आठवडा मार्केटचा – २ मार्च ते ५ मार्च – उच्चांकाचा झेंडा रोविला

आधीच्या आठवड्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेअरमार्केटचं लग्न थाटामाटांत पार पडलं.पण त्यानंतरची आवराआवरी शिल्लक होतीच नं ! अहो लग्न उरकलं तरी पाहुणे जायचे असतात. सत्यनारायणाची पूजा व्हावयाची असते कुलदैवतेचे दर्शन घ्यावयाचे असते.अशाच पद्धतीने मार्केटमध्येसुद्धा लोकांना बजेट समजावून घ्यायचं होतं. कोणत्या कंपनीला आणी किती फायदा होईल त्याप्रमाणे शेअर्सच्या किंमतीत किती फरक पडेल आणी गुंतवणूक केली तर फायदेशीर ठरेल कां? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती.हे सगळं हळूहळू घडतय आणी मार्केटला हळू हळू बजेट समजतंय असं या आठवड्यात वाटलं.
सोमवारी पहिला दणका ‘ITC’ ने दिला. सिगारेटवरचा कर वाढल्यामुळे ‘ITC’ च्या शेअरवर याचा परिणाम झाला. ‘ITC’ चे ‘NIFTY’ मधील WEIGHTAGE ७% आहे त्यामुळे मार्केट पडलं.
नॉन-पेमेंट ऑफ DUES हे कारण देऊन जेट एअरवेज, स्पाईसजेट, गोएअर, आणी इंडिगो या कंपन्यांना क्रेडीट देणे बंद केले त्यामुळे यापैकी काही कंपन्यांचे शेअर्स घसरले. ‘FINANCIALTECHNOLOGY’ आणी ‘NSEL’ यांच्या मर्जरची बातमी आली. ‘FT’ च्या शेअरहोल्डरना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी या विरोधांत जणू आघाडीच उघडली.’FT’ ची कॅश ‘NSEL’ चे LOSSES भरून काढण्यासाठी कां वापरणार असे शेअरहोल्डरचे म्हणणे होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना आशेचा किरण दिसला आणी परिणामी शेअरचा भाव वधारला.नेहेमीप्रमाणे ऑटोविक्रीचे आकडे जाहीर झाले. ‘बजाज ऑटो’ ची विक्री आणी निर्यात,तसेच हिरोमोटोची विक्री कमी झाली त्यामुळे त्यांच्या शेअर्सचे भाव कमी झाले त्याविरुद्ध EICHER, TATA MOTORS, TVS च्या विक्रींत वाढ झाली.त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले.
सरकारने पेट्रोलचा दर ३.१८ पैसे वाढवला. त्यामुळे ओईल मार्केटिंग कंपन्यांचे शेअर्स वधारले.उदा : HPCL BPCL IOC. बजेटमध्ये INFRASTRUCTURE आणी हौसिंग या क्षेत्रांत गुंतवणूक वाढेल असं दिसल्यानी सिमेंटचे शेअर्स चांगलेच तेजीत होते.
मंगळवार हा ‘NIFTY’च्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस ठरला. दूरदर्शनवरील वाहिन्यांनी या घटनेचे प्रसारण एखाद्या क्रिकेटच्या सामन्यासारखे केले.आता ८ धावा उरल्या आता दोन चौके पाहिजेत, आता तीन रन उरल्या सहा BALL मध्ये नक्की निघू शकतात. हे जसे सांगतात तसचं NIFTY ८९९० झाल्याबरोबर शेअर मार्केटच्या समालोचकांना उत्साह आला. ४ अंक वर ५ अंक खाली हा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. ८९९७ हा NIFTYचा आतापर्यंतचा उच्चांक होताक्षणीच फटाके वाजवले फलक झळकले व आनंद साजरा केला. जणू काही हा साऱ्या गुंतवणूकदारांचा, ट्रेडर्सचा विजय होता असे वातावरण निर्माण झाले.खूप मजा आली. एक भारावलेले वातावरण तयार झालं. पण ही घटना घडली दुपारी. ‘PSL’(PRIORITY SECTOR LENDING )चे नॉर्म्स बदलले. रोमिंग चार्जेसची कमाल मर्यादा ‘TRAI’ ने ठरवली. त्यामुळे भारती आयडीया यांच्या शेअर्सवर परिणाम झाला. ‘HOTEL LEELA’ त्यांची गोवा व चेन्नई येथील हॉटेल्स विकणार अशी बातमी येताच शेअरचा भाव वधारला. आज अचानक ‘TATA’ ग्रुपच्या शेअर्समध्ये वाढ झाली. नेहेमी किमतीत वाढ किंवा घट झाली की शोधाशोध चालू होते आणी ही वाढ किंवा घट कोणत्या कारणांने योग्य आहे किंवा कुठे खिचडी शिजते आहे हे शोधले जाते.पण आज मात्र या लोकांना या वाढीचे कारण सांगता आले नाही. वर्तमानपत्राच्या बातमीनुसार “TATA SONS’ चा ‘IPO’ येतो आहे म्हणून शेअर्स वाढले हा माझा अंदाज. मार्केटने 9000 चा आकडाही ओलांडला. ३०-१- २०१५ नंतर मार्केट पहिल्यांदा या ठिकाणी पोहोचलं
बुधवारी अजूनच मजा आली. आज ‘RBI’ने अचानक रेपो रेट .२५ ने कमी केला आहे असं जाहीर केलं . त्यामुळे आज मार्केटमध्ये तेजी असणार हे ठरलेलेच. परंतु किती याचा अंदाज प्रत्येकजण घेत होता. आज SENSEX उच्चांक गाठतो कि काय अशी बऱ्याच जणांची अटकळ होती. सव्वानउ वाजतां घंटा झाली मार्केट उघडले आणी THIRTY THIRTY असा जयघोष ऐकू आला. THIRTY म्हणजे SENSEX ३०००० बरं . ३०००० आकडा असलेले GASचे फुगे सोडले गेले. आणी हा ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला.
त्याच दिवशी स्पेक्ट्रम आणी कोळसाखाणींचा लिलाव .होता. उषा मार्टिन या कंपनीला खाण मिळाली असे कळताच त्या शेअरचा भाव वाढला. ‘ SUN PHARMA’ या कंपनीला जो ’USFDAकडून ४८३ फार्म मिळाला होता त्याचे CLOSURE झाले त्यामुळे कंपनीच्या डोक्यावरची टांगती तलवार गेली. हलोल प्लांट काळजीमुक्त झाला. सन फार्माची कॉलर ताठ.त्यामुळे सन फार्मा आणी त्यांची कंपनी ‘SPARC ’ यांचाही भाव वाढला
शेअरमार्केटची लहर सांभाळणे फार कठीण. रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा शेअरमार्केटने आपला हिसका दाखवला. अचानक शेअरमार्केट पडायला सुरुवात झाली. मार्केट पडण्याचा वेगही वाढला. सर्वांची तारांबळ उडाली. ४०० अंक वाढलेले मार्केट नाहीसे होऊन ४०० अंक रेड दिसू लागले काय झाले हे कोणालाच कळेना. खरेदी करणाऱ्यांचा आणी विक्री करणाऱ्यांचा दोघांचाही गोंधळ उडाला. पण शेअरमार्केट एखाद्या व्यक्तीप्रमाणे बाजूला उभे राहून मजा बघते की काय असं वाटू लागलं. तुम्ही परीस्थीतीचे कितीही विश्लेषण करून निष्कर्ष काढले तरी तुमची गाठ माझ्याशी आहे हे लक्षांत ठेवा हुरळून जावू नका असं जणू मार्केट सुचवतं होतं
मी गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच टीव्ही लावला तेव्हाच पहिली बातमी कानावर आली ती ‘RELIANCE INFRA’ पिपावाव डिफेन्समध्ये स्टेक घेते आहे. पण हा फारसा फायेद्शीर सौदा गुंतवणूकदारांच्या दृष्टीने नव्हता. त्यामुळे पिपावावचा भाव १०% पडला. ‘UNITED SPIRITS’ या कंपनीने व्यवस्थापनामध्ये जे बदल केले ते कंपनीची प्रगती करतील असे गुंतवणूकदारांना वाटले. त्यामुळे शेअरच्या भावांत वाढ झाली. ‘ORTEL COMMUNICATION’ चा ‘IPO’ शुक्रवारी बंद होणार असूनही लोकांनी पाठ फिरवली असे जाणवले.
असा लक्षांत राहण्यासारखा ‘उतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका” असे सुचवत हा आठवडा संपलाआणी शेअरमार्केटच्या रंगांच्या उधळणीप्रमाणेच खऱ्या रंगांची उधळण करायला गुंतवणूकदार मोकळे झाले . होळी आलीरे होळी म्हणत घरी पत्नीने केलेल्या पुरणपोळ्यांचा आस्वाद घेण्यास सज्ज झाले.

One thought on “आठवडा मार्केटचा – २ मार्च ते ५ मार्च – उच्चांकाचा झेंडा रोविला

  1. Pingback: क्या बनेगा पैसा – आठवडा ९ मार्च ते १३ मार्च | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.