नुकताच रविवारी एका वाचकाचा फोन आला होता. त्याने चौकशी केली व विचारले
“तुम्ही हल्ली ‘ब्लोग’ लिहिणे बंद केले कां?. असे करू नका आम्हाला तुमचा ‘ब्लोग’ वाचायला आवडतो. तुम्ही आम्हाला अर्ध्या वाटेवरच सोडलेत. आम्हाला सांगा आम्ही कोणते शेअर्स खरेदी करावेत? कोणत्या भावाला खरेदी करावेत.? कधी खरेदी करावेत ? कधी विकावेत ? किती फरकानी विकावेत? डोक्यात सगळा गोंधळ माजला आहे. काहीच कळत नाही. काही सुचत नाही. त्या शेअरमार्केटच्या भानगडीत जाऊ या की नको. तुम्ही हा गुंता सोडवून मार्ग दाखवणार कि नाही?”
हो! हो! त्या वाचकाचे आणि तुम्हा सगळ्यांचे प्रश्न सोडवायला मला आवडेल. तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहाराची शेअरमार्केटशी सांगड घालून पहा म्हणजे प्रश्न पटापट सूटतील. नेहमी आपण बर्याच गोष्टी गरजेपोटी करतो. म्हणजे पावसाळा आला तर छत्री रेनकोट खरेदी करतो. शेअर मार्केट मध्ये २ फरक आहेत, एक तर शेअर खरेदी करायची कुणाला ‘गरज’ नसते आणि आपण खरेदी केलेल्या वस्तू आपण विक्री करण्यासाठी खरेदी केलेल्या नसून उपयोगात आणण्यासाठी खरेदी केलेल्या असतात. त्या वस्तूची संख्या किवा त्यांचे मूल्य वाढावे अशी आपली अपेक्षा नसते.पण शेअरमार्केटमध्ये खरेदी केलेल्या शेअर्सची किमत वाढून ते विकल्यावर आपल्या पैसे सुटावेत अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते.
मार्केट मध्ये गुंतवणूक करताना आपले अंथरूण केवढे आहे ,पाय किती लांब करता येतील व किती वेळ अंथरुणावर लोळता येईल हे मात्र पहिले पाहिजे. आपल्याजवळ किती रक्कम आहे, ही रक्कम तुमच्याजवळ किती काळ पडून राहणार आहे याचा विचार करा. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर ऑर्डर देताना हा विचार करताच ना? कारण तुम्हाला ताबडतोब बिल द्यावयाचे असते. तोच शेअर्सच्या बाबतीत विचार करावा.तुम्हाला ६ महिने पैसे लागणार नसतील तर ४ महिन्यांसाठी योजना करा कारण शेअरमार्केटमध्ये निश्चित काही सांगता येत नाही.
मुलांच्या शिक्षणासाठी आपण रकमेची जुळवाजुळव करतो, कितीही आदर्श डोळ्यासमोर असतील तरी समाजातील काही गोष्टींचे बळी आपण ठरतो. डोनेशन भरावे लागतेच. डोनेशनसाठी जमा केलेले हे पैसे ४-५ महिने पडून राहतात. आपल्याजवळ दोन पर्याय असतात. बचत खात्यात ठेवणे किंवा ४५, ९०, १८०, दिवसांसाठी मुदत ठेवीत ठेवणे. आता नवा पर्याय शेअरमार्केटचा.
मी ३८व्या भागात सांगितल्याप्रमाणे आपण जानेवारी ते जून हा कालावधी घेतला होता. कालावधी अशासाठी की कोणत्यावेळी कोणते शेअर्स खरेदी करण्याचा विचार करावा हे सांगण्यासाठी.
आता पहा उन्हाळ्यात छत्री विकत घेतली तर स्वस्त पडते व A. C. किंवा पंखा विकत घेतला तर महाग पडतो. किंवा सणासुदीच्या दिवसात कपडे साड्या दागिने महाग पडतात.असाच विचार आपण मार्केट संबंधात करावा.
(१) आता पहा जर कंपनीचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे असेल तर जानेवारीपर्यंत तीन तिमाहीचे निकाल जाहीर झालेले असतात. त्याच्यावरून कल्पना करता येते की कोणत्या कंपन्याचा वार्षिक निकाल चांगला असेल. आपण अशा कंपनीचे शेअर्स घ्यावेत.
(२) काही कंपन्या ‘ INVESTOR FRIENDLY ‘ असतात, म्हणजेच चांगला लाभांश किंवा बोनस शेअर्स देतात. लाभांच्या बाबतीत त्यांचे रेकार्ड चांगले असते. अशा शेअर्सचे भाव लाभांशाच्या अपेक्षेप्रमाणे वाढतात.लाभांशाच्या उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही.
(३) ‘ADVANCE TAX’ चे आकडे जाहीर होतात. ज्या कंपन्याना आपला नफा वाढणार असे वाटते त्या कंपन्या जास्त ‘ADVANCE TAX ‘ भरतात. काही कंपन्या मात्र नेहेनीच जरुरीपेक्षा जास्त ‘ADVANCE TAX ‘ भरतात. ज्या कंपनीने गेल्यावर्षीपेक्षा जास्त ‘ADVANCE TAX’भरला असेल त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत.
(४) सरकारचे अंदाजपत्रक याच काळात जाहीर होते. २५ फेब्रुवारीला रेल्वेचे अंदाजपत्रक व २८ फेब्रुवारीला रेग्युलर अंदाजपत्रक जाहीर होते. रेल्वेशी संबंधीत शेअर्स कमी किमतीत विकत घेवून बजेटच्या आधी १-२ दिवस आधी विकावेत.उदाहरणार्थ काही रेल्वशी संबंधीत शेअर्सची नावे खालीलप्रमाणे (१) कालिंदी रेल (२) करनेक्स मायक्रोसिस्टीम्स (३)स्टोन इंडिया (४)हिंद रेक्टीफायर (५) बी ई एम एल.(६) TITAAGHAR WAGONS.या शेअर्समध्ये मिळत असेल तो नफा घेवून अंदाजपत्रक जाहीर होण्याच्या आधी बाहेर पडावे.या शेअर्सचे भाव पुन्हा वर्षभरात वाढत नाहीत. रेल्वे व खते यांच्या शेअर्सच्या भुयारात वेळेवर घुसून वेळेवर बाहेर पडावे लागते.
(५) सरकारचा भर नेहेमी शेती, शिक्षण, संरक्षण, उत्पादन, दळणवळण, लघुउद्योग आदी गोष्टींवर असतो. या क्षेत्रात विविध सवलती दिल्या जातात. करात सवलती दिल्या जातात. या क्षेत्रातील काही कंपन्यांकडे सुद्धा लक्ष ठेवू शकता
(६)या काळात दिला जाणारा हवामानाचा अंदाजही फार महत्वाचा ठरतो. विशेषतः पावसाचे प्रमाण, त्याची वेळेवर वाटणी ही फार महत्वाची ठरतात. शेतकरयाची खुशहाली शेअर मार्केटमध्येही आनंदाची लहर पसरवते. यावर्षी अल-निनो हा शब्द वारंवार कानावर येतो आहे. याचा परिणाम पावसावर होईल. पाउस कमी पडेल. तांदूळ पिकवणाऱ्या देशांवर याचा परिणाम होईल. सुदैवाने अल-निनोचे दुष्परिणाम भारतावर जास्त दिसणार नाहीत. भारत बासमती तांदुळाची निर्यात करतो. त्यामुळे तांदळाची निर्यात करणारया KRBL, LTFOODS कोहिनूर फुड्स या कंपन्यांचा फायदा होईल.अग्रो शेअर्सचा विचार करू शकता उदाहरणार्थ : जयंत अग्रो. एरिस अग्रो हेरीटेज फूड्स
(७) जानेवारी ते जून हा उन्हाळ्याचा मोसम असल्यामुळे HAVELLS(इंडिया), CROMPTON GREAVES, VOLTAS या शेअर्सचाही विचार करावा. कारण या कंपन्यांची विक्री या काळात वाढते.
(८) या काळात खतांचे शेअर्सही स्वस्त मिळतात.
महत्वाचा मुद्दा म्हणेज निरीक्षणाचा, कंपनीच्या शेअर्सचा LOWEST भाव आणी HIGHEST भाव काय हे बघायला हवे. यात वार्षिक, महिन्यातील, आठवड्यातील, त्यादिवशीचा व आत्तापर्यंतचा असे कमीतकमी आणी जास्तीतजास्त भाव प्रत्येक शेअरच्या बाबतीत मिळू शकतात.जर शेअर त्याच्या कमीतकमी किमतीच्या जवळ मिळत असेल तर त्या भावाला विकत घ्यावा. म्हणजे RISK-REWARD RATIOचे प्रमाण चांगले राहते.आपण प्रत्येक माणसाची किंवा वस्तुची कुवत पहातो. या मुलाची बुद्धी किती, याला मार्क किती मिळतील किंवा कपडे घेताना हा कपडा किती टिकू शकेल हे बघतो . त्याचप्रमाणे प्रत्येक शेअर किती वाढू शकतो याचा अंदाज निरीक्षणावरून बांधता येतो. म्हणजेच बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होणार नाही हे लक्षात घ्यावे. म्हणजे शेअर कधी विकावा याचे गणित घालता येते. जर १०% फायदा ५-६ महिन्यात होत असेल तर तो खूप चांगला ! कधीही जास्त हव्यास करू नये.
आता सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे मोदी FACTOR चा विचार आहे. जर तुम्ही धाडशी असाल धोका पत्करण्याची तयारी असेल तर ADANI ENTERPRISES, ADANI PORT , ADANI POWER, हे शेअर्स खरेदी करू शकता. गुजरातमध्ये असलेले किंवा गुजरात राज्याशी संबधीत शेअर्स म्हणजेच GNFC, GSFC , GUJARAAT GAS, GMDC इत्यादी. निवडणुकीचा फायदा मिडिया सेक्टर (प्रिंट मेडिया, इलेक्ट्रोनिक मेडिया ) याना होईल. कारण निवडणुकीच्या काळात जाहिरातीचे उत्पन्न वाढते. ENIL, जागरण प्रकाशन, HTMEDIA, ZEE ENTERTAINMENT हे शेअर्स पहा. मोदींच्या जाहीरनाम्यात बंदरे व उर्जा या क्षेत्रांवर भर दिला जाईल. गुजरातमधील अनुभव लक्षात घेता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना प्राध्यान्य मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे नफ्यात चालणारया व कार्यक्षमता दाखविणार्या सार्वजनिक उद्योगांचे शेअर्सही वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्येक गोष्टीचा विचार चहुबाजूनी करा. मोदि पंतप्रधान नाही झाले तर काय ? त्यामुळे ८-९ मेच्या जवळपास शेअर्स विकून कॅशमध्ये बसा आणी निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एन्ट्री घ्या. मोदि पंतप्रधान झाले नाहीत तर मार्केट कोसळेल तेव्हा शेअर्स स्वस्तात मिळतील.
तुमच्या भाषेत बोलावयाचे झाले तर शेअरमार्केटच्या फलाटावर गर्दी खूप आहे. सर्व लोकल्स भरून येत आहेत. तुम्ही चढू शकाल कां ? सुरक्षितपणे उतरू शकाल कां? घुसमट तर होणार नाही याचा विचार करा, लहानमुलाबाळांना घेवून लोकलमध्ये चढू नका. म्हणजेच दुसर्या शब्दात “A’ ग्रुपच्या शेअर्समध्ये किंवा BLUE CHIP शेअर्स मध्येच राहा. वेळेवर खरेदी विक्री करा. आपल्याला उतरायच्या स्टेशनवर गाडी थांबते ना याचा विचार करा नफ्याचे प्रमाण ठरवून आपले उतरण्याचे ठिकाण नीट ठरवा. ही खटपट मारामारी जमत नसेल तर निवडणुका होईस्तोवर भानगडीत पडू नका.
निघण्याआधी एक सांगते , मी उदाहरणासाठी ज्या शेअर्सची नावं सांगितली आहेत ती फ़क़्त उदाहरणासाठीच आहेत. ते शेअर घ्या असं मी सांगत नाहीये. या लेखातून घेण्यासारखं काही आहे तर ते विचार करायची एक पद्धत आणि शेअर मार्केटमध्ये लावता येतील असे काही निकष. बाकी मग कुठले शेअर घ्यावेत हा तुमचा तुमचा प्रश्न ..
भेटूच लवकर
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा