Monthly Archives: April 2013

भाग २२ – गुढी उभारा मार्केटची आणि काळजी घ्या या १० गोष्टींची

This is a picture of the Gudi that is raised o...
आज गुढीपाडवा! साडेतीन मुहूर्तापैकी एक!! माझ्या आयुष्यातला फारच महत्वाचा दिवस. दहा वर्षापूर्वी गुढीपाडव्याला मला माझा trading account नंबर मिळाला आणि माझं सगळं आयुष्य बदलून  गेलं. गेल्या दहा वर्षात शेअरबाजारातील प्रवासात मला अनेक अनुभवातून जावं लागलं आणि बरंच शिकता आलं. काही गुरुमंत्र मिळाले, आजच्या या मुहूर्तावर मी तेच तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरु करूया
1.       अंथरूण पाहून पाय पसरा
आपल्याजवळ असणारे भांडवल, फायदा मिळेपर्यंत थांबण्याची तयारी, तोटा सहन करण्याची ताकत याचा अंदाज घेवूनच शेअर खरेदी करा म्हणजे अंथरुणाबाहेर पाउल कधी जाणार नाही.
2.       ऐका जनाचे, करा मनाचे
ब्रोकेरच्या ऑफिसमध्ये, वर्तमानपत्रात, नियतकालिकात, टी .वी . च्या विविध channelवरून येणारे सल्ले अभिप्राय व शिफारशी अवश्य वाचा. पण त्या वाचून आपण आपल्या अभ्यासावर आधारित निर्णय घ्या
3.       प्रयत्नांती परमेश्वर
सतत माहिती मिळवा. आळस करू नका .शेअर किमत वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याची कारण शोधा .त्यामुळे खरेदीविक्रीचा सौदा योग्य होऊन फायद्याचा परमेश्वर भेटेल.
4.       नवरा मरो नवरी मरो, दक्षिणेशी मतलब
खरेदी किवा विक्रीचा कोणताही सौदा तुम्हाला फायदेशीर असेल तरच करा. अनावश्यक सौदेबाजी टाळा.
5.       धीर धरी रे धीरापोटी, फळे असती रसाळ गोमटी
मार्केट पडत असेल किवा वाढत असेल तरी धीरानं निर्णय घ्या त्यामुळे कमीतकमी किमतीला खरेदी आणि जास्तीत जास्त किमतीला विक्री होऊन जास्तीत जास्त फायदा होईल .
6.       तिने घातली सरी म्हणून तुम्ही नका घालू दोरी
कोणताही मुद्दा प्रतिष्ठेचा बनवू नका. अंधानुकरण करू नका. कोणाशीही स्पर्धा किवा बरोबरी करू नका. स्वता:ला पचेल, रुचेल आणि झेपेल तितकच करा.
7.       थांबातर संपाल  
मार्केटचा व्यासंग सतत आणि पुरेसा हवा. त्यात खंड पडल्यास मार्केट तुम्हाला दूर फेकून पुढे निघून  जातं. येथे विलंब घातक ठरतो.
8.       हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे
अफवांवर विश्वास ठेवू नका आणि वावटळीप्रमाणे येणाऱ्या बातम्यांच्या मोहजालात फसू नका.
9.       कशासाठी? पैश्यासाठी!! फायद्याच्या गोष्टीसाठी !! शेअरच्या खरेदीविक्रीसाठी !!
शेअर मार्केटमध्ये भावना, आवड, हेवादावा या गोष्टींना स्थान नाही. फायदा मिळवून देणारा शेअर चांगला आणि ठेवण्यास योग्य. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा असे शेअर्स घेवू नका.
10.   अति तेथे माती
आपल्याला किती फायदा हवा हे शेअर्स खरेदी करण्यापूर्वीच ठरवा. अमर्याद फायद्याची वाट बघत बसाल तर नुकसान होण्याची शक्यता वाढेल.
हे मंत्र मी चांगलेच गिरवले. त्यातून माझ्या शेअरमार्केट ची गुढी दिमाखात उभी राहिली आहे. कशी ते सविस्तर सांगेनच पण ते पुढच्या भागात.पण इतकं मात्र नक्की कि हे मंत्र तुम्ही लक्षात ठेवलेत आणी आचरलेत तर तुम्हालाही यश मिळेल.
गुढीपाडव्याला संकल्प करा आणि नियमानुसार आचरण करा. लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल. तुमचा दिवाळीचा पाडवा आनंदाने साजरा होईल .देव तुम्हाला “अनंत हस्ते कमलावरांनी देता, किती घेशील दो करांनी” असे भरभरून देईल आणि तुमच्या आयुष्यात प्रसन्नता ओसंडून वाहील !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा