Monthly Archives: October 2014

भाग ५० – IPO – पुढच्यास ठेच मागचा शहाणा

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
सर्व वाचकांबरोबर दिवाळी साजरी करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. हा ५०सावा ब्लोग लिहिताना अत्यन्त आनंद होतोय. ५०साव्या भागापर्यंत नियमितपणे हा शेअरमार्केटचा प्रवास आपण सर्वजण  करीत आहोत. हा ब्लोग वाचून व माझी वहिनी मासिकातील लेख वाचून बरेचजण प्रत्यक्ष भेटण्यासाठी शनिवार रविवारी येत असतात. त्यांच्या शंकांना उत्तरे देतां देतां काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. बहुतेकांना न वाचता ,न जाणून घेता, न अभ्यास करतां ताबडतोब शेअरमार्केटचा व्यवसाय सुरु करायचा होता.
‘तुम्ही समजावून घ्या नंतर सुरुवात करा’ असे सांगितले तरी त्यांना पटत नसे. कोणी कोणी आपल्याजवळची स्टेटमेंट घेवून यायचे आणि म्हणायचे ‘यातील कोणते शेअर विकू, कधी आणि किती भावाला विकू’ म्हणजे त्यांना पांगुळगाडा बनण्यातच रस असायचा, आणि स्वावलंबी बनण्यात कोणालाच इंटरेस्ट नसायचा.  पण सर्वांचा एक प्रश्न मात्र जरूर असे “madam तुम्ही IPO मध्ये invest करतां कां? त्यात किती पैसे मिळतात.? तुम्हाला कधी घाटा झाला कां? घाटा झाला तर तुम्ही काय उपाय करतां?”
म्हणजेच माझे अनुभव ऐकण्यामध्ये त्यांना रस होतां. म्हणून मी या ५०साव्या ब्लॉगच्या निमित्ताने माझे ‘IPO’ च्या संदर्भातील वेचक अनुभव तुम्हाला सांगणार आहे. यावर्षी बरेच ‘IPO’ येणार आहेत. त्यामुळे  माझ्या या अनुभवांचा उपयोग तुम्हाला नक्की होईल असे वाटते.
मी मार्केटमध्ये शिरले तो काळ होता सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्याच्या निर्गुंतवणूक (DIVESTMENT) करण्याचा! त्या काळांत बरेच ‘IPO ‘ आले, बऱ्याच लोकांनी ‘DEMAT’ अकौंट उघडले. सामान्य लोकांनाही फायदा व्हावा व गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने किरकोळ गुंतवणूकदारांना ५% डिस्काउंट जाहीर झालेला होता. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी ‘ IPO’ साठी अर्ज करावेत व या नवरत्न कंपन्यांची मालकी  अधिकाधिक लोकांत वाटली जावी असे सरकारचे धोरण होते. हेच धोरण सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची  ‘ALLOTMENT’ करताना सरकारने राबविले.
त्यावेळी माझी आणि मार्केट्ची फारशी ओळख झाली नव्हती.मला ‘IPO’ चा फार्म भरतां येत नव्हता.  माझे यजमान फार्म भरत असत. कधी खाडाखोड होत असे. खाडाखोड झाली तर आपल्याला शेअर्स मिळणार नाहीत या भीतीपोटी फार्मचा बोळा करून फेकावा लागत असे.फार्म बरोबर भरला की नाही हे पुन्हापुन्हा तपासून बघून तो फार्म इमानेइतबारे ऑफिसमध्ये नेवून देण्याचे काम मी करीत असे.ही खबरदारी आवश्यक होती कारण फार्म भरताना काही चूक झाली तर शेअर्स तर मिळायचे नाहीत पण आपले पैसे मात्र २ महिने अडकून पडतील अशी भीती असायची.
पैशाची जूळवाजुळवी करणे हा नेहेमीचा उद्योग. या ‘IPO’ च्या वेळी आमच्या असं लक्षात आलं की आपल्या काही मुदत ठेवींची मुदत संपत आहे. तर या मुदत ठेवींचे renewal करण्यापेक्षा आपण हीच रक्कम ‘IPO’ साठी वापरून शेअर मिळाले तर उरलेली रक्कम पुन्हा मुदत ठेवींत गुंतवू.( दोन महिन्यानी पैसे परत आल्यावर) शेअर मिळाले नाहीत तर दोन महिन्यांनी पुनः मुदत ठेवी करता येतील. एक दोन महिन्याचे व्याज बुडेल एवढाच काय तो प्रश्न !  एवढा सगळा काथ्याकुट झाल्यानंतर मी त्या मुदत ठेवींच्या पावत्या बँकेत नेऊन दिल्या व त्या पावत्यांची रक्कम आमच्या बचत खात्याला जमा कराव्यात असं बजावलं. याच बचत खात्याचे चेक ‘IPO’ च्या अर्जाला जोडून आम्ही पाठवले आणि सुस्कारा सोडला. आठवडाभराने फार्म परत आले ‘FUNDS INSUFFICIENT’ असे कारण चेक ‘BOUNCE’ करताना बँकेने दिले होते. माझे डोके चालेनासे झाले. सर्व प्रकारची काळजी घेवूनही असे कां झाले हे कळत नव्हते. मी रागारागातच दाराला कुलूप ठोकले व बँकेच्या दारांत जावून उभी राहिले.  पासबुक कौंटरला जावून पासबुक भरून घेतले. माझ्या मुदत ठेवीची रक्कम खात्याला जमा झालेली नाही असे आढळले. त्यामुळे अर्थातच चेक पास होण्याएवढी पुरेशी रक्कम खात्यावर नव्हती हे उघड झाले. मी बँकेतल्या ऑफिसरला विचारले “माझी मुदत ठेवीची रक्कम माझ्या बचत खात्यावार जमा कां झाली नाही ?
“अहो तुमच्या मुदत ठेवीची मुदत संपली नसेल!
मी म्हणाले “ तुम्ही मला मूर्ख समजलात कां  मुदत संपली आहे की नाही हे पाहूनच तुम्ही माझ्याकडून मुदत ठेवींच्या पावत्या घेतल्यात”
“ तुम्हाला नक्की आठवते आहे ना की तुम्ही पावत्या दिल्यांत की तुमच्या पर्समध्येच राहिल्या”
मी त्यांना त्यांनी दिलेली पावत्यांची ACKNOWLEDGEMENT.दाखवली. मी त्यांना त्यांचा ड्रावर उघडून बघावयास सांगितला. त्यांच्या ड्रावरमध्ये माझ्या मुदत ठेवींच्या पावत्या जशाच्या तश्या होत्या. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. माझा पारा चढला आहे हे  पाहून ऑफिसर म्हणाले “अहो घाबरताय कशाला तेव्हढ्या दिवसांचे व्याज तुम्हाला देऊन टाकू.” त्या ऑफिसरला काय कल्पना की माझे किती नुकसान झाले त्याची! माझे चार चेक ‘BOUNCE’ झाले होते म्हणजेच चार फार्मला मला एकही शेअर मिळाला नाही. जर हे शेअर्स मला मिळाले असते तर मला भरपूर फायदा होऊ शकला असतां. कारण या शेअर्सचे लिस्टिंग दामदुपटीने झाले.एवढे झालेले हजारो रुपयांचे नुकसान ऑफिसर किंवा बँक नकीच भरून देणार नव्हते.त्याउलट माझे चार चेक ‘BOUNCE’ झाल्यामुळे माझी चूक नसतानाही Rs.४०० बँकेने माझ्या खात्याला वजा केले.म्हणजेच मला दंड पडला. मी हा दंड भरणार नाही आणि भरला नाही हे ओघाओघाने आलेच.माझी काहीही चूक नाही त्यामुळे माझा दंड माफ व्हावा असा मी बकेकडे अर्ज केला व बँकेनेही खुल्या दिलाने माझा दंड माफ केला.घरी आल्यावर मी एकदा विचार केला तेव्हां माझ्या लक्षांत आले ‘ज्याला आगत असेल त्याने स्वागत करायला शिकले पाहिजे’ जरूर मला होती नुकसान माझे होणार होते तर मग बँकेत जाऊन पासबुकमध्ये पैसे जमा केले आहेत की नाही हे पहिले असते आणि त्याच वेळेला १५ मिनिटे थांबून रक्कम खात्याला जमा करून घेतली असती तर पुढचे सगळे रामायण टाळता आले असते. शेअरमार्केट म्हणजे संधीसाधूगिरी असते. जर चेक पास झाले असते तर किती फायदा झाला असता या सर्व गोष्टी बँकेतील ऑफिसरच्या समजण्यापलीकडच्या होत्या.
हल्ली ‘ ECS  (ELECTRONIC CLEARING SERVICES ) पद्धतीने सर्व आर्थिक व्यवहार होतात. म्हणजेच रक्कम थेट खात्याला जमा होते किंवा खात्यातून वजा होते. त्यामुळे वेळ आणि खर्च दोहोंचीही बचत होते.एकदा एखादी पद्धत अमलांत असेल तर त्यापेक्षा काही वेगळे घडेल असे आपल्या ध्यानीमनीही येत नाही. असेच काहीसे ‘MOIL’या कंपनीच्या IPOच्या बाबतीत आमच्या अनुभवास आले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमाल मर्यादा Rs.२००००० होती. ‘MOIL’ ही कंपनी सरकारी शिवाय शेअर्स स्वस्त मिळणार म्हणून उधारउसनवार पैसे घेवून मुदत ठेवींवर कर्ज काढून फार्म भरला, ‘ALLOTMENT’ झाली शेअर्सही मिळाले. त्यानंतर लागलेल्या शेअर्सची रक्कम वजा जातां उरलेली रकम ‘ECS’ पद्धतीने थेट खात्याला जमा व्हायला हवी होती. ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. ज्यांनी ज्यांनी फार्म भरले होते त्यांची रक्कम खात्याला जमा झाली होती. त्याच पद्धतीने माझ्याही फार्मची रक्कम खात्याला जमा झाली असेल. दोन दिवसांनी जाऊन पासबुक भरून आणू असा विचार करत दोन दिवस गेले. बँकेत फोन केला त्यांनी सांगितले उद्या खात्याला रक्कम जमा केली जाईल . उद्या फोन करा. त्यानुसार दुसर्या दिवशी मी बँकेत गेले  माझ्या दोन खात्यांवर पैसे जमा झाले होते . पण एका खात्यावर मात्र पैसे जमा झाले नव्हते. मी बँकेच्या अकौंटटकडे चौकशी केली. ते म्हणाले ज्या खात्यांत जेव्हढे पैसे आले तेव्हढे आम्ही जमा केले. आम्हाला यापलीकडे काही माहित नसते. तुम्ही तुमच्या ऑफिसकडे चौकशी करा. नंतर मी पुन्हा ऑफिसमध्ये विचारले. तेव्हा ते म्हणाले प्रत्येक फार्मच्या शेवटी कोणत्या व्यक्तीकडे तक्रार करायची त्या व्यक्तीचे नाव आणि टेलीफोन/मोबाईल नंबर दिलेला असतो.
INVESTOR GRIEVANCES CELL ID, CONTACT PERSON AND COMPLIANCE ऑफिसरचे नाव आणि फोन नंबर दिलेला असतो. (48व्या भागामध्ये  जो फार्म दिलेला आहे त्याच्या मागच्या बाजूस ही माहिती दिलेली आहे.) तेथे तक्रार करा किंवा लेखी अर्ज करा. म्हणजे तुम्हाला खरी वस्तुस्थिती समजेल.तेव्हा आम्ही तेथे फोन केला. त्यांनी मला अर्जाचा क्रमांक आणि बाकी माहिती विचारली.आणि नंतर मला सांगितले तुमचा चेक रजिस्टर पोस्टाने पाठवला आहे. त्याचा रजिस्टर नंबर अमुक आहे. व हा चेक येथून अमुक तारखेला पाठवण्यात आला आहे. तुम्हाला दोनतीन दिवसांत मिळेल. पोस्टमन रजिस्टर देण्यास येणार घराला कुलूप बघून परत जाणार त्यामुळे चेक मिळण्यास उशीर होणार व आपले त्या रकमेवरचे व्याज बुडणार, हे सर्व टाळण्यासाठी मी स्वतःच पोस्टांत गेले. दोनतीन दिवस जावे लागले. त्यानंतर चेक मिळाला . तो जमा केल्यानंतर दोन दिवसांनी  पैसे मिळाले. या सर्व गोंधळामध्ये जवळजवळ सतरा दिवसांचा कालावधी लोटला.
त्यामुळे ‘ALLOTMENT ‘ झा;याबरोबर तुमची रकम खात्याला जमा झाली की नाही हे पहा. प्रत्येक वेळेला सिस्टीमप्रमाणे घडते असे नाही. तुमच्या बाबतीत विपरीत घडू शकते. आपली आपण काळजी घेतलेली बरी.
कधी कधी आळशीपणा चांगलाच भोवतो. खरे पाहतां ‘IPO’ येणार हे जाहीर झाले होते व मलाही माहित होते .फार्म भरायचा आहे हेही ठरलेले होते. चेकबुकांत दोन चेक शिल्लक होते. ‘IPO’ चा फार्म भरून झाला परंतु चेक भरताना खाडाखोड झाली. ऑफिसमधल्या काकांना विचारले “काय करू ?” तेव्हां ते म्हणाले “जेथे खाडाखोड झाली असेल ती सुधारा आणि त्याच्या बाजूला सही करा.म्हणजे हाच चेक चालेल. दुसरा चेक लावण्याची गरज नाही.” त्यामुळे खरे पाहतां प्रश्न मिटला होता. परंतु चेकबुकातून चेक काढून घेताना फाटला. आतां आली कां पंचाईत !तो चेक चालणार नव्हता. दुसरा चेक भरून द्या असे काकांनी सुचविले. पण चेकबुकांत चेक शिल्लकच राहिले नाहीत. बँकेतून नवीन चेकबुक आणायला हवे होते. चेकबुक रिक्विझिशन स्लीप भरून मी बँकेत गेले.  ती स्लीप बँकेच्या काउंटरवर दिली.आणि तेथेच थांबले.
तेव्हां बँकेतले ऑफिसर म्हणाले “तुम्ही कशाला थांबलात. हल्ली चेकबुक ताबडतोब मिळत नाही. चेकबुक तुमच्या घरी पोस्टाने पाठविले जाते.”
मी त्याना म्हटले “ पण मला चेकबुकची खूप गरज आहे. पोस्टाने चेकबुक मिळेपर्यंत १०-१२ दिवस लागतील. त्यामुळे दोन तीन लूज चेक दिलेत तरी माझी अडचण भागेल. मग १५ दिवसांनी चेकबुक मिळाले तरी चालेल”
ऑफिसर म्हणाले “ अहो लूज चेक हल्ली देता येत नाहीत आणि दिले तरी ते चेक कॅश काढण्यासाठी किंवा आमच्याच शाखेतील खात्यात रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी वापरता येतील.”
त्यामुळे प्रदक्षिणा पूर्ण करून मी ऑफिसमध्ये गेले.
काकांना सांगितले ‘१० -१२ दिवसांशिवाय चेकबुक मिळणार नाही असे बँकेचे म्हणणे आहे”. तेव्हां काका म्हणाले “ तुम्ही या वेळेपुरता डिमांड ड्राफ्ट /पेऑर्डर जोडून फार्म भरू शकतां.”
इलाजच नव्हता विनाशकाले समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः. मी यजमानांना फोन करून विचारले
“ काय करायचे. तेव्हां ते म्हणाले “शेअरमार्केटचा व्यवसाय तू करतेस तेव्हां तू निर्णय घे. पण मी तुला एकच सांगतो किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जी कमाल मर्यादा असते तेव्हढाच म्हणजे Rs.२००००० चा ड्राफ्ट काढल्यास Rs. ३०० ते ३५० ड्राफ्टसाठी कमिशन बसेल.”
हे सर्व ऐकून मी पूर्णपणे माघार घेतली.व ज्या ‘IPO’ बाबतीत सुरुवातीलाच एवढ्या अडचणी येत आहेत त्या ‘IPO’ चा नाद सोडलेला बरा. (ही पूर्वीची गोष्ट आहे आतां खाडाखोड झालेला चेक चालतच नाही.तसेच आतां तुम्ही दिलेला चेक दुसऱ्या दिवशीच पेमेंट साठी येऊ शकतो. तेव्हां आपल्या अकौटमध्ये आधी पैसे जमा करून मगच ‘IPO’ साठी चेक द्या.)
कधी कधी आपल्या हातून चूक होते पण ती इष्टापत्ती ठरते. परमेश्वरच आपणास वाचवितो असेच म्हणावे लागते.मध्यंतरी जेम्स & जुवेलर्री या क्षेत्राशी संबंधीत असलेल्या कंपनीचा ‘IPO’ आला. मी ‘IPO’चा फार्म भरला, सह्या केल्या, चेक भरला, तो जोडला, चेकच्या मागच्या बाजूस अर्जाचा प्रिंटेड नंबर आणि टेलिफोन नंबर लिहिला. मी व माझ्या यजमानांनी  पुन्हा पुन्हा तपासला. फार्म व चेक बरोबर भरला आहे याची खातरजमा करून घेतली व नंतरच फार्म दिला. आमच्या ऑफिसमध्ये फार्म बरोबर भरला आहे की नाही हे तपासूनच घेतात.ऑफिसमधला शिपाई भरलेले फार्म मुंबईच्या ऑफिसमध्ये घेवून गेला. दोन तीन दिवसांनी पास बुक भरण्यासाठी मी बँकेत गेले त्यावेळी माझा चेक पास झालेला नाही असे आढळले. बँकेत चौकशी केली तेव्हां त्यांनी मला सांगितले चेकवर लिहिलेली तारीख चुकीची होती त्यामुळे चेक पास होऊ शकला नाही. त्यामुळे ‘IPO’ फार्म रिजेक्ट झाला.
तेव्हां काका म्हणाले “ MADAMचा फार्म रिजेक्ट झाला म्हणजे शेअरचा भाव चांगला फुटणार नाही हे नक्की.”
बोलाफुलाला गाठ पडली. मध्यंतरीच्या काळांत गव्हर्नमेंटने नोटीफिकेशनद्वारे सरकारने सोन्याच्या आयातीवरचे निर्बंध वाढवले. यामुळे सोन्याच्या व्यवहारांत असणाऱ्या कंपन्यांचे नुकसान होणार होते. याचा या ‘IPO’च्या लिस्टिंगवरही परिणाम झाला.भाकीत केल्याप्रमाणे हा ‘IPO’ इशू प्राईसपेक्षा कमी किमतीला लिस्ट झाला. आणि भाव पडतच गेला. त्यामुळे परमेश्वरानेच मला वाचवले असे म्हणावे लागते. परंतु सगळ्यांच्याच नजरेतून चेकवरची चुकीची तारीख कशी निसटून गेली याचे आश्चर्य वाटले.
माझ्या चुका मीच माझ्या तोंडाने कबुल करणे हे योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. दुसर्या शब्दांत सांगायचं तर यालाचं लोक ‘अनुभव’ म्हणतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केल्यास तुमचाच फायदा होऊ शकतो. शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणे हा करमणुकीचा विषय नाही. सतत होणाऱ्या बदलांकडे लक्ष देवून आपल्या व्यवहारांत लवचिकता आणावी लागते. अखंड सावधानता बाळगावी लागते. तुम्ही शेअरमार्केटचा व्यवसाय सुरु करावा व त्यांत तुम्हाला यश मिळावे हीच इच्छा. दिवाळीच्या या शुभदिनी तुम्हाला पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा.

भाग ४९ – एक मार्केट.. समांतर

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
गेल्या थोडे दिवसात सगळीकडे निवडणुकीचे वारे वहात होते. गप्पा मारण्यासाठी एक सुंदर विषय! या काळातले मुख्य आकर्षण ‘EXIT POLL’ म्हणजेच निवडणुकीच्या निकालाचे अंदाज. निरीक्षक, राजकीय निरीक्षक ‘SAMPLE SURVEY’ घेवून त्याचे विश्लेषण करून अंदाज व्यक्त करतात.
अशाच प्रकारचे अंदाज शेअरमार्केटमध्ये सांगितले जातात. हे अंदाज व्यक्त करणारे मार्केट म्हणजेच ‘GREY MARKET’. या मार्केटमधील लोकांना गाढा अनुभव असतो. या अनुभवानुसार ते गुंतवणूक तसेच ट्रेडिंगही करत असतात. ‘IPO’ चा price band ठरवताना ग्रे मार्केटचा कल लक्षात घेतला जातो अशी ऐकीव बातमी आहे. काय खरे काय खोटे परमेश्वरालाच माहिती! आता या ग्रे मार्केटचा सामान्य माणसालाही फायदा होवू शकतो, कसा ते आज बघू.
बाळाची चाहूल लागल्यानंतर आनंद होतोच त्याबरोबर काळजीही वाटत असते. त्याचप्रमाणे नवीन शेअर मार्केटमध्ये दाखल होणार या उत्सुकतेबरोबर अनेक शंका कुशंका मनांत येतात.’IPO’ ला गुंतवणूकदारांचा कसा प्रतिसाद मिळेल? त्याचे  स्वागत कसे होईल?.आपल्याला शेअर्स मिळतील कां? मिळाले तर किती शेअर्स मिळतील? भाव काय फुटेल? असे नाना प्रश्न उभे राहतात. काही लोक धोका स्वीकारण्यास तयार असतात आणि काही लोक धोका स्वीकारण्यास तयार नसतात. काही लोकांनी ‘DEMAT’ तसेच ट्रेडिंग अकौंट उघडलेला असतो पण त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतात काही वेळेला एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक  सदस्यांचे DEMAT तसेच ट्रेडिंग अकौंट असतात आणि सर्व अकौंटवर ‘IPO’ चे फार्म भरणे शक्य होत नाहीं. अशावेळी आपला ‘DEMAT’ व ट्रेडिंग अकौंट दुसऱ्यास वापरण्यास देऊन थोडेफार पैसे कमावता येतात. अर्थात हे काम विश्वासावरच चालतं. अशावेळी ग्रे मार्केटमधील लोकांशी संपर्क साधल्यास काही पर्याय मिळू शकतो. या मार्केटमधील लोक प्रत्येक फार्मासाठी काही रकम देवून तुमच्या ‘demat’ अकौंटचा उपयोग ‘IPO’ फार्म भरण्यासाठी करतात. या रकमेला ‘Kostak rate’ असे म्हणतात.
हल्ली ग्रे मार्केटचे अंदाज वर्तमानपत्रांतही दिले जातात आणि दूरदर्शनच्या वाहिनींवरही सांगितले जातात. ग्रे मार्केटमधील लोक ‘IPO’ च्या किमतीपेक्षा किती रकम जास्त देण्यास तयार असतील त्यालाच ग्रे-मार्केट प्रीमियम असे म्हणतात.कधी कधी ‘ IPO’ एवढीही किमत ग्रे-मार्केट मधील लोक द्यावयास तयार होत नाहीत. त्यावेळी ग्रे-मार्केट प्रीमियम ‘NEGATIVE’ आहे असे मानले जाते.हा प्रीमियम चांगल्या किंवा वाईट बातम्या येतील त्याप्रमाणे बदलत राहतो. या बातम्या ‘IPO’ ची मुदत संपल्यापासून शेअरचे लिस्टिंग होईपर्यंत कमी अधिक प्रमाणांत येतच असतात. यावरून लिस्टिंगच्या दिवशी शेअर विकून टाकावा किंवा काही काळ ठेवावा याचा अंदाज येऊ शकतो. म्हणजेच थोडक्यांत सांगायचे तर ग्रे- मार्केट ‘ IPO’ ला मदत करते.
या मार्केटलाच ‘OTC’ (OVER THE COUNTER’) मार्केट असे म्हणतात. यालाच ‘PARALLEL MARKET’ किंवा समांतर मार्केट असे म्हणतात. हे मार्केट’ UNOFFICIAL,UNAUTHORISED SELFREGULATORY’ असते. या मार्केटचे सर्व व्यवहार विश्वासावरच चालतात. या मार्केटला पारदर्शकता नाही. Bids नाहीत.’EXCHANGE’ च्या कायद्यानुसार व्यवहार होत नाहीत,निश्चित मार्केटप्लेस नाही. ‘VOLUME’ कमी असतो. शेअरची किमत कशी ठरवावी यासाठी निश्चित  नियम नसतात. शेअरची किमत मागणी व पुरवठा या तत्वावर निश्चित केली जाते.’SEBI ‘ (SECURITIES EXCHANGE BOARD of INDIA) चे नियंत्रण नसते. कंपनीच्या व्यवहाराबद्दल कोणतीही माहिती देण्याचे बंधन नाही. ‘CIRCUIT FILTER’ सुद्धा नसतात. म्हणजेच थोडक्यांत सांगावयाचे झाले तर ‘अपना हात जगन्नाथ’ अशी या मार्केट्ची रचना असते.
एका फार्मला किती ‘Kostak’ देऊ केले जाते. याचे गणित साधारणतः खालीलप्रमाणे असते. समजा XYZ कंपनीच्या  शेअर्सचा “price band’ Rs ८०-१०० आहे. ‘IPO’ ४० वेळेला OVERSUBSCRIBE झाला त्यामुळे upper bandलाच शेअर्स दिले जाणार होते. शेअर्सचा ग्रे-मार्केट प्रीमियम Rs.७५ आहे. Bid लॉट २० शेअर्सचा आहे. त्यामुळे एका फार्ममागे Rs१५०० ग्रे-मार्केट प्रीमियम होतो. तीन फार्ममध्ये एका फार्मला २० शेअर्स मिळतील असा ग्रे-मार्केट चा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक ‘ IPO’ च्या अर्जासाठी ग्रे-मार्केट Rs. ५०० Kostak देऊ करेल. जर ही व्यवस्था तुम्हाला मान्य असली तर तुम्हाला Rs५०० मिळतील. त्यानंतर तुम्हाला फार्मवरील सर्व माहिती त्या व्यक्तीला द्यावी लागेल. लिस्टिंगच्या दिवशी ती व्यक्ती ते शेअर्स ठराविक किमतीला विकण्याची तुम्हाला सुचना करेल.किंवा ते शेअर्स त्या,व्यक्तीच्या ‘DEMAT’ अकौंट वर जमा करण्याची विनंती करेल. जर ‘IPO’ च्या अर्जाला शेअर्स मिळाले नाहीत व डीलरकडून  तुम्ही कोणतीही  रकम घेतलेली नाही तर व्यवहार आपोआप रद्दबातल होतो. कधी कधी आपण ‘DEMAT व ट्रेडिंग अकौंट उघडण्यास उत्सुक असता परंतु ‘ IPO’ बंद  होईस्तोवर तुम्हाला ‘DEMAT’ अकौंट नंबर मिळणे शक्य नसते अशावेळी तुम्ही दुसऱ्या माणसाचा ‘DEMAT’ अकौंट वापरून त्याच्या नावावर ‘IPO’ साठी अर्ज करू शकता मात्र जर अशा अर्जाला शेअर्स मिळाले तर ते तुम्ही उघडलेल्या ‘DEMAT’ अकौंटवर ट्रान्स्फर करून घेण्याची खबरदारी घ्यावी.
जेव्हां ग्रे –मार्केट डीलरला वाटते की ‘IPO’ खूप स्वस्त आहे, ‘IPO’ मोठा असल्यामुळे शेअर्स मिळण्याची शक्यता जास्त आहे. ‘RETAIL INVESTOR’ साठी ‘DISCOUNT’ मिळणार आहे. अशा वेळी ‘IPO ‘ ची पूर्ण रक्कम भरण्यास डीलर  तयार होतो. अशा वेळेला तुमचा ‘DEMAT व ट्रेडिंग अकौंट आहे म्हणून थोडे पैसे मिळू शकतात.  माझ्या वाचनांत आले आहे की विएतनाम या देशांत ग्रे-मार्केट त्यांच्या OFFICIAL मार्केटपेक्षा मोठे आहे.
तर हे झालं ग्रे मार्केटबद्दल. आता पुढच्या भागात मी माझे IPO चे काही किस्से तुम्हाला सांगेन आणि मग आपण आपली IPO ची गाथा संपन्न करू.
शुभ दीपावली.. भेटूच लवकर