मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
उन्हाळ्याचे दिवस होते. लोड-शेडींग होते. त्यामुळे अर्थातच लाईट्स नव्हते. लाईट्स नाहीत म्हणजे टी व्ही नाही. इन्टरनेट नाही. आधुनिक साधनांचा उपयोग शून्य. त्यामुळे अर्थातच झाली पंचाईत. म्हणून उठले , स्वयंपाक उरकून घेतला.माझी धोपटी उचलली आणी आमच्या ऑफिसमध्ये गेले. आमचं ऑफिस आमच्या घरापासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे त्यामुळे सहज शक्य झालं. नाहीतर काय करायचं हा प्रश्नच.
ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर ऐकू येणारा एकच संवाद. “काय MADAM लाईट गेलेले दिसतात. तेव्हांच तुमचे पाय ऑफिसकडे वळले.”
“हो रे बाबांनो पण तुमचं काय नुकसान!”
“ काही नाही हो MADAM, चेष्टा आपली! पाणी हवंय कां ? विचारपूस करतोय नाहीतर म्हणाल पाणी सुद्धा विचारलं नाही. काकांचा ओरडा बसेल”
मी माझ्या जागेवर बसून मार्केट पाहू लागले. आज काही ट्रेड करतां येईल कां याचा विचार करू लागले. तेव्हढ्यात चार-पांच जण आले. मी विचारलं “ काय हवंय ? तेव्हां अविनाश म्हणाला “ क्लायंट आहेत ! MADAM, बसा हं!”
“आम्ही बसायला नाही आलो.”
“मग काय हवंय? चेक हवंय बील हवंय स्टेटमेंट हवंय की आणखी काही?आणखी काही हवे असेल तर मात्र साडेतीननंतर , मार्केट संपल्यानंतर सांगा”
तेव्हढ्यांत ऑफिसमध्ये काका आल्रे. त्यासरशी ते लोक काकांकडे आले.
“ काय अंदाधुंदीचा कारभार असतो मार्केटमध्य. आज तुम्ही शेअर्स घेतलेत तर बोनस किंवा डीव्हीदण्ड मिळेल की नाही याची कोणालाच नक्की माहिती नसतं . त्यावर अवलंबून लोक शेअर्स घेतात किंवा विकतात. आणि मग फसवणूक झाल्यासारख होतं.”
काकांचा स्वभाव खूपच शांत आहे. “ तुम्ही भांडू नका. मला काय झालं ते सांगाल कां ?”
“आम्ही खरे पाहतां बोनस आणी स्प्लिट हवा म्हणूनच घाईघाईने अकौंट उघडला.माझ्या मित्राला पैशाची गरज होती. बोनस जाहीर झाला की त्या शेअर्सचा भाव वाढतो तेव्हां विकावा असे समजले होते.त्यामुळे त्यांनी १९ तारखेला विकले. आता जर १९ मार्च ही EX-डेट होती व २० मार्च ही रेकॉर्ड डेट होती तर आम्हाला बोनस मिळायला पाहिजे ना?
“१९ मार्चला तुम्ही खरेदी केलेत तर ते शेअर्स तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर २१ तारखेला जातात. २० तारखेला ज्यांचे शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर असतील त्यांनाच बोनस मिळेल आणी शेअर्स स्प्लिटचाही फायदा मिळेल. त्यामुळे १९ तारखेला ज्यांनी शेअर्स खरेदी केले असतील त्यांना बोनस आणी स्प्लिटचा फायदा मिळणार नाही. उलटपक्षी तुम्ही १९ तारखेला शेअर्स विकले तर ते सर्व प्रक्रिया होऊन २१ तारखेला तुच्या ‘DEMAT’ वरून वजा होतात. त्यामुळे त्यांनी विकले असले तरी त्यांना बोनस आणी स्प्लिटचा फायदा मिळेल.या मध्ये दोष कुणाचा? कुणाचाच नाही. सध्या रोलिंग सेटलमेंट T+2 अशी आहे”
“ आम्हाला काहीच कळत नाही.आम्ही विकत घेतले तेव्हां तरी कोणी तरी सांगायला पाहिजे होतं.”
काकांना काही समजेना. काका मला म्हणाले “ काय करू आता ?”
तेव्हां मी पुढे झाले “ उद्या तुम्ही तुमचे बिल घेवून या. शनिवार आहे मार्केट नसते शांतपणे बसून बोलू.”
“ अहो तुम्ही सांगता शनिवारी या. आम्ही शनिवारी मुद्दाम येणार व नेमके आम्हाला शटर बघून परत जावे लागेल”
“ तुम्ही निघताना फोन करा. आम्ही ऑफिसांत आहोत की नाही याची खात्री करूनच मग निघा.” असे म्हटल्यावर ती माणसे थोडी शांत झाली.
शनिवारी येतो असे सांगून निघून गेली. ऑफिसमधला गोंगाट कमी झाला. मी काकांना म्हटलं
“कदाचित तारीख सांगताना काही गोंधळ होऊ शकतो. आपणही आपले रेकॉर्ड बघू. विचार करायला काय घडले, चूक कोणाची याची शहानिशा करायला थोडा वेळ मिळेल.”
ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शनिवारी आले. मला काकांनी बजावले होते “ MADAM, तुम्ही नक्की यायला पाहिजे.” त्याप्रमाणे मी ऑफिसमध्ये गेले. १९ तारखेला शेअरचा भाव बोनस आणी स्प्लिट झाल्यावर १:४ या प्रमाणांत विभागून आला.६९८ रुपये चा भाव होता.
” हे पहा फक्त समजुतीचा घोटाळा झाला. तुम्हाला Rs २८००चे शेअर्स Rs ७०० च्या जवळपासच्या किमतीला मिळाले म्हणून तुम्ही हरखून गेलांत. पण वस्तुस्थिती तशी नाही. कंपनीने १:१ बोनस आणी त्यानंतर एका शेअरचे २शेअर्स स्प्लिट असे जाहीर केले. म्हणजेच १० शेअर्सला १०शेअर्स बोनस आणी त्या २० शेअर्सचे स्प्लिट म्हणजेच ४० शेअर्स होणार. म्हणजेच ज्या माणसाकडे १ शेअर असेल त्याला ४ शेअर्स मिळणार. त्यामुळे १९ तारखेला म्हणजेच EX- डेट ला शेअरची किमत १/४ होऊन आली. म्हणजेच Rs.६९८ ला १ शेअर झाली. त्या हिशेबानेच तुम्ही ६९८ रुपयाला एक या प्रमाणे १० शेअर्स घेतलेत असे बिलाप्रमाणे दिसते आहे. जर तुम्हाला बोनस आणी स्प्लिट मिळायचे असते तर २८०० रुपयाच्या किमतीला १ शेअर खरेदी करावा लागला असता.
त्याचप्रमाणे तुमच्या मित्राने १९ तारखेला १० शेअर्स ६९० च्या भावाने विकले असतील तरी त्यांच्या ‘DEMAT’ अकौंटवर आणखी ३० शेअर्स रेकॉर्डडेटनंतर येतील. ते ३० शेअर्स तुम्ही नंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे आणी तुमच्या गरजेप्रमाणे विकू शकता. त्यांचाही काही फायदा नाही आणी तुमचेही काही नुकसान नाही फक्त समजुतीचा घोटाळा आहे.”
EX-डेट म्हणजेच लक्ष्मणाने सीतेसाठी घालून दिलेली मर्यादा आहे असे समजा. त्या तारखेच्या आधी खरेदी करणाऱ्याला बोनस DIVIDEND स्प्लिट , RIGHTS, मर्जर डीमर्जर , स्पिन ऑफ अशा प्रकारच्या कॉर्पोरेट ACTIONचा फायदा मिळतो. य़ा तारखेला किंवा या तारखेनंतर घेतलेल्या शेअर्सवर हे फायदे मिळत नाहीत.जसे रावणाने सीतेला लक्ष्मणरेखा पार केल्यावर पळवून नेले तसे एकदा ही तारीख निघून गेल्यावर ही सर्व फायदे मिळत नाहीत.
त्यामुळे शेअर्स खरेदी करताना तसे काही उद्देश असेल तर खरेदी केलेले शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर कधी येतील हे विचारूनच शेअर्स खरेदी घेत चला .
हे शेअर्स रेकॉर्ड डेटला तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर असतील तरच तुम्हाला हे सर्व फायदे मिळतील. तसेच शेअर विकताना ते तुमच्या ‘DEMAT” अकौंटवर कधी वजा होतील हे विचारून घ्या. जर ते रेकॉर्ड डेटला किंवा त्याच्या आधी तुमच्या अकौंटवरून वजा होणार असतील तरी तुम्हाला या सर्व कॉर्पोरेट ACTION चा फायदा मिळणार नाही. या सर्व माहितीसाठी ब्रोकरवर किंवा दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच इंटरनेटवर जाऊन (जे आता तुमच्या मोबाईलवरही असते) माहिती करून घ्या.
भेटू या पुढच्या भागांत…
पण ब-याचदा रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट जी दिलेली असते त्याच्या एक/दोन दिवस आधीच नंतरचा भाव दिसतो असे का होते. मध्यांतरी माझ्या बाबतीत ही असे घडले होते. समजा 15 ही एक्स डेट दिली आहे याचा अर्थ 15 तारखेला नविन भावाप्रमाणे भाव दिसायला हवा पण तो 14 लाच सकाळी बदलला होता.
आपल्याकडे T+२ ही पद्धत स्वीकारली आहे. आपण विचारल्याप्रमाणे १४ तारखेला एखाद्याने जर शेअर विकत घेतला तर तो १५ तारखेला DEMAT अकौंटवर जमा होणे शक्य नाही. सगळ्या लोकांना रेकॉर्ड डेटची माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसगत होण्याची शक्यता गृहीत धरून १४ तारखेलाच भावात बदल केला जातो
दुसरा प्रश्न असा आहे की सध्या नेस्लेचे maggi प्रकरण गाजते आहे. पण public memory is short, वातावरण निवळल्यावर याचा भाव वाढेल की कमी होईल? थोड़े घेऊन ठेवावेत का?
नेस्लेचे शेअर्स घ्यावेत की नाही यासंबंधी सर्व चर्चा गेल्या खेपेच्या आठवड्याचे समालोचन या भागांत केली आहे. नेसले ही कंपनी चांगली असली तरी वातावरण निवळायला काही काळ जावा लागेल. सध्या मार्केटचा त्या प्रमाणांत SUPPORTही नाही. पावसाला म्हणावी अशी सुरुवात होईल,असे दिसत नाही. या सर्व अडचणी लक्षांत घेवून तुम्ही निर्णय घ्या.
Pingback: भाग ५६ – कॉर्पोरेट एक्शन : बोनस इशू | Stock Market आणि मी