Monthly Archives: February 2014

भाग ३८ – बाजार करावा नेटका, असो नये फाटका

परी लाभाचा चटका असू द्यावा!!
पत्रिका जुळते का हे पाहून, कान्देपोह्याचा कार्यक्रम होतो . वधूवरची पसंती होते. त्यावेळी आईवडील एकच गोष्ट सांगतात ‘ सुखाने आनंदाने संसार करा” शेवटी आनंद सुख समाधान हेच संसाराचे अंतिम ध्येय असते.
त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा गेले वर्षभर तयारी करीत आहात . माहिती मिळवत आहात. DEMAT ACCOUNT,  ट्रेडिंग अकौंट सेविंग अकौंट ही उघडला असेलच थोडीशी भांडवलाची सोय केली असेल.. ज्या पद्धतीच्या व्यवहारासाठी भांडवल लागत नाही त्या पद्धतीचा ट्रेड म्हणजेच intra day ट्रेड तोही मी तुम्हाला समजावून सांगितला आहे ,
संसाराचे अंतिम ध्येय म्हणजेच सुख समाधान आनंद त्याचप्रमाणे कुठल्याही व्यवसायाचे मुख्य ध्येय नफा मिळवणे हे होय . शेअरमार्केट हा एक व्यवसायच आहे . यामध्ये आपण शेअर्स खरेदी करतो व काही काळाने वाढलेल्या भावाला तेच शेअर्स विकतो . विक्री किमत वजा खरेदी किमत म्हणजे नफा किंवा फायदा होय. संसारातील जे जे प्रश्न संसार करताना येतात तेच प्रश्न शेअर्स खरेदी करतानाही पडतात. मी जेव्हा मार्केटमध्ये शिरले तिचा माझ्या समोरही अनेक प्रश्न उभे राहिले. पण मी धैर्याने गुंता सोडवला.
प्रथम बँकेत खात्यावर किती पैसे आहेत ते पाहिले. यजमानांना विचारले
“आपल्याकडे किती पैसे असतील जे आपल्याला लगेच लागणार नाहीयेत? आणि अगदी लागलेच तर ते कधी लागतील?”
विचारायचा मुद्दा असा कि माझे अंथरूण  केवढे आहे आणि पाय किती पसरता येतील ? आणि ते तसे पसरून किती वेळ ठेवता येतील? म्हणजेच मार्केट मध्ये किती भांडवल गुंतवता येयील आणि किती कालावधीसाठी हे मला कळले.
आता प्रश्न आला नफ्याचा किंवा फायद्याचा, तिथे मी साधे व सोपे गणित घातले. त्या काळात बँक मुदत ठेवीसाठी १०%व्याज देत असे . ..हीच १०% वाढ मला १ वर्षापेक्षा कमी कालावधीत मिळाली तर सोन्याहून पिवळे असा विचार केला
आता माझ्या जवळ अनुभव आहे पण तेव्हा काहीच समजत नव्हते . परंतु माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी १०-१५ शेअर्सची निवड केली होती. ज्या शेअर्समध्ये सतात चढउतार असे. मी माझे जुने शेअर्स विकून भांडवल गोळा करीत होते आणि साईड बाय साईड  शेअर मार्केटचे जाणीवपूर्वक आकलन करीत होते .
लहान लहान मुली जसा भातुकलीचा खेळ खेळतात . त्याचप्रमाणे मी खोटा खोटा शेअर मार्केटचा  व्यवहार करीत होते. कारण आमच्या घरात शिकवायला किंवा सांगायला कुणीही नव्हते . मी माझ्या वहीतल्या वहीत खरेदी करीत असे . तेथेच भाव वाढला की शेअर्स विकले असे लिहित असे त्याच्या बाजूला नफ्याचा आकडा लिहित असे .. पण तेथे एक चूक झाली. मी त्या फायद्यातून दलाली व इतर कर वजा केले नाहीत. पण त्या वहीमुळे मालाविश्वास मिळाला की मला फायदा होऊ शकतो .
थोड्या पैशात जसा गृहिणी टुकीने संसार करते तीच अवस्था माझी मार्केटमध्ये होती . असलेल्या पैशात अनेक गरजा भागवावयाच्या होत्या.
माझे यजमान म्हणाले “ही रकम जूनपर्यंत लागणार नाही. तेव्हा तू हे पैसे जूनपर्यंत वापर.’
तेव्हा मला लक्षात आलं नाही पण यालाच मार्केटच्या भाषेत हा मध्यम कालावधीसाठी केलेला व्यवहार… आज १२ वर्षांनी ही आणि अशी बरीच अक्कल आलीये.
टीवीवरच्या वाहिनीवर जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा सुद्धा तुम्ही पाहिले असेल की शेअरचे नाव, खरेदीसाठी योग्य भाव व किती कालावधीसाठी शेअर्स खरेदी  करावा हे सांगतात. शार्ट टर्मसाठी म्हणजे ३ महिन्यापर्यंत, मिडीयम टर्मसाठी म्हणजे ३ महिने ते एक वर्षपर्यंत. दीर्घ मुदतीसाठी  म्हणजे १ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी म्हणजेच गुंतवणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेली खरेदी होय.
३ महिने, ६ महिने ठरवले म्हणून तुम्ही मुदत पूर्ण होईपर्यंत थांबायची गरज नाही. ती  काही मुदत ठेवीची पावती नाही की मध्ये तोडली तर तुम्हाला व्याजात नुकसान होईल. तुम्ही शेअर्स कधीही (४ दिवसानंतर कधीही म्हणजेच DEMAT अकौंटवर गेल्यावर) विकू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हढा फायदा जेव्हा होत असेल तेव्हा विकून रिकामे व्हा. गुरुकिल्ली काय तर किती दिवस पैसे गुंतले व फयदा किती होतो आहे याची सांगड घाला म्हणजे शेअर विकून आलेली रकम पुन्हा पुन्हा गुंतवता येते.
पूर्वी मला कळत नव्हते परंतु आतापर्यंत आलेल्या अनुभवावरून मी सांगू शकेन की तुमच्याजवळ जानेवारी ते जून एवढ्या कालावधीसाठी पैसे गुंतवायला उपलब्ध असतील तर तुम्ही शेअर्सची निवड कशी करावी . पण यासाठी पुढील भागाची वाट पहावी लागेल