भाग ४९ – एक मार्केट.. समांतर

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
गेल्या थोडे दिवसात सगळीकडे निवडणुकीचे वारे वहात होते. गप्पा मारण्यासाठी एक सुंदर विषय! या काळातले मुख्य आकर्षण ‘EXIT POLL’ म्हणजेच निवडणुकीच्या निकालाचे अंदाज. निरीक्षक, राजकीय निरीक्षक ‘SAMPLE SURVEY’ घेवून त्याचे विश्लेषण करून अंदाज व्यक्त करतात.
अशाच प्रकारचे अंदाज शेअरमार्केटमध्ये सांगितले जातात. हे अंदाज व्यक्त करणारे मार्केट म्हणजेच ‘GREY MARKET’. या मार्केटमधील लोकांना गाढा अनुभव असतो. या अनुभवानुसार ते गुंतवणूक तसेच ट्रेडिंगही करत असतात. ‘IPO’ चा price band ठरवताना ग्रे मार्केटचा कल लक्षात घेतला जातो अशी ऐकीव बातमी आहे. काय खरे काय खोटे परमेश्वरालाच माहिती! आता या ग्रे मार्केटचा सामान्य माणसालाही फायदा होवू शकतो, कसा ते आज बघू.
बाळाची चाहूल लागल्यानंतर आनंद होतोच त्याबरोबर काळजीही वाटत असते. त्याचप्रमाणे नवीन शेअर मार्केटमध्ये दाखल होणार या उत्सुकतेबरोबर अनेक शंका कुशंका मनांत येतात.’IPO’ ला गुंतवणूकदारांचा कसा प्रतिसाद मिळेल? त्याचे  स्वागत कसे होईल?.आपल्याला शेअर्स मिळतील कां? मिळाले तर किती शेअर्स मिळतील? भाव काय फुटेल? असे नाना प्रश्न उभे राहतात. काही लोक धोका स्वीकारण्यास तयार असतात आणि काही लोक धोका स्वीकारण्यास तयार नसतात. काही लोकांनी ‘DEMAT’ तसेच ट्रेडिंग अकौंट उघडलेला असतो पण त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतात काही वेळेला एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक  सदस्यांचे DEMAT तसेच ट्रेडिंग अकौंट असतात आणि सर्व अकौंटवर ‘IPO’ चे फार्म भरणे शक्य होत नाहीं. अशावेळी आपला ‘DEMAT’ व ट्रेडिंग अकौंट दुसऱ्यास वापरण्यास देऊन थोडेफार पैसे कमावता येतात. अर्थात हे काम विश्वासावरच चालतं. अशावेळी ग्रे मार्केटमधील लोकांशी संपर्क साधल्यास काही पर्याय मिळू शकतो. या मार्केटमधील लोक प्रत्येक फार्मासाठी काही रकम देवून तुमच्या ‘demat’ अकौंटचा उपयोग ‘IPO’ फार्म भरण्यासाठी करतात. या रकमेला ‘Kostak rate’ असे म्हणतात.
हल्ली ग्रे मार्केटचे अंदाज वर्तमानपत्रांतही दिले जातात आणि दूरदर्शनच्या वाहिनींवरही सांगितले जातात. ग्रे मार्केटमधील लोक ‘IPO’ च्या किमतीपेक्षा किती रकम जास्त देण्यास तयार असतील त्यालाच ग्रे-मार्केट प्रीमियम असे म्हणतात.कधी कधी ‘ IPO’ एवढीही किमत ग्रे-मार्केट मधील लोक द्यावयास तयार होत नाहीत. त्यावेळी ग्रे-मार्केट प्रीमियम ‘NEGATIVE’ आहे असे मानले जाते.हा प्रीमियम चांगल्या किंवा वाईट बातम्या येतील त्याप्रमाणे बदलत राहतो. या बातम्या ‘IPO’ ची मुदत संपल्यापासून शेअरचे लिस्टिंग होईपर्यंत कमी अधिक प्रमाणांत येतच असतात. यावरून लिस्टिंगच्या दिवशी शेअर विकून टाकावा किंवा काही काळ ठेवावा याचा अंदाज येऊ शकतो. म्हणजेच थोडक्यांत सांगायचे तर ग्रे- मार्केट ‘ IPO’ ला मदत करते.
या मार्केटलाच ‘OTC’ (OVER THE COUNTER’) मार्केट असे म्हणतात. यालाच ‘PARALLEL MARKET’ किंवा समांतर मार्केट असे म्हणतात. हे मार्केट’ UNOFFICIAL,UNAUTHORISED SELFREGULATORY’ असते. या मार्केटचे सर्व व्यवहार विश्वासावरच चालतात. या मार्केटला पारदर्शकता नाही. Bids नाहीत.’EXCHANGE’ च्या कायद्यानुसार व्यवहार होत नाहीत,निश्चित मार्केटप्लेस नाही. ‘VOLUME’ कमी असतो. शेअरची किमत कशी ठरवावी यासाठी निश्चित  नियम नसतात. शेअरची किमत मागणी व पुरवठा या तत्वावर निश्चित केली जाते.’SEBI ‘ (SECURITIES EXCHANGE BOARD of INDIA) चे नियंत्रण नसते. कंपनीच्या व्यवहाराबद्दल कोणतीही माहिती देण्याचे बंधन नाही. ‘CIRCUIT FILTER’ सुद्धा नसतात. म्हणजेच थोडक्यांत सांगावयाचे झाले तर ‘अपना हात जगन्नाथ’ अशी या मार्केट्ची रचना असते.
एका फार्मला किती ‘Kostak’ देऊ केले जाते. याचे गणित साधारणतः खालीलप्रमाणे असते. समजा XYZ कंपनीच्या  शेअर्सचा “price band’ Rs ८०-१०० आहे. ‘IPO’ ४० वेळेला OVERSUBSCRIBE झाला त्यामुळे upper bandलाच शेअर्स दिले जाणार होते. शेअर्सचा ग्रे-मार्केट प्रीमियम Rs.७५ आहे. Bid लॉट २० शेअर्सचा आहे. त्यामुळे एका फार्ममागे Rs१५०० ग्रे-मार्केट प्रीमियम होतो. तीन फार्ममध्ये एका फार्मला २० शेअर्स मिळतील असा ग्रे-मार्केट चा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक ‘ IPO’ च्या अर्जासाठी ग्रे-मार्केट Rs. ५०० Kostak देऊ करेल. जर ही व्यवस्था तुम्हाला मान्य असली तर तुम्हाला Rs५०० मिळतील. त्यानंतर तुम्हाला फार्मवरील सर्व माहिती त्या व्यक्तीला द्यावी लागेल. लिस्टिंगच्या दिवशी ती व्यक्ती ते शेअर्स ठराविक किमतीला विकण्याची तुम्हाला सुचना करेल.किंवा ते शेअर्स त्या,व्यक्तीच्या ‘DEMAT’ अकौंट वर जमा करण्याची विनंती करेल. जर ‘IPO’ च्या अर्जाला शेअर्स मिळाले नाहीत व डीलरकडून  तुम्ही कोणतीही  रकम घेतलेली नाही तर व्यवहार आपोआप रद्दबातल होतो. कधी कधी आपण ‘DEMAT व ट्रेडिंग अकौंट उघडण्यास उत्सुक असता परंतु ‘ IPO’ बंद  होईस्तोवर तुम्हाला ‘DEMAT’ अकौंट नंबर मिळणे शक्य नसते अशावेळी तुम्ही दुसऱ्या माणसाचा ‘DEMAT’ अकौंट वापरून त्याच्या नावावर ‘IPO’ साठी अर्ज करू शकता मात्र जर अशा अर्जाला शेअर्स मिळाले तर ते तुम्ही उघडलेल्या ‘DEMAT’ अकौंटवर ट्रान्स्फर करून घेण्याची खबरदारी घ्यावी.
जेव्हां ग्रे –मार्केट डीलरला वाटते की ‘IPO’ खूप स्वस्त आहे, ‘IPO’ मोठा असल्यामुळे शेअर्स मिळण्याची शक्यता जास्त आहे. ‘RETAIL INVESTOR’ साठी ‘DISCOUNT’ मिळणार आहे. अशा वेळी ‘IPO ‘ ची पूर्ण रक्कम भरण्यास डीलर  तयार होतो. अशा वेळेला तुमचा ‘DEMAT व ट्रेडिंग अकौंट आहे म्हणून थोडे पैसे मिळू शकतात.  माझ्या वाचनांत आले आहे की विएतनाम या देशांत ग्रे-मार्केट त्यांच्या OFFICIAL मार्केटपेक्षा मोठे आहे.
तर हे झालं ग्रे मार्केटबद्दल. आता पुढच्या भागात मी माझे IPO चे काही किस्से तुम्हाला सांगेन आणि मग आपण आपली IPO ची गाथा संपन्न करू.
शुभ दीपावली.. भेटूच लवकर
 
 

2 thoughts on “भाग ४९ – एक मार्केट.. समांतर

  1. Pingback: भाग ५० – IPO – पुढच्यास ठेच मागचा शहाणा | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.