Monthly Archives: December 2014

भाग ५२ – ‘IPO’ ची साठा उत्तरांची कहाणी

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
चातुर्मास संपला देवदिवाळी झाली तुळशीचे लग्न झाले त्याबरोबरच चातुर्मासांतले पुराण कीर्तने सगळ  संपलं. पण आपली IPO ची कहाणी मात्र मागील पानांवरून पुढे चालू रहाणार आहे..
आपण IPO चे फॉर्म घेतले; सगळी माहिती मिळवली; फॉर्म कसा भरायचा ते शिकलो.’ipo’ चा फॉर्म भरताना माझी कशी फटफजिती झाली, कसा गोंधळ उडाला हे मी तुम्हाला खुल्या दिलाने सांगितलं. खरं म्हणजे आपली झालेली फजिती, आपल्या झालेल्या चुका कोणी एवढ्या उघडपणे सांगत नाही पण मी मात्र सांगितल्या कारण माझ्या अनुभवाचा तुम्हाला उपयोग व्हावा, तुमची फजिती होऊ नये हा एकच उद्देश त्यामागे होता. आतां IPO च्या कहाणीचा पुढील टप्पा लक्ष देवून वाचा आणि पुढील पाउल विश्वासाने टाका.
शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्यांची काही बाबतीत पंचाईत होते कारण शेअरमार्केटला फारच कमी सुट्ट्या असतात. अगदी मिलिटरी शिस्तच म्हणाना. कोणी मरो कोणी जगो काहीही होवो मार्केट चालूच असतं. मार्केट ठरलेल्या वेळेलाच उघडतं व ठरलेल्या वेळेसच बंद होतं. अगदी लंचटाईमही नसतो. मला तर असं  वाटतं की शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणार्यांना मनापासून सुट्टी नकोच असते. कारण मार्केट बंद म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग बंद ! पण कुटुंबातील बाकीची माणसं मात्र सुट्टीसाठी हपापलेली असतात.माझ्या बाबतीतसुद्धा असंच व्हायचं. मुलांना शाळेला कॉलेजला सुट्टी असे , यजमान बँकेत कामाला असल्यामुळे त्यांनाही सुट्टी असे /मिळत असे. पण त्या वेळेला मार्केट मात्र चालू असे. मार्केट सोडून कुठे गावाला जायचं तर बिनपगारी रजाच समजायची. नेमकी याच काळांत IPO चे फार्म भरून देण्याची तारीख येत असेल तर दुष्काळांत  तेरावा महिना ! फार्मवर सही लागते, चेक जोडावा लागतो त्यामुळे हे  काम कोणावरही सोपवता येत नाही. असंच एकदा आम्हाला बाहेरगावी जायचं होतं आणि नेमका एक IPO येणार होता. त्यावेळी मी ठरवलं घरांतले सर्वांचे हिरमुसलेले चेहरे बघण्यापेक्षा जमलं तर IPO चा फार्म भरायचा नाहीतर तर नाही.
पण या वेळेस माझी अडचण परमेश्वराला समजली. आमच्या ऑफिसमध्ये फार्म १५ दिवस आधी आले. मी फार्म घेतले आणि भरले सुद्धा ! पण एक अडचण दत्त म्हणून उभी राहिली. IPO च्या शेअरची किमत व लॉट साईझ जाहीर झाली नव्हती. त्यामुळे चेक पूर्ण भरतां आला नाही. पूर्वी रिटेल invenstor ला जास्तीतजास्त रुपये १००००० चाच फॉर्म  भरतां येत असे त्यामुळे चेकवर ‘ not more than Rs १००००० ‘ असं लिहिलं. चेक क्रॉस केला. हा चेक, ‘PAN’ कार्डाची कॉपी फॉर्मला जोडून ऑफिसमध्ये दिला. मला आनंद झाला कारण फॉर्मही भरायला मिळाले, कोणाचा विरसही झाला नाही आणि शांतपणे बाहेरगावी जाता येणार होतं.
आम्ही उत्साहाने बाहेरगावी जाण्याची तयारी केली आणि सर्वजण बाहेरगावी गेलो. त्याकाळांत ‘ONLINE FORM ‘ भरण्याची तसेच ‘E-बँकिंगची सोय नव्हती. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख लक्षांत ठेवून ऑफिसमध्ये फोन करायचा यापेक्षा जास्त माझ्या हाती काही नव्हते. फॉर्मची शेवटची तारीख ४ होती. मी ३ ताखेला एकदा फोन करून माझे फॉर्म घेवून जायचे आहेत याची आठवण केली. ४ तारखेलाही फोन केला. परंतु खरोखरीसच ऑफिस मधल्या लोकांनी फॉर्म दिला कां हे बघतां आले नाही.E-बँकिंग सेवा असती तर परगावी सुद्धा माझा चेक पास झाला कां हे पाहून खात्री करून घेतां आली असती. परंतु त्यावेळी हे शक्य नव्हते. यजमान आणि मुले म्हणाली “आई, तू आतां शेअरमार्केटचा विचार सोडून दे आणि ट्रीप एंन्जोय कर “ मी सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्केटचा विचार सोडून दिला. ट्रीपमध्ये खूप मजा आली. १० दिवसांनी आम्ही परत आलो.
परत आल्यानंतर प्रत्येकजण आपल्या उद्योगाला लागला. यजमान बँकेत गेले, मुले अभ्यासाला लागली. मी सुद्धा बँकेत जाऊन पासबुक भरून घेतले. तेथेच थांबून पासबुकातल्या नोंदी पहिल्या तेव्हा ‘IPO’ साठी दिलेल्या चेकची नोंद तेथे आढळली नाही. मी बँकेतल्या ऑफिसरला विचारले “१३४५६७ व १४३७६५  या नंबरच्या चेकचे काय झाले, मी या नंबरचे  चेक ‘ipo’ साठी दिले  होते .”. ऑफिसर म्हणाले “ या नंबरचे  चेक PRESENT झालेले  नाहीत. ”
बोलूनही काहीच फायदा नव्हता, तारीख तर निघून गेली होती. फक्त वाईटपणाच काय तो पदरी आला असता. यजमान घरी आल्यानंतर त्यांनाही सांगितले  तेव्हा तेही म्हणाले “गप्प बसण्यातच काही वेळेला शहाणपणा असतो”. रोजच्या रुटीनमध्ये १० -१५ दिवस निघून गेले. एक दिवस यजमानांना ‘IPO’ ची ALLOTMENT झालेल्याची वार्ता समजली. बँकेतल्या दोघांना प्रत्येकी ३० शेअर्स लागले असे कळले. यजमानांचा फोन आला. ते म्हणाले “आपल्याला किती शेअर्स लागले याची चौकशी केलीस कां ? प्रत्येक फॉर्मला ३० शेअर्स लागले आहेत असे म्हणतात. या वेळेला लिस्टिंगही चांगले होईल अशी वार्ता  आहे.मी APPLICATION  नंबर बाहेरच्या खोलीतील कॅलेंडरवर लिहून ठेवले आहेत.
मी ऑफिसमध्ये गेले. त्यांना APPLICATION नंबर सांगितले. व मला किती शेअर्स लागले याची चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले “अजून आपल्याकडे लिस्ट आलेली नाही. बहुतेक आज संध्याकाळी लिस्ट येईल. मी तुम्हाला उद्या सांगू शकेन.”
मी दुसरे दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये गेले आणि पुन्हा विचारले. तेव्हा ते म्हणाले “ काल  संध्याकाळी ७ वाजतां लिस्ट आली आहे पण कोणाला आणि किती शेअर्स लागले हे मात्र आम्ही पाहिलं नाही मार्केट संपेपर्यंत तुम्ही बसणार आहांत ना? मग घाई कसली ! मार्केट संपल्यानंतर शांतपणे सांगतो. ज्यांनी रुपये १ लाखापर्यंत जास्तीतजास्त शेअर्ससाठी  फॉर्म भरला असेल त्यांना ३० शेअर्स दिले आहेत एवढ मात्र समजलंय.
मार्केट संपलं तशी मी पुन्हा आठवण केली तेव्हा त्यांनी कॉम्पुटरवर लिस्ट दाखवली.  त्या  लिस्टमध्ये माझे व माझ्या यजमानांनचे नावच नव्हते. त्यामुळे किती शेअर्स लागले हा प्रश्न दूरच राहिला. मी मात्र मनोमन काय समजायचे ते समजले. मी त्यांना विचारले “आमची नावे लिस्टमध्ये कां नाहीत ? की तुम्ही फॉर्म द्यायला विसरलांत? “ तेव्हा ऑफिसमधले लोक एकमेकांकडे पाहू लागले. आतां काय उत्तर द्यावे असा त्यांना प्रश्न पडला असावा.”
प्रकरण हातघाईला येतय हे लक्षांत येताच काका मध्ये पडले ते म्हणाले “ तुम्ही इकडे या , काय झाले हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही १५ दिवस आधी फॉर्म आणून दिले होते ते खराब होऊ नयेत म्हणून DRAWER मध्ये ठेवले. तुमचे फार्म घेवून जायचे आहेत हे त्यांच्या लक्षांत होते परंतु ऐनवेळी घाई-गर्दीत घेवून जायला विसरले. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी त्या दिवशी ऑफिसमध्ये नव्हतो. त्यांनी संध्याकाळी फोन करून मला कळवले परंतु माझ्याही हाती काही उरले नव्हते. जाऊ द्या पुढच्या ‘ipo’ ला दोनाच्या ऐवजी चार फार्म भरा.”
१५ दिवसानंतर त्या शेअर्सचे लिस्टिंग झाले सुरुवातीलाच दुप्पट भाव होता तो वाढतच गेला. त्यानंतर कधीही मंदीच्या लाटेत सुद्धा ते शेअर्स ‘IPO’ च्या भावाला मिळू शकले नाहीत. तो ‘ipo’ माझ्या नशिबांतच नव्हता कदाचित. ‘वक्तसे पहले और किस्मत से जादा किसीको कुछ्भी नही मिलता’ अशी मी माझी समजूत काढून घेतली. फक्त यामध्ये माझी काहीही चूक नव्हती इतकंच काय ते समाधान.
असे हे आपल्या ‘IPO’ च्या साठां उत्तराच्या कहाणीतले उपकथानक बरेच काही शिकवून गेले. ‘IPO’’ च्या कथेचा शेवट तर अजून दूर आहे. शेअर्सची ALLOTMENT शेअर्सचे लिस्टिंग या विषयी पुढील भागांत वाचा.