Monthly Archives: May 2014

भाग ४१ – मार्केटमधले Window Shopping – भाग २ !!

गेल्या वेळी आपण वर्षाचे पहिले ६ महिने शेअर मार्केटच्या नजरेतून बघितले आता उरलेल्या ६ महिन्यांकडे बघूया. हा कालावधी सणावाराचा तसेच पावसाचा असतो. दोन्हीचा परिणाम शेअर मार्केटवर होतोच, कसा ते या भागात सांगते
आता आपला देश पडला शेतीप्रधान त्यामुळे पावसाचे प्रमाण व हा पाऊस भारतभर योग्य वेळी व योग्य प्रमाणात पडतो की नाही यावर I.I.P. चे आकडे , G.D.P.(GROSS DOMESTIC PRODUCTION) व DEFICIT , महागाईचे आकडे अवलंबून असतात.या सर्व आकडेवारीवरच R .B .I . (RESERVE BANK OF INDIA)चे आर्थिक धोरण आणि व्याजाचे दरही ठरतात.
पावसाळ्यात बांधकामाची कामे कमी होतात. त्यामुळे सिमेंटची मागणी कमी.सिमेंट कंपन्याचे शेअर्स स्वस्त मिळू शकतात. अगदी रु. २०/- पासून रु. २०००/- किमतीपर्यंत सिमेंट कंपन्यांचे शेअर उपलब्ध आहेत . रस्त्याची कामे थांबतात. पण पत्रे विकणार्या कंपन्यांची विक्री वाढते. इर्रीगेशन कंपन्यांच्या मालाची मागणी वाढते. पावसाळ्यांत कीटकनाशकांचा वापर वाढतो त्यामुळे खते, व केमिकल्सचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची विक्री वाढते.
त्याचवेळी गणपती, दसरा दिवाळी , ओणम हे सर्व सण असतात. त्यामुळे स्कूटर मोटारसाईकल , मोटार. यांचीही विक्री वाढते फ्रीज टी.व्ही. इत्यादी ग्राहकोपयोगी वस्तूंचीही विक्री वाढते
काही काही वेळा काही काही कंपन्या त्यांचे वार्षिक निकाल जूनपर्यंत जाहीर करत नाहीत. बहुतेक कंपन्यांच्या लाभांश देण्याच्या तारखा जुलैमध्ये असतात.जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असे आढळेल की काही कंपन्या शेअरला रु.१५ वा त्याच्यापेक्षा जास्त लाभांश देतात. लाभांश व शेअरची किमत यांचाही ताळमेळ बसतो की नाही ते पहा. शेअरची किमत रु.१६०० ते रु.१८०० आहे. व लाभांश रु.१५ ते रु.२० आहे परंतुं काही वेळेला असे होते की शेअरची किमत रु.१०० ते रु.१५० असते व लाभांश रु.७ पर्यंत असतो किंवा शेअरची किंमत रु.१५ ते रु २० असते व लाभांश प्रत्येक शेअमागे रु.१ असतो. लाभांश शेअरच्या किमतीप्रमाणे योग्य प्रमाणात असला तर फायदेशीर ठरतो. जर शेअरची किमत व लाभांशाचे गणित जमले तर थोड्या कालावधीत चांगला फायदा होतो .
या कालावधीमध्ये TEXTILE कंपन्या तेजीत असतात. TRACTORS, EICHER MOTOR सारख्या मालवाहू ट्रकला मागणी असते. कोणत्या देशांत पाऊस पडला कोठे पाऊस पडला नाही या गोष्टींची माहिती ठेवा. वर्तमानपत्रात या बातम्या येत असतात. गेल्याच वर्षीची गोष्ट घ्या. गेल्यावर्षी रबराचे उत्पादन वाढले त्यामुळे रबराच्या किमती कमी झाल्या. रबर हा कच्चा माल म्हणून उपयोग करणाऱ्या कंपन्यांचे मार्जिन वाढले आणि पर्यायाने नफा वाढला. त्यामुळे CEAT, MRF, APPOLLO, J. K. TYRES या शेअर्सचे भाव वाढले.
पावसाळा संपल्यानंतर लोक प्रवासाला जाण्यास प्राध्यान्य देतात.आल्हाददायक कालावधी असतो. या काळांत हॉटेल्स, विमान कंपन्या किंवा प्रवासाची बुकिंग करणारया वा पर्यटनाशी संबंधीत असणाऱ्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढतात. थंडीमध्ये अंडी व कोंबड्यांचे भाव वाढतात. त्यामुळे कुक्कुटपालन आणी त्याच्याशी संबंधीत कंपन्यांची विक्री वाढतेउदा.VENKEY’S.  प्रवासामध्ये मजा, थंडीचे दिवस आणी त्यामध्ये येणाऱ्या सणांमुळे दारूची वाढती विक्री होते. त्यामुळे दारू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत असतात.   लोक दिवाळी, नववर्ष, नाताळ, अशा दिवशी फुलांचे गुच्छ, ग्रीटींग्स कार्ड्स, भेटवस्तू एकमेकांना देत असतात. या सणांच्या सुमारास या सगळ्या धंद्यात असणार्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढतात उदा – ARCHIES.
