भाग ४३ – रुक जाना नहीं, तू कही हार के !!

गृहिणी ते शेअरमार्केट हा आपला प्रवास अजून संपलेला नाही. हा प्रवास खूप लांबलचक आहे. प्रवासांत काही लहान मोठी स्टेशने येतात तश्या माझ्या प्रवासात वाचकांच्या काही शंका आल्या होत्या. काही गोष्टी समजलेल्या नव्हत्या. काही बाबतीत मी दिलेली माहिती त्यांना अपुरी वाटली. त्यामुळे त्यांनी प्रेमाने मला मध्येच थांबवून त्यांना हवी होती ती माहिती विचारली शंकांचे निरसन करावयास सांगितले. मलासुद्धा माहिती सांगताना आणी शंका निरसन करताना आनंदच झाला.माझा ब्लोग वाचून लोकांना उपयोग होतो आहे हे समजलं. आता २९ व्या भागापासून शेअरमार्केटचा प्रवास पुढे चालू करू या.
मी माझे एच. डी एफ सी. चे शेअर्स विकले व गिनी सिल्कचे शेअर्स थोडे थोडे करून विकणे सुरूच ठेवले. जसा जसा जास्त जास्त भाव मिळेल तसे तसे वरच्या वरच्या भावाला विकत राहिले. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. अडकलेला पैसाही थोडा थोडा मोकळा झाला. व दरवेळी पहिल्यापेक्षा जास्त भावाला विकत असल्याने सरासरी चांगली होऊन भाव चांगला होत गेला.यालाच मार्केटच्या भाषेत ‘STAGGERED BUYING OR SELLING’ असे म्हणतात.
विक्री कशी करायची याची प्राथमिक माहिती मला मिळाली होती .जास्त डोके चालवण्याएवढा माझ्याजवळ वेळ होताच कुठे? कारण शेअरमार्केटचा व्यवसाय करण्यासाठी मला भांडवलाची गरज होती.आता माझ्याजवळ थोडफार भांडवल तयार झालं होतं. ‘बोलाचा भात बोलाची कढी’ संपली आणि आता खरा भात करायची वेळ आली. भात चांगला झाला तर सगळे पोटभर जेवतील, भात करपला , कच्चा राहिला किंवा भाताची खीर झाली तर नावं ठेवतील व सर्वजण उपाशी राहतील. त्यामुळे प्रत्येक पाउल जपून टाकण भाग होतं
किती भांडवल गुंतवायच ? जेवढ भांडवल जमा झालय तेवढ सगळ गुंतवावं कि ५०%आता गुंतवून बाकीचे थोडे दिवसांनी मार्केट पडलं तर गुंतवावं? असा प्रश्न पडला. अशावेळी आमच्या ऑफिसमध्ये लोक ज्या गप्पा मारत त्याचा मला उपयोग झाला. ऑफिसमध्ये एक गोष्ट होत असे . कुणीही कधीही घरगुती गोष्टी बोलत नसत,कुणाचा अपमान करण किंवा कुणाला कमी लेखण नाही, किंवा मला पैसे मिळाले त्याला मिळू नयेत अशी संकुचित दृष्टी मला आढळली नाही.
मी आपली फक्त सगळ्यांच्या गप्पा ऐकून किंचित हसून प्रतिसाद देत असे. पण मला त्या गप्पांचा उपयोग झाला. “अरे, १०० शेअर्स एकदम कां घेतलेस. २५-२५ च्या गटाने घ्यायचे होतेस. मार्केटचा अंदाज घेतला असतास तर बरे नाही कां? आज दुपारी ‘I. I. P’ चे आकडे येणार तेव्हा जर मार्केट पडले तर स्वस्त पडतील वगैरे वगैरे.
अहो, तेव्हा मला ‘I. I. P.’ ‘INFLATION ‘ ‘CAD’(CURRENT ACCOUNT DEFICIT ) म्हणजे काय हे काहीच कळत नव्हते. पण मला एवढे मात्र कळले की खरेदी छोट्या छोट्या लॉटमध्ये करावी.मार्केटचा अंदाज घेवून करावी. आणी मार्केटच्या अस्थिरतेचा फायदा करून घ्यावा. मार्केटमधील अस्थीरतेलाच “MARKET VOLATILITY ‘ असे म्हणतात.
त्याचबरोबर मार्केट पाहणे ऐकणे निरीक्षण करणे या सवयींचा उपयोग झाला.
काही शेअर रोज किती वाढतात किंवा मार्केट पडले तर किती पडतात किंवा शेअर्सचे जे निर्देशांक (SENSEX, NIFTY ) आहेत त्यांचा शेअरच्या किमतीतील वाढीशी किंवा कमी होण्याशी काही संबध जोडता येतो कां ? हे मी माझ्या सोयीसाठी निरीक्षणाने पाहिले. शेअर्सच्या खरेदीशी या सर्व गोष्टींचा फार घनिष्ट संबंध आहे.
मी तुम्हाला कित्येक वेळेला एक गोष्ट सांगितली आहे पुन्हा सांगते शेअर खरेदीचा उद्देशच फायदा घेवून विकणे हा असतो. जतन करणे, म्युझियममध्ये ठेवणे हा कदापि नसतो. ‘TO MAKE MONEY’ हाच उद्देश हेच अंतिम ध्येय व तुम्हाला पैसा किती सुटला यावरच तुमच्या यशाची मोजदाद होते.
इथे एक गोष्ट तुमच्या कानांवर घातल्याशिवाय मला राहवत नाही. मी ऑफिसमध्ये जाताना किंवा घरी येताना काही गरजेच्या गोष्टी खरेदी करीत घरी येत असते. हे माझ्यासारख्या गृहिणींना काही नवीन नाही. घरांत काय संपले आहे काय उद्यासाठी हवे आहे., घरातील मुलांच्या मागण्या काय आहेत हे सर्व डोक्यांत ठेवूनच गृहिणी वावरत असते. ऑफिसच्या बाहेरच बसणाऱ्या फळवाल्याकडून मी फळे घेत असे. कारण त्याचा दर वाजवी असे. मालही चांगला असे. तो माझ्या ओळखीचा झाला होता. मी त्याला एकदा विचारले “तुला एवढ्या भावांत विकणे परवडते कसे? “ तेव्हा तो म्हणाला “फायदा किती घ्यावयाचा हे माझे ठरलेले असते. आज कोणता माल लावायचा , किती किमतीला मिळायला हवा, किती किमतीला विकावा, खर्च जाऊन किती पैसे मिळाले पाहिजेत हा हिशोब करूनच मी माल घेतो .२-३ तास बसतो. दुकाने उघडण्याच्या आंत माझी पाटी रिकामी मी पण रिकामा. माल चांगला असल्यामुळे गिऱ्हाईकही फिक्स्ड असते “.
यशाचे केवढे मोठे गणित तो फळवाला मला कळत-न-कळत सुचवून गेला होता. हेच तंत्र बद्या–चढ्या भाषेत बोलायचे तर वाजवी नफा ठेवायचा, टर्नओव्हर जास्त हवा, भांडवल जास्त लवकर बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा गुंतवता येतं. व तेवढेच भांडवल वापरून जास्तीतजास्त फायदा मिळवता येतो. म्हणजेच १००००रुपये गुंतवायचे ठरवले तर १००रुपये प्रती शेअर किमतीचे शेअर खरेदी करायचे. महिन्याभरांत विकायचे व पुन्हा फायदा बाजूला काढून घेवून पुन्हा १००००रुपये गुंतवायचे. म्हणजेच आपण वर्षाला १,२०,००० रुपये गुंतवू शकतो.प्रत्येक महिन्यांत १००० रुपये फायदा झाला तर वर्षाअखेरीला १००००रुपयांवर १२०००रुपये निव्वळ फायदा होऊ शकतो.
म्हणजे ज्यावेळी आपल्याजवळ भांडवल कमी असते तेव्हा ‘QUICK ENTRY, QUICK EXIT ‘ करून पुन्हा पुन्हा तोच पैसा वापरून जास्त फायदा मिळवता येतो. त्यासाठी योग्य वेळ व योग्य वेळीच योग्य निर्णय ताबडतोब घेणे यावरच यशाचे गणित अवलंबून असते. त्याचबरोबर त्या फळवाल्याने अजून एक गोष्ट सांगीतली ती सुद्धा विचारात घेण्यासारखीच!
‘माल चांगला म्हणजे गिऱ्हाईकही फिक्स्ड’ म्हणजेच शेअरमार्केटच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास चांगले शेअरच घेतले पाहिजेत. म्हणजेच कंपनीच्या अस्तित्वाबद्दल, तिच्या प्रगतीशील वाटचालीबद्दल कोणत्याही प्रकारची शंका खरेदीच्या वेळीतरी आपल्या मनांत असू नये.नाहीतर आज कंपनी अस्तित्वांत होती उत्पादन तसेच विक्री जोरांत होती, पण थोड्याच दिवसांनी बंद पडली. शेअर्सचा भाव २०पैसे झाला.म्हणजेच ‘तेल बी गेलं तूप बी गेलं आणी हाती धुपाटणे आले’ अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्व प्रकारची खात्री झाल्यावरच खरेदी करावी. नाहीतर जमीन जशी धुपून नाहीशी होते तसे भांडवल संपून जाईल व हातांत करवंटी यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या भांडवलाची जपणूक करणे सर्वात जास्त महत्वाचं…
अजून पुढे बरंच काही बोलायचं , पण ते पुढच्या भागात …
  पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

5 thoughts on “भाग ४३ – रुक जाना नहीं, तू कही हार के !!

  1. Pingback: भाग ४२ – तुमची शंका आणि मार्केटची भाषा | Stock Market आणि मी

  2. Manoj Patil Post author

    Madam,
    Share cha EPS and PE ratio minus madhe(-) asel tar te share kase astat.pls mala mahiti dya.

    Reply
    1. surendraphatak Post author

      हे दोन्ही रेशियो जर NEGATIVE असतील तर कंपनी तोट्यांत असते. लाभांश देत नाही. गुंतवलेले भांडवल धोक्यांत येणार असते. एखाद्या कंपनीला झालेला तोटा एका वेळचा किंवा काही विशिष्ट कारणासाठी आहे कां ते बघावे. ते कारण किंवा कंपनीचा पर्फार्मंस दीर्घ काळाकरता तोट्यांत राहणार आहे कां ते बघावे.

      Reply
  3. NikhiL Post author

    वा! ब्लॉग वाचताना, हे अनुभवाचे बोल आहेत हे मनोमन पटते. (तुम्ही २०१४ मधेच लिहिलाय आणि मी आज २०२१ मधे वाचला! आमचा मार्केटमधला प्रवेश तसा २०१७ मधला, पण माहितीअभावी जास्त व्यवहार करत नव्हतो. २०२० मध्ये आमची वाटचाल थोडी सक्रिय झाली, खरं तर लॉकडाऊन मुळेच झाली असं म्हणावं लागेल. थोडे धक्के खात मार्गक्रमण सुरु होते, मग बरीचशी माहिती ऑनलाईन क्लास केल्यामुळे कळली आणि आता २०२१ तुमची साईटही सापडली… आता थोडं लक्ष देत खरेदी-विक्री सुरु केली आहे. ते करताना या ब्लॉगशी तंतोतंत जुळणारे अनुभव आले, त्यामुळे वाचताना रस निर्माण झाला. आता हे मी काही महत्वाचं लिहीलं नाहीये, फक्त तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांशी गप्पा मारता, म्हणून सहजच लिहिलं आहे) तुमच्या ब्लॉग्सचा, रोजच्या मार्केटच्या विश्लेषणाचा उपयोग होतो खरेदी-विक्री करताना! त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! १३/०४/२०२१.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.