२२-०७-२०१३ – गुरुपोर्णिमेचा दिवस. गेल्या गुरुपोर्णिमेपासून मी तुमच्याबरोबर गप्पा मारीतये. माझ्याबरोबर शेअरमार्केटमध्ये घेवून जातीये. मी माझी कथा आणि व्यथा आपल्यासमोर मांडतीये. १५-२०दिवसांच्या अंतराने आपण भेटतोय.
ब्लोग( BLOG) लिहीण्याचा माझा अट्टाहास अनेक महिलांनी शेअरमार्केटमध्ये यावे, ओळख करून घ्यावी यासाठी आहे. शेअरमार्केट आपलं आहे, आपल्यासाठी आहे, बाकी सगळ्या मार्केटप्रमाणेच या मार्केटमध्येही आत्मविश्वासाने वावरता येतं, मजा घेता येते हे समजावून द्यायचा प्रयत्न मी करतीये. त्याचबरोबर फसगत होऊ नये नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हेही सांगायचा प्रयत्न आहे.
पहिल्या ३ भागात – याचसाठी केला होता अट्टाहास , केल्याने होत आहे रे आणी प्रयत्ने वाळूचे – मी शेअरमार्केटमध्ये का शिरले हे सांगितल. शेअरमार्केट असो किंवा कोणतेही मार्केट असो विंडो शॉपिंगसाठी पैसे लागत नाहीत पण खरेदी करायची असेल तर पैसा हवा ,भांडवल हवं. हे भांडवल मी कसं उभ केलं हे सांगताना माझ्याजवळ असलेली शेअर्सची रद्दी उपयोगात आणण्यासाठी केलेली खटपट तुम्हाला सांगितली. सदैव सैनिका , असाध्य ते करता साध्य , येथे पाहिजे dematचे , नमनाला घडाभर तेल , आधी लगीन DEMAT चे, या पांच भागातून DEMAT अकौंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे , अकौंट उघडण्याची प्रोसीजर सांगितली .
निजरूप दाखवा , सरफरोशी, एक दिवस – या तीन ब्लोग मधून PHYSICAL फॉर्म मध्ये असलेले शेअर्स DEMATफॉर्ममध्ये आणण्यासाठी केलेल्या तडफडाटाचं वर्णन केलं. १२व्या भागामध्ये ब्रोकर कसा शोधला हे सांगितले . १३व्या भागामध्ये आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली . मुहूर्त ट्रेडिंगची मजा अनुभवली . भाव तेथे देव , कोणता भाव कोणता देव, माझा कुठला भाव आणी माझा कुठ्ला देव, शेअर कोणता विकावा या चार भागांमध्ये शेअर्सची किमत, ती कोठे पहावी , योग्य किंमत कोणती हे सगळं सांगितलं.
गुढी उभारू या, गोंधळ मांडला या ब्लोगमध्ये ट्रेडिंग अकौंट उघडण्याची प्रोसिजर व अकौंट उघडताना माझा झालेला गोंधळ तुम्हाला सांगितल्यानी बरं वाटलं. वळल नाही तरी, उघडले स्वर्गाचे दार, गुढी उभारा या तीन भागातून मार्केट समजावून घेण्याचा प्रयत्न केला.
भाषा मार्केट्ची – या भागात मार्केटमध्येच फेरफटका मारला , मार्केटच्या भाषेत बोललो. शुभ मंगल, ऑर्डर ऑर्डर, ऑर्डर ऑर्डर २ या भागात ऑर्डर कशी टाकायची आणि ऑर्डर टाकताना माझा उडालेला गोंधळ मी तुम्हाला सांगितला . शेअर्सची वरात, घर पाहावे बांधून, शेअर्स असो कि पाणी – या तीन भागात शेअर्स विकून भांडवल गोळा करण्याचा शेवटचा टप्पा व लागलेली हुरहूर नंतर झालेला गोड शेवट सांगितला
तुम्ही म्हणाल याचा आम्हाला काय उपयोग ? कोणता शेअर खरेदी करायचा ? कोणता विकायचा ? काहीच सांगितलं नाही ! तुमची गोष्ट आम्ही कशाला ऐकायची !
थोडसं थांबा , ज्यांनी अकौंट उघडले आहेत , ज्याना मार्केट्ची थोडीफार माहिती आहे, त्यांना शेअर्सची नावं सांगून (टीपा देऊन ) उपयोग होईल . पण ज्यांना ‘शेअर मार्केट’ हा शब्दही माहीत नाही त्यांना शेअर्सची नावंच कळणार नाहीत . जी बाई स्वयंपाकघरात कधी गेलेली नाही तिला ‘रेसिपी’ काय उपयोग? त्यामुळे प्रत्येकाची अडचण विचारात घेवून ब्लोग लिहीले . काही काही फोन येतात आजकाल, कोणी भेटायला येतात , वेगवेगळे प्रश्न विचारतात त्यावेळी त्यांना काय काय अडचणी येतात ते मला समजतंय. त्या अडचणीवर काय उपाय करता येयील ते आता मी पुढच्या वर्षी सांगणार आहे .
घरात निरुपयोगी पडलेल्या शेअर्सच्या रद्दीचा उपयोग मी भांडवल उभे करण्यासाठी केला . पण शून्यातून उभं रहायचं असेल तर स्वत:च्या वागणुकीतून स्वत:बद्दल विश्वास निर्माण करायला हवा. हा विश्वास कसा निर्माण करायचा ते पण सांगायचा विचार आहे. रुपये ५००० पासुन ५००००रुपये भांडवलापर्यंत कसे मार्केटमध्ये घुसता येईल हे येत्या वर्षी मी सांगणार आहे. त्याचबरोबर दर महिन्यामध्ये शेअरमार्केटमध्ये घडलेल्या घटनापण तुम्हाला सांगणार आहे .
धोके प्रत्येक ठिकाणी आहेत, पावलापावलावर आहेत ! अहो शॉक लागतो म्हणून विजेचा वापर करणे कोणी थांबवलय का? उलट वीज गेली तर आपण बोंब मारतो. कारण विजेचे फायदे आहेत त्यामुळे तिचा योग्य प्रकारे उपयोग करायला आपण शिकलो. तसच काळजी घेवून , धोके समजावून घेवून शेअरमार्केट मध्ये व्यवहार करू म्हणजे मार्केटचा पण उत्तम उपयोग करून घेता येयील.. गेल्या वर्षात आपण बरीच प्रगती केलीये.. आता माघार नाही !! मार्केटकडे हि वाटचाल चालू ठेवूया.. भेटूया पुढच्या भागात ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
mast information 🙂
Pingback: भाग २९ – शेअर्स असो कि पाणी, नेहेमी खेळतं राहिलेलं बरं !! | Stock Market आणि मी
Namaste mam,
Mi tumche he lekh aamchya gharatil sarvana vachayla sangitlet karan tyanchi shaer market khup chuklchi samjut ahe , ani asnarach karan te nokri ani fd ya palikade vchar karat nahit,
Ani gharatun support (mansik) aslyashivay mi kahi karu shakt nahi ….baghu. ….thanks
आपला अभिप्राय वाचला. आपल्याला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. अजूनही शेअरमार्केटबद्दल गैरसमजूत आहेच. ही गैरसमजूत दूर होण्यासाठी शेअरमार्केटकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. मार्केट पडते किंवा एखादा शेअर पडतो त्याचप्रमाणे मार्केट वाढते किंवा एखादा शेअर वाढतो याला कांरणे असतात. ती कारणेही योग्य आहेत असे अभ्यास केल्यावर जाणवते.कधी कधी एखाद्या गोष्टीचा परिणाम मात्र प्रमाणाबाहेर झालेला आढळतो. जसे आजारपणामध्ये काही माणसे मुकाटपणे सोसतात काही जण आरडाओरडा करतात. ही प्रतिक्रिया स्वभावावर अवलंबून असते. आजाराच्या तीव्रतेवर नाही. असेच मार्केट समजावून घेण्याचा प्रयत्न केल्यास गैरसमज दूर होतील.आणी घरातील माणसे संमती देतील तेव्हाच मार्केटमध्ये व्यवहार करा.