भाग १९ – गोंधळ मांडीला ग मार्केटचा गोंधळ मांडीला !!!

गेल्या भागात सांगितलं तसं काका आणि ४ कप चहा यांच्या मदतीने trading account अध्याय संपवायचा प्रयत्न चालू होता.
“तुमचे चार चहा माझ्यावर उधार.” असं सांगून काकांचा निरोप घेतला. जास्तीचे forms घेतले आणि घरी आले.
घरातल्या कामापासून सुटका नाहीच. गृहिणीच ना मी ! फार्म ठेवले बाजूला. घरातले कामं पटापट आटपावी   आणि forms वाचावेत असं ठरवलं. संध्याकाळी माझे यजमान घरी आल्यानंतर त्यांना सगळा वृतांत कथन केला. चहापाणी झाले. नंतर माझ्या यजमानांनी forms भरले आणि मी सह्या केल्या. दुसर्या दिवशी यजमानांचा टिफिन, मुलांचं खाणपिण झाल्यानंतर मी भरलेले forms घेवून ऑफिसमध्ये गेले. अविनाशनी  forms वर नजर टाकली. दोन तीन ठिकाणी सह्या राहिल्या होत्या मी पुन्हा घरी आले. यजमान घरीच होते. त्यांना आज ऑफिसला उशिरा जायचे होते. त्यामुळे जिथे सह्या राहिल्या होत्या त्या घेतल्या .
पुन्हा ऑफिसमध्ये दाखल झाले. अविनाश म्हणाला की introducer ची सही राहिली होती. त्याने काकांकडे बोट दाखविलं आणि म्हणाला” घ्या त्यांच्याकडून”.  काकांची introducer म्हणून सही घेतली आणि forms दिले .
काका म्हणाले “पाच सहा दिवस लागतील Trading Account नंबर मिळायला.”
मी विचार केला आता घरी जावूनही काही मला महत्वाचं आणि तातडीचं काम नाही . तेव्हा आज ऑफिसमध्ये मार्केटची वेळ संपेपर्यंत येथेच बसून आपल्या ज्ञानात काही भर पडते का ते पाहू .
ऑफिसमध्ये पंधरा वीस माणसं होती . ती आपापसात काहीतरी बोलत होती. मला काही समजत नव्हतं. TV चालू होता. CNBC channel चालू होता. पण गोंगाट एवढा की TV वरचं काही ऎकु येत नव्हतं. कॉम्पुटर वरचं काही दिसत नव्हतं. डोळे असून आंधळेपणा आला होता. दोन सोडून चार डोळे असून उपयोग नव्हता. माझी डाळ मलाच शिजवून घ्यायला लागणार होती.
मी माझ्या बाजूला असलेल्या गृहस्थांना म्हंटलं “थोडे सरकून बसता का? म्हणजे मलाही  दिसेल”
कर्णिक म्हणाले “ तुम्हाला दिसत नसेल तर डोळ्यांचा नंबर बदललेला असेल”. त्यांचं नाव कर्णिक ही माहिती मला नंतर अविनाशनी दिली. असे बरेच लोकं भेटले मार्केटमुळे. त्यातली बरीचशी पात्र आपल्या गोष्टीमध्ये येणारच आहेत. येतील तेव्हा सांगीनच त्यांच्याबद्दल.
मी जेव्हा शेअर मार्केटचा विचार सुरु केला होता तेव्हाहि शेअर मार्केट विषयी क्लासेसबद्दल, पुस्तकांबद्दल चौकशी केली होती. आज वाटलं पुन्हा चौकशी करावी कारण ही सगळी माणसं शेअर्समध्ये व्यवहार करणारी आहेत म्हणजे त्यांना अचूक माहिती असेल.
मी कर्णिकांनाच विचारले “मार्केट शिकण्यासाठी काही पुस्तकं किवा क्लासेस आहेत का? म्हणजे मग कोणाचे उपकार नकोत”
“पुस्तक?? क्लास?? म्हणजे शिकवणी??” अख्या ऑफिस मध्ये हशा पिकला.
“पुस्तकात वाचून किवा क्लासला जावून कुणी मार्केट शिकलय का? आम्हाला तरी माहित नाही हो madam!!” कुणीतरी मागून ओरडलं..
जरा ओशाळल्यासारख झालं खरं पण उसनं अवसान आणून मी म्हणाले  “अहो असे का  हसता ? पूर्वी स्वयंपाक आईकडून , सासूकडून  आजीकडून  शिकावा लागे .पण आता रुचिरा अन्नपूर्णा अशी पुस्तके आहेत की !! म्हणून मी विचारले.”
मग काका मध्ये पडले. “ BSE (Bombay Stock Exchange) मध्ये पंधरा दिवसांचे लहान लहान कोर्स चालतात. तुम्ही चौकशी करा हवी तर, सर्वांनाच उपयोग होईल.”
एवढ होईपर्यंत बारा वाजून गेले . अविनाश म्हणाला “तुम्ही डबा आणलाय का? कि घरी जाणार आहात?. आमच्याबरोबर येता का आमच्या डब्यातला मासला घ्यायला? का मार्केटनीच पोट भरलं तुमचं ?”.
मी म्हटले “तुम्ही जेवा “. सगळे जेवायला गेले पण आमच्या ऑफिसचा शिपाई दीपक मात्र मुंबईला जाण्यास निघाला.  तेवढ्यात एका माणसाचा call आला त्याला range मिळत नव्हती म्हणून तो बाहेर गेला रे गेला आणि मी त्याची खुर्ची ढापली. त्यावेळी मार्केट तेजीत होतं, त्यामुळे माणसं जास्त आणि खुर्च्या कमी असा प्रकार असायचा आणि मी नवखी त्यामुळे तेव्हातरी खुर्ची ढापावी लागली.
ती खुर्ची जरा पुढे होती त्यामुळे अविनाश जेवून यॆइपर्यन्त कॉम्पुटरवर काय दिसतय ते बघायचा प्रयत्न चालू केला . कॉम्पुटरवर काही कंपन्यांची नावं होती. चार पाच रकान्यामध्ये काय काय आकडे होते. आमच्या घरी कॉम्पुटर होता आणि आजही आहे. पण प्रत्येक सेकंदाला त्या कॉम्पुटरवर  काही बदलत नाही. मला ते बदलते आकडे पाहून मजाही वाटली आणि उत्सुकताही वाटली. पण तिथे कुठेही माझ्या शेअर्सची नावं नव्हती.
अविनाश जेवून आल्यावर मी त्याला विचारले
“मला जे शेअर्से विकायचे आहेत ते कुठे बघायचे बाबा?  हा कॉम्पुटर आहे का काय आहे.”
“Madam हा कॉम्पुटरच आहे. पण याला  BOLT  म्हणजे ‘B . S .E ऑन लाईन ट्रेडिंग सिस्टीम’ असं म्हणतात.  शेअर खरेदी विक्रीची माहिती याच्यावर दिसते”
मग माझ्या शेअर्सची नावे कुठे आहेत त्यांचा भाव काय? अविनाशने माझे शेअर्स पाहून मला भाव सांगितला.
मला म्हणाला “तुम्हाला तुमचे हे शेअर विकायचेत आहेत का?  तसे असेल तर मी हे शेअर समोर घेतो.”
त्याने काहीतरी केलं आणि मला समोर गिनी सिल्क , HDFC ,कोणार्क SYNTHETICS असे सगळे शेअर्स दिसू लागले. HDFC चा भाव सारखा बदलत होता. मी अविनाशला विचारले  हे असे का ? तेव्हा तो म्हणाला HDFC ही  BLUE  CHIP कंपनी आहे . या मध्ये LIQUIDITY चांगली असते.VOLUME असतो. बाकीच्या कंपन्यात तसे नाही. कित्येकदा ट्रेडही  होत नाही.
तुम्ही जर कधी शेअरमार्केटच्या वाटेला गेला नसाल तर आता तुमच्या चेहेर्यावर जे भाव आहेत तेच माझ्या चेहेर्यावर त्यावेळी होते. माझी कापूसकांडयाची गोष्ट सुरु झाली.
“BLUE CHIP ,, LIQUIDITY, VOLUME , ट्रेडही होत नाही हे तू काय म्हणतो आहेस.ते मला समजत  नाही.”  तो म्हणाला “सांगतो थांबा जरा.”
तेवढ्यात दोन वाजले आणि चहा आला. एकजण म्हणाले “ घ्या चहा घ्या.. कुलकर्णींची मेहेरबानी..”
माझ्या डोक्यात गोंधळ उडाला होता पण माझ्या आजूबाजूला त्यापेक्षा मोठा गोंधळ चालू होता. कोणी cheque घ्यायला येत होते, कोणी cheque द्यायला येत होते कोणी statement मागत होते.समोरच्या टेबलावर वेगवेगळ्या forms चे गठ्ठे होते. लोक त्यातले forms घेवून जात होते. सारखे फोनवर फोन येत होते . बहुतेकजण शेअर्सची किमत विचारात होते.
आता सव्वातीन झाले. सगळ्यांची POSITION CLOSE करायची घाई सुरु झाली. साडेतीन वाजताची घंटा TV वर वाजली. मार्केट बंद झाले . बदलणाऱ्या किमती स्थिर झाल्या. आता उद्या मी BLUE CHIP ,VOLUME , LIQUIDITY ट्रेड होत नाही, POSITION CLOSE ही सगळी  कोडी उलगडून घेईन आणी तुम्हाला सांगीन. माझ्या शेअर्सच्या विक्रीमध्ये पुढे काय झालं तेही पाहू पुढच्या भागात.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

3 thoughts on “भाग १९ – गोंधळ मांडीला ग मार्केटचा गोंधळ मांडीला !!!

  1. Pingback: भाषा मार्केटची आणि मजा माझी !! | Stock Market आणि मी

  2. Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी

  3. Pingback: भाग १८ – गुढी उभारूया Trading Account ची !! | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.