भाग २१ – उघडले स्वर्गाचे (मार्केटचे) चे दार !!
मार्केट केव्हा उघडतं व कसं उघडतं या गोष्टीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एका प्रश्नाचं उत्तर मी CNBC वरून शोधलं. स्क्रीनवर ‘उलटी गिनती’ चालू होती. खालच्या बाजूच्या चौकोनात किती वाजले हे दाखवत होते. वाजले होते ९-३० व मार्केट उघडण्यास ३० मिनिटे शिल्लक होती. त्यावरून मार्केट १० वाजता उघडतं हे कळलं. हल्ली मार्केट ९-१५ ला उघडतं. ९.०० ते ९.१५ या वेळेत प्री-ओपनिंग (एस. एस. सी ची जशी पूर्व परीक्षा असते तसा) प्रकार सुरु झाला आहे.
आता उरलासुरला प्रश्न मार्केट कसं उघडतं याचा. माझ्या मनात अनेक विचार आले. उत्सुकता शिगेला पोहोचली.
मार्केट कसं उघडत असेल??
शाळेसारखे कि काय घंटा वाजणार , प्रार्थना होणार, नंतर शाळा सुरु होणार??
कि भाजी मंडईप्रमाणे? विकणाऱ्या बायका पुरुष माल घेवून येणार, पाणी शिंपून तयारी करणार, खरेदी करणारे भाव विचारून घासाघीस करणार, भाव पटला नाही तर पुढे निघून जाणार?
कि दुकान उघडतं त्याप्रमाणे विश्वासू कामगार कुलूप काढणार, शटर उघडणार, साफसफाई झाल्यावर सुरु??
किवा हिरवा सिग्नल दिसल्यावर गाडी येते त्याप्रमाणे काहीच कळत नव्हतं!!
मी आमच्या घरमालक आजीना (आम्ही त्यांना ताई असे म्हणतो.) नमस्कार करायला गेले. त्यांनी हातावर साखर दिली. म्हणाल्या
” यशस्वी हो!. मी मुंबई सगळी पालथी घातली आहे. दलाल स्ट्रीट म्हणून भाग आहे तीथे BSE मध्ये शेअर्सची ओरडून ओरडून लीलावासारखीच खरेदी विक्री चालते. लंब्या चौड्या वहीत बघून काहीतरी सांगत असत. तसचं आहे का हल्ली?”
‘मला पण माहित नाही, बघते’ असे सांगून मी निघाले.
ऑफिसमध्ये पोहोचले. काका आले होते. त्यांना म्हणाले
“आज मी मुद्दाम वेळात वेळ काढून मार्केट कसं उघडतं हे बघायला आलीये. कसं हो उघडतं मार्केट.?
काका म्हणाले
” मार्केट म्हणजे क्रिकेटची match बघा. सामन्याला जशी सुरुवात होते तशीच मार्केटची सुरुवात होते. आधी ग्राउंड कसं आहे; बॉल वळेल कि नाही; कोणत्या बोलरची बोलिंग चालेल ह्या सगळ्याची चर्चा होते. नंतर पंच येतात,नाणेफेक होते. मग BAT हलवत फलंदाज येतात आणी पहिला बॉल टाकला जातो. फ़क़्त मार्केटचं pitch वेगळ आणि match पण वेगळी. पण सगळं मीच सांगितल तर तुम्हाला काय मजा येणार? बसा आणी प्रत्यक्ष बघा मार्केट कसं उघडतं ते”
ऑफिसमधल्या लोंकाचे रोजचेच रुटीन चालूच होतं . अविनाश म्हणाला
” तुम्हाला काही समजत नसेल तर मला विचारा. तुमची सुरुवात आहे म्हणून तुम्ही गोंधळला आहात. अहो तिसरी चौथी शिकलेली माणसे सुद्धा व्यवस्थित ट्रेडिंग करतात.”
डोळे व कान उघडे ठेवून मी लक्ष देवू लागले . लोक लगबगीने येत होते. वेगवेगळ्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या ओर्डेर्स त्यांना हव्या असलेल्या भावाला देत होते. एका BOLT वर अविनाश आणि दुसरया BOLT वर अमित काम करत होता.
आपण स्कूटरसाठी, कारसाठी order नोंदवतो तेव्हा आपल्याला त्याची नोंद मिळते. पण इथे सगळं computerवरच होते. नाव आडनावाची गरज नव्हती. प्रत्येकजण आपला ट्रेडिंग अकौंट नंबर सांगत होता. इथे ट्रेड पूर्ण होण्याआधी आपल्याला order बदलत येते असही कळलं. शेअर्सची संख्या, भाव बदलाता येतो किवा ओर्देर पूर्णपणे रद्द करता येते हे हि लक्ष्यात आलं.
“शेअरमार्केटमध्येच आपण आपल्याला हव्या त्या भावाला खरेदी किवा विक्री करू शकतो असेच आहे का रे अविनाश?”
तो म्हणाला “तो भाव स्क्रीनवर दिसायला हवा ना ! अहो थांबा दोन सेकंदात मार्केट चालू होईल.”
बर ते जावू द्या! दोन सेकंद जातात न जातात तोच घंटा वाजली . मला खूप मजा वाटली. खरोखरीच आपल्याला घंटा ऐकु येते तशीच . माझ्या देवाच्या मंदिराचे दार उघडले असेच म्हणावे लागेल . मार्केट उघड्ण्याआधीच्या screenवरच्या स्थिर किमती हळू लागल्या. शेअर्सचे भाव बदलू लागले. संगणकावर तळाला एक पट्टी फिरू लागली . ज्यांच्या ज्यांच्या ओर्डरस पूर्ण झाल्या त्यांचे नंबर त्यापुढे खरेदी असेल तर निळ्या रंगात व विक्री असेल तर लाल रंगात दिसू लागले. अविनाश व अमित हजर असलेल्या माणसाना सांगू लागले आणि जे हजर नव्हते त्यांना फोनवरून सांगू लागले.प्रत्येकाच्या ओर्डरच्या निकालाविषयी ! त्या दिवशी मार्केट तेजीत होते BSE व NSE चे निर्देशांक सतत वाढत होते. या निर्देशांकाविषयी पुढच्या भागात सांगते.
काका म्हणाले ” Madam तुमचा पायगुण चांगला आहे. गेला आठवडाभर मार्केट मंदीत होते. असेच मार्केट तेजीत राहणार असेल तर आम्ही तुम्हाला पुढे बसायला जागा देवू. ”
अविनाश म्हणाला ‘आता बोलताना तुम्ही बसल्या आहांत हे लक्ष्यात ठेवूनच बोलायला लागणार.’
मी थोड्याश्या रागातच म्हणाले “असे का म्हणता हो मी तुमचं काय घोडं मारलय?.”
“अहो तसे नाही madam आता काय तुमच्यासमोर शिव्या देवून बोलणार कि काय 🙂 ? चला ते सगळं नंतर बघू. बोलता बोलता लक्ष राहिलं नाही तर घाटा होईल.”
मीसुद्धा माझे शेअर्स स्क्रीनवर पुढे आणून घेतले. माझा ट्रेडिंग अकौंट नंबर आला नव्हता त्यामुळे फ़क़्त निरीक्षणच! पण एक गोष्ट मात्र नक्की झाली . माझ्या नवीन नोकरीची वेळ ठरली ती म्हणजे सकाळी १० ते दुपारी ३-३०:) . शनिवार रविवार सुट्टी कारण त्या दिवशी मार्केट बंद असेत. आता आपली भेट पुढील भागात.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा