भाग ५६ – कॉर्पोरेट एक्शन : बोनस इशू

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Corporate action information in marathi
 
 
 
काही दिवसापुर्वीची ही घटना . मी घरातले सर्व काम आटपून ऑफिसमध्ये गेले. ५ ते १० मिनिटातच मार्केट उघडणार होते.रोजचे मेंबर हळूहळू येऊ लागले. घंटा वाजली..मार्केट सुरु झाले. किमती दाखवणारा टीकर दूरदर्शनच्या वाहिनीवरून फिरू लागला.तितक्यांत कोणीतरी ओरडला –  ‘ इन्फोसिसचा भाव Rs ९७० दिसतो आहे काहीतरी लफडे दिसते आहे जरा जपून”
मी म्हटलं “ अरे भानगड काही नाही. आज इन्फोसिसच्या बोनस इशुची एक्स-डेट होती. त्यामुळे १:१ या हिशेबाने त्याचा भाव अर्धा झाला.”
तेवढ्यांत एक गृहस्थ मला म्हणाले – “ आम्हाला दिवाळीच्या आसपास बोनस मिळतो ८.३३% प्रमाणे. प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस मिळतो. त्यासाठी वेगळे असे काही काम करावे लागत नाही.पण शेअरमार्केटमध्ये केव्हांही बोनस मिळतो कि काय?. बोनस ठरलेला असतो की कितीही मिळतो ? पण किती कां असेना आता मी सुद्धा शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करतो मग मलाही बोनस मिळेल… द्या टाळी ! ……”
“नुसती टाळी देवून भागणार नाही तोंड गोड करावे लागेल”
‘हो! हो ! करुकी घाबरतो की काय.’’”
त्यांना बोनस बद्दल जे सांगितलं ते आता तुम्हाला पण सांगते
शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करणारा माणूस मजूर किंवा कर्मचारी नसतो. जास्तीतजास्त त्याला गुंतवणुकदार म्हणतां येईल.तो काही BSE(BOMBAY STOCK EXCHANGE) किंवा NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) चा कर्मचारी