Monthly Archives: November 2014

भाग ५१ – एक ‘IPO’ , बारा भानगडी !

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
२३ तारखेला होते लक्ष्मीपुजन! लक्ष्मीपुजनाचा कालावधी जेव्हढा वेळ असतो तेव्हढा वेळ शेअर मार्केट चालू असते. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर त्यादिवशी मार्केटमधले व्यवहार होत असतात. म्हणूनच या दिवसाच्या व्यवहाराला मुहरत ट्रेडिंग असे म्हणतात.  जे लोक शेअरमार्केटचा व्यवसाय करतात त्यांच्या दृष्टीने  मुहरत ट्रेडिंग हा फार जिव्हाळ्याचा आणि कौतुकाचा विषय. ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.
मी  सुद्धा  तुमच्याबरोबर हे तिसरे मुहूरत ट्रेडिंग साजरे करत आहे. हा योग साधून मी माझ्या शेअरमार्केटच्या प्रवासातील माझे काही अनुभव तुम्हाला सांगितले, तुमच्याशी गप्पा मारल्या त्यामुळे खूप मजा आली.परतू आपण गृहिणी ते शेअरमार्केट हा प्रवास करीत आहोत हे विसरून चालणार नाही. नेहेमी आपण प्रवास करीत असतो तेव्हां आपण एखाद्या मोठ्या स्टेशनाची वाट पाहतो. ते स्टेशन आले की काही खरेदी करतो गाडीतून खाली उतरतो, पाणी तसेच खाण्याच्या वस्तू घेतो, डब्यांत पुन्हा जागेवर येवून  गप्पागोष्टी, गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळतो.ग्रीन सिग्नल मिळतो, घंटा वाजते व पुढील प्रवास सुरु होतो. त्याचप्रमाणे आपण आतां शेअरमार्केटच्या पुढच्या प्रवासाला जाऊ.
शेअरमार्केटचा आपला प्रवास तुम्हाला आठवत असेलच. प्रथम आपण रद्दी झालेले शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ब्रोकर शोधला,  DEMAT, अकौंट आणि ट्रेडिंग अकौंट उघडला.शेअर विकायचे कसे याची थोडीशी माहिती घेवून रद्दी झालेले शेअर्स विकून थोडे भांडवल गोळा केले. त्यातून काही नवे शेअर्स खरेदी केले. थोडेसे इंट्राडे  ट्रेडिंग सुद्धा केले. आतां आपण ‘IPO’ च्या महत्वाच्या टप्प्यावर येवून ठेपलो आहोत. ४७ साव्या भागापासून टप्प्याटप्प्याने आपण ‘IPO’ ची माहिती घेत आहोत. या भागांत आपण ‘IPO’ चा फार्म भरताना माझी कशी तारांबळ उडाली हे पाहणार आहोत.
‘IPO’ चे फार्म ऑफिसमध्ये आले होते. मी ते फार्म घरी आणले व फार्म्स भरायचे ठरवले. इथेच माझी सत्वपरीक्षा सुरु झाली. प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती. माझ्या यजमानांना ‘IPO’ फार्म भरतां येत होता. ते फार्म भरून द्यायला तयारही होते.
मग तुम्ही म्हणाल ‘माशी कुठे शिंकली??
अहो पण व्यवसाय माझा मग फार्म मला भरतां यायला नको कां? मला वेळ नाही किंवा  फार्ममधले column समजत नाहीत म्हणून त्यांनी फार्म भरला तर अलग बात आहे ! परंतु मी चांगली शिकली-सवरलेली असताना त्यांच्याकडून फार्म भरून घ्यायचा म्हणजे ‘वेड घेवून पेडगावला जाणेच झाले’ . आणि समजा जर कधी यजमानांना फार्म भरायला वेळ झाला नाही किंवा त्यांची बदली झाल्यामुळे ते फार्म भरू शकले नाहीत तर मग मी व्यवसाय बंद करणार की काय? फार्म भरता आला नाही तर कोणावर तरी अवलंबून राहणे ओघाओघाने आलेच. हा सगळा विचार आल्याबरोबर यजमानांकडून किंवा कोणाकडूनही ‘IPO’चा  फार्म भरून घ्यायचा नाही असं ठरवलं. माझ्या व्यवसायातील  प्र त्येक गोष्ट मला करतां आली पाहिजे, कितीही चुका झाल्या तरी चालतील पण चुका कां होतात याची कारण शोधून आपल्यात सुधारणा करायची असं ठरवलं.
काही वेळा काही गोष्टी करताना का चुका होतात हेच कळत नाही कि एका वेळी १० जागी लक्ष द्यावं लागतं म्हणून असं होतं का ते माहित नाही.  मुलांचा अभ्यास घ्यायचा,  शाळेची वेळ साधायची, आवडीनिवडी सांभाळायच्या, गाण्याचे विध्यार्थी घ्यायचे, तेवढ्यात दारावरची बेल वाजली तर कोण आलाय ते बघा, फोन आला असेल तर तो घ्यायचा , त्यांत मुलांची भांडण आणि त्यांत फार्म भरायची घाई!
चुका होणार म्हणून वैतागून तर चालणार नव्हते. सुरुवातीला एकदोन फार्म फुकट जायचे.  मग मी शहाणी झाले. आधी फॉर्म नीट वाचायची सवय लावून घेतली, अगदी शाळेत गेल्यासारखं वाटलं पण इलाज नव्हता.  फार्ममध्ये कुठेकुठे आणि कायकाय भरायचे हे यजमानांना विचारू लागले. भरतां भरतां असे लक्षांत आले नावासाठी किंवा पत्त्यासाठी ठेवलेली जागा पुरेशी नसते.  तेव्हां लहान अक्षर काढून लिहायला सुरु केलं. फार्मवर ‘DEMAT’ अकौंट नंबर,  ‘PAN’ नंबर,  बचत खाते नंबर आणि चेक नंबर लिहावा लागतो. बँकेचा पत्ताही लिहायचा असतो. कितीही लक्षांत ठेवून लिहिलं तरी मनांत शंकेची पाल चुकचुकायची. लिहिलेला नंबर बरोबर की चूक हे पुन्हा पुन्हा बघून खात्री करून घ्यायचे मी पण मला हे सगळं फार कटकटीचे वाटू लागले. आपण प्रवासाला जातो तेव्हां नेमकं असंच घडतं . घराला कुलूप लावलं की हटकून विचार येतो ‘GAS’ बंद  केला ना, नळ बंद केला ना ! पंखा विसरला कां? कधी कधी कुलूप उघडून खात्री करतां येते परंतु घरापासून दूर अंतरावर गेल्यावर पुन्हा घरी येवून पाहणे शक्य नसते.यावर काहीतरी विचार करावाच लागतो. एकदा आम्ही हॉटेलमध्ये पहिले होते एका खटक्याला किल्ली अडकवली होती. आपण रूममधून बाहेर येताना दरवाजा बंद करण्यासाठी ती किल्ली काढली की रूममधल्या सगळ्या गोष्टी बंद होत असत. शंकाकुशंका येण्यास जागाच उरत नसे. अशीच काहीतरी उपाययोजना आपण केली पाहिजे असे माझ्या मनाने घेतले.
मी एक वही केली त्यांत फार्म भरण्यासाठी लागणारे सर्व नंबर व माहिती अचूक मोठ्या अक्षरांत व कोणालाही वाचता येईल अशी नीटनेटकी लिहून ठेवली. एका फाईलमध्ये लागणाऱ्या कागदपत्रांच्या ZEROX प्रती ठेवल्या त्यामुळे फार्म भरताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्या.अहो काय सांगू तुम्हाला ! पावलापावलावर अडचण उभी असे. माझ्या नावाचे SPELLING लांब लचक आणि फार्मवर असलेली जागा कमी त्यामुळे हे सगळं जमायचं कसं ! काही ठिकाणी आधी आडनाव, नंतर आपलं नाव , नंतर यजमानांचे नाव असं लिहायचं असे. त्यावेळी हटकून मी नेहेमीप्रमाणे प्रथम माझे नाव, नंतर यजमानांचे नाव नंतर आडनाव असे लिहित असे. त्यामुळे खाडाखोड ठरलेली. मग पुनः दुसरा फार्म भरायला घ्यायचा.फार्म फुकट मिळतात म्हणून ठीक ! नाहीतर किती नुकसान झालं असतं  कुणास ठाऊक ! कधी नाव कॅपिटल लेटरमध्ये लिहायचे तर कधी SMALL लेटरमध्ये लिहायचं,  चेकवरील नंबर समजायचा नाही, फार्म भरण्याची शेवटची तारीख लक्षांत ठेवली असली तरी त्याचवेळी नेमक्या घरांत काही अडचणी अशा येत की नेमका ऐनवेळेला फार्म भरावा लागे. त्यामुळे नाहक धावाधावी होत असे .
खरे पाहतां फार्म भरण्यासाठी तीनचार दिवस ठेवलेले असतात.पहिल्याच दिवशी फार्म भरून दिला तर त्याच दिवशीच्या तारखेचा चेकही द्यावा लागतो त्यामुळे कळत नकळत नुकसान होतं . सुरवातीला कितपत response मिळाला हे समजत नाही, आकडेवारी जाहीर होते पण त्यातून नक्की काही कळत नाही.  शेवटच्या दिवशी फार्म भरला तर ईश्युला कितपत response मिळालाय याची आकडेवारी, त्या इश्यूबद्दलची चर्चा,  वर्तमानपत्रातून मिळणारी माहिती या सर्वांचा विचार करून किती रकमेचा फार्म भरायचा हे ठरवता येतं. त्याप्रमाणे आपला निर्णय बदलताही येतो.त्यामुळे घाई गर्दी होऊ नये चुका होऊ नयेत म्हणून आधीपासून फार्म भरून देणे यीग्य नाही असे जाणवले .कधी कधी ऐन वेळेला अशी काही माहिती मिळत असे की भरलेला फार्म पाठवायचा नाही असा निर्णय घ्यावा लागे किंवा कमी रकमेचा फार्म भरावा लागे. कधी कधी पूर्ण रकमेसाठी फार्म भरला नाही तर शेअर्स मिळणार नाहीत असे वाटे. त्यामुळे भरलेल्या फार्ममध्ये बदल करून जास्तीतजास्त शेअर्ससाठी फार्म भरावा लागे त्यावेळी मात्र बँकेच्या खात्यावर तेव्हढे पैसे आहेत की नाही त्याची खातरजमा करून घ्यावी लागे. फार्मला जोडलेला चेक कधी पेमेंटसाठी येईल त्याप्रमाणे खात्याला रकम जमा करावी लागे.
हे आख्यान इथेच थांबत नसे. .फार्म पूर्ण भरून झाला की प्रथम भरलेल्या फार्मची ZErox काढूनच मी ऑफिसमध्ये देत असे. दुपारचे साडेतीन वाजले की नेमका यजमानांचा फोन येई.
‘फार्म देण्याच्या आधी तू नीट बघितलास ना?’
त्यावेळी पुन्हा एकदा मनाचा गोंधळ उडे . परंतु फार्मची ZErox कॉपी त्यांना मी दाखवीत असे.
त्यादिवशी त्यांनी मला फोनवर विचारलं –  ‘तू या वेळेला रकमेमध्ये फेरफार केल्यामुळे नवा चेक भरलास पण तो चेक क्रॉस केलास ना ?’
तेव्हां माझे धाबे दणाणले. मी चेक क्रॉसही केला नव्हता व चेकच्या मागील बाजूस APPLICATION  नंबर मोबाईल नंबर लिहिला नव्हता. मी घाबरत घाबरत ऑफिसमध्ये फोन केला तेव्हां त्यांनी सांगितले  – ‘तुम्ही चेक क्रॉस करायला विसरला होतात व माहितीही लिहिली नव्हती.परंतु आम्ही चेक क्रॉस  करून माहिती लिहूनच फार्म पाठविला आहे. काळजीही करू नका आणि घाबरूनही जाऊ नका. पुन्हा अशी चूक करू नका म्हणजे झाले.’
संध्याकाळी यजमान घरी आले व मला म्हणाले आपण B.COM. करताना हे सर्व शिकलो आहे. क्रॉस  केलेला चेक हरवला तरी त्याचा गैरवापर होत नाही. परंतु क्रॉस केला नसेल तर तो बेअरर चेक होतो आणि त्याद्वारे कोणीही रोख रकम काढू शकतो. त्यामुळे मला पुस्तकी शिक्षण आणि व्यवहार यातील फरक लक्षांत आला. डोक्यात चांगलाच उजेड पडला. त्या दिवसापासून कधीही पुन्हा अशी चूक माझ्या हातून झाली नाही.
अहो हा अध्याय इथेच संपत नाही. तुमचा फार्म पोचला याची खात्री काय ? जसा तुम्ही अभ्यास करतां परीक्षेचा पेपर लिहिता परंतु लिहिलेला पेपर  गहाळ होऊ शकतो परीक्षेला बसूनही गैरहजर असा निकाल येऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी HALL तिकिटावर निरीक्षकाची सही घेणे जरुरीचे असते. त्यामुळे तुम्ही परीक्षेला हजर होतात हे तरी सिद्ध होते. माझे यजमान या बाबतीत अतिशय ‘‘PARTICULAR’… ऑफिसला निघाले की मला आठवण करीत.  ‘आज भरलेल्या फार्मची पावती आठवणीने घेवून ये’ असे सांगत. ‘वेळांत वेळ काढून एवढे कर कारण मी घरी येईपर्यंत ऑफिस बंद होते’
त्यामुळे मी आठवणीने पावती आणून फाईलला लावून ठेवीत असे. चार दिवसांनी चेक पास झाला कां हे पाहायचे इश्यू किती वेळा SUBSCRIBE झाला, प्राईस BANDप्रमाणे कंपनी किती किमतीला शेअर्स देणार हे जाहीर होते याकडेही लक्ष ठेवायला लागे. अहो एक ‘IPO’ पण त्याच्या बारा भानगडी.
अशी ही ‘IPO’ चा फार्म भरण्याची साठां उत्तराची कहाणी व्यवस्थित काळजी घेतल्यास पांचाउत्तरी सफल आणि संपूर्ण होते. अशा या ‘IPO’ च्या नाटकाचे बरेच अंक आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्या बऱ्याच छटा अनुभवायच्या आहेत. पुढ्च्या भागांत आपण ‘IPO ‘ च्या ALLOTMENT  बद्दल थोडी थोडी माहिती दमादमाने घेवू.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा