Monthly Archives: July 2015

HAPPY BIRTHDAY TO YOU – ‘मार्केट आणी मी ‘

‘मार्केट आणी मी ‘हे माझे बाळ ३ वर्षांचे झाले आहे. त्यानिमित्त आपण सर्व वाचक केक कापुन गोड गोड घास घेवून या बाळाचा तिसरा वाढदिवस साजरा करू.
Guru Purnima 2014
३ वर्षापूर्वीचा दिवस मला अजून आठवतो आहे. त्यावेळी माझ्या मुलाने मला ब्लॉग लिहिण्याची कल्पना सुचवली. ४ दिवसांनी गुरुपोर्णिमा होती. त्या दिवसापासून ब्लॉग लिहिण्यास प्रारंभ केला. शेअरमार्केटविषयीचे गैरसमज दूर करणे, लोकांच्या मनातील शेअरमार्केटची भीती घालवणे, मातृभाषेत शेअरमार्केट समजावून देणे, आणी टिपा न देतां लोकांना स्वावलंबी गुंतवणूकदार बनवणे, अतिशय सोप्या भाषेंत लिहिणे हे उद्देश डोळ्यांसमोर होते. त्याचबरोबर वाचकांची फसवणूक होऊ नये, नुकसान होऊ नये, म्हणून काही सुचनावजा माहिती द्यावी असे वाटले. हे उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच लेखांची रचना केली आणी करीत आहेआणी भविष्यांत करणार आहे.
माझ्या कामांत माझे यजमान श्री. प्रकाश भास्कर फाटक आणी माझा मुलगा सुरेंद्र प्रकाश फाटक यांची मदत झाली. मी लेख लिहायचा ,यजमानांनी तो टाईप करायचा, मुलाने तो ब्लॉगवर टाकायचा असे हे काम अव्याहत चालू आहे. माझी सून किरण गोवेकर या ब्लॉगची पहिली वाचक आहे. ती आम्हाला उत्तेजन देते. काही अडचण आली की मुलगी स्वरश्री फाटक हिला विचारायचे. सगळ्यांच्या प्रयत्नातून माझ्या या बाळाने इथपर्यंत मजल मारली आहे. अनेक वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया, अपेक्षा कळविल्या त्याप्रमाणे ब्लॉगमध्ये सुधारणा होत गेल्या. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळून माझे बाळ मोठे झाले, माझ्या या बाळाने बाळसे धरले त्या सर्वांची मी आभारी आहे, ऋणी आहे.
माझे बाळ आता गुटगुटीत झाले आहे हे बघून मला आनंद होतो. काही वाचक आता ट्रेडिंग करू लागले आहेत. त्यामुळे माझा उद्देश अंशतः कां होईना साध्य होतो आहे. एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे आपण जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा माझी उत्तरे हे सदर वाचा. त्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल . त्यामुळे तुमची शंका लगेच दूर होईल.
मी या बाळाकडे आईच्या नजरेतून पाहते त्यामुळे ब्लॉगमधील दोष काढून टाकून गुणवत्ता आणी उपयोगिता सतत वाढवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझे हे बाळ आपल्याला सतत प्रगतीची योग्य वाट दाखवेल, शेअरमार्केट मध्ये ट्रेडिंग, गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करेल, आपला आत्मविश्वास वाढवेल,आणी वेळोवेळी समस्यांचा, धोक्यांचा लाल दिवाही दाखवील हा माझा विश्वास आहे. आपण वाचकही प्रतिक्रिया, सुचना देऊन माझे बळ वाढवत आहांत. मला आनंद देत आहांत.
शेवटी एक विसरू नका – माहिती, प्रोसीजर, ज्ञान, धैर्य आणी निर्णय घेण्याची क्षमता हे सर्व स्तुत्य गुण आहेत. पण शेअरमार्केट मध्ये व्यवहार करून आपल्याला पैसा मिळालाच पाहिजे हे ध्येय विसरू नका. पण समजा एखाद्यावेळेला तोटा झाला तर घाबरून न जाता ती चूक सुधारा आणी भविष्यांत पुन्हा त्या पद्धतीची चूक होऊ नये ही काळजी घ्यावी.ही विनंती
पुन्हा एकदा सर्व वाचकांना धन्यवाद . भेटू पुन्हा———–

आठवड्याचे समालोचन – २० जुलै ते २४ जुलै २०१५ – मंद झुळुक GST ची

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
कमी पाऊस, ग्रीसचे संकट या बातम्या मार्केटने पचवल्या आणी बाजूला सारल्या. आणी सर्वांनीच रिझल्ट्स आणी पावसाळी अधिवेशन लक्षांत घेवून आगेकूच करायला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स आले तर प्रॉफीट बुकिंग, अपेक्षेपेक्षा कमी आले तर त्या शेअर्सचा नाद सोडून द्यायचा आणी ज्या कंपन्या भविष्यकाळात प्रगती होण्याची खात्री देतील ते शेअर्स खरेदी करायचे असे वातावरण दिसले कारण निफ्टी सध्या ८६००च्या जवळपास आहे.
GST (GOODS AND SERVICES TAX) साठी सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे त्यामुळे यावेळी हे बिल पास होईल अशी सर्वांना शक्यता वाटत आहे. हे बिल पास झाले तर मार्केट उसळी घेईल म्हणून प्रत्येकजण सावधगिरीने पावले उचलत आहे. हे बिल पास झाले नाही तर मार्केट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरेदीची पोझिशन घ्यावी की शेअर्स विकून टाकून गुंतवणूक कमी करावी याचा अंदाज येत नाही. आता हे GST प्रकरण आहे तरी काय ? तर GST हा जगभर प्रचलीत असलेला एक अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. ठीकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कर देण्यापेक्षा एकदाच कर आकारणी करावी त्यामुळे कर प्रणालीमध्ये सुसूत्रता येईल, करचुकवेगीरीला आळा बसेल आणी सरकारच्या उत्पन्नात वाढ होईल. भारतांत तयार होणारा माल आणी सेवा आंतरराष्ट्रीय बाजारांतील स्पर्धेत टिकाव धरू शकतील आणी करआकारणीमध्ये पारदर्शकता येईल. करदात्यांची संख्या वाढेल. त्यामुळे एकंदरीतच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सर्वांचा फायदा होईल असे सध्या तरी सर्वांना वाटते आहे.
सोने ५ वर्षातील कमीतकमी भावाला पोहोचले. सोने US$ ११०० च्या खाली गेले. म्हणजेच आपल्याकडे सोने १० ग्रामला Rs २५००० च्या खाली आणी चांदी किलोला Rs ३४००० च्या खाली गेली. चीनमध्ये ५ टन सोने विकले गेले.
याचा परिणाम तीन प्रकारे झाला –
(१) सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर होतो. सोन्याची किमत कमी झाल्यामुळे कर्जावरील मार्जिन कमी होते त्यामुळे एक तर कर्जाची आवश्यक परतफेड करुन घ्यावी लागते किंवा तारण वाढवावे लागते..
(२)जवाहीर आणी दागदागिने बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो. उदा:TBZ. गणेश जुवेलरी, गीतांजली जेम्स, P. C. जुवेलर्स. इत्यादी.
(३) सोन्याचा वापर घड्याळे इत्यादी रोजच्या वस्तूंमध्ये करणाऱ्या कंपन्या.उदा : टायटन.
दक्षिण आफ्रिकेमध्ये लेबर आणी पॉवर प्रॉब्लेम आहे त्यामुळे सोन्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन ते घटेल. सोन्याकडे सिक्युरिटी किंवा सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात होते त्याचे प्रमाण कमी झाले. देशांच्या TREASURY मध्ये सोने ठेवले जात होते त्याचेही प्रमाण आता कमी झाले. सोन्याची किमत कमी होते तेव्हां लोक दागिने खरेदी करतात. पण गुंतवणूक या दृष्टीने सोन्याची मागणी कमी होते, कारण लोकांना वाटते की भाव कमी होत आहे तर थांबू या. सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे रिटर्न ओंन इनव्हेस्टमेंट कमी होते .ज्या लोकांनी निवृत्तीनंतर मिळालेला पैसा सोन्यांत घातला त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आली. गोल्ड ETF सोने विकत आहेत. सोन्याची किमत कमी झाल्यामुळे आपल्या देशाच्या रीझर्व्समध्ये घट येईल.
फेडने USA मध्ये व्याजाचे दर यावर्षी वाढवणार असे जाहीर केल्यामुळे US$ मजबूत होण्याची शक्यता आहे. डीशमन फार्माचे ऑडीटर बरोबर मतभेद झाल्यामुळे त्यानी जुने ऑडीटर काढून नवीन औडीटर नेमले. त्यामुळे अकौंट फायनलाईझ करण्यासाठी आणी लाभांश ठरवण्यासाठी बोलावलेली बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग पुढे ढकलली. ऑरोबिन्दो फार्माचे शेअर्स आज एक्सबोनस झाले. Rs. १४०० च्या वर भाव होता तो अर्धा म्हणजे Rs. 730च्या आसपास झाला. कोणत्याही FMCG (FAST MOVING CONSUMER GOODS) शेअर्ससाठी प्राफिट मार्जिन आणी VOLUME(विक्री) बघावेत. इतर उत्पन्न पहावे.
फेडरल बँक आणी कर्नाटक बँकेचे तिमाही निकाल खराब आल्यामुळे हे दोन्ही शेअर्स पडले. या दोन्ही बँकाच्या N.P.A . ( NON PERFORMING ASSETS) मध्ये वाढ झाली. ‘ACC’ चा रिझल्ट निराशाजनक आला. ULTRATECH या सिमेंट कंपनीचा रिझल्ट गेल्या तिमाहीपेक्षा कमी पण अपेक्षेपेक्षा चांगला आला.
पंतप्रधानांनी ‘NATIONAL CAREER PORTAL’ चे उद्घाटन केले. या पोर्टलवर ज्यांना नोकरी हवी आहे आणी जे नोकरी देऊ शकतात अशा दोघांनीही नावे नोंदवायची आहेत. शालीमार पेंट्स या कंपनीचे रिझल्ट्स खराब आले.IOC (INDIAN OIL CORPORATION) चेन्नई पेट्रोलियम मध्ये Rs १०००कोटी गुंतवणूक करणार आहे. LIC हौसिंग कॉर्पोरेशन बॉंडमधून Rs ३०० कोटी उभारणार आहे. सास्केन कम्युनिकेशनचे रिझल्ट्स चांगले आले.
‘सन फार्मा’ या कंपनीने प्रॉफीट वार्निंग दिली. FY२०१६ मध्ये प्रॉफीटमध्ये घट होण्याचा संभाव आहे असे जाहीर केले. याचे कारण त्यांना जो RANBAXYचे अधिग्रहण ते इंटिग्रेशन यासाठी जो खर्च आला त्याचा परिणाम प्रॉफीट वर नकारात्मक होईल असा इशारा कंपनीने दिला. यामुळे हा शेअर आज १५% खाली आला. GAMMON इंफ्राने इंदिरा कंटेनर मध्ये ऑटो क्षेत्राला उपयुक्त असलेली RORO (ROLL IN ROLL OUT) सेवा सुरु केली. ‘मनपसंद बिवरेजीस या कंपनीचा ‘जस्ट डायल’ या कंपनीएवजी BSE( BOMBAY STOCK EXCHANGE) च्या ‘IPO’ निर्देशांकात समावेश करण्यांत आला. भारती एअरटेलने ४ आफ्रिकन सबसिडीअरी ‘ORANGE’ या कंपनीला विकल्या.
इन्फोसिसचे तिमाही रिझल्ट्स चांगले आले. एकूण उत्पन्न, नफा आणी US$ मधील उत्पन्न यांत चांगली वाढ झाली.कंपनीने २०१६ वर्षासाठी ‘GUIDANCE’ ही चांगला दिला. त्यामुळे कंपनीचा शेअर ११% वाढला.
HDFC बँकेचे तिमाही रिझल्ट्स नेहेमीप्रमाणे चांगले आले पण ग्रॉस आणी नेट N.P.A. मध्ये वाढ झाल्यामुळे थोडे गालबोट लागल्यासारखे झाले. HULचे तिमाही रिझल्ट्स चांगले आले. परंतु त्यानी रुरल डिमांड वर जास्त भर दिल्यामुळे शेअर पडला.पोरान्तु त्यांची विक्री कमी झाली.
विप्रोचा रिझल्ट अपेक्षेप्रमाणेच चांगला आला नाही. बजाज ऑटोचा नफा वाढला पण विक्री कमी झाली म्हणून निकाल फारसा चांगला म्हणता येणार नाही. ‘लुपिन’चे तिमाही रिझल्ट निराशाजनक तर होतेच पण त्यानी घेतलेली ‘ गावीस फार्मा’ ही कंपनी त्यानी महाग भावांत खरेदी केली असे तज्ञांचे मत आहे. CAIRNS ENERGY PLC ने तसेच LIC आणी GIC यांनी CAIRN (I) आणी वेदांत यांच्या मर्जरविरुद्ध मत नोंदवले. त्यामुळे CAIRN(I) च्या शेअर्सचा भाव वाढला. GAIL या कंपनीचा रिझल्ट निराशाजनक आला. स्टील उद्योगाची ‘DUMPING’ च्या संकटापासून सुटका होईल अशी चिन्हे दिसत नाहीत.J. P. असोसिएटचे रेटिंग ‘POOR’ असे केल्यामुळे IDBI आणी ICICI या बँकेच्या शेअर्सवर होत आहे. टेक महिंद्राने ONTARIO ENERGY PROJECT साठी पार्टनरची घोषणा केली. सरकार ‘BPCL’ मधील ३ % स्टेक विकण्याच्या विचारांत आहे.
बँक ऑफ बरोडा मधील परदेशी होल्डिंगची कॅप उठवली. USFDAने WOCKHARDT च्या नालगढ युनिटची तपासणी पूर्ण केली. कंपनीला फॉर्म नंबर ४८३ देण्यांत आला नाही. INDIAN INSTITUTE ऑफ PUBLIC ADMINISTRATION न्यू दिलीने त्यांच्या कॅम्पस डेवलपमेन्टसाठी Rs.४३५ कोटींचे कॉन्त्राच्त NBCC ला दिले. GSFC या कंपनीचे शेअर्स NSE मधून डीलीस्ट होणार आहे.IDFCला IDFC बँकेसाठी लायसन्स मिळाले.
मार्केट बंद होता होता TVS मोटर्स, CROMPTON यांचे रिझल्ट्स आले ते निराशाजनक होते. AXIS बँकेचा रिझल्ट ठीक म्हणता येईल. MM फायनांसचें रिझल्ट्स चांगले आले. सर्वांची मदार रिलायंस इंडस्ट्रीजवर आहे. पण हा रिझल्ट मात्र मार्केट संपल्यावर येईल त्यामुळे त्याचा परिणाम सोमवारी जाणवेल.. बघू या काय होते ते

आठवड्याचे समालोचन – १३ जुलै ते १७ जुलै २०१५ – शेअरमार्केटचा रुबाब राजाचा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
IIP चे नंबर फारसे चांगले आले नव्हतेच, ग्रीसचे काय होणार हे माहित नव्हते. अशा ढगाळ वातावरणातच सोमवारी हा आठवडा चालू झाला. मार्केटचा रागरंग पहावा आणी मगच ट्रेडिंग करायचे की नाही याचा निर्णय घ्यावा असे ठरवले
सुरुवातीला मार्केट वर होते. पण लगेचच मार्केटने दिशा बदलली. एखादे मुल रुसून बसावे असे मार्केट जाणवत होते. १० वाजेपर्यंत असंच चालू राहिलं. १० वाजतां COMMODITY मार्केट उघडले, क्रूड आणी मेटल्स पडत आहेत फक्त हळद तेजीत आहे ही बातमी आल्याबरोबर मार्केटमध्ये उत्साह आला. त्यानंतर १२ वाजण्याच्या सुमारास ग्रीसचे डील झाले. ग्रीसचे संकट यशस्वीरीत्या दूर झाले हे कळताच मार्केटचा उत्साह द्विगुणीत झाला. निफ्टीने ८४६० ची महत्वाची पातळी गाठली.
मी पूर्वी सांगितले आहे की या प्रकारच्या ट्रेडला रिस्क on आणी रिस्क ऑफ ट्रेड असे म्हणतात. जसे ढगाळ वातावरण असेल मळभ आले असेल तर घुसमटते पाऊस येणार की नाही नाही काहीच काळात नाही. त्याच पद्धतीने जेव्हां कोणताही धोका समोर उभा ठाकलेला दिसतो तेव्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्याला अंदाज बांधता येत नाही तर मार्केट ४ पावले पुढे तर 3 पावले मागे असे असते. धोका नाहीसा झाल्यावर परिस्थितीनुसार निर्णय घेवून ट्रेडिंग सुरु होते. असा अनुभव प्रत्येक ठिकाणी येतो.
१२ वीचा रिझल्ट लागला मार्कही हवे तेवढे मिळाले पण हव्या त्या ठिकाणी हव्या त्या साईडला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत काही सुचत नाही. पण एकदा ADMISSION मिळाली की पुढील निर्णय घेणे सोपे जाते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी मार्केट RELATE करून पाहिल्यास मार्केट समजावून घेणे सोपं जातं. मध्यंतरी पावसाने दडी मारली होती. जून महिन्यांत पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडला. शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरण्या केल्या. नंतर पाऊस पळाला. पेरलेले बियाणे करपून जायची पाळी आली. दुबार पेरणीची भाषा सुरू झाली. दुष्काळाची भाषा सुरु झाली. त्यामुळे ही मार्केट रुसले. आज बातमी आली की पावसाचा रुसवा गेला. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भरपूर पाऊस पडला.आपल्याकडेही अधुन मधून पावसाच्या सरी आल्या. प्रत्येक गोष्ट मार्केटच्या दृष्टीने अनुकूल घडली.
इराणबरोबर ६ राष्ट्रांनी न्युक्लिअर डील केले अशी बातमी आली. यामुळे जागतिक पटलावरील आणखी एक ढग नाहीसा झाला. त्यामुळे क्रुडऑइलशी संबंधीत आणी इराणशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या. इराणशी झालेल्या कराराप्रमाणे इराण अणुशस्त्र बनविणार नाही आणी त्या बदल्यांत इराणवर लावण्यांत आलेले आर्थिक निर्बंध उठवले जातील. यामुळे क्रूडचे उत्पादन वाढून किमत खाली येईल. भारताचा क्रूड आयातखर्च आणखी कमी होईल. तसेच इराणमधून आयात केल्या जाणाऱ्या क्रुद्वर ९० दिवसांचे क्रेडीट मिळते. बाकीचे देश फक्त ३० दिवसांच्गे क्रेडीट देतात. इराणकडून होणारी क्रूडआयात वाढल्यामुळे GRM US$१/BBL वाढू शकेल. याचा फायदा ‘MRPL’, ‘OILINDIA,’ ‘ONGC’ या ओईल उत्पादन करणाऱ्या आणी HPCL, BPCL, IOC या ऑईल मार्केटिंग कंपन्या आणी अबन ऑफशोअर ही ऑईल रीग पुरविणारी कंपनी या कंपन्यांना होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड युथ स्किल्स दिनानिमित्त ‘स्किल इंडिया’ ह्या योजनेचे उद्घाटन केले. या दिवशी पंतप्रधानांनी खालील योजना जाहीर केल्या.
(१)राष्ट्रीय स्किल्स डेव्हलपमेंट मिशन
(२)स्कील डेव्हलपमेंट आणी एन्टरप्रानुंअर २०१५ धोरण
(३)प्रधान मंत्री कौशल विकास योजना
(४) स्कील लोन योजना
ही पंतप्रधानांची तरुण पिढी तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण देवून कार्यक्षम बनविण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. यातील सर्वात उल्लेक्नीय बाब म्हणजे निवृत्त होणार्या सैनिकांसाठी तंत्रशिक्षण पुरविण्याची आहे.. या योजनेच्या घोषणेमुळे तंत्रशिक्षण आणी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. उदा: NIIT, CARRER POINT, अप्टेक, झी लर्न.
‘SYNGENE INTL’ या बायोकॉन या कंपनीशी संबंधीत कंपनीचा ‘IPO’ २७ जुलै ते २९ जुलै या मुदतीत येत आहे.त्याचा प्राईस band Rs २४० ते Rs २५० आहे ‘एस्सार ओईल’ त्यांची वाडीनार रिफायनरी सप्टेंबर २०१५ मध्ये ३० दिवसांसाठी बंद ठेवणार आहे.’THERMAX’ या कंपनीने ‘फर्स्ट एनर्जी’ या कंपनीमधला ३३% स्टेक घेतला. ‘फर्स्ट एनर्जी’ ही कंपनी ‘उर्जा’ या नावाने उत्पादन विकते.
निरनिराळ्या प्रकारच्या येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीसाठी सरकारने COMPOSITE FOREIGN CAPITAL’ या नावाखाली एकत्रीकरण केले. आणी त्याचे जास्तीतजास्त प्रमाण ठरवून दिले. यामुळे आता भारतांत येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीला फायदेशीर प्रकार निवडता येईल तसेच ही परदेशी गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांनाही ही गुंतवणूक निरनिराळ्या योजनांखाली स्वीकारणे सोपे जाईल. या योजेनाची फायदा HDFC, एक्शीस बँक, यस बँक, कोटक महिंद्रा बँक यांना फयदा होईल.त्यामुळे हे शेअर्स वाढले.
रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले की ते अल्पावधीतच ४०० रेल्वेस्टेशने रीडेव्हलप करण्याचे काम हाती घेईल. स्टेट बँक ऑफ इंडिया Rs ४४०० कोटींचे NPA (NONPERFORMING ASSETS) ARC( ASSET RECONSTRUCTION COMPANY) ला विकण्याच्या विचारांत आहे. गुरुवारी निफ्टीने 8600 चा अडथळा पार केला.
‘आठवड्याचे समालोचन (१३ एप्रिल ते १७ एप्रिल’) कंपन्यांचा वार्षिक निकाल’ या भागांत BIOCON ही कंपनी SYNGENE INTL ’ चा ‘IPO’ आणत आहे हे कळवले होते. त्या दिवशी हा शेअर Rs ४९० पर्यंत गेला होता. मी नेहेमी आपल्याला सांगते की बातमी आल्याबरोबर धावपळ करायची गरज नाही. जेव्हां स्वस्तांत मिळतील तेव्हा ५-१० शेअर्स असे हळू हळू गोळा करावेत. तुम्हाला हे शेअर्स मे महिन्यांत Rs ४३० ते Rs ४५० ला मिळू शकले असते. हा ‘IPO’ २७ जुलै ते २९ जुलै दरम्यान येत आहे तोपर्यंत ‘BIOCON’ शेअरची किमत Rs ५०० ते Rs ५१० होईल अशी शक्यता आहे. म्हणजे आपल्याला ३ महिन्यांत २०% फायदा होऊ शकेल. बँक तुम्हाला मुदत ठेवीवर १०% व्याज वर्षानंतर देते. हा फायदा करून घेवून तेच पैसे दुसऱ्या शेअर्समधील गुंतवणुकीसाठी वापरता येतात. पण शेवटी जे काही कराल ते स्वतः विचार करून करा. फायदा हि तुमचा आणि नुकसानही तुमचंच हे विसरू नका.
‘LUPIN’ या कंपनीला त्यांच्या डायबेटीसवरच्या ‘PRANDIMET’ या औषधाला USFDA ची परवानगी मिळाली. ‘MINDTREE’ या कंपनीने ‘BLUFIN REVENU’ ही कंपनी घेतली. एशिअन पेंट्स ही कंपनी म्हैसूरला कारखाना उभारण्यासाठी कर्नाटक सरकारबरोबर बोलणी करीत आहे. डेल्टा कोर्प आणी मान इंडस्ट्रीज यांचे तिमाही निकाल चांगले आले. ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होत आहे. त्यामुळे एरोस इंत) हा शेअर चांगला चालू आहे. ‘INOX WIND’ यां कंपनीने मध्यप्रदेशातील ‘BLADE’ युनिट सुरु झाले असे जाहीर केले. रिझर्व बँकेने बँकांना डायरेक्ट शेती कर्जासाठी १३.५ लक्ष्य दिले आहे. साकार मेडिया सेक्टरमध्ये विदेशी गुंतवणूक ४९% पर्यंत वाढविण्यास परवानगी देण्याच्या विचारात आहे. टीटाघर WAGON या कंपनीने ‘फिरेमा’ ही इटालियन कंपनी खरेदी केली.
या आठवड्यात मार्केट राजासारखे स्वतःच्याच थाटांत चालले. पाऊस फारसा नाही तरी मार्केटने त्याकडे दुर्लक्ष केले. उलटपक्षी सरकार जे रीफॉर्म करीत आहे, किचकटपणा कमी करून सोप्या आणी सरळ गोष्टी करून व्यापार करण्यासाठी योग्य वातावरण तयार करीत आहे..ही गोष्ट दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आवडली असे जाणवते. त्यामुळे ज्या रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअर्सने मार्केटकडे पाठ फिरवली होती. तो शेअर सुधारला. बरेच दिवसांनी शेअरची किंमत Rs 1000च्या वर गेली . निफ्टी ८६०० च्या वर गेला. सर्वांना आनंद झाला. बघू पुढील आठवड्यांत काय होते ते.

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – June २०१५

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नाव: आनिरूध्दतातुगडे
तुमचा प्रश्न :मँडम मला काहीच समजतनाही सुरवातीला कमीत कमी किती पैसे गुंतवणुक करू शकतो. 
एक हजार रुपयापासून तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता. मात्र गुंतवणुकीच्या प्रमाणांतच नफा मिळेल एवढे लक्षांत ठेवा.प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याच्या आधी वहीतल्या वहीतच खरेदी विक्री करून तुमचे शेअर्सच्या किमतीतील वाढीचे अंदाज किती प्रमाणांत खरे येतात ते पहा.
नाव: Anil Gaikwad
तुमचा प्रश्न : Dear Madam,  i want to know About Future & Option Trading in marathi?
मी ‘DERIVATIVE’ मध्ये ट्रेडिंग करत नाही त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देवू शकत नाही पण पुढे कधी त्या क्षेत्रात प्रवेश केला तर नक्की मराठीत माहिती ब्लोगवर टाकेन
नाव: nitin pise
तुमचा प्रश्न :मैडम माझे sbi मधे सेविंग अक्काउंट आहे. मला share market मधे एंट्री करायची आहे.  demat अक्काउंट काढल्या नंतर ट्रेडिंग अक्काउंट कसे काढ़ायचे. brokerशिवाय आपण online ट्रेडिंगअक्काउंट काढु शकतो काय?
आपण माझा ब्लोग वाचा. तुम्हाला ओंन-लाईन ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्हाला बँकेच्या स्कीममध्ये किंवा ब्रोकरकडे ट्रेडिंग अकौंट उघडावा लागेल.
नाव: sandip untwale
तुमचा प्रश्न : share split ka kartat
शेअरची किंमत खूप वाढली त्यामुळे शेअरची लिक्विडीटी कमी झाली. तर शेअर्स स्प्लिट करतात. शेअर स्प्लिटविषयी एक पोस्ट लवकरच टाकत आहे ते वाचावे.
नाव: Shreerang
तुमचा प्रश्न : Madam, I read all your blogs and it gave me inspiration to start learning and trading. I purchased Mastek shares on 15June after reading the news that Mastek record date as 15June for allotment of additional shares of Majesco to each Mastek shareholder. Please guide, will I get Majesco shares since I have purchased Mastek shares on Record date? I request your urgent reply so that I can decide whether to keep these shares or not. If I am getting additional Majesco shares, then only I am interested to keep the same. Please guide urgent
रेकॉर्ड डेटला ज्यांचे शेअर्स DEMAT अकौंटवर असतील त्यानांच ‘ ‘MAJESCO’ चे शेअर्स मिळणार होते. तुमचे शेअर्स रेकॉर्ड डेटला खरेदी केल्यामुळे त्यानंतर 2 दिवसांनी ‘DEMAT’ अकौंटला जमा होणार. त्यामुळे तुम्हाला ‘’MAJESCO’ शेअर्स मिळणार नाहीत.
नाव: ajit
तुमचा प्रश्न : on line trading karnyasati laptop kinva computer garjechaaaheka
mobile varunnahikakarushakataapan on line trading.??
होय मोबाईलवर इंटरनेटची सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही ओंनलाईन ट्रेडिंग करू शकता. पुढील माहितीसाठी तुम्ही तुमच्या ब्रोकर किंवा बँकेशी संपर्क साधा.
नाव: vitthal
तुमचा प्रश्न : Namaste madam mala aasevichyarayechehoteki BSE,NSE,NIFTY & SENSEX yamadhekutle share yetat. tasech 1 share 100 Rs. La aahe tar to share mala tyachkimtitmilelkatyavarkutlecharges lagtatKa? Aani mi share kharedi /viklyanantartyache payment online hou shakkt ka te kase tyachi mahiti sanga. Aani tyasathi Kay karav lagel.
तुम्ही ज्या किंमतीला ऑर्डर टाकाल त्या कीमतीला शेअर विक्रीसाठी उपलब्ध असेल तर त्या किमतीला तुम्हाला शेअर्स मिळतो त्या किंमतीत नंतर दलाली, SECURITY TURNOVER TAX , SERVICE TAX, STAMP DUTY, आणी TURNOVER चार्जेस मिळवले जातात. शेअर विक्रीच्या किमतीतून हे सर्व वजा केले जातात. तुम्ही इंटरनेट बँकिंग सुविधा घेवून ओंन-लाईन करू शकता.
नाव: सौ. वंदना
तुमचा प्रश्न :नमस्ते मैडम :- मी एक गुरुहिणी आहे. मला माझे घर सांभाळून घर बसल्या दोन पैसे कमवायचे आहेत. यासाठी मला शेअर मार्केट हे मध्याम योग्य आहे असे वाटते आणि मला शेअर मार्केट आवडते . दोन वर्ष पासून शेअर मार्केट मधेय पैसे गुंतवते . पण मी इंटर-दय करते कारण मला दिवसाल शंभर रुपय मिळाले तरी पुरेसे आहेत. पण असे होत नाही आणि माझेच पैसे जातात. माझी गुंतवणूक कमी आहे. (२००० – ४०००) तर मी काय करू मला मार्गदर्शन करा .
तुमचा प्रश्न आणी तुमची अडचणही समजली. तुम्हाला रोज Rs १०० मिळाले पाहिजेत याचा अर्थ हे Rs १०० इंट्राडे ट्रेडिंग करूनच मिळवले पाहिजेत असा नव्हे. तुम्ही शंभर रुपये किमतीचे ५० च शेअर्स खरेदी केलेत आणी Rs ३० ते Rs ४० च्या फरकाने विकलेत किंवा Rs ५०० किमतीचे १० शेअर्स घेतले व प्रत्येक शेअरला Rs १०० नफा ठेवून विकले तरी तुमचा उद्देश साध्य होईल. इंट्राडे मध्ये खरेदी विक्रीची वेळ जर बरोबर गाठता आली नाही तर तोटा होतो. योग्य संधी असेल तरच इंट्राडे ट्रेड करा आणी ‘A’ ग्रूपच्या शेअर्स मध्ये इंट्रा करा नुकसान होत असल्यास DELIVERY घ्या. आणी किमत वाढल्यावर विका.. इंट्राडे करताना आपण कंपनीची  गुणवत्ता,  शेअर स्वस्त आहे की महाग याचा विचार करत नाही. इंट्राडे ट्रेडिंगचे  शेअर्स पुष्कळ वेळेला गुंतवणूक करण्यायोग्य नसतात.
नाव: प्रमोद धिवारे
तुमचा प्रश्न :सविनयप्रणाम, बर्याच वेबसाईट्स वाचल्या पण Call Put हा प्रकार  काही अजुन लक्षात येत नाही. कृपया मदत करा. तुमची सांगण्याची पद्धत समजण्यास खुप सहज आणि सोप्पी आहे. Call Put म्हणजे काय ?त्यात ट्रेडींग कसे करावे ?day trading पेक्षा call put तुलनेने जास्त सुरक्षीत आहे का ? कृपया एखादे नफ्याचे तसेच नुकसानाचे उदाहरण देउन सविस्तर माहीती द्यावी. 
मी ‘DERIVATIVE’ मध्ये ट्रेडिंग करत नाही त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देवू शकत नाही पण पुढे कधी त्या क्षेत्रात प्रवेश केला तर नक्की मराठीत माहिती ब्लोगवर टाकेन
नाव: shailesh Krishna Padelkar
तुमचा प्रश्न : Namskar Madam, mala aasevicharaycheaaheki company ni chi finanacial position tychya balance sheet varunkashi find karaychi tee company pudhekashi progress karnar aahe tya companicha share gyva ki nahi he kase tharvayche jara mala sangalka please.
इंटरनेटवरून कंपनीची माहिती मिळवा. कंपनीवर कर्ज किती आहे ते बघा, कंपनी फायद्यांत चाले आहे कां हे बघा लाभांश देते कां? सार्वजनिक क्षेत्रातील आहे की खासगी क्षेत्रातील आहे, कंपनीवर सरकारी नियंत्रण किती आहे.? कंपनीचे कॉर्पोरेट governanceचे रेकॉर्ड कसे आहे ? ह्या सर्व गोष्टी बघून तुम्ही निर्णय घ्या
नाव: vitthal
तुमचा प्रश्न : Namaste madam maze demat account open honyasathi thoda time aahe topryant me trading karu shakkto ka? Mazyakade laptop/computer nahi pan mi ha buisseness mobile Varian karu ichito aani 1 varshat hat ji income hoilntyatun computer ghenar as hi jidd aahe. Pan mobile madhun trading kase Karachi te sanga. aani share madhe kiti group astay te mala mahit nahi ‘A’ group madhil share konte tehi sanga.pl comment tumala milala ki lavkar margdarshan kara.
‘A’ ग्रुपच्या शेअर्स साठी तुम्ही ‘GOOGLE SEARCH ‘ मध्ये ‘A GROUP SHARES’ म्हणून सर्च केला तर ‘A ग्रुपच्या शेअर्सची यादी मिळू शकेल . बाकीच्या माहितीसाठी माझी वहिनी या विभागातील दिवाळी अंकाचा म्हणजे ११ वा पोस्ट वाचा. तुम्ही   मोबाईलवरून  शेअर्सचे भाव जाणून घेवून ब्रोकरकडे फोन करून खरेदी विक्री करू शकता. तुम्हाला जर मोबाईलचा वापर करून ओंन लाईन ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्ही  जिथे ‘DEMAT’ अकौंट उघडला असेल त्यांचे मोबाईलवरून ट्रेडिंग करण्यासाठी जी ‘APP’ ची सुविधा असेल ती डाउन लोड करावी लागेल. मोबाईल बँकिंगची सुविधा  हवी आहे असे तुम्हाला ‘DEMAT’ आणी ट्रेडिंग अकौंट उघडताना  कळवावे लागते. बाकीचे मार्गदर्शन तुम्हाला तुमचा ब्रोकर करेल.

आठवड्याचे समालोचन – ६ जुलै २०१५ ते १० जुलै २०१५ – संगीत खुर्ची शेअर्सची

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
या आठवड्यांत ग्रीसचे अधिक महिन्याचे आख्यान सुरूच राहिले. ग्रीसचे आख्यान आहे तरी काय ? हे समजायला फारच सोपे आहे.कर्जबाजारी झाल्यानंतर सावकार जसा फायदा उठवतात त्यातलाच हा प्रकार.! पण जेव्हा एखादी व्यक्ती कर्जबाजारी होते त्याचा परिणाम त्या व्यक्तीपुरता किंवा त्या कुटुंबावर होतो. पण एखादा देश जेव्हां कर्जबाजारी झाला की साऱ्या जगालाच ह्या घटनेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम भोगावे लागतात. ग्रीसमध्ये ‘OLYMPICS’ झाले तेव्हां त्यांना बरेच कर्ज घ्यावे लागले ते कर्ज ते फेडू शकले नाहीत ठरलेल्या तारखेला कर्जाची परतफेड करू शकले नाहीत म्हणून ही वेळ येवून ठेपली. पूर्वीचे कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेतले गेले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणे निधीने, युरोपिअन सेन्ट्रल बंक्केने आणी युरोपिअन कॉमन युनियनने आणखी मदत/कर्ज देण्यासाठी अनेक निर्बंध घालण्यास सुरुवात केली. त्यासाठी ग्रीस सरकारने रविवार ५ जुलै २०१५ रोजी सार्वमत घेतले. या सार्वमताच्या कौलानुसार योग्य तो निर्णय घेता येईल असे मत होते. या सार्वमताचा कौल ‘NO’ च्या बाजूने आला. ६१.३८ लोकांनी ‘NO’ बाजूने कौल दिला. याचा अर्थ काय झाला तर आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणी इतर कर्जदारांनी घातलेले निर्बंध ग्रीसमधल्या लोकांना मान्य नाहीत. ग्रीसच्या लोकांनी बंधने झुगारून द्यायची असे ठरविले. ग्रीसची खरी परीक्षा २१ जुलैला आहे. त्यादिवशी त्यांना युरो ३.६० बिलीयनच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करायची आहे. आता आपल्याला ‘ जे जे होईल ते ते पहावे’ हीच भूमिका घ्यावी लागेल.काही लोकांच्या मते ग्रीसच्या घटनेचा भारताला फायदा होईल. क्रुडऑइलचे दर कमी होतील. जर US$ मजबूत झाला तर फेड रेट वाढविण्याची योजना पुढे ढकलेल.
ग्रीसच्या घटनेमुळे ‘COMMODITY MARKET’ कोसळले. तुम्ही म्हणाल आता या मार्केटच्या नसत्या चौकशा कशाला? प्रत्येक ‘COMMODITY’ म्हणजे कोणाचा तरी कच्चा माल किंवा कोणाचा तरी पक्का माल असतो. स्टीलचे किंवा इतर धातूंचे भाव कोसळले तर ज्या कंपन्यांचा हा पक्का माल आहे त्यांचा तोटा होतो. उदा.: टाटा स्टील, JSW स्टील, भूषण स्टील या कंपन्यांचे शेअर पडले.
चहा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आज वाढले.उदा : MCLEOD RUSSEL’ जयश्री टी, टाटा ग्लोबल बिवरेजीस, HARRISSON मलायलम, GOODRICKE, DHUNSERI टी BOMBAY BURMAH. केनयातील दुष्काळामुळे आणी युगांडामधील अवकाळी पाऊसामुळे या देशांत चहाचे उत्पादन कमी झाले.यामुळे चहाच्या किमतीत वाढ अपेक्षित आहे. पण एक गोष्ट लक्षांत ठेवा ‘अधिक महिना’ कसा चार वर्षातून एकदा येतो तसेच चहाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स कधीतरी बऱ्याच कालावधीनंतर चमकतात. तुमचे हे शेअर्स अडकले असतील तर विकून रिकामे व्हावे पण पुन्हा या भानगडीत पडू नये हेच योग्य असे माझे वैयक्तीक मत आहे.
इराण ‘अणू करार’ होण्याची वाट पहात आहे तो करार झाला नाही तर क्रुडऑइलची निर्यात दुप्पट करू असे इराणने सांगितले. OPECचे सभासद देश क्रुडऑइलचे उत्पादन आणी निर्यात कमी करणार नाहीत त्यामुळे क्रूडची किमत झपाट्याने कोसळेल. त्यामुळे पेंट कंपन्या उदा : एशिअन पेंट्स, शालीमार पेंट्स, नेरोलाक पेंट्स, बर्जर पेंट्स, एक्झो नोबल हे शेअर्स वाढले. त्याचप्रमाणे ओईलमार्केटिंग कंपन्यांचे शेअर्सही वाढले.उदा : BPCL, HPCL, IOC. क्रूड स्वस्त झाले की विमानांचे इंधन स्वस्त होतेच त्यामुळे ‘जेट एअरवेज’, ‘स्पाईसजेट’ या विमान कंपन्यांचे शेअर्स वाढले. टायर्सचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअरही वाढले उदा: सिएट, JK, टायर्स, अपोलो टायर्स, MRF या कंपन्यांचे शेअर्स वाढले. काही केमिकल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले, CASTROL, गल्फ ओईल, इत्यादी. प्लास्टिक व प्लास्टिकच्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्सही वाढले. उदा: सिंटेक्स इंडस्ट्रीज, सुप्रीम इंडस्ट्रीज, नीलकमल प्लास्टिक. भारताची अर्थव्यवस्था ही जशी शेतीवर अवलंबून आहे तशीच क्रूड ओईलवर अवलंबून आहे. आपल्या देशाला क्रुडऑइलची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. क्रुडऑइल जेवढे स्वस्त होईल तेवढी आपली अंदाजपत्रकातील तूट कमी होते. आणी अर्थव्यवस्था सुधारते.
आज L& T फायनान्सचा शेअर चमकला. सध्या दोन P.E. कंपन्यांनी या कंपनीत स्टेक घेतला आहे. आता ‘वारबर्ग पिनकस’ ही P. E. कंपनी L&T फायनान्स कंपनीमध्ये २५% स्टेक Rs. ८३ या भावाने घेणार आहे अशी बातमी होती. त्यामुळे L&T फायनान्सच्या शेअर्सचा भाव वाढला. ‘LUPIN’ ला त्यांच्या इंदोर, औरंगाबाद, आणी नागपूर युनिटसाठी निर्यात करण्याची परवानगी USFDA कडून मिळाली.
ग्रीससंकटाचा परिणाम भारतीय पर्यटनउद्योगावर फारसा झाला नाही.त्यामुळे महिंद्रा हॉलिडेज, COX AND किंग्स, THOMAS कूक. ह्या कंपन्यांच्या शेअर्सची किमत वाढली. ग्रीसनंतर चीनच्या शेअर्समार्केटमध्ये खळबळ माजली. चीनमधील शेअरमार्केट्स प्रमाणाबाहेर पडली. त्यामुळे चीनच्या मार्केटमध्ये ट्रेडिंग सस्पेंड केले गेले. मार्जिन call वाढविले.चीनच्या PEOPLES बँकेने (चीनची आपल्या रिझर्व बँकेसारखी सेन्ट्रल बँक ) लिक्विडीटीच्या कारणास्तव बंधने वाढवली. ‘IPO’ वरही काही काळापर्यंत बंधने आणली.चीनच्या मार्केट पाठोपाठ COMMODITY मार्केटही कोसळले. विशेषतः तांबे, निकेल ,अल्युमिनीयम, जस्त, स्टील आदी धातूंचे भाव मे २०१०च्या निम्नतम स्तराला पोहोचले.चीनशी संबंधीत जेव्हडे शेअर्स होते ते सर्व पडले. टाटा मोटर्सच्या उत्पन्नात ‘JLR’ चा वाटा ८०% आहे. ‘JLR’ च्या विक्रीचा २०% ते २५% भाग चीनमधून येतो .चीनमधील गोंधळामुळे टाटा मोटर्सची विक्री कमी होईल असा अंदाज आहे. चीन आणी ग्रीसच्या समस्येकडे जेवढ्या गंभीरतेने बघायला हवे होते तेव्हडे बघितले गेले नाही. चीनचे मार्केट फुग्यासारखे फुगले होते. त्यामानाने त्यांची अर्थव्यवस्था तेव्हढी मजबूत नाही. त्यामुळे चीनी मार्केट ढासळले. आपण म्हणतो जग जवळ आले आहे. त्याचे फायदे आहेतच, पण तोटेसुद्धा आहेत. जगांत कुठेही काहीही झाले की त्याचा परिणाम भारतीय शेअरमार्केटवर होणारच हे उघड आहे.
‘ROSNEFT’ ही रशियन कंपनी ‘एस्सार ओईल’ मध्ये हिस्सा विकत घेईल. ‘EROS NOW’ मध्ये ‘FULLERTON’ ही USA बेस्ड कंपनी १०% हिस्सा US$ ८० मिलियनला विकत घेणार आहे. ‘SHARON BIOMEDICINE’ या कंपनीला युजर फी नं भरल्यामुळे ‘’USFDA’ कडून वार्निंग नोटीस मिळाली. भूषण स्टील या कंपनीचे Rs ३०००० कोटीं कर्जाच्या ‘RESTRUCTURING’ ला आज कर्ज देणाऱ्या बँकांनी मान्यता दिली. MRPL ह्या कंपनीचे ‘ONGC’ त मर्जर होणार आहे अशी बातमी आहे. तांबे जस्त आणी शिसे हा ‘BATTERY’ बनवणाऱ्या कंपन्यांसाठी कच्चा माल आहे., त्यामुळे त्यांची किमत घसरल्यामुळे अमर राजा BATTERY, EXIDE या कंपन्यांचा फायदा होईल. अदानी पोर्ट “L&T’ कडून एक पोर्ट विकत घेणार आहे.
गुरुवारी ‘मनपसंद बिव्हरेजीस’ या कंपनीचे लिस्टिंग झाले. ‘IPO’ प्राईस Rs ३२० होती पण शेअरचे लिस्टिंग Rs, ३०० ला झाले. हा शेअर गुंतवणूकदारांना मनपसंद वाटला नाही. कंपन्याचे पहिल्या तिमाहीचे निकाल यायला सुरुवात झाली. त्यांत CMC 8K MILES, या I. T. क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल चांगले आले. ‘बजाज कॉर्प’ या ‘FMCG’ क्षेत्रातील कंपनीचा निकालही चांगला आला.
पंतप्रधानांचा कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किरघीझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणी रशिया . या सहा देशांचा दौरा सुरु आहे. या दौऱ्यात कझाकिस्तानबरोबर युरेनियमचा पुरवठा करण्यासाठी करार झाला. ‘BRICS’ बँकेचे उद्घाटन झाले. ही बँक सभासद असलेल्या देशांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करेल असा आशावाद व्यक्त करण्यांत आला.
गुरुवारी मार्केट संपल्यावर ‘TCS’ या I. T. क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा पहिल्या तिमाहीचा निकाल आला. पर्सिस्टंट सिस्टम्स, आणी टेक महिंद्रा या कंपन्यांनी PROFIT वार्निंग दिल्यामुळे TCS च्या निकालांवर सर्वांचे लक्ष होते. TCSचा निकाल ‘GOOD AND STEADY’ असे वर्णन करता येईल असा होता. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चेहेऱ्यावरील नैराश्य कमी झाले. आता उत्सुकता आहे ते ‘INFOSYS आणी WIPRO कंपन्यांचे निकाल कसे येतात याची..
‘FLECAINIDE ACETATE’ या जनरिक औषधासाठी ऑरोबिन्दो फार्मा या कंपनीला ‘USFDA’ ची मंजुरी मिळाली. ‘विप्रो’ या कंपनीने ‘DESIGNIT’ ही डेन्मार्कमधील कंपनी विकत घेतली. MPHASISने आपल्या इंडिअन डोमेस्टिक बिझिनेसचा काही भाग कारवी डाटा management या कंपनीला ट्रान्स्फर केला. डायमंड पावर या कंपनीला १.५ कोटींची ऑर्डर मिळाली. ‘भेल’ने तुतीकोरीन थर्मल पावरमध्ये दुसरे युनिट कार्यान्वित केले.सन टी व्ही .या कम्पनीवर १३ जुलै २०१५ पर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने एन्फोर्समेन्ट डायरेक्टोरेटला दिले.
गारेपाल्मा IV/२ आणी IV/३ या दोन्ही कोलब्लॉक्सचे कस्टोडीयन म्हणून कोल इंडियाची नेमणूक केली.या दोन्ही कोल ब्लॉक्समधून निघणाऱ्या कोळशाची इ -लिलाव पद्धतीने विक्री होईल आणी त्यांत कोल इंडियाला सामील होता येईल. गृह फायनान्स या कंपनीचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला.
या आठवड्यांत ग्रीस आणी चीन या देशांत आर्थिक क्षेत्रांत मोठ्या घटना घडल्या. या घटनांचे परिणाम साऱ्या जगावर झाले. त्यामुळे या घटनांपासून शेअर्समार्केट तरी अलग कसे राहू शकेल.? त्याचबरोबर या आठवड्यांत मिडकॅप आणी स्मालकॅप शेअर्सनी राज्य केले असे म्हणावे लागेल. आज एका सेक्टरमधल्या शेअर्समध्ये तर उद्या दुसऱ्या सेक्टरमधील शेअर्समध्ये ट्रेडिंग होत होते. लार्जकॅप शेअर्समध्ये फारशी हालचाल नव्हती. कोणते शेअर्स आज संगीत खुर्चीत सहभागी होणार कोणत्या खुर्चीत आपण बसायचे आणी कोणत्या खुर्चीतून उठायचे म्हणजे कोणते शेअर्स १-२ दिवसांसाठी २% ते ५% फायद्यासाठी घ्यावे आणी आपल्याजवळचे कोणते शेअर्स विकावे हे ठरवणेच आपल्या हातांत ! जसे शिटी वाजली की ज्यांना खुर्ची मिळत नाही ते बाद होतात त्याप्रमाणे जे लोक खरेदी आणी विक्री पटापट करीत नाहीत ते बाद होतात म्हणजे त्यांचे शेअर्स घेतलेल्या भावाला (जो बहुतेक त्या शेअरचा महाग भाव असतो) अडकतात. असेच काहीसे संगीत खुर्चीसारखे या आठवड्याचे शेअर मार्केट होते.
या वेळी मी आपल्याला रिझल्ट कॅलेंडर देण्यापेक्षा आपण BSEची साईट उघडून तेथे दिलेल्या BSE रिझल्ट्स कॅलेंडर या साईटवर जा. तेथे तिमाही रिझल्ट्सच्या तारखा पाहून तुम्ही SHORT टर्म ट्रेडिंग करुन बघू शकता.

आठवड्याचे समालोचन -२९ जून ते ३ जुलै २०१५ – लांडगा आला रे लांडगा आला

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
या आठवड्यांचा हा ब्लॉग लिहिताना मला खूप हसायला येत आहे. तुम्हाला पण सांगते, बघा तुम्हाला पण हसू येतं का ते
सध्या चालू असलेली ग्रीसची घटना वाटले तर समजावून घ्यावी नाहीतर सोडून द्यावी अशीच ……. मी जर गृहिणी म्हणून या घटनेकडे पाहिले असते तर म्हटले असते  “काय चालू आहे ग्रीस ग्रीस ! त्यानी काय माझ्या पोळ्या लाटायला कोणी येणार आहे कां ? माझी भांडी घासणे सुखकारक होणार आहे कां ? मग मला काय करायचं“
पण हल्ली मात्र मी अतिशय बारकाईने या घटनेकडे लक्ष ठेवते. ज्या शेअरवर या घटनेचा परिणाम होईल त्यापैकी कोणत्या कंपनीचे शेअर्स आपल्याजवळ आहेत त्याबाबतीत काय निर्णय घ्यावा इत्यादी इत्यादी. माझ्यामध्ये एव्हढा मोठा बदल घडवून आणण्याचे सारे श्रेय शेअरमार्केटलाच दिलं पाहिजे.
मागच्या ब्लोगमध्ये आपण ग्रीस या देशाच्या कर्जफेडीबाबत आणी त्याच्या संभाव्य परिणामांबद्दल उल्लेख केला होता. ह्या कर्जाच्या परतफेडीची शेवटची तारीख ३० जून २०१५ ही होती. २८ जुन रोजी झालेल्या ग्रीस आणी कर्जदार यांच्या बैठकीत व्यवहार्य असा पर्याय न निघाल्यामुळे २९ जून रोजी मार्केटच्या आकाशांत काळजीचे आणी अनिश्चिततेचे ढग जमू लागले. कोणत्या कंपन्यांची निर्यात युरोपांत आहे याची यादी तयार झाली. युरो या युरोपिअन चलनावर या घटनेचा परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला गेला.
ग्रीस या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनउद्योगावर अवलंबून असल्यामुळे THOMAS COOK, COX AND KINGS या पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांवर आणी, मदरसन सुमी, भारत फोर्ज , टाटा मोटर्स, टाटा स्टील, HAVELLS (इंडिया) आणी IT क्षेत्रातील कंपन्या यांचा व्यवहार युरोपमधील देशांमध्ये असल्याने या कंपनीच्या शेअर्सवर ग्रीसने परतफेड वेळेवर केली नाही तर बराच परिणाम होईल असा अंदाज वर्तवला गेल्यामुळे ह्या शेअर्सच्या किमती कमी झाल्याच. पण हळूहळू सर्वच मार्केट पडायला लागले. .
त्यातच ग्रीसच्या पंतप्रधानांनी जाहीर केले की आम्ही कर्जदारांच्याबरोबरच्या वाटाघाटी थांबवल्या आहेत. त्यांनी युरोझोनमध्ये राहावयाचे की नाही यावर ग्रीसमध्ये ५ जुलैला सार्वमत घेण्याचा निर्णय घेतला.त्याचबरोबर ग्रीस मधील बॅंका ६ जुलै पर्यंत बंद राहतील असे जाहीर केले. ग्रीसचे STOCK EXCHANGE ही एक आठवड्यासाठी बंद केले. ATM मधून दर दिवशी ६० युरोच काढता येतील असे जाहीर केले. कॅपिटल कंट्रोल डिक्री पास केली. तसेच ग्रीस सरकारच्या मंजुरीशिवाय देशाबाहेर पैसे पाठविता येणार नाहीत असे जाहीर केले.
या सर्व आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाचा मार्केटवर ‘केळीचे सुकले बाग’ या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे परिणाम झाला.
टेक महिंद्रा या कंपनीने ‘PROFIT’ वार्निंग दिली. म्हणजेच २०१५ -२०१६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणी दुसऱ्या तिमाहीत आमचे उत्पन्न आणी नफा अपेक्षेपेक्षा कमी होईल असे जाहीर केले. ‘PERSISTENT SYSTEMS’ या कंपनीनंतर ‘PROFIT’ वार्निंग देणारी ही दुसरी IT क्षेत्रातील कंपनी. त्यांनी व्हिसा चार्जेस आणी पगारवाढ तसेच करन्सीच्या दरातील VOLATILITY ही कांरणे दिली. त्यामुळे या शेअरच्या किमतीत जबरदस्त घट झाली. या दरम्यान दूरदर्शनच्या वाहिन्यांच्या माध्यमातून वरीलपैकी पुष्कळ कंपन्यांनी आमच्या उत्पन्नावर आणी फायद्यावर ग्रीसप्रश्नाचा फारसा परिणाम होणार नाही असे सांगितले.
‘DOT (DEPARTMENT OF TELECOMMUNICATION) PANEL’ ने शिफारस केली की प्रत्येक टेलिकॉमक्षेत्रातील कंपन्यांबरोबरच्या करारांत ‘’NET NEUTRALITY’ आश्वस्त करणारे कलम अनिवार्य केले. ‘CROMPTON \GREAVES’ ला फिलीपाईन्स या देशातून दोन CONTRACT मिळाली. AXIS बँकेने बेस रेटमध्ये कपात केली. मार्केट अडीच वाजेपर्यंत पडतच राहिले. अडीच वाजल्यानंतर मात्र मार्केट हळूहळू सुधारू लागले. कदाचित ग्रीस प्रश्नाचा जास्तीतजास्त संभाव्य परिणाम किती होईल याचा गुंतवणूकदारांना अंदाज आला असावा.
आताच्या ‘इमर्जिंग मार्केट’ पैकी इंडिया हे सर्वांत सुरक्षित असे इमर्जिंग मार्केट असल्यामुळे कदाचित उद्या मार्केट सुधारेल.
ग्रीसने IMF (INTERNATIONAL MONETARY FUND) कळवले की आम्ही कर्जाची परतफेड ३० जूनला करू शकत नाही. या दरम्यान फ्रान्सच्या अध्यक्षांनी USAच्या अध्यक्षाना ग्रीसच्या प्रश्नांत मध्यस्थी करण्याची विनंती केली. ग्रीस सरकारने जाहीर केले की पेन्शनरांसाठी बँकांच्या १००० शाखा उघड्या राहतील आणी या आठवड्यासाठी १२० युरो एवढे पेन्शन मिळेल. ग्रीस प्रश्नातील अनिश्चितता संपल्यावर मार्केट पुन्हा एकदा सुधारले.
‘मार्कसन फार्मा’ या कंपनीने ‘TIME CAP’ ही USA बेस्ड कंपनी खरेदी केली. ‘कन्साय नेरोलक’ या कंपनीची चेन्नाईमधील जमीन ‘ब्रिगेड एन्टरप्राईजेस’ या कंपनीने विकत घेतली. ‘ग्लेनमार्क फार्मा’ या कंपनीला त्यांच्या कोलेस्टेरॉलवरील गोळ्यांसाठी ‘USFDA’ ची मंजुरी मिळाली. ‘INDIGO’ ही प्रवासी विमानवहातूक क्षेत्रातील कंपनी ‘IPO’ आणीत आहे.
सुवेन लाईफसायन्सेस ला ३ उत्पादनांसाठी पेटंट मिळाले. दीप इंडस्ट्रीला ‘ONGC’ कडून २७८ कोटींचे ‘CONTRACT’ मिळाले. ‘ORBIT CORPORATION’ ही कंपनी LIC HOUSING’ या कंपनीला ९५ कोटी रुपये देणे लागते. यासाठी त्यांचा साकीनाक्याचा प्रोजेक्ट LIC हौसिंग विकणार आहे. . सरकार ‘भारतीय महिला बँकेचे स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याचा विचार करत आहे. IDFC आणी IDFC बँकेच्या डीमर्जरला चेन्नई उच्च न्यायालयाने परवानगी दिली.
ग्रीसने ESM (‘EUROPEAN STABILITY MECHANISM’) कडे २ वर्षासाठी ‘BAILOUT’ मागितला. एकीकडे आम्हाला काही बदलांसकट BAILOUT PACKAGE मान्य आहे असे जाहीर करत ग्रीसच्या पंतप्रधानांनी जनतेला मात्र सार्वमतांत युरोझोनमध्ये रहाण्यासाठी ‘NO’ च्या बाजूने मतदान करायला सांगितले.
‘ MPHASIS BFL’ या कंपनीने त्यांचा BPO बिझिनेस Rs १७ कोटींना विकला. पण शेअरवर मात्र याचा फारसा परिणाम दिसणार नाही. क्रिसिलने श्रीराम ट्रान्सपोर्टचे क्रेडीट रेटींग UPGRADE केले. टाटा ग्रूपने आपला केमिकल्स आणी फरटीलायझर बिसिनेस विकायचे ठरविले आहे. सरकारने टेक्सटाईल्स निर्यात करण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी व्याजामध्ये ‘३% INTERVENTION’ची सूट FY २०१४ पासून जाहीर केली. यामुळे टेक्सटाईल उद्योगातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले.
PNGRB आणी IGL( INDRAPRASHTA GAS LIMITED) या मधील केसचा निकाल IGLच्या बाजूने लागला. PNGRBला GASच्या किमती नियंत्रित कण्याचा अधिकार नाही असे निकालांत म्हटले आहे.. ‘BASF’ या कंपनीला टेक्सटाईल बिसिनेस विकून Rs१४४ कोटी मिळाले. कल्पतरू पावरला Rs १०३५ कोटींची ऑर्डर मिळाली. कॅफे कॉफी डे , इंफिबीम आणी रत्नाकर बँकेचे IPO लवकरच येतील. कोटक महिंद्रा बँक आणी फेडरल बँकेच्या बोनस इशुची ९ जुलै ही रेकॉर्ड डेट आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते आज प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे उद्घाटन झाले. या योजनेसाठी Rs ५०००० कोटी पांच वर्षांत मंजूर होणार आहेत. सिंचाईमध्ये ‘WATER CONSERVATION अंड RECYCLING’ चा समावेश केला गेला आहे. या योजनेत आधीच्या सर्व योजना मर्ज केल्या गेल्या आहेत. या योजनेमुळे ‘ जैन इरिगेशन, सुदर्शन केमिकल्स, शक्ती पंप्स, मान इंडस्ट्रीज, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, KSB पंप्स DREDGING CORPORATION, VA TECH, PATEL ENGG, आदी कंपन्याना फायदा होईल.त्यामुळे या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘NATIONAL AGRICULTURE MARKET’ ला मंजुरी मिळाली. हे मार्केट ON-LINE असेल. हळूहळू देशातील ५८५ फार्म मार्केट्सचे यात विलीनीकरण केले जाईल.
‘IOC’ या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमधील सरकारच्या शेअरहोल्डिंग पैकी १०% शेअरहोल्डिंग सरकार विकणार आहे.
आज ऑटो विक्रीचे आकडे आले. त्यांत अतुल ऑटो, मारुती, EICHER मोटर्स, महिंद्रा अंड महिंद्रा, तसेच अशोक LEYLAND यांच्या विक्रीचे आकडे वाढ दर्शविणारे होते. त्यामुळे या सर्व कंपनींच्या शेअर्सचे भाव वाढले
पंतप्रधानांनी ‘DIGITAL INDIA’ या योजनेचे उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना रिलायंस इंडस्ट्रीज, वेदांत ग्रूप, टाटा ग्रूप, कुमारमंगलम बिर्ला ग्रूप, विप्रो, भारती मित्तल ग्रूप, या सर्व मोठ्या कंपनी समूहांच्या प्रमुखांनी आम्ही भरभक्कम भांडवली गुंतवणूक या प्रकल्पांत करू असे आश्वासन दिले. या योजनेअंतर्गत दोन संशोधनसंस्था, तसेच ‘इलेक्ट्रॉनिक डेवलपमेंट फंड ‘ तसेच ‘भारत नेट’ नेक्स्ट जनरेशन नेटवर्क’ या साईट्स तसेच ‘NATIONAL SCHOLARSHIP PORTAL’, इ-हॉस्पिटल इत्यादी PRODUCTS लौंच केली जातील. याच बरोबर ‘NATIONAL POLICY FOR SKILL DEVELOPMENT AND ENTREPRENEURSHIP’ या योजनेचे उद्घाटन केले.
टाटा स्टील U. K च्या कामगार युनियन्सनी बहुमताने नवी पेन्शन योजना मंजूर केली. त्यामुळे हा वाद मिटला.
MTNL आणी BSNL यांचे मर्जर होण्याआधी MTNL डीलिस्ट होणे जरुरीचे आहे. ‘BIOCOM’ ही रशियन कंपनी ‘LUPIN’ णे विकत घेतली. या मुळे रशियन फार्मा मार्केटमध्ये ‘LUPIN’ला प्रवेश मिळू शकेल.
या आठवड्यांत खरोखरीच लांडगा आला रे आला अशीच अवस्था झाली. ग्रीसचे दिवाळे निघणार अशा बातम्या आल्या की मार्केट पडत असे. ग्रीसची अवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत अशी बातमी आली की मार्केट वाढत असे. पण कितीही काहीही झाले तरी ग्रीसमधल्या घटनाक्रमाची टांगती तलवार मार्केटवर लटकत राहणार आहे हे निश्चित. !