म्हणजेच प्रत्येक बाजारपेठेत सामान्य ज्ञान उपयोगी पडते. जसे श्रावण महिना आला की दुकानदार पूजेचे साहित्य दिसेल असे मांडतात. १५ अगस्तला स्वातंत्रदिनी सगळीकडे झेंडे व पांढरया टोप्या, पांढरया साड्या  शोकेस केलेल्या दिसतात .हा सगळा हिशेब शेअर्स खरेदी करताना घाला. अर्थात हा हिशेब अल्प किंवा मध्यम मुदतीसाठी शेअर्स खरेदी करत असाल तरच घाला.गुंतवणुकीसाठी शेअर्स खरेदीची संधी नेहेमी नेहेमी मिळतं नाही. मार्केट जेव्हा रपारप पडत असेल आणि कोणीही शेअरमार्केटच्या जवळपासही फिरकत नसेल तेव्हा शेअर्स खूप स्वस्तात मिळतात. अशा वेळी दीर्घ मुदतीसाठी म्हणजेच १वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी शेअर्स खरेदी करा. त्यावेळी खरेदी केलेला चांगला शेअर multi-bagger होण्याची शक्यता निर्माण होते.
सध्या निवडणुका आहेत. नेहेमीचे आडाखे उपयोगाचे नाहीत. निवडणूक-जाहीरनाम्यामध्ये काय काय कबुल केले आहे आणी कोणती आश्वासने दिली आहेत हे पाहूनच त्या त्या उद्योगातील निवडक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत. सध्या अशी खसखस पिकली आहे की मोदी निवडून आले तर त्यांचा कल उर्जा, रस्तेबांधणी,बंदराची प्रगती याकडे असेल. त्यानुसार सर्वांच्या रडारवर ते शेअर्स आहेत. ( हा भाग लिहिला तेव्हा निवडणुकीचा निकाल लागायचा होता ). निवडणुकीचा विचार केल्यास एखाद्या कंपनीचा प्रमोटर निवडणुकीला उभा असेल आणी निवडून आला नाही तर त्या कंपनीचा शेअर काही काळापुरता पडतो. कारण शेअर मार्केट कोणत्याही बातमीवर लगेच आणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करते. असे जर घडले तर रु.५० ते रु.१०० नी शेअर स्वस्त पडतो. २-३महिन्याने भाव वाढल्यावर विकता येतो.
काही वेळेला कायदेकानू, सरकारी नियम , न्यायसंस्थांचे निर्णय आदीचा फटका बसल्यामुळे कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी होतात.उदा. HDIL,DLF , HCC. कधी कंपन्यांवर आयकर व तत्सम खात्यांच्या धाडी पडतात. एका कंपनीवर दुसरी कंपनी कोर्टात केस घालते. एखादी कंपनी बोनस,विशेष लाभांश देते, शेअर्सचे विभाजन करते, कंपनी एखादा भाग विकून टाकते, किंवा ती कंपनी दुसऱ्या कंपनीला खरेदी करते,कंपनी आपले धोरण बदलते किंवा कार्यक्षेत्र विस्तारीत करते, कंपनीच्या प्रमोटर्समध्ये भांडणे होतात, कंपनी जर परदेशी बाजारपेठेत व्यवहार करत असेल तर त्या देशातील बदललेल्या कायदेकानुचा ही फटका कंपनीला बसतो.उदा. ‘विसा ‘ च्या नियमातील बदल किंवा कंपनीच्या उत्पादनाच्या विक्रीवर आणलेली बंदी.
भावनेला प्राधान्य न देता शेअर्सच्या भावावर होणारा परिणाम बघा. कोणत्याही कंपनीमध्ये भावनेच्या आहारी जावून पैसे गुंतायचे नाहीत. भावना बाजूला ठेवून व्यावहारिक विचार केल्यास शेअरमार्केटमध्ये यश नक्की मिळेल.
ह्या दोन्ही लेखांमध्ये तुम्ही ठराविकच शेअर्स घ्या असे सांगण्याचा उद्देश नाहीकिंवा मला तसं सुचवायचंहि  नाही. फक्त शेअरमार्केटचा अभ्यास कोणत्या प्रकाराने करता येऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला त्यातून काही दिशा मिळावी ही सदिच्छा!
 पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा