Monthly Archives: July 2013
भाग २९ – शेअर्स असो कि पाणी, नेहेमी खेळतं राहिलेलं बरं !!
HDFC बँकेचे लग्न तर लागलं.. अगदी थाटामाटात झालं.. आता संसार सुरु झाला..
माझ्या अकौंटवरचे शेअर्स तर विकले गेले. त्या DEMAT अकौंटसाठी असलेले INSTRUCTION स्लीप बुक पण घेतलं. पण मला स्लीप काही भरता येत नव्हती. मग ऑफिसमध्ये गेले आणि भरून घेतली. मी सही केली .
आधी सांगितलं तसं माझा DEMAT account फोर्टमधल्या DEMAT साठीच्या special branch मध्ये होता. त्यावेळी एक बरं होतं कि ऑफिस मधला एक शिपाई INSTRUCTION स्लीप घेवून जायचा. DEMAT चार्जेस भरण्यासाठी मी त्याच्याजवळ पैसे दिले. हे चार्जेस DEMAT अकौंटमध्ये खरेदी केल्येल्या किंवा विकलेल्या शेअर्सची नोंद करण्यासाठी आकारले जातात . या चार्जेसबद्दल नंतर सविस्तर सांगेनच.
INSTRUCTION स्लीप भरताना कार्बन टाकून २ कॉपी काढतात. वरची स्लीप DMAT account जेथे असेल ते लोक घेतात. कार्बन कॉपी तारीख असलेला शिक्का मारून स्लीप मिळाल्याची ACKNOLODGEMENT म्हणून परत देतात. स्लीपवर ज्या दिवशी स्लीप जमा करतो ती तारीख टाकतात .
मी स्लीप दिली व ऑफिसमध्ये बसून राहिले .
HDFC बँकेचे शेअर्स चांगल्या भावाला विकले गेले होते आणि आता मला GINI SILK मिल्सच्या शेअर्सच्या मागे लागायचं होतं.
“गिनी” च्या शेअर्समध्ये LIQUIDITY, VOLUME कमी असे. आता मला इतक समजलं होतं कि आपली ओर्डर टाकण्याआधी मार्केटमध्ये बाकीच्या काय ओर्डर आहेत हे बघून घ्यायचं. त्या दिवशी १४ रुपयाच्या भावाला ४८९ शेअर्ससाठी कोणीतरी खरेदीसाठी ओर्डर टाकली होती. १३.८०ला १२५ शेअर्ससाठी खरेदीची ओर्डर होती आणि १३.५० ला ५० शेअर्सची खरेदी ओर्डर होती. हे सगळं बघितलं आणि मग इकडे तिकडे अनुभवी लोकांना विचारलं तेव्हां सगळ्यांचं असं मत पडलं कि “तुम्ही ४८० शेअर्स १४च्या भावानी विकायला ठेवू शकता . बघा तुम्हाला पटतय का?”
मला पण ते ठीक वाटलं आणि मी ४८०शेअर्स १४च्या भावाने विकायला लावले आणी बसून राहिले . ते शेअर्स अविनाशने स्क्रीनवर आणले पण किती तरी वेळ ट्रेड झालाच नाही . थोड्या वेळाने पाहिलं तर १४ च्या भावाची खरेदीसाठीची ओर्डर रद्द झाली होती आणि १२.१०च्या भावाने ५०० शेअर्ससाठी खरेदीसाठीची ओर्डर कुणीतरी लावली होती .
“ अविनाश हे बघ काय झाले ते ? ओर्डेर गायब झाली रे ! १४ची खरेदीसाठीची ओर्डर गेली कुठे रे ती?”
“तुम्ही जश्या खरेदीच्या ओर्डर बघून तुमची विक्रीची ओर्डर टाकली तेच त्या लोकांनी केलं. तुम्हाला जास्तीत जास्त किमतीत विकायचेत आणि खरेदी करणार्यांना कमीत कमी किमतीत घ्यायचेत. ओर्डेर बदलून बदलून कमीत कमी भावात , जास्तीत जास्त शेअर स्वस्तात खरेदी करण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा.
अहॊ, नेहमीचा व्यवहार आहे हा!”
“समजा पाऊस खूप पडतो आहे. विकणाऱ्याला घरी जाण्याची घाई झाली आहे . वस्तू किंवा माल टिकाऊ नाही अशावेळेस तो विक्रेता भाव कमी करतो . माल भरभर विकतो व घराचा रस्ता धरतो . त्यावेळेस आपल्यास स्वस्तात स्वस्त माल मिळतो . कधी कधी लोंकाची गरज ओळखून किमत वाढवली जाते . दिवाळी आली की साखरेचे भाव वाढतातच की !”
माझ्या ज्ञानात भर पडत होती !!
“बघा madam तुमचे HDFC बँकेचे शेअर्स विकले गेले आहेत . थोडेसं भांडवल जमा झालय. आता घाई करायचं कारण नाही . फक्त १४ऐवजी कोणी १५ च्या भावाला विकत घ्यायला तयार आहे का त्याच्या कडे लक्ष ठेवा. तसा या शेअर्समध्ये नेहमी ट्रेड होत नाही पण आज व्यवहार होताना दिसतो . सरकारतर्फे कापड उद्योगाला चालना देण्यासाठी काही सवलती देण्यात येणार आहेत अशी बातमी पसरली आहे . तुम्हीसुद्धा हळूहळू , धीर धरून, सबुरीने थोडे थोडे करून शेअर्स विकू शकता . आता तुम्ही ऑर्डर टाकली आहे न यापेक्षा जास्त काही करू शकत नाही . आता तुम्ही मार्केटकडे ध्यान द्या.”
मी मार्केट बघतच होते. ऑफिसमध्ये शेअर्समार्केटचे CHANNEL बदलून बदलून लावत होते . त्यामुळे माझ्या एक गोष्ट लक्ष्यात आली कि प्रत्येक CHANNEL वरच्या टिकरवर वेगवेगळे शेअर्स व त्यांचे भाव दाखवतात. अजुन एक गोष्ट जाणवली की काही शेअर्स NSE आणि BSE म्हणजेच NATIONAL STOCK EXCHANGE व BOMBAY STOCK EXCHANGE असे दोन्हीकडे असतात . त्यांचे दोन्ही EXCHANGEवरचे वेगवेगळे भाव दिसतात. HDFC बँकेचे शेअर्स दोन्ही EXCHANGESवर लिस्टेड आहेत . त्याच्या दोन्ही EXCHANGEच्या भावात रुपये २ते ३ चा फरक असतो. या फरकाचा पण लोक उपयोग करतात पैसे कमवण्यासाठी !! पण ते नंतर बोलूच…
मार्केट बघता बघता वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. माझे BOLT कडे लक्ष होतंच आणि टी. व्ही. वर काय सांगत आहेत तेही ऐकत होते . तेव्हढ्यात BOLT च्या तळाकडे असलेल्या टिकरकडे माझे लक्ष गेले . तेथे ऑर्डर पूर्ण झाली म्हणजेच ट्रेड झाला की खरेदी असेल तर निळ्या रंगात दिसते आणी विक्री असेल तर लाल रंगात दिसते . तेथे ४८०चा आकडा लाल रंगात दिसला मी अविनाशला विचारले ” माझे शेअर्स विकले गेले का ते बघ रे ” अविनाश म्हणाला “MADAM तुमचेच शेअर्स विकले गेलेत. याची सुद्धा INSTRUCTION स्लीप उद्या द्या! आता MADAM तुमची दिवाळी आहे. आज गिनी सिल्कमध्ये VOLUME आहे थोडे थोडे करून रोज विका आणी मोकळ्या व्हा. अशा शेअर्सच्या बाबतीत कायम सांभाळून रहा. शेअर्स असो कि पाणी, नेहेमी खेळतं राहिलेलं बरं !!”
मार्केटमध्ये असे गुरु आणि गुरुमंत्र बरेच मिळाले आणि त्याच शिदोरीवर हा प्रवास चालू आहे. प्रवासातला पुढचा टप्पा पुढच्या भागात !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग २८ – घर पहावं बांधून, लग्न पहावं करून आणि शेअर पहावा विकून !!
शेअरची वरात मार्केटच्या दारात वाट पहात उभी होती . वरात आली ,वरात आली असं म्हणताच होणारी धांदल गडबड आठवली .दुध पाणी पायावर,भाकरतुकडा ओवाळून आरती या सगळ्या गोष्टी झरझर डोळ्यांसमोर आल्या .पण ही लग्नाची वरात होती थोडीच ? हि वरात होती मार्केटची !!
‘पुनश्च हरी ओम’ असं म्हणत मी ऑफिसमध्ये जावून माझे HDFC बँकेचे शेअर्स ३६५च्या भावाने विकायला लावले. काल ३५५ च्या भावानी शेअर्स विकले गेले नव्हते त्यामुळे खरं पाहता मी ३५० चा भाव लावावायला हवा होता. कालच्या अनुभवातून काहीतरी शिकायला हवं होतं. पण मनुष्यस्वभावाला औषध नाही हेच खरं . मार्केट तेजीत दिसलं, म्हटलं पाहू या १० रुपये वरचा भाव लावून . तेवढ्यात अविनाशनी विचारलं “MADAM आज तुमची ओर्डर नाही टाकायची का? कि हार मानलीत इतक्या लवकर?”
“अरे बाबा टाकली !! आल्याबरोबर टाकली !! ‘गिनी सिल्क’ ची ओर्डर सुद्धा लावली . .” मी लगेच म्हणाले
तेवढ्यात अजून एक ओळखीचा आवाज आला. ऑफिसमध्ये जावून जावून माझी त्यांच्याबरोबर तोंडओळख झाली होती . ते गृहस्थ म्हणाले “madam मी तुम्हाला एक सुचवू का ?”
“सुचवा ना, काही हरकत नाही” असे मी म्हटल्यावर ते म्हणाले “तुम्ही दोन order टाका. ५० शेअर्स ३६५ भावाने आणि दुसरे ५० शेअर्स रुपये ३७० भावाने किंवा २५ – २५ शेअर्सच्या ४ Order ४ वेगवेगळ्या भावांना लावा . थोडे जास्त पैसे मिळतील.”
ही त्यांनी केलेली सुचना मला योग्य वाटली . मी अविनाशला ओर्डर बदलावयास सांगितली . ५० शेअर्स रुपये ३६५ भावाला, ५० शेअर्स रुपये ३७० भावाला विकावयास लावले. ४ – ४ Order टाकायच्या फांद्यात पडले नाही कारण मी मार्केटमध्ये नवीनच होते.
मग काय ? रोजच्यासारख ऐकण , पाहण , माहिती करून घेण, डोळे व कान उघडे ठेवून परीक्षण , निरीक्षण करत बसण, सगळं सुरु झालं. मार्केट सुरु होवून जेमतेम अर्धा तास झाला तितक्यात वीज गेली. AIR CONDITIONERS बंद… लाईट बंद.. ट्यूबलाईट बंद!! आम्ही खिडक्या-दारे उघडली . नुसती तारांबळ उडाली . ऑफिस मधले BOLT(BSE’S ONLINE TRADING ) म्हणजेच मार्केटसाठी असलेले खास संगणक तेवढे सुरु होते .
“हे संगणक कसे चालू रे अविनाश ?” तेव्हा तो म्हणाला “हे UPS आणी INVERTER च्या सिस्टीमवर चालतात . म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या BATTERYवर चालतात.”
ते आधीचे गृहस्थ म्हणाले “रात्रीसुद्धा ४ तास लाईट नव्हते .त्यामुळे चार्जिंग पुरेल की नाही कुणास ठाऊक !”
काका म्हणाले ” तुम्ही सगळे संगणक बंद ठेवा. सगळ्या ऑर्डर्स एकाच BOLT वर घ्या . २ च पंखे चालू ठेवा .म्हणजे चार्जिंग जास्त वेळ पुरेल.”
सगळीकडे फोन करून चौकशी केली तेव्हा समजलं की काहीतरी मोठा बिघाड झालाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज नाही . जशी जशी दुरुस्ती होईल तशी तशी वीज येईल . ३ ते ४ तास नक्कीच लागतील .
त्या गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे चार्जिंग संपत आले , वार्निंग बेल ऐकू येवू लागली . अरे बापरे आता आली का पंचाईत! १० मिनिटात आवरते घ्यावे लागेल . ऑफिस मधल्या लोकांनी पटापट शक्य झाल्या तेव्हढ्या ओर्डरS रद्द केल्या किंवा बदलल्या आणि संगणकांनी शेवटचा श्वास घेतला.
सगळ्यांना सक्तीची विश्रांती मिळाली . येणाऱ्या फोनना उत्तरे देणे एवेढेच काय ते काम ऑफिसमध्ये चालू होतं. मी थोडा वेळ बसले. पण नंतर विचार केला येथे नुसते बसून काय ज्ञानात भर पडणार आहे? त्यापेक्षा घरी जावू या. गहू निवडून दळण तरी टाकता येईल. तेव्हढ्यात जर लाईट आले तर परत येवू . घर जवळ असल्याने मी २ मिनिटात घरी आले .
लाईट येण्याचे चिन्हच नाही . गहू निवडून झाले. पण लाईट नाही तर पिठाची चक्की तरी कुठून चालणार ? मी बाहेरच्या खोलीत भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढू लागले तेव्हढ्यात पंखा सुरु झाला . सगळी सालं घरभर उडाली आणि माझं लक्ष घड्याळाकडे गेलं. ३ वाजून ५ मिनिटे झाली होती . मी घराला कुलूप लावले. ऑफिसकडे धावत सुटले . पहाते तो ऑफिसमध्येही लाईट आले होते . ऑफिसमधल्या सर्वानी एकच गोंगाट सुरु केला . मी सुद्धा माझं घोडं दामटलं. पण काही कळेना. ऑफिस मधल्या T.V. वर HDFC बँकेचा भाव रुपये ३७४ चा दिसत होता.
“अरे अविनाश माझे शेअर विकले गेले का ते विचार न जरा”
“३७४ चा भाव दिसतो आहे. म्हणजे तुमचे शेअर्स विकले गेले असतील नक्की !” त्याने सांगितले ” ३६७.५० च्या भावाला १०० शेअर्स विकले गेले तुमचे”
मला काहीच समजेना. मी ३६७.५० च्या भावाने विकावयास लावलेच नव्हते. मार्केट आहे कि मस्करी? तेवढ्यात अविनाश म्हणाला “घाबरू नका. तुमच्या दोन्ही Order पूर्ण झाल्या madam. त्याची सरासरी किंमत ३६७.५० येते”
मी डोक्यावर हात मारून घेतला . अविनाश म्हणाला ” तुमची बोहोनी झाली तरी आनंद झालेला दिसत नाही madam.”
“जरा डोकं लावल असतं तर माझे सगळे शेअर्स ३७२ ला विकले गेले असते त्यामुळे वाईट वाटतय.” मी म्हणाले
“ काय madam, अहो काल ३५५ च्या भावाने जाण्याऐवजी आज ३६७.५०च्या भावाने गेले हा फायदा नव्हे काय ? जास्त हाव बरी नव्हे madam. बर याचा चेक मात्र ४ दिवसांनी मिळेल . पण INSTRUCTION स्लीप मात्र उद्याच्या उद्या WORKING HOURS मध्ये तुमचा DEMAT अकौंट जेथे असेल तेथे नेवून द्या”.
अशा प्रकारे HDFC बँकेच्या शेअर्सची इतिश्री झाली!! शेवटी ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड नव्हे काय !
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग २७ – शेअरची वरात , मार्केटच्या दारात
आता चला माझ्याबरोबर . तुम्ही हवी असल्यास १ शेअर खरेदी करण्याची ओर्डेर टाकू शकता . मला मात्र शेअर्स विकून भांडवल गोळा करायचे आहे त्यामुळे मी आधी विकणार आहे . तुम्हाला आता पाठ झाले असेल . सांगा बरं मी कोणते शेअर्स विकणार? GINI SILKS आणी HDFC बँक.
मी ठरवूनच ऑफिसमध्ये गेले . आज सौदा करायचाच. नमनाला घडाभर तेल घालून झालं होतं आणि आता तेल वाहून जावयाची पाळी आली होती. HDFC बँकेचा भाव ३५० रुपये चालला होता. माझे शेअर्स IPO मधील होते . हे शेअर्स मला ‘AT PAR’ मिळाले होते ( IPO आणी AT PAR याचे अर्थ पुढील भागातून येतील.)
‘AT PAR’ म्हणजे १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर IPO मध्ये १० रुपयाला मिळतो . ‘AT PREMIUM म्हणजे शेअरच्या दर्शनी किमतीत premiumची रक्कम वाढवून येणाऱ्या रकमेला शेअर IPOमध्ये विक्रीला आणण्यात येतो . म्हणजेच आता AT १० रुपये premium शेअर असला तर १० रुपये दर्शनी किमतीचा शहरे २० रुपयाला दिला जातो . ‘AT DISCOUNT’ म्हणजे शेअरच्या दर्शनी किमतीतून “DISCOUNT ” वजा केला जातो . AT रुपये २ DISCOUNT म्हणजे १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर विक्रीसाठी IPO मध्ये ८ रुपयाला मिळतो . थोडक्यात PREMIUMची रक्कम शेअरच्या दर्शनी किमतीत वाढविली जाते आणी discountची रक्कम शेअरच्या दर्शनी लीमातीतून वजा केली जाते . हल्ली नजीकच्या काळांत “AT DISCOUNT ” IPO अभावानेच आढळतात .
मला “HDFC बॅंकेच्या शेअर्ससाठी फारच चांगला भाव मिळत होता . यापेक्षा जास्त भाव मिळेल की भाव कमी होईल याबद्दल ना कल्पना होती ना अक्कल !! मी रुपये ३५५ भावाने १०० शेअर्स विकण्यासाठी ओर्डेर लावली. ३५५ रुपयाचा भाव दिसत होता पण माझे शेअर्स विकले जाईनात तेव्हा माझा पुन्हा गोंधळ उडाला.
मी विचारल – “अविनाश माझे शेअर्स का विकले जात नाहीत बाबा?’
तो म्हणाला – “स्क्रीनच्या डाव्या बाजूला रुपये ३५२ चा भाव आहे . व उलट्या बाजूला ३५५रुपयाचा भाव आहे. हा हिशेब ध्यानात घ्या. म्हणजे दुसरया बाजूस असलेला माणूस ३५२ रुपयाला खरेदी करायला तयार आहे आणि ३५५ रुपयाला विकायला तयार आहे. Madam तुम्हाला विकायचे असले तर त्या भावाला दुसरा माणूस खरेदी करायला तयार हवा. त्यामुळे ३५२ रुपयाच्या भाव ३५५ रुपये होईल तेव्हा तुमचा नंबर लागला तर विकले जातील .
अविनाश म्हणाला ” आणि हो मार्केट बंद होण्याआधी तो भाव आला पहिजे. मध्येच मार्केट पडायला लागले तर भाव खाली सुद्धा जातो.
मी म्हणाले “शुभ बोल नार्या तर बोडक्या झाल्या सारया !! मार्केट पडेल असं का म्हणतोस बाबा?. तर म्हणतो कसा – ‘ अहो मार्केटच ते, भाव कमी जास्त होणारच. तुमच्या तालावर तुमचा नवरा नाचेल मार्केट नव्हे’.
ऐकूण काय माझी आजची बोहोनी उद्यावर गेली एवढ मात्र नक्की !
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा