मी तुमच्या विनंतीला मान देवून माझी कथा अर्धवट सोडून “मागणी तसा पुरवठा’ या उक्तीप्रमाणे D-MAT अकौंट उघडण्याची प्रक्रिया ( ब्लोग नंबर ३१ ) मराठीतून खुलासेवार सांगितली. त्यानंतरच्या भागातून डेट्रेडविषयी स्पष्टीकरण केले. डेट्रेडसाठी तांत्रिक विश्लेषणाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.ज्यावेळी तांत्रिक विश्लेषण व मुलभूत विश्लेषण याविषयीची चर्चा येईल तेव्हा त्याबद्दल बोलूच.
आज मी तुम्हाला माझ्या कथेत पुढे काय झालं ते सांगणार होते पण इतक्यात मार्केटमध्ये एक मजेशीर घटना घडल्यामुळे या घटनेकडे तुमचं लक्ष वेधावं असं मला वाटलं. मार्केट मध्ये संगणकाच्या वापरामुळे चुका कधीच होत नाहीत असा जर तुमचा समज असेल तर तो आज दूर होईल.
आजची घटना ज्या चुकीमुळे घडली तिला मार्केटच्या भाषेत ‘FAT FINGER ERROR ‘ असे म्हणतात. काही नाही हो! ‘नाव मोठे लक्षण खोटे ‘ घाबरू नका. यात न समजण्यासारखे काही नाही. संगणकावर काम करताना चुकीचे बटण दाबले गेले तर अशी चूक होते. यालाच ‘FAT FINGER ERROR’ असे म्हणतात.यामुळे जो ट्रेड होतो त्याला ‘FREAK TRADE’ असे म्हणतात. नेहमीच या चुकांमुळे मोठे नुकसान होते असे नाही. वेळेतच चूक लक्ष्यात आल्यास सावरता येते. ‘ENTER’ केलेला चुकीचा व्यवहार अमलात आला नाही तर नुकसान टळतं. पण २८.११.२०१३ रोजी असाच एक “FAT FINGER ERROR” झाला. तो एक “PUNCHING ERROR’ होता. एका डोमेस्टिक ब्रोकरने निफ्टी ६२५० असं पंच केलं. त्यामुळे १.१२कोटींचा तोटा झाला. अशीच एक चूक ऑक्टोबर ३ २०१३ ला झाली होती . निफ्टी ५८९६च्या ऐवजी ५९९६ एन्टर केले त्यामुळे ८.०० कोटी रुपयांचे नुकसान झालं.
आता असं बघा प्रत्येक गृहिणी स्वयंपाक करते, चहा करते. समजा चहामध्ये साखर घालायला विसरली,किंवा भाजी-आमटीत मीठ घालायला विसरली तर फारसे नुकसान होत नाही. मूड जातो इतकच! साखर किंवा मीठ ऐनवेळी घालून घेता येते. परंतु साखरेच्या ऐवजी मीठ किंवा मिठाच्या ऐवजी साखर घातली तर पदार्थ फेकून द्यावा लागतो . आणि जर चुकून ‘GAS’ बंद करायचा विसरला किंवा तेल तापत ठेवलेलं विसरलं तर घराची राखरांगोळी होते. चूक दिसायला लहान असते पण त्या चुकीचा परिणाम मात्र खूप मोठा होतो. तसच काहीतरी मार्केटचं आहे. चूक छोटी असेल आणि सुधार्ण्यासारखी तर ठीक नाहीतर बोंबला!!
सांगायचा मुद्दा असा कि मार्केटमध्ये असल्या चुका होण्याची हि पहिली किंवा दुसरी वेळ नव्हे. एप्रिल २०, २०१२ला एका दिवसात दोन वेळा ‘FAT FINGER ERROR’ झाली. ‘NIFTY FUTURES’ मध्ये ५००० ची एन्ट्री झाली. दुसर्या वेळी वेळेला इन्फोसिसचे शेअर्स ‘FUTURES” मध्ये रुपये २४५०.०० च्या ऐवजी १९५० एन्टर केले गेले. यात ७ कोटी ते ८ कोटीचा तोटा झाला.
जून २ ,२०१० रोजी झालेल्या ‘ FAT FINGER ERROR’ मध्ये शेअर्सविक्रीच्या वेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे 64000 शेअर्स ८४० रुपयांना विकण्यास ठेवल्यामुळे शेअरमार्केटमध्ये घबराट माजली. कारण त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाव रुपये १०४० चालू होता .१०४० रुपयाला रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर विकला जात असताना हा माणूस रुपये ८४० ला ६४००० शेअर्स का विकतोय हे समजत नव्हत. नंतर असं समजलं की ‘ICICIBANK’ च्या कोडनंबर ऐवजी रिलायन्स इंडस्ट्रीजचा कोड नंबर ‘PUNCH’ केल्यामुळे ही चूक झाली. त्यामुळे ‘ICICI BANK’या कंपनीच्या शेअर्सेऐवजी रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर्स ‘ICICI BANK’ या कंपनीच्या भावाप्रमाणे विक्रीस ठेवले गेले या व्यवहारामध्ये २८ कोटींचा तोटा झाला. ही चूक लक्ष्यात येताच ती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हढ्या वेळात ६०००० शेअर्स विकले गेले होते त्यामुळे चूक फारशी सुधारता आली नाही.
हे तुम्हाला सांगण्याचे कारण म्हणजे आजकाल लोक ‘ ON LINE TRADING’ चा वापर करतात . त्यावेळेला अशा पध्दतीची चूक होऊ शकते. मी मार्केटमध्ये शिरले तेव्हा ही सुविधा नव्हती.ब्रोकरमार्फतच सर्व व्यवहार करावे लागत असत . ब्रोकरमार्फत ट्रेड करताना सुद्धा तिथल्या ‘BOLT OPERATOR’नी तुमची ऑर्डर बरोबर टाकली कि नाही याची खातरजमा करून घ्या .तुमच्या वहीत सुद्धा केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवावयास विसरू नका .
मी तुम्हाला पुढच्या भागापासून शेअर्सची खरेदी कशी करावी, महाग स्वस्त चांगले वाईट शेअर्स कसे ओळखावेत हे सांगेन.आता आपली भेट पुढील भागात…………………
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ३७ – फट(FAT) म्हणता ब्रह्महत्या !!
3 Replies