47 साव्या भागापासून तुम्ही ‘IPO’ कहाणी वाचीत आहात ; समजावून घेत आहांत परंतु ‘IPO’ मार्केटने म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. क्रूडच्या बाबतीत चाललेलं राजकारण किंवा अर्थकारण सगळ्यांना सतावतय . सध्या जागतिक मार्केटमध्ये अनिश्चितता आहे परंतु घरेलू मार्केटमध्ये मात्र तेजीचे वातावरण आहे. भारतीय अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी क्रूडच्या आयातीवर अवलंबून असते आणि नेमका याच वेळेला ब्रेंट क्रूडचा भाव सर्वांत खालच्या पातळीला पोहोचला आहे. विनिमय दर स्थिर आहे. हे सगळं वातावरण भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल आहे. या वातावरणाचा फायदा ‘NTPC (NATIONAL THERMAL POWER CORPORATION ) सारख्या बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या कंपन्या उठवीत आहेत. NTPCने नुकतेच भागधारकांना बोनस कर्जरोखे (डिबेंचर्स) द्यायचं ठरवलय. बोनस कर्जरोखे ही काय भानगड आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून ‘IPO’ कहाणीला ब्रेक लावून मध्येच बोनस डिबेंचर्सची कहाणी उलगडून सांगण्याचा प्रयत्न मी करीत आहे.
गेल्या रविवारी ४ तारखेला मला भेटायला आलेली माणसं बोनस डिबेंचर्सबद्दल विचारीत होती. काहीजणांकडे ‘NTPC’चे शेअर्स होते.तर काहीजण ‘NTPC’ मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत होते. – “MADAM आम्ही ‘NTPC’चे शेअर्स बोनस साठी घ्यावे कां? ही गुंतवणूक फायदेशीर होईल कां? पण MADAM बोनस जाहीर झाला तरी ‘NTPC’ चा भाव कां वाढत नाही?”
“अहो ते बोनस शेअर्स नव्हेत, ते बोनस डिबेंचर्स आहेत. तुम्ही नीट वाचा. तुम्ही फक्त ‘बोनस’ शब्द वाचून गुंतवणूक करायला निघाला आहांत, अशामुळेच तुमची फसगत होते. कावळा आणि कोकिळा दिसायला सारखे असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. हा फरक समजावून घ्या. नंतर जर तुम्हाला फायदेशीर वाटलं तरच गुंतवणूक करा.”
त्या माणसांना समजावून सांगितले तेव्हां माझ्या मनांत विचार आला की ‘ब्लोग’च्या वाचकांनाही आपण ही माहिती द्यावी कारण ‘NTPC’ने अजून रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. मी फक्त माहिती देत आहे, गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.
“ NTPCला सध्या कोळशाच्या खाणी, नुतनीकरण , आधुनिकीकरण आणि सध्या चालू असलेल्या प्रोजेक्टचे रीफायनान्स यासाठी बोनस डिबेंचर्सचे पैसे वापरायचे आहेत म्हणून कंपनीने १:१ या प्रमाणांत बोनस डिबेंचर्स द्यायचे योजले आहे Rs १० दर्शनी किमतीच्या एका शेअरमागे Rs १२.५० दर्शनी किमतीचा एक डिबेंचर्स द्यायचा ठरवले आहे@
“म्हणजे काय MADAM ! १२.५० रुपयाच्या फायद्यासाठी बराच काळ आम्हाला गुंतवणूक करावी लागेल. हा काय आमच्या दृष्टीने फायदेशीर सौदा दिसत नाही. म्हणूनच शेअरचा भाव फारसा उसळी घेत नाही असं दिसतय”
“तुम्ही प्रथम बोनस शेअर्स आणि बोनस डिबेंचर्स यातील फरक समजावून घ्या आणि डिबेंचर्स मिळण्यासाठी वाटल्यास तुम्ही गुंतवणूक करा. तुमच्यावर कोणी सक्ती केलेली नाही. बोनस डिबेंचर्सवर व्याज मिळतं. ह्या व्याजाला coupon रेट असं म्हणतात. या व्याजाचा दर सरकारी रोख्याच्या दरानुसार ठरतो.या डिबेंचर्सवरील व्याजाचा दर १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा दर + ५०BPS (BASE POINTS) एवढा निश्चित केला आहे.तुम्हाला या कर्जरोख्याचे मुद्दल ८ व्या वर्षी २० % आणि ९ व्या व 10 व्या वर्षी प्रत्येकी ४०% असं परत देण्यात येणार आहे. हे डिबेंचर्स STOCK EXCHANGE वर लीस्ट केले जातील. तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर याची नोंद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार हे डिबेंचर्स शेअर्ससारखे विकू शकाल. हे डिबेंचर्स सुरक्षित(SECURED) , NON-CUMULATIVE, अपरिवर्तनीय, TAXABLE आणि FULLY PAID UP आहेत.
या सगळ्या शब्दांचा अर्थ सांगते आता. अपरिवर्तनीय – या डिबेंचर्सच्या बदल्यांत तुम्हाला शेअर्स मिळणार नाहीत आणि TAXABLE – कंपनी या डिबेंचर्स च्या दर्शनी किमतीवर DIVIDEND DISTRIBUTION TAX भरते कारण हे बोनस डिबेंचर्स फ्री रिझर्वमधून dividend म्हणून दिले आहेत असे समजले जाते. म्हणजे ज्या भागधारकाला हे डिबेंचर्स मिळतील त्याला डिबेंचर्स मिळाल्यावर कोणताही TAX भरावा लागत नाही ,परंतु डिबेंचर्सवर मिळणाऱ्या वर्षभरातील व्याजावर आयकर लागतो
या बोनस डिबेंचर्सवर व्याज दर वर्षी दिले जाईल. बोनस शेअर्समुळे कंपनीच्या DEBT-EQUITY RATIO मध्ये फरक पडत नाही .या बोनस डिबेंचर्समुळे कंपनीकडे असणारे ‘FREE RESERVES’ कर्जामध्ये रुपांतरीत होतात त्यामुळे DEBT-EQUITY RATIO वाढतो. बोनस डिबेंचर्स देताना कंपनी कोणतीही रोख रकम देत नाही त्यामुळे कंपनीच्या उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या स्त्रोतांमध्ये फरक पडत नाही. त्यामुळे कंपनीच्या विविध प्रगतीशील आणि विस्तार योजनांसाठी भांडवल उपलब्ध होते.जेव्हा तुम्ही डिबेंचर्स विकता तेव्हां मुद्दलभावापेक्षा जास्त किमतीला विकले गेल्यास या जास्त मिळालेल्या रकमेला भांडवली लाभ (कॅपिटल गेन) असे समजले जाते. Rs १२.५०चा डिबेंचर्स तुम्ही Rs १३ला विकलांत तर ५० पैसे हे उत्पन्न न धरता ‘capital gains’ समजले जातील. बोनस डिबेंचर्समुळे शेअर्सची संख्या वाढत नाही. त्यामुळे अर्थातच प्रत्येक शेअर्सच्या वाट्याला येणारे उत्पन्न किंवा नफा (EPS) बदलत नाही.
बोनस डिबेंचर्सवर द्यावे लागणारे व्याज व डिबेंचर्सच्या मुद्दलाची परतफेडीची रकम कंपनीच्या PROFIT AND LOSS अकौंटमध्ये खर्च म्हणून दाखविली जाते. त्यामुळे वरील रकमेवरील कंपनीचा TAX वाचतो. COMPANY ACT खाली बोनस डिबेंचर्स देण्याची तरतुद नाही त्यामुळे कंपनीला हे ‘SCHEME OF ARRANGEMENT’ या योजनेखाली द्यावे लागतात. त्यासाठी भागधारक , उच्च न्यायालय, रिझर्वबँक इत्यादींची परवानगी लागते. या साठी खूप वेळ जातो.त्यामुळे बोनस डिबेंचर्स फारसे लोकप्रिय होऊ शकले नाहीत. पूर्वीच्या काळांतही असे बोनस डिबेंचर्स दिले गेले आहेत उदा. हिंदुस्थान लिवरने २००१ साली सर्वप्रथम असे बोनस डिबेंचर्स इशू केले होते. ब्लू DART EXPRESS ने बोनस डिबेंचर्सची ALLOTMENT करून लिस्टिंग केले.
तितक्यात कुठून तरी आवाज आला “अहो तृम्ही एवढे खुलासेवार बोनस डिबेंचर्सचे रामायण वाचले परंतु रामाची सीता कोण हे कळलेच नाही. आम्हाला समजेल उमजेल अशा रीतीने पण थोडक्यांत सांगा”.
ऐका तर ! १ शेअरला १ बोनस डिबेंचर्स ‘NTPC ‘ देत असल्यामुळे Rs१२.५० तुम्हाला मिळाल्यासारखेच होतात. फक्त हे पैसे तुम्ही डिबेंचर्स विकल्यानंतर तुमच्या हातांत पडतात.तुम्ही जर बोनस डिबेंचर्स विकले नाहीत तर तुम्हाला साधारण ९% दराने दर वर्षी व्याज मिळते.हे व्याज मुदत ठेवीच्या दरापेक्षाही जास्त आहे. ‘NTPC’ च्या शेअर्सचा सध्याचा भाव Rs. १४० ते १४५ च्या दरम्यान आहे. त्या हिशोबानेसुद्धा ९ % ने पैसे मिळतात.बोनस शेअर्स मिळणार म्हणून जशी शेअर्सच्या भावांत वाढ होते तशीच बोनस डिबेंचर्समुळे शेअर्सचा भाव वाढल्यास बोनस डिबेंचर्स न घेताही वाढत्या भावाचा फायदा मिळण्यासाठी तुम्ही शेअर्स विकून टाकू शकता.
आतां इतकं सांगितल्यावर ही योजना फायदेशीर आहे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. त्यामुळे आतां निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. बोनस डिबेंचर्स मिळण्यासाठी ‘NTPC’ च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही हे तुम्ही ठरवा. पुढ्च्या भागापासून ‘IPO’ ची कहाणी पुढे पुढे नेत राहू. भेटू पुढल्या भागात !
म्हणजे 10 Ntpc घेतले तर 10 debentures पण मिळणार? ते शेअर बाजारात लिस्टेड असल्याने केव्हाही अगदी मिळालेल्या दिवशी देखील विकता येतील की 10 वर्ष थांबावे लागेल? बोनस शेयर्स मिळाले की शेअरचा भाव तितक्या प्रमाणात खाली जातो तसे याचेही होते का? लिस्टेड debentures ना लिक्विडिटी असते का?
(1) १० ‘NTPC’ चे शेअर्स घेतले तर १:१ प्रमाण असल्याने १० बोनस डिबेंचर्स मिळतील.
(2) जसे शेअरची ALLOTMENT झाल्यावर ते काही दिवसांनी STOCK EXCHANGEवर लिस्ट होतात त्याप्रमाणे ह्या बोनस डिबेंचर्सचे लिस्टिंग झाल्यावर तुम्ही ताबडतोब विकू शकता.कारण या बोनस डिबेंचर्सना ‘LOCK- IN- PERIOD’ नाही आहे.पण विकण्यासाठी योग्य भाव आहे कां ? याचा निर्णय तुम्ही घ्या. १० वर्षे थांबण्याची जरुरी नाही.
(3) बोनस शेअर्स १:१ या प्रमाणांत मिळाले तर शेअर्सचा भाव अर्धा होतो. बोनस डिबेंचर्सच्या बाबतीत मात्र शेअर्सच्या किमतीवर डिबेंचर्स इशूमुळे अशा पद्धतीचा परिणाम होत नाही.
(4) सगळ्या शेअर्सना तरी कुठे लिक्विडीटी असते! लिक्विडीटी पब्लिक RESPONSE वर अवलंबून असते. बोनस डिबेंचर्सची पद्धतच मुळांत फारशी प्रचलीत नाही. जसा या बोनस डिबेंचर्सचा प्रचार आणि प्रसार होईल तशी लिक्विडीटी वाढेल.