहात तोपर्यंत लक्षात ठेवा.”
मी एकदम लक्ष देवून ऐकू लागले.
“भांडवली बाजारात पहिले भांडवल सुरक्षित करा.” त्यावेळी मला तितका अर्थ कळला नाही पण नंतर लक्षात आला. आणि खरच सांगते तुम्हाला कि आजपर्यंत हा गुरुमंत्र मला उपयोगाला येतो. ते पण तुम्हाला सांगायचाच आहे पण नंतर.
माझ्याजवळचे शेअर्स (म्हणजे माझ्या यजमानांनी १० वर्षापूर्वी घेतलेले शेअर्स) IPO मध्ये घेतलेले असल्याने जादाचा खर्च किंवा वरखर्च अजिबात आला नव्हता. (पुढील पोस्टमध्ये IPO म्हणजे काय त्यात खरेदी केल्यास होणारे फायदे किंवा तोटे याची चर्चा करूच). १० वर्षे पैसे अडकल्याने १० वर्षांचे मुदत ठेवीवर जेवढे व्याज मिळेल तेवढे मिळवून विक्रीचा भाव ठरवला. त्यापेक्षा जास्त रक्कम ते शेअर्स विकून मिळायला हवी होती. ही अपेक्षा पूर्ण होईल असे ४-५ कंपन्यांचे शेअर्स माझ्याजवळ आहेत असं मला जाणवलं. एका शेअरमध्ये भरपूर फायदा मिळू शकत होता, मग ते विकायचे ठरलं.
मी दोनतीन दिवस ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जावून भाव विचारताना आणखी एक गोष्ट लक्ष्यात आली. आपल्याला जे शेअर्स विकावयाचे आहेत ते खरेदी करणारेसुद्धा शेअर मार्केटमध्ये कोणीतरी हव. जेवढ्या शेअर्ससाठी खरेदी करणारे असतील तेवढेच शेअर्स विकले जातात. असच एक दिवस ऑफिसमध्ये बसले होते तेव्हा कुठून तरी आवाज आला
“आज ३६५ शेअर १७ रुपये भावाने विकले जातील. विकायचे का बोला?” विकायचे असतील तर तुमचा नंबर सांगा”
तो आवाज काकांचा होता. मी एकदम हुरळून गेले. माझी बोहोनी होणार अशी चिन्ह दिसत होती . पण काकांना नंबर कसला हवा होता ते काही कळायला काही मार्ग नव्हता.
मी म्हटल “ अहो काका , आता हा कसला अजून नंबर”
काका म्हणाले “ अहो trading account नंबर.”
मी सांगितलं कि मी असला काही account उघडलेला नाही . त्यानंतर काकांनी माझ्या उत्साहाच्या फुग्याला टाचणीच लावली.
म्हणाले “ तो उघडल्याशिवाय तुम्ही शेअर्स विकू शकणार नाही”
मग काय, चार पावलं पुढे गेलेली मी तीन पावलं मागे आली. मुकाट्याने trading account उघडण्यासाठी फार्म घेतले. trading account उघडण्याची खटपट करू पण आता पुढच्या भागात.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Pingback: भाषा मार्केटची आणि मजा माझी !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग १६ – भाव तिथे देव पण माझा कुठला भाव आणि माझा कुठचा देव | Stock Market आणि मी
Pingback: भाग ५१ – एक ‘IPO’ , बारा भानगडी ! | Stock Market आणि मी
Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५ | Stock Market आणि मी