Monthly Archives: August 2014

भाग ४५ – खरेदी विक्री करत रहावी !!

तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडेसे भांडवल जमा झाले. अर्थातच रद्दी झालेले शेअर्स विकुनच. परंतु एक गोष्ट मात्र खरी रद्दी विकून पैसे येवोत, जुनी भांडी मोडीला घालून पैसे मिळोत शेवटी पैसा तो पैसाच. या पैशाचे मूल्य व पगारातून मिळालेल्या पैशाचे मूल्य यांत काही फरक नसतो .पैश जपूनच वापरायचा हेच खरे !
बहुतेक गृहिणींना बाजारहाट करण्याची सवय असते. काय खरेदी करायचं, कधी खरेदी करावयाचं , कोणत्या भावाला खरेदी करावयाचं, किती खरेदी करावयाचं, कोणत्या गुणवत्तेचे खरेदी करावयाचं व प्राधान्य कशाला द्यायचं हे शिकवाव लागत नाही. परंतु शेअर मार्केटच्या बाबतीत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अनुभवातूनच शोधावी लागतात.
शेअरमार्केटशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही हे मला पटले होतं. मी त्यावेळी जे शेअर्स खरेदी केले त्याचा उपयोग आत्ता होईल असं वाटत नाही. त्यातल्या काही कंपन्या सध्या अस्तित्वात नाहीत. या कंपन्यांचे दुसऱ्या मोठ्या कंपनीत विलीनीकरण झाले अथवा दुसरया कंपनीने या कंपन्यांना विकत घेतल्यामुळे या कंपन्यांचे स्वतंत्र अस्तित्व उरले नाही, उदा. बोन्गाईगाव रिफायनरी, कोची रिफायनरी, IBP, UTI BANK.  CESC व G.E. SHIPPING या दोन कंपन्या मात्र त्याच नावाने अस्तित्वात आहेत. ही नावं वाचल्याबरोबर तुमच्या एक लक्षात आलं असेल ते म्हणजे अश्या कंपन्यामध्ये गुंतवणूक म्हणजे सुरक्षितता, कंपनी बुडण्याची भीती कमी आणि शेअरवर मिळणार्या लाभांशाचे प्रमाण जास्त. पण या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सरकारी धोरणावर अवलंबून आणि या कंपन्या संपूर्ण व्यापारी वृत्ती ठेवून काम करीत नाहीत. समाजाचे हित पाहिले जाते. असे बहुतेक शेअर्स सरकारच्याच मालकीचे असतात. त्यामुळे या शेअर्सचा भाव खूप वाढत नाही. या सर्व गोष्टी हळू हळू लक्षांत येत गेल्या. या शेअर्समधील गुंतवणूक म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक हे सुद्धा लक्षात आलं .
त्यावेळी माझी अवस्था अडाण्याप्रमाणेच होती. कोणता शेअर स्वस्त आणी कोणता शेअर महाग याचा गंध नव्हता. TV वर लाल रंगात दिसले की भाव पडला आणी हिरव्या रंगात दिसले की त्या शेअरचा भाव वाढला एवढीच काय ती तोडकी मोडकी अक्कल. परंतु हा शेअर बुक VALUE च्या कितीपट चालू आहे. मार्केटमध्ये या सेक्टरमधल्या कंपन्यांना किती भाव मिळतो हे काही मला माहित नव्हतं.
इतर प्रकारची बाजारहाट करण्यामध्ये माझा हात धरणारा कोणी नव्हता. मला लहानपणी बाजारमास्तरच म्हणत असत. मी चोखंदळ ग्राहक होते. बाजार करायला मला आवडायचं आणि यायचंसुद्धा . बाजारहाट करताना सगळ्यांची जी काय फजिती होते ती मी डोळ्यांनी पहिली आहे.एकदा माझ्या मैत्रीणीला आईनी अंबाडीची भाजी आणायला सांगितली पण तिला अंबाडीची भाजीच ओळखू येत नव्हती. आणी किती रुपयाला जुडी मिळते हेही माहित नव्हते. एकदा वैशालीला पोहे घ्यायचे होते पण कसले पोहे जाड की पातळ, तळायचे  पोहे की नायलॉनचे, ज्वारीचे की तांदुळाचे हे काहीच कळत नव्हते. या सगळ्या समस्या मला कधी आल्या नाहीत पण  शेअरमार्केटच्या बाबतीत मात्र मला अनेक प्रश्नांची उत्तरे चौकस बुद्धीने शोधावी लागली.
लहान लहान लॉटमध्ये खरेदी करायची आणी कमीतकमी भावाला खरेदी करायची एव्हढेच माहित होते. ,आमच्या जमान्यात जेव्हां बाजारहाट करायचो तेव्हां ती वस्तू आईला किंवा सासूला पसंत पडली की काम फत्ते. पण शेअर्स खरेदी केल्यानंतर तो पसंत पडो किंवा न पडो त्याचा भाव वाढायला हवा आणी विकल्यानंतर फायदा व्हावयास हवा हा कळीचा मुद्दा!
कमीतकमी भावाला खरेदी करायची हे पटले परंतु कमीत कमी भाव तरी कोणता, हा भाव ठरवायचा कसा! अहो १०० मार्कांचा पेपर असतो तेव्हां १००पैकी १०० मार्क मिळाले की सर्वांत जास्त आणी १०० पैकी ३५ मिळाले की उत्तीर्ण होण्यापुरते आणी त्यापेक्षा कमी मिळाले की तोच अभ्यास परत करायला लागतो. परंतु शेअरमार्केटच्याबाबतीत मात्र अशी काहीच व कोणतीच मर्यादा नाही.  ‘SKY IS THE LIMIT ‘  भाव कां वाढला किंवा कां कमी झाला याचे उत्तर सापडणे कठीण. प्रत्येक विश्लेषक ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु तेच विश्लेषण बरोबर असेल असे छातीठोकपाने सांगता येत नाही.त्यामुळे सातत्याने निरीक्षण करणे हाच एकच रामबाण उपाय.
समजा शेअरचा भाव ८८रुपये चालू आहे तर ८५रुपये या भावाला शेअर खरेदी करावेत असे मी ठरवत असे. १०० शेअर्स खरेदी करायचे असले तर प्रत्येकवेळी २५ २५ शेअर्स खरेदी करण्यासाठी ऑर्डर टाकत असे. कारण मीच माझी मुखत्यार होते. घरांत कुणाला शेअरमार्केटबद्दल समजत नव्हते. समजा मार्केट वाढत राहिले, ऑर्डर लावलेल्या भावाला शेअर्स मिळाले नाहीत तर शांतपणे दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑर्डर लावायची. पण समजा दुसऱ्या दिवशी मार्केट पडत असेल तर ८३रुपयाच्या ऐवजी ८१रुपयाला ऑर्डर लावायची. मार्केट पडण्याचा जोर जास्त असेल तर ८१रुपयाची ऑर्डर बदलून ७७रुपयाची ऑर्डर लावत असेल आणी मार्केट्ची वेळ संपत आली असेल तर ऑर्डर काढून टाकून पुन्हा दुसऱ्या दिवशी नवी विटी नवे राज्य चालू करायचे.
मी त्या काळामध्ये ऑफिसमध्ये जाऊन बसत असे. माझे दोन दिवस ऑर्डर लावण्यांत आणी काढण्यांतच फुकट गेले. मी लावलेल्या भावाला शेअर्स मिळालेच नाहीत.त्यावेळी मला एक गुरु भेटला.
ते गृहस्थ म्हणाले
“ madam, आपण कोणत्याही शेअरचा ‘TOP’ किंवा ‘BOTTOM’ अचूक पकडू शकत नाही. मोठ्या मोठ्या फुशारक्या मारणाऱ्यांची सुद्धा येथे गाळण उडते. त्यामुळे सारासार विचार करून खरेदी करा. शेअरमार्केटमध्ये गरज हा मुद्दाच नाही. जवळजवळ ६०००शेअर्स आहेत.अमुकच शेअर अमुकच भावाला आणी आजच घेतला पाहिजेअसे तुमच्यावर बंधन नाही.  नुसती ऑर्डर सातत्याने बदलून तुम्हाला काय साधणार . तुमचे शेअर्स खरेदी होणारच नाहीत त्यामुळे ते शेअर्स विकून फायदा मिळविणे ही दूरची बात! नुसते कष्ट मात्र होतील आणि पदरांत काहीच पडणार नाही.त्यापेक्षा तुम्हाला जो शेअर खरेदी करावयाचा असेल त्याची माहिती इंटरनेटवरून मिळवा. तुम्हाला त्या शेअरचा कमीतकमी भाव किती होता व जास्तीतजास्त भाव किती होता हे समजेल. LOW भावाच्या जवळपासच्या किमतीला खरेदी करा व HIGH भावाच्या जवळपास विका. म्हणजेच आपण धोका किती पत्करत आहोत व फायदा किती होणार आहे हे समजू शकेल.सुरुवातीला थोडी भीती वाटते पण त्याला इलाज नाही.”
मी ऑफिसमध्ये असतानाच दोन व्यवहारांकडे माझे लक्ष गेले. एका माणसाने त्याच दिवशी ८३रुपयाला घेतलेले १००शेअर्स ८५ रुपयाला त्याच दिवशी विकले एका तासांत खरेदी-विक्री करून २००रुपये गाठीला बांधून तो मोकळा झाला. पण त्याच वेळेला दुसऱ्या माणसाने ८५रुपयाला घेतलेले शेअर्स ८३रुपयाला विकले. वारंवार विचार करूनही या व्यवहारामागची त्या माणसाची भूमिका माझ्या लक्षांत आली नाही. अज्ञान उघडे केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही त्यामुळे लाज वाटत असली तर ती  खुंटीला टांगून ठेवली पाहिजे. असा विचार करून संकोच न बाळगता मी त्या व्यक्तीला त्याच्या व्यवहाराचे कारण विचारले.
तेव्हां तो माणूस म्हणाला
“ तासाभरांत फारशी मेहेनत न  करता दोनशे रुपये मिळत होते ते पदरांत पडून घेतले इतकेच.मी INTRADAY करण्याच्या उद्देश्याने शेअर्स खरेदी केले नव्हते. ८० रुपयाला हे शेअर्स मिळायला पाहिजे होते असे मला वाटते. उद्या ८०रुपयाला मिळतात कां हे पाहीन.”
मी त्यांना म्हटले “ माझ्यावर रागाऊ नका मी तुमच्या व्यवहारांवर लक्ष ठेवते असे समजू नका. शेअरमार्केट शिकणे एवढाच एक कलमी कार्यक्रम आहे.’
ज्या दुसऱ्या व्यक्तीने घाटा सोसून शेअर्स विकले त्यांनाही मी विचारले की
“नुकसान सोसून शेअर्स विकण्याचे कारण काय? कारण सांगण्यासारखे असेल तर मला सांगा.”
ते म्हणाले
“ ८३रुपये हा माझा “STOP LOSS’ होता. हा ‘STOPLOSS’ मी लावला होता त्यामुळे ८३रुपये भाव होताक्षणीच माझे शेअर्स आपोआप विकले गेले. MADAM आज रागाऊ नका आज मला घरी जायची घाई आहे. ‘STOPLOSS ’ म्हणजे काय तो का लावावा ही माहिती  मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगितली तर चालेल कां ?”
त्यांना जायचं होतं तसं आत्ता मला पण निघायचं पण आपणसुद्धा “STOPLOSS’ विषयीची माहिती पुढच्या भागांत घेवू… बोलूनच लवकर