माझी वाहिनी – लेख १०

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
आज मला सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी जाण्याचा योग आला. त्या गृहस्थांना पणतू झाल्यामुळे सुवर्णफुले उधळण्याचाही कार्यक्रम होता.ते गृहस्थ ८० वर्षांचे, त्यांचा मुलगा ६० वर्षांचा, नातू ३२ वर्षांचा आणी पणतू ३ महिन्यांचा असे ते गोकुळ होते. दोन्ही कार्यक्रम खूप सुंदर चालू होते. आजोबा , पणजोबा दोघेही जेष्ठ नागरिक असल्याने पुष्कळ जेष्ठ नागरिक असणारी मित्रमंडळी समारंभाला हजार होती. माझा त्यातील बऱ्याचजणांशी परिचय होता. हल्ली मी आणी शेअरमार्केट हे एक समीकरणच बनले आहे. मला पाहिले आणी शेअरमार्केटचा विषय निघाला नाही असे क़्वचीतच घडते.
“ काय madam शेअर मार्केट तेजीत चालले आहे. आम्ही रोज पेपरमध्ये वाचतो. आम्हालाही शेअरमार्केटविषयी उत्सुकता आहे. वेळही आहे, पैसेही आहेत,परंतु शेअरमार्केटमधील ओ की ठो समजत नसल्यामुळे काही उपयोग नाही.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे बरेचशे खर्च वाटले जात असत. जबाबदारी कमी होत असे. परंतु हल्ली विभक्त कुटुंबपद्धतीमुळे खर्च वाढले आहेत. वाढत्या वयाबरोबर येणारे आजारपण व त्यासाठी लागणारे औषधपाणी यासाठी पैशाची तरतूद करावी लागते.दिवसेंदिवस कुटुंबातील मनुष्यबळही कमी होत आहे.
पूर्वी मुदतठेवींवर १०%पेक्षा जास्त परतावा मिळत असे. परंतु हल्ली महागाईचे प्रमाण वाढल्यामुळे प्रत्यक्षांत काही फायदा होत नाही.जर आपण १०००० रुपये ५ वर्षांसाठी गुंतविले आणी १०%व्याज दर गृहीत धरला तर ५ वर्षांनंतर १०००० रुपयांत व्याज मिळवूनसुद्धा आजच्याएवढी खरेदी करता येत नाही. म्हणजेच रिअल इन्कम नेगेटिव येते. तुम्हीच आम्हाला असा उपाय सुचवा ज्यायोगे आम्ही आमच्या वेळेचा , जवळ असलेल्या पैशाचा चांगला उपयोग करून उत्पन्नांत भर घालू शकू.”
मी सुद्धा जेष्ठ नागरिक असल्यामुळे मला त्यांचा दृष्टीकोनही समजला, समस्याही कळली अडचणही समजली. खरे पाहतां निवृतीनंतर काय करायचे याचा विचार ५०वर्षापासुनच करायला हवा. एकदम कोणत्याही गोष्टीची आवड निर्माण होत नाही किंवा कोणतीही गोष्ट एकदम जमत नाही.काही कालावधी लागतोच. माझ्या कुवतीप्रमाणे मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. जेष्ठ नागरीकांना निर्माण होणारी मुख्य अडचण म्हणजे त्यांना कुठूनही कर्ज मिळत नाही.त्यामुळे अडीअडचणीसाठी काही पुंजी राखून ठेवणे जरुरीचे असते. पूर्वी जेष्ठ नागरीकांना कर भरावा लागत नसे. परंतु हल्ली जेष्ठांची करापासून सुटका होत नाही. वयोमानानुसार धक्के पचविण्याची किंवा धोका पत्करण्याची ताकत उरलेली नसते. त्यामुळे जेष्ठ नागरीकांनी शेअरमार्केटमध्ये जपूनच गुंतवणूक करावी. सगळ्या गरजा भागवून जर रक्कम उरत असेल तर तेवढीच रक्कम गुंतवावी.हल्ली सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित आहे असे छातीठोकपणे सांगता येत नाही. आपण खूप मोठे संकट आल्यानंतर दागिना मोडावयाला जातो त्याचवेळी कळते की ते सोने चांगले आहे की नाही. आपल्या गरजेप्रमाणे तुकड्याने तुकड्याने दागिना विकता येत नाही. त्याचप्रमाणे घराचा सौदाही तुकड्यातुकड्याने करता येत नाही. ताबडतोब सौदा होत नाही व ताबडतोब पैसे मिळत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करतां शेअरमार्केटमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर आहे खरी पण काही पत्थ्ये पाळावीच लागतात. जसे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण शिळेपाके खात नाही, उघडे पदार्थ/ instant फूड याचे सेवन टाळतो, वेळींअवेळी खात नाही, पचेल तेवढेच खातो, त्याच पद्धतीने कोणत्याही गुंतवणुकीचे आरोग्य सांभाळले पाहिजे तरच ती गुंतवणूक फायदेशीर ठरते. हे सर्व पुढील गोष्टींवर अवलंबून आहे.
(१)   तुमच्या आवश्यक गरजा भागून जर काही रकम उरत असेल तर तेव्हढीच रकम गुंतवा. कर्ज काढून किंवा उधार-उसनवार पैसे घेवून गुंतवणूक करू नका.
(२)कोणत्याही गुंतवणुकीच्या बाबतींत विश्वासार्हता, लवचिकता, आणी रोखता (रोख रकमेमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता) आहे कां  हे पडताळून पहा.
(३)जेव्हां मार्केट खूप पडत असेल तेव्हां शेअर्स खरेदी करा. मार्केटचे पडणे थांबले कां हे आपल्याला कळत नाही, मार्केट जेव्हां ‘oversold zone ‘ मध्ये असते तेव्हां लोक खरेदी करतात पण पुन्हा मार्केट पडू लागते. त्यामुळे मार्केटचा अंदाज घेत घेत टप्प्या टप्प्याने गुंतवणूक करा
(४)‘largely held’ , ‘professionally managed ‘ आणी ‘corporate governance’ उत्कृष्ट असलेल्या कंपनीतच गुंतवणूक करावी.
(५) ठरवलेल्या रकमेची विभागणी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये करा. उदा. auto, metal, finance, pharma , oil&gas, capital goods, I. T. FMCG
(६) प्रत्येक सेक्टरमधल्या प्रस्थापित कंपनीतच गुंतवणूक करा. म्हणजेच अनुक्रमे मारुती, महिंद्र &महिंद्र बजाज auto, टाटा स्टील, सेसा गोवा, IDFC, स्टेट बँक, GLENMARKpharma, LUPIN, ONGC RELIANCE, लार्सेन &टुब्रो, भेल, TCS आणी INFOSYS, ITC &COLGATE
(७) मार्केटमध्ये खरेदी किंवा विक्री करीत असताना धीराने काम करा. त्यामुळे शेअर कमी किमतीला विकत घेवून जास्तीत जास्त किमतीला विकता येतो. यासाठी मी तुम्हाला ‘TCS ‘चे उदाहरण देते. ‘TCS’ कंपनीचा ‘IPO ‘ २००४ मध्ये आला. त्याची किमत ८५० रुपये होती. किरकोळ गुंतवणूकदारांना ५%सूट मिळाली. २००६ व २००९ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. त्यामुळे ज्यांच्याजवळ एक शेअर होता त्यांच्याजवळ ४ शेअर्स झाले. सध्या या शेअरचा भाव २६०० रुपये आहे.या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला लाभांशही दिला. या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक १०पट झाली.म्हणजेच जे लोक धीराने थांबले चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली, गुंतवणूक योग्य वेळी केली आणि धरसोड वृत्ती ठेवली नाही त्यांनाकोणतीही मेहेनत न करता, डोक्याला त्रास न होता १०पट पैसा मिळाला.
(८) मार्केटमध्ये मोहाचे क्षण अनेक येतात. अशा मोहाच्या क्षणांना बळी पडू नये.अशा क्षणांना बळी पडल्यामुळे बऱ्याच ऋषी-मुनींचा तपोभंग झाला.याचे बरेच दाखले पुराणांत व इतिहासांत मिळतात. शेअरमार्केटमध्ये चुकीच्या निर्णयासाठी क्षमा नाही.
(९) लाभांशाचा विचार करून केलेली गुंतवणूक सुद्धा काही प्रमाणांत फलदायी ठरते. जर सरकारी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केलीत तर सुरक्षितता व लाभांश असे दोन्ही फायदे होतात. पण मिळणारा लाभांश हा प्रतीशेअर मिळतो. शेअरची खरेदी किंमत व त्याच्यावर मिळणारा लाभांश याचा तुलनात्मक अभ्यास करून शेअर्स खरेदी केल्यास मुदत ठेवीप्रमाणेच उत्पन्न मिळते.
(१०)आपण शेअर कधी खरेदी करतोय त्याकडे ध्यान द्या. कोणतीही घटना घडल्यानंतर शेअर खरेदी केल्यास निराशा पदरी येते. कारण बऱ्याच लोकांना ती बातमी आधीपासूनच माहिती असते त्यामुळे शेअरचा भाव आधीच वाढलेला असतो. उलट बातमी जाहीर झाल्यानंतर लोक शेअर्स विकायला सुरुवात करतात व शेअरचा भाव खाली येतो.
(११)जसे जेष्ठ नागरीकांनी संध्याकाळी म्हणजेच अंधारांत फिरायला जाणे टाळावे, सावधपणे रस्ता ओलांडावा,अनोळखी गल्लींत शिरु नये त्याचप्रमाणे शेअरमार्केटमध्येही धोका पत्करणेसुद्धा टाळा.
(१२)दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवरून, वर्तमानपत्रातून अनेक सल्लागार वेगवेगळे सल्ले देत असतात. ते सल्ले आचरणांत आणताना दहा वेळां विचार करा. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे पण नीट अभ्यास करून’ हा शिरस्ता ठेवा.
अशा प्रकारची सर्व काळजी घेतल्यास तुमच्या रिकाम्या वेळेतून व शिलकी पैशातून चांगले उत्पन्न मिळविता येयील आणि सुखी समृद्ध जीवन लक्ष्मीच्या कृपेने जगतां येयील.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

2 thoughts on “माझी वाहिनी – लेख १०

  1. Pingback: माझी वाहिनी – लेख ११ – दिवाळी विशेष | Stock Market आणि मी

  2. blassaeb Post author

    खरोखरच वाचण्या आणि विचार करण्या सारखा ब्लॉग.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.