Monthly Archives: March 2014

गुढी पाडवा 2014 – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे

Gudi Padwa Share Market

Image – Redtigerxyz at English Wikipedia


आज गुढी पाडवा. नववर्षाचा पहिला दिवस. अशा शुभ दिवशी तुमच्याशी थोडेसे हितगुज करू असे मनात आले म्हणून हा blog post.
शेअरमार्केटने गुढी पाडव्याचे व नववर्षाचे दणदणीत स्वागत करून शेअरमार्केट्ची गुढी खूप उंच उंच नेली आहे. गेल्या गुढीपाडव्याला BSE SENSEX 21832.61 व NSE NIFTY 6516.55 होता. २९ मार्च २०१४ रोजी BSE SENSEX 22339.00 व NSE NIFTY 6695.90 आहेत . म्हणजेच आतापर्यंतच्या जास्तीतजास्त स्तरावर आहेत. अशा मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काही टिप्स देते आज –
(१)   आनंदाचे तोरण लागले आहे. हीच वेळ खरी खबरदारी घेण्याची असते . त्यामुळे तुम्ही अचूक वेळ साधून जास्तीतजास्त नफा मिळवा. बेसावध राहिलात तर बस चुकेल आणी पुढली बस केव्हा येईल याचा कोणी भरवसा द्यावा. परंतु त्याचबरोबर रेंगाळू नका, मोहात पडू नका किंवा अमुक एक भाव मिळाला तरच विकीन असे ठरवून बसू नका.सारासार विचार करून मिळणारे दान लवकरात लवकर पदरात पडून घ्या नाहीतर मिडास राजाच्या गोष्टीप्रमाणे होईल
(२)   मार्केटच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस करू नका.
(३)   इतक्या वाढलेल्या मार्केटमध्ये स्वस्त काय महाग काय हे शोधणे कठीण असते. त्यामुळे खरेदीच्या भानगडीत पडू नका
(४)   कमीतकमी किमतीचे व जास्तीतजास्त पैसा मिळवून देणारे असे काही विशिष्ट शेअर्स मार्केटमध्ये नसतात .आखूडशिंगी व बहुगुणी शेअर्स मिळणे नेहेमीच कठीण असते. शेअर एकतर चांगला म्हणजे फायदा करून देणारा असतो किंवा वाईट म्हणजे तोटा होणारा असतो .
(५)  काही काही लोकांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. जे लोक आमचे पैसे बुडाले म्हणून हाताची घडी घालून बसले असतील त्यांनी आपले ‘DMAT’ अकौंटचे स्टेटमेंट काढून त्यापैकी कोणते शेअर्स फायद्यात आहेत कां हे बघून झटपट निर्णय घेवून विकून टाका. जर कोणाजवळ फिझीकल फोर्ममधे शेअर्स असतील तर ते झटपट ‘DMAT’ करून विकून टाका.
(६)   ही शेअर विक्रीची वेळ आहे खरेदीची नव्हे संधी हुकली असेल तर पुढच्या संधीची वाट पहा.गर्दीमध्ये घुसून चेंगराचेंगरीत सापडू नका.
(७)  ही ‘ ELECTION RALLY’ आहे १६मेला निवडणुकीचे निकाल आहेत.10 मे पर्यंत आपापला फायदा वसूल करा. पुढे मार्केटचा रागरंग निवडणुकीच्या निकालाप्रमाणे बदलू शकतो.
या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे हा गुढीपाडवा आपल्या सर्वांच्या चिरंतन स्मरणात राहील व भरघोस दान आपल्या पदरात टाकेल.

महिला दिन विशेष !!

तुम्हाला मी सांगितलं कि नाही लक्षात नाही पण आजकाल मी ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकाच्या माध्यमातून लोकांना शेअर मार्केट बद्दल माहिती देत आहे. मार्चच्या अंकात महिला दिनानिमित्त मी माझी – ‘गृहिणी ते गुंतवणूकदार’ हि वाटचाल  वाचकांना सांगावी असा आग्रह संपादकांनी केला आणि त्यासाठी प्रकाशित हा लेख आज मी ब्लोग वर पोस्त करत आहे. वाचून तुम्हाला थोड जरी प्रोत्साहन मिळालं तर लेखाचा उद्देश साध्य समजेन
Womem's day special article - Bhagyashree Phatak
********************************************
भाग्यश्री फाटक – प्रयत्ने वाळूचे कण रगडीता… शेअर मार्केटही कळे !!   
इसवी सन – २००१
स्थळ – शेअर ब्रोकरचे ऑफिस
घाबरी घुब्री थोडीशी गोंधळून गेलेली मी म्हणजेच श्रीमती भाग्यश्री प्रकाश फाटक!
“शेअरमार्केट म्हणजे काही वरणभाताचा कुकर लावणे नव्हे किंवा कांदेपोहे करणे नव्हे . येथे भल्याभल्यांची भंबेरी उडते. तुम्ही आपल्या चुलीजवळ बऱ्या. नवर्याचे असतील नसतील तेव्हडे पैसे घालवाल“
अश्या अनाहूत सल्ल्याने माझे झालेले स्वागत !
इसवी सन – २०१३
स्थळ – तेच शेअर ब्रोकरचे ऑफिस
ऑफिसमध्ये सन्मानाने गेलेली मी म्हणजेच श्रीमती भाग्यश्री प्रकाश फाटक
“मी ओळख करून देतो. ह्या ठाणे शाखेच्या मोठ्या गुंतवणूकदार , अतिशय अभ्यासू , यशस्वी शेअर मार्केट व्यावसायिक आहेत. कोणालाही काही शंका असेल तर प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण खात्रीलायक रीत्या देणारी व्यक्ती म्हणजेच या फाटक MADAM.”
आणि माझ्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालेला अमुलाग्र बदल.. माझ्या एक तपाच्या अविश्रांत मेहेनतीचे फळ…
आता मला ठणकावून सांगावेसे वाटते की वरणभाताचा कुकर लावता लावता , कांदे पोहे करता करता शेअरमार्केट करता येते. जी गृहिणी संसारातील प्रत्येक अडचणीला तोंड  देवून संसार संभाळते ती  कोणतीही गोष्ट यशस्वीरीत्या करू शकते. अहो मी अशिक्षित होते , मला नोकरी मिळू शकली नाही म्हणून शेअरमार्केटमध्ये शिरले असे मात्र नाही . माझ्या आयुष्याने व आजूबाजूच्या परिस्थितीने जशी वळणे घेतली त्या वाटेने मला प्रवास करावा लागला.
गेल्या १२ वर्षात माझ्यात तसे खूप बदल झाले पण तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणीची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. आणि या पुढे मी जे सांगणार आहेत ते कदाचित तुम्हाला सर्वात जास्त जाणवेल.
आता मी सागते त्या प्रसंगात स्वताला ठेवण्याचा प्रयत्न करा. साल २००० , ४०-४२ वर्षाची, मी २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली. माझं graduation १९७४ साली झालेलं. कॉम्पुटरच्या knowledge च्या नावानी शंखनाद. बऱ्याच जागी वयाच्या अटीत मी बसत न्हवते. फारसे काही interview calls येत नव्हते. जे येत होते त्यांना काही अर्थ नव्हता. या सगळ्या मध्ये एका महाभागाने मला मुक्ती चा मार्ग दाखवला आणि मला नोकरीच्या मोहमायेतून  बाहेर काढलं. तुम्ही विचार करत असाल कि त्या पठ्ठ्याने असं काय सांगितलं? ऐका तर मग –
‘तुम्ही ४० वर्षाच्या , तुम्हाला जितका पगार देणार तितक्या पगारात आम्हाला २०-२२ वर्षाची computer educated मुलं मिळतात , तर मग आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ?’
प्रश्न अगदी बरोबर होता, उत्तर माझ्याकडे बिलकुल नव्हतं.
आता मी तुम्हाला सांगते कि मी या प्रश्नापर्यंत कशी आले?. असं नाही कि मी कधी नोकरी केलेली नव्हती. लग्न आधी मी commerce graduate होते. लग्ना नंतर वकिली चं शिक्षण घेतलं. lecturer म्हणून नोकरी लागली. नोकरी करायची म्हणजे मला माझ्या लहान मुलीला शेजारी सोडावं लागे, तिच्या कडे थोडं दुर्लक्ष होई. हे सगळं मनाला पटत नव्हत. स्वताची पोळी भाजण्या साठी इतरांकडे दुर्लक्ष करण योग्य नाही असं वाटत होतं. जीवाची ओढाताण होत होती. घरातही या गोष्टींवर चर्चा होवू लागली. आयुष्यात लहानपणाची काही वर्ष फार महत्वाची असतात. त्यावेळी आईचा सहवास मिळाला नाही , संस्कार घडले नाहीत तर पोरके पण वाटतो. त्यामुळे मुलं लहान असताना नोकरी करू नये व मुलं मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी करावी, स्वत:चं career करावं असं ठरलं.
आणि आधी सांगितलं ते या नंतरचं सगळं रामायण. आता मागे वळून बघितल तर हसायला येतं पण त्या वेळी मात्र ते एकून तोंडचं पाणी पळाल होतं. एक गोष्ट मात्र साफ होती, आता जे काय करायचं तिथे वयाची अट असता कामा नये, मला जे आधी पासून येतं त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या श्रमाला साजेसा पैसा त्यातून मिळाला पाहिजे. नोकरी मिळणं आता मुश्कील आहे हे साफ होतं, आणि मिळाली तरी ती काही मला पाहिजे तशी मिळणार नव्हती. हा सगळा विचार करत असताना एक सुंदर कल्पना त्या वेळी माझ्या मनात आली आणि त्याच कल्पनेचा हा सगळा प्रवास.
मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवले त्यावेळी माझ्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांनी थैमान घातले होते. मी वयाने जरी ४५ वर्षांची होते तरी  शेअरमार्केटच्या दृष्टीकोणातून मी नर्सरीमध्ये होते . लहान मुलाला जसे शाळेचे नाव माहीत नसते तसेच मलाही काही माहीत नव्हते . त्यामुळे लहान मुल जसे प्रत्येक गोष्ट पाटीवर गिरवते त्याचप्रमाणे मला प्रत्येक गोष्टींच्या नोंदी वहीत कराव्या लागल्या . अगदी N.S.E. म्हणजे काय, B.S.E.  म्हणजे काय, हे माहीत नव्हते .शेअर्सची नावे नवीन, ती  कंपनी काय करते हे ही माहीत नव्हते. कधी कधी कंटाळा येई. परंतु स्वतःच स्वतःला उठवून पुन्हा शेअरमार्केटकडे लक्ष देणे सुरु झाले ..
माझ्या यजमानांचे ऑफिस ‘BOMBAY STOCK EXCHANGE’च्या जवळच होते. त्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये शेअर्सविषयी चर्चा होत असे . शेअर्सचे अर्ज टेबलावर ठेवलेले असत. त्यानी काही शेअर्सचे अर्ज भरले होते . अगदी थोडे शेअर्स लागले होते . पण ते विकायचे कसे ते समजत नव्हते . त्यामुळे शेअर सर्तीफीकेत्सची रद्दी जमा झाली होती. ही राद्देच माझ्या स्वर्गाचे दार ठरली. ‘भांडवलाचा’ हा प्रश्न मी रद्दी झालेले शेअर्स विकून सोडवला. टाकाऊ झालेल्या कागदातून काही पैसा उगवतो का हे पहाता पहाता मी मार्केट्च कामकाज, त्यातल्या खुब्या बारकावे शिकत गेले . कारण या व्यवहारात नुकसान काहीच नव्हते . ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ हा विचार करून कामाला लागले. एकेक गोष्टीची उकल होत गेली. DEMAT ACCOUNT, TRADING ACCOUNT, उघडून तयारी करून हळू हळू शेअर्स विकून भांडवल गोळा तर झालेच पण माझे शेअर्सचे ज्ञानही वाढले पैसेही मिळू लागले. मला एक नवा व्यवसाय मिळाला. माझ्या बुद्धीला आव मिळाला. मुलाला जशी शाळेत मजा वाटू लागली की मुले स्वतः होऊन शाळेत जातात त्याप्रमाणे मलाही चटका लागला. मी कधी पहिलीत गेले म्हणजेच शेअरमार्केट्ची पहिली पायरी ओलांडली ते समजले नाही.
ब्रोकरच्या ऑफिसमध्ये बसत असल्यामुळे व्यवसायातील अनेक युक्त्या समजल्या. इतरांचे पाहून मीही कधी कधी ‘INTRA DEY TRADE’करू लागले काही लोक फक्त ‘ब्लूचीप’ शेअर्समध्ये व्यवहार करीत तर काहीजण १रु.च्या आतल्या शेअर्समध्ये व्यवहार करीत .
“१००रु.च्या शेअरचा भाव २००रु. झाला काय किंवा ४०पैसे किमतीच्या शेअरची किमत ८० पैसे झाली. काय हिशोब सारखाच ना MADAM ! फायदा १००%च होणार.” हे एका आजोबांच ज्ञान मला खूपच भावले आणी पटलेही. त्यानंतर मी माझ्याजवळ असलेल्या भांडवलाची योग्य प्रकारे वाटणी करू लागले.थोडे पैसे बाजूला ठेवून जेव्हा मार्केट खूप पडत असे तेव्हा शेअर्स विकत घेवू लागले. सर्व प्रकारच्या शेअर्समध्ये , त्याचप्रमाणे कमी किंवा जास्त किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू लागले . अशाप्रकारे प्रथम गोंधळलेल्या भाग्यश्री फाटक धाडसी विचारी भाग्यश्री फाटक झाल्या . गेल्या १०-१२ वर्षात जेव्हा जेव्हा मार्केट कोसळले तेव्हा डगमगल्या नाहीत. मार्केट कोसळते आहे म्हणजे आपल्यासारख्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे असे वाटे . आपल्या शेअरचा भाव २००रु.नी  कमी झाला आहे हा विचार करत डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा कोणते चांगले शेअर्स कचऱ्याच्या भावात घेता येतील हा विचार डोक्यात असे .
हळू हळू माझ्या डोक्यात कर्ज काढून भांडवल गोळा करण्याचा विचारही डोकावू लागला.कारण अशी सुवर्णसंधी कित्येक वर्षांनी येते.कर्जावरती व्याज देवूनही मला फायदा होईल कां ?ही आकडेमोड सुरु झाली . इथेच मी गुंतवणूकदार झाले. अशातऱ्हेने मी मार्केटची 12वी पास झाले. मी नंतर देरीवेटीव(DERIVATIVE) मार्केटचा तसेच कमोडीटी(COMMODITY) मार्केटचाही  अभ्यास करून त्याचा उपयोग करू लागले. केंद्र सरकार, राज्य सरकारे, रिझर्व बँक, एवढेच नव्हे तर परदेशातील सरकारांनी घेतलेल्या निर्णयांचा शेअर्सच्या किमतीवर होणारा परिणाम समजून घेतला. शेअरमार्केट मध्ये वापरले जाणारे विविध शब्द त्यांच्या अर्थ आणी उपयोगांसकट समजावून घेतले .कंपनीचे तिमाही वार्षिक निकाल समजावून घेवून त्याच्या शेअरच्या किमतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला . शेअरमार्केटच्या सतत बदलणाऱ्या महासागरातून चांगली रत्ने वेचण्याचे ज्ञान मिळाले. माझ्या व्यवसायाला स्थेर्य आले. मी बुल रन(BULL RUN) व बेअर रन(BEAR RUN) दोन्हींचाही अनुभव घेतला. आता घट्ट पाय रोवून शेअरमार्केटचा प्रवास करीत आहे. एखाद्या गृहिणीला जसा अजिबात स्वयंपाक येत नसतो तेव्हा तिचा गोंधळ उडतो. परंतु जिद्दीने शिकत शिकत ती कॅटरिंगचा व्यवसाय करू लागते , हॉटेल काढते, ५०० माणसांचा स्वयंपाक करते व रेचीपीची पुस्तके लिहिते . त्याचप्रमाणे शेअरमार्केटमध्ये चाचपडणारी  मी आता ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग चालवते. ‘माझी वहिनी’ या मासिकातून लेख लिहून शेअरमार्केट विषयी मार्गदर्शन करीत आहे.
मार्केटमुळे नाव मिळाले आता अनेकांना मार्गदर्शन करता येते. त्यांनाही अर्थाजन करता येते. त्यांना होणारा आनंद पाहून माझा आनंद द्विगुणीत होतो. मागे वळून पहाताना कधी धडपडले पडले पण माझे यजमान, माझा मुलगा सुरेंद्र व मुलगी स्वरश्री यांनी सावरण्यासाठी खूपच मदत केली . माझे यजमान तर रोज दुपारी ३.३० वाजता मार्केट संपल्यावर बँकेतून फोन करत. मग काय म्हणते तुमचे मार्केट ? माझ्या आवाजातून त्यांना जाणवत असे आज दिवस चांगला गेला की वाईट ? ते म्हणत ‘ झाले ते झाले , पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घे.’
२००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock marketमधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकांकडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे.
ज्या क्षेत्रात स्त्रियांचा वावर फार कमी प्रमाणात असे, तिथे मी आज पाय घट्ट रोवून उभी राहिले आहे. गेल्या दहा वर्षात अनेक वादळे आली , तरीही मी अजून खंबीर उभी आहे. ईश्वरी कृपा, अफाट प्रयत्न आणि नशीब यामुळे हे सगळं शक्य झालेल आहे. कधी कधी शेअर्स विकले जायला हवेत तेव्हा विकले जात नसत. थांबावे लागे . त्यावेळी वर्किंग कॅपिटल मुले पुरवत असत . माझी मुलगी माझ्या शेअर्सची EXCELSHEET तयार करून सर्व नोंदी UPTODATE ठेवत असे. कधी डबा करण्याच्या घाईत पेपर वाचायला वेळ झाला नाही तर महत्वाच्या बातम्या माझे यजमान मला सांगत असत.   आता दोन्ही मुलांची लग्ने झाली आहेत. माझी सून किरण आणी माझे  जावई अमेय जोगळेकर कौतुकानी शेअरमार्केट्ची चौकशी करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या माणसाशिवाय माझा हा प्रवास पूर्ण होऊ शकला नसता ते म्हणजे आमचे काका (व्यास्थापक व ब्रोकर ) श्री मधुसूदन कुलकर्णी ज्यांनी मला सर्वप्रकारे मदत केली.
खरं पाहता हि माझ्या आयुष्याची दुसरी खेळी म्हणावी लागेल. ज्या वयात सर्व जण ऐछिक निवृत्ती घेत होते, त्याच वेळी मी हा नव्याचा शोध घेत होते. घरात कोणतीही आबाळ होवू न देता माझी हि महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. तुम्हाला हि हा सगळं अनुभव घेता यावा, यातली मजा चाखता यावी हा माझा प्रयत्न आहे.
एक अजून गोष्ट साधायची आहे मला. गेल्या 10 वर्षात मला कळलंय कि share market हे इतकं भीतीदायक नाहीये. share market हे खरं तर खूप मजेशीर आहे, ते एका क्रिकेट च्या match प्रमाणे रोमांचक आहे. फ़क़्त त्यातली मजा कळायची देर आहे. तीच मजा, तोच अनुभव, तीच रोमांचकता तुमच्या पर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
माझ्यासारखाच ज्या स्त्रीयांचा परिस्थितीमुळे कोंडमारा झाला असेल त्यांच्यासाठी शेअरमार्केट,हा सुरेख पर्याय आहे. माझ्या अनुभवाचा आणी ज्ञानाचा उपयोग अनेक महिलांना व्हावा यासाठी हा प्रपंच. माझ्या महिला मैत्रिणींनो जर कधी तुमच्या आयुष्याच्या मध्यावर सर्वबाजूंनी  कोंडी झाल्यासारखी वाटली आणि आपल्याला असलेल्या रिकाम्या वेळेचा , शिल्लक  असणाऱ्या पैशाचा उपयोग फायदेशीर रित्या कसा करावा हा प्रश्न पडला तर शेअरमार्केट हा पर्याय अवश्य लक्षांत असू द्या. कुठल्याही प्रकारचे  मार्गदर्शन पाहिजे असल्यास मला कधीही संपर्क करू शकता. शेअरमार्केटमध्ये महिलांचा सहभाग वाढावा हीच माझी सदिच्छा!
भेटूच लवकर ..
********************************************