सकाळचे ८ वाजले. माझा डबा तयार झाला. यजमानांच्या कपड्यांना इस्त्री केली.त्यांचीही तयारी झाली.ते ऑफिसला जाण्यास निघाले. जातां जातां मला म्हणाले
“आज तू ऑफिसला जाणार असलीस तर फार्म्स घेवून ये. IPO (INITIAL PUBLIC OFFER )येतो आहे”
आतां तुम्हाला सांगायचं तर IPO म्हणजे शेअरमार्केटमध्ये बागडण्यासाठी,खेळण्यासाठी नव्याने दाखल होणाऱ्या बाळाची लागलेली चाहूल! बाळाची चाहूल लागली की जसं वातावरण बदलतं, अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण येतं, काय मग मुलगा की मुलगी? अशी चेष्टामस्करी सुरु होते त्याचप्रमाणे ब्रोकरच्या ऑफिसमध्ये सुद्धा चर्चा चालू होते.
काही लोकांना याची माहिती आधीपासूनच असते. कोणत्या कंपनीने इशू आणण्यासाठी DRHP (DRAFT RED HERRING PROSPECTUS) दाखल केले आहे. ही कंपनी कोणत्या उद्योगांत आहे, इशू कधी येईल हे सगळं माहित असतं. आता ज्या कंपनीचा इशू येणार आहे ती कंपनी ज्या उद्योगातील असेल त्या उद्योगातील शेअर्समधील खरेदी थोड्याफार प्रमाणांत वाढू लागते.या उद्योगातील शेअरला जास्तीतजास्त किती भाव मिळेल किंवा कमीतकमी भाव किती मिळेल याचा अंदाज येऊ शकतो.पण ज्या उद्योगातील शेअर्स मार्केटमध्ये लिस्टेड नाहीत तो शेअर किती रुपयाला लिस्ट होईल याचा अंदाज येऊ शकत नाही.कारण इतर शेअर्सच्या भावाशी या शेअरची तुलना करता येत नाही.उदा: स्टील उद्योगातील, हॉटेल उद्योगातील बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये आहेत परंतु “JUST DIAL” किंवा ‘JUBILANT FOODS’ या सारख्या उद्योगातील कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत.त्यामुळे स्पर्धाही नाही आणि काय स्वस्त काय महाग हेही समजत नाही. कधी कधी अश्या उद्योगातल्या शेअर्सच्या बाबतीत लोकांना खूप उत्सुकता असते. आणि अशा कंपन्यांचे “BUSINESS MODEL’ काय आहे PROFIT MARGIN’ किती आहे, आणि त्यांचा ग्राहकवर्ग कोणता यानुसार त्या कंपनीला काय भाव मिळेल हे ठरवाव लागतं.
अश्या नवीन उद्योगांत कार्यरत असणार्या कंपन्याना “ NICHE ‘ कंपन्या असे म्हणतात किंवा हिंदीमध्ये “जरा हटके” प्रकारच्या कंपन्या म्हणतात. मार्केटमध्ये हा इशू कुठला, लिस्टिंगला काही फायदा होईल कां ? किती रुपयाला इशू फुटेल,शेअर्स मिळतील कां ? असे एक ना अनेक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाभोवती रंगणाऱ्या चर्चा सुरु होतात. “ ग्रे मार्केट” मध्येसुद्धा वेगवेगळे अंदाज वर्तविले जातात. इशू प्राईसच्या वर किती रु. फायदा मिळेल याचा अंदाज व्यक्त होऊ लागतो. हे अंदाज खरे ठरतातच असे नाही या अंदाजांवर किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.
SEBI (SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA) च्या नियमाप्रमाणे प्रत्येक कंपनीचा “SWOT’ ANALYSIS’ देणे जरुरीचे असते. (STRENGTH, WEAKNESS, OPPORTUNITIES,THREATS ANALYSIS ) याचाच अर्थ कंपनीचे गुण-दोष, कंपनीला उपलब्ध असणाऱ्या वर्तमान तसेच भविष्यातील संधी आणि त्याबरोबर येणारे धोके यांची चर्चा केलेली असते.खरे पाहतां शेअर्ससाठी अर्ज करताना अर्जदाराने हे सर्व वाचणे जरुरीचे आहे. म्हणजे मग शेअर स्वस्त मिळतो आहे की महाग मिळतो आहे हे समजते.
पूर्वी अशी समजूत होती की ‘IPO’ मध्ये शेअर्स स्वस्त मिळतात. परंतु हल्ली मात्र असं दिसतं नाही. शेअर्सची प्राईस ठरवणार्यांकडून गुंतवणूकदाराचा काही फायदा व्हावा असा विचार होत नाही असं दिसतंय
वर्तमानपत्रातून, दूरदर्शनवरील वाहिन्यांवरून ‘IPO’ कॉर्नर सारख्या कार्यक्रमातून चर्चा होत असतात. तुम्ही त्या चर्चा ऐकून योग्य तो निर्णय घेत चला. मार्केटमध्ये मात्र काहीही घडू शकतं. तुम्हाला या गोष्टींचा अनुभव पदोपदी येतो. एखादा मुलगा एकुलता एक, देखणा , चांगली नोकरी, चांगला पगार सुस्थितीत असला तरी लग्न ठरता ठरत नाही.ते कां याला काही उत्तर नाही. त्याचप्रमाणे एखाद्या कंपनीचे शेअर्स सर्व बाजू चांगल्या असूनही चांगल्या भावाला ( गुंतवणूकदाराला पुरेसा फायदा होईल अशा भावाला ) लिस्ट होत नाहीत. एखाद्या इशुच्या बाबतीत अनेक धोके असतात तरीही तो इशू चांगल्या किमतीला लिस्ट होतो . काय करावे काही कळेना अशी अवस्था होते!पण अशा गोष्टी अपवाद म्हणून सोडून देत चला.
शेअर्स मिळेल किंवा न मिळेल याची अनिश्चितता आलीच. त्यातून शेअर्स कोणाला व किती द्यायचे हे संगणक ठरवतो. मार्केट मधले लोग तसे वेडेच, ते फार्मवरील प्रिंटेड नम्बरातील आकड्यांची बेरीज, फॉर्म भरायचा दिवस व ब्रोकरच्या ऑफिसमध्ये द्यायची वेळ हे सगळ बघतात!! अगदी ज्योतिष्याचाही सल्ला घेतात. ऐकून काय सगळी मजा चालू असते.
मी ऑफिसमध्ये गेले तेव्हां फार्मचा गठ्ठा ठेवला होता.लोक फार्म घेवून जात होते. परंतु फार्म भरून देण्याची शेवटची तारीख ३ आठवडे दूर होती. विचार केला आत्तापासून फार्म घेवून काय करायचे आहे? मी फॉर्म घेत नाही असं बघून ऑफिसमधल्या गृहस्थांनी आठवण केली
“अहो MADAM ‘IPO’ चा फार्म घेवून ठेवा. भरा किंवा भरू नका .फार्मला काही पैसे पडत नाहीत. २-३ फार्म जास्तच घ्या खाडाखोड झाली तर उपयोग होतो. कधी ऐनवेळी फार्म मिळत नाहीत. कधी फार्मचा काळाबाजार होतो .एक ना अनेक अनुभव गाठीशी आहेत हो ! नंतर उगीचच कुणाचे OBLIGATION घेण्यापेक्षा फार्म्स घेवून ठेवा.तसाही तुम्हाला अभ्यास करायचा असतो माहिती मिळवायची असतेत्यासाठी लवकर फार्म घ्या.”
फार्म्सबरोबर ABRIDGED PROSPECTUS म्हणून काही पानांत सेबीच्या नियमानुसार माहिती दिलेली असते.ण ऑफिसमधल्या फार्मबरोबर माहितीची पानं नव्हतीच.
काका म्हणाले “अहो कुणाला माहिती वाचायची नसतेच. मी तुमच्यासाठी अख्खा फार्म देतो.तुम्ही वाचा आणि मलाही सांगा. काय?”
मी एक फार्म घेतला व वाचायला सुरुवात केली. शेअर्स किती किमतीला देऊ केले आहेत, किती रकमेची जुळवाजुळव करावी लागेल, काही खर्चांना काटछाट करावी लागेल कां ?कुठल्या मुदतठेवी सुटत असतील तर रिन्यू न करतां ती रकम इशूसाठी वापरावी की दादांकडून म्हणजेच माझ्या वडिलांकडून उसने पैसे घ्यावेत. की सगळ्या खात्यांवरचे पैसे काढून एका खात्याला जमा करावेत.एक ना अनेक विवंचना असतात.
काकांना विचारलं – “ एका बँकेत एवढी रक्कम येणार कुठून? चार चेक दिले तर चालतील कां?” तर काकांना हसूच आले.
ते म्हणाले – “ अहो सगळी रक्कम एका खात्यावर जमा करून घ्या नंतर त्या खात्याचा चेक द्या. नाहीतर मुदत ठेवींवर कर्ज घ्या, शेअरचे लिस्टिंग झाल्यावर लागल्यास शेअर्स विकून किंवा शेअर्स लागले नाहीत तर पैसे परत आल्यावर कर्ज फेडून टाका. १ ते २ महिन्याच्या व्याजांत भागेल.अजून ३ आठवडे आहेत. तुम्ही बँकेत जा कर्ज मिळायला किती वेळ लागतो त्याची चौकशी करा. कर्ज मंजूर करून ठेवा, म्हणजे लागल्यास वापरता येते. संधी गमावली जात नाही. मुदत ठेवीवर जेवढे व्याज मिळते त्यापेक्षा २%व्याज जास्त आकारतात. समजा तुमची मुदत ठेव ९% व्याजाने असेल तर कर्जावर ११% व्याज द्यावे लागते. म्हणजे तुम्हाला २% चा फटका बसतो. म्हणजे साधारण २%ने १ महिन्याचे व्याज जाते. परंतु ‘RETAILER’ साठी जास्तीतजास्त जेवढा फार्म भरतां येतो तेव्हढा भरल्यास शेअर्स लागण्याची शक्यता वाढते इतकेच ! पण तेथेही शेअर्स लागतीलच अशी खात्री देता येत नाही.परंतु आपल्या हातांत जे असते ते करावे.”
पूर्वी माझे यजमान जेव्हा फार्म भरत असत तेव्हा हे सगळं काही काही कळत नव्हतं. तेव्हां मिनिमम शेअर्ससाठी फार्म भरत होतो आणि शेअर्स लागत नव्हते.त्याकाळी ट्रेडिंग अकौंटही नव्हता आणि DEMAT अकौंटही नव्हता. फार्म बरोबर भरला किंवा नाही हे कळायला मार्ग नव्हता. हल्ली तसं होत नाही. स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ब्रोकर फार्म तपासून घेतो. त्यामुळे फार्म भरायला चुकला या कारणासाठी फार्म रिजेक्ट होत नाही.
मी त्यादिवशी साडेतीनपर्यंत ऑफिसमध्ये बसले नाही. फार्म घेतले,पाहुणे येणार होते म्हणून लवकर घरी आले. रात्री यजमान आल्यावर त्यांना फार्म दिले. सर्व वृतांत घडाघडा कथन केला.
ते वैतागले , मला म्हणाले – “पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू नकोस. तुला काय म्हणायचे ते मला समजले. पैशाची व्यवस्था कशी करायची ते पाहतो. गरज पडली तरच कर्जाच्या ‘OPTION’ चा विचार करू. ‘CALCULATED RISK’ घेण्यास काहीच हरकत नाही. पण आतां मिनिममसाठी फार्म भरायच्या ऐवजी ‘MAXIMUM’ साठी फार्म भरू या एवढे आश्वासन मी तुला देतो. झोप आतां उद्या बघू”
यजमान कंटाळले तसे तुम्ही पण कंटाळला असाल आता. थोडी विश्रांती घेवूया आणि पुढच्या भागात भेटूया..
भाग ४६ वाचायला इथे क्लिक करा
Monthly Archives: September 2014
भाग ४६ : Stop loss – विनाशकाले समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः
दुसरे दिवशी आमच्या ऑफिसमध्ये गेले. मनातल्या मनांत माझी हरिनामाची कथा सुरु झाली. आज स्टोप लॉस काय असतो तो शिकून जाईन असं ठरवून आले होते.
अविनाशला विचारले ‘काल माझ्या बाजूला बसलेले गृहस्थ आले नाहीत कां अजून? ते रोज येतात ना?
अविनाश :”अहो madam , ही काय शाळा आहे कां ?. अहो घरी काही काम निघाले तर लोक येत नाहीत.
शेअरमार्केट चालू झालं.. व्यवहार सुरु झाले. माझी नजर दरवाजाकडेच होती.११ वाजतां ते आले. मला त्यांनी खुणेनेच सांगितले नंतर बोलू कारण मार्केट सुरु असताना आपल्या शेअरकडे लक्ष दिले नाही तर नुकसान होते. स्क्रीन कडे बघून त्यांच्या चेहेऱ्यावर थोडं हसू आलं, त्याच कारण कदाचित मला माहित होतं. त्यांचा कालचा निर्णय योग्य ठरला असं स्क्रीननी त्यांना सांगितलेलं दिसत होतं. त्यांनी नुकसान सोसून जो शेअर काल ८३ला विकून टाकला त्याची किंमत आज रु. ७५ झाली होती. त्यांची खरेदी किंमत रु. ८५ होती. त्यावेळी त्यांना रु.२०० नुकसान झाले खरे परंतु मोठे नुकसान होणे टाळता आले होते. त्यांनी मला विचारले “madam पाहिलंत ना ?
मी म्हटलं ‘होय बघितलं! बघितलं!’
ते म्हणाले – “ तुम्हाला ‘STOPLOSS’ म्हणजे काय सांगण्याची गरज आहे कां? तुम्हाला आज मार्केटनेच ‘STOPLOSS’ समजावला कि.
“कळला पण वळला नाही किंवा वळला पण कळला नाही अशी माझी अवस्था आहे.मला एक सांगा कि नुकसान सोसल्याशिवाय पर्यायच नाही कां? थोडासा भले पण तुम्हाला २०० रुपये घाटा झालाच नं!” मी लगेच म्हटलं
गृहस्थ म्हणाले : “ सांगतो, बसा जरा.. अहो शेअर मार्केटमध्ये काही शेअर उत्कृष्ट, काही चांगले काही मध्यम, काही नित्कृष्ट दर्जाचे असतात. मी जे शेअर्स घेतले होते ते फारसे चांगले नव्हते. न्यूज-बेस्ड होते. त्या कंपनीला ऑर्डर मिळणार होती.पण काय झालं ते मला माहित नाही. तो शेअर वाढायला हवा होता पण वाढला नाही. पण त्या कंपनीला जी ऑर्डर मिळणार होती ती रद्द झाली असेल किंवा नाही पण शेअर पडायला लागला. आता जर मला हे शेअर्स घेवून काही महिन्यांसाठी ठेवायचे असते तर मी कमीत कमी भावाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला असता. पण माझ्या डोक्यांत तसं काही नव्हत, मला फक्त चांगल्या बातमीचा फायदा उठवायचा होता. मी शेअर घेतानाच ठरवलं होतं कि जर भाव पडायला लागला तर त्यामुळे काय झाले असेल जास्तीतजास्त रु. २ नुकसान सहन करायचे आणि ते शेअर विकून मोकळ व्हायचं. उगाच शेअर का पडला आणि नंतर वाढेल का हि चर्चा करत बसायची नाही. कारण कधी कधी टोटल मार्केटचा मूड मंदीचा असेल तर आपला शेअर प्रथम काही वेळ पडतो, व नंतर सुधारतो. कारण volatility हा मार्केटचा गुणधर्म आहे. पुढच्या मिनिटाला काय होणार हे आपल्याला रोजच्या आयुष्यांत कळत नाही म्हणून आपण सुरक्षिततेचे उपाय करीत असतो. भविष्यकाळासाठी अनेक योजना आखत असतो. तसीच हि शेअर्मार्केट मधली योजना.
आतां शेअर पडला आहे थोड्यावेळाने वाढू लागेल अशी आशा वाटते आपण आपले आशाळभूत नजरेने वाट पहात बसतो. वाट पहाण्याशिवाय काही उपायहि नसतो. अशा वेळी काय करणार ? तोटा सहन करण्याशिवाय काही इलाज नसतो. ‘विनाशकाले समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः’ हाच शहाणपणाचा सल्ला असतो. अशावेळी ‘STOPLOSS’ लावावा म्हणजे नुकसान कमी होतं किंवा मग अशा शेअर्सच्या भानगडीतच पडू नये असे मी सुचवीन.”
आता त्यावेळी मला जो प्रश्न पडला तो कदाचित तुम्हाला हि पडला असेल
‘ अहो मग अश्या शेअर मध्ये किंवा अश्या परिस्थितीत लोक गुंतवणूक का करतात ?’
ते म्हणाले
‘काही लोकांजवळ गुंतवण्यासाठी भांडवल नसते त्यामुळे असा ट्रेड लोक करतात. काही लोक संधीचा फायदा उठविण्यासाठी असा ट्रेड करतात. माणसाचा स्वभाव आहे!
कधी कधी नशीबाचा खेळ असा असतो की कितीही योजना केली तरी नुकसान व्हायचं तितकं होतेच. तुम्ही तुमच्या STOPLOSS च्या किमतीला शेअर विकायला लावले तर शेअरची PRICE ‘JUMP’ मारते. त्यामुळे तुम्ही टाकलेल्या किमतीला ट्रेड होत नाही. त्यामुळे ‘STOPLOSS’ फिक्स न ठेवता एका range मध्ये ठेवावा म्हणजे तुम्ही लावलेल्या किंमतीच्या जवळपास ट्रेड होऊ शकतो.
मार्केटमध्ये काही पथ्ये पाळावी लागतात. वेळेवर ‘PROFIT’ बुक करावे नाहीतर ‘तेलही गेले तूपही गेले’ अशी अवस्था होते. आता एखादा शेअर रोजच वाढतअसेल तर मग नक्की कधी विकायचा ते कळत नाही. शेवटी ’अजून हवे , अजून पाहिजे’ ही सुद्धा एक मानवी प्रवृत्ती आहे. या वृत्तीला सुद्धा ‘STOPLOSS’ मुळे लगाम लागतो. अशावेळी जो ‘STOPLOSS’ लावतो त्याला ‘TRAILING STOPLOSS’ असे म्हणतात. असं समजा कि हा STOPLOSS तुमच्या भविष्यातल्या profit च्या सुरक्षेसाठी. हा ‘STOPLOSS’ शेअरच्या वाढत असलेल्या किंमतीचा माग काढत जातो. शेअर किती वाढतो आहे तेव्हढा वाढू दे आपण त्याच्या मागावर रहायचे.समजा शेअरची किंमत रु. १०० आहे ही तुमची खरेदी किंमत आहे. शेअर रु. ११० झाला , तुम्हाला १०% फायदा होत आहे पण तुम्हाला वाटते की ‘PROFIT’ बुक न करतां थांबावे तर मग तुम्ही रु. १०८ वर ‘STOPLOSS’ लावा, शेअरची किंमत रु. १२० झाली तर ‘STOPLOSS’रु.११८ करा. शेअरची किंमत रु. १३० झाली तर ‘STOPLOSS’बदलून रु. १२८ करा. परंतु आतां शेअरची किमत कमी होऊ लागली तर तुम्ही शेअर्स रु. १२८ला विकून PROFIT-LOCK करा. म्हणजे तुमचा फायदा वाढू शकतो.
तुम्हाला ‘STOPLOSS’ मुळे जो थोडासा तोटा होतो तो नको असेल तर लार्ज-कॅप किंवा ब्लूचिप किंवा ‘A’ ग्रुपच्या शेअर्समध्येच पैसे गुंतवा म्हणजे शेअर पडू लागला तर इंट्राडे ट्रेडचे रुपांतर ‘DELIVERY TRADE’ मध्ये करा. पैसे गुंतवण्याची ऐपत असेल तर पैसे गुंतवा १५ दिवसांनी शक्य झाल्यास फायद्यात विका.’
मग ते एक मिनिट थांबले आणि म्हणाले
‘madam, मला जेव्हढे माहीत होतं तेवढ मी तुम्हाला ‘STOPLOSS’ चे पुराण ऐकवलं. तुम्ही फार्म भरताय नं?’
मला कळेना : ‘कसला फार्म?’
गृहस्थ : ‘IPO’चा फार्म हो! उद्या इशू क्लोज होत आहे. हा फार्म तुम्हालाच भरता येईल. कसा भरायचा ते मलाहि समजावून सांगा’
त्या गृहस्थांना फार्म कसा भरायचा ते समजावून सांगितले ते तुम्हालाही सांगेन पण त्यासाठी पुढील ‘BLOG’ वाचा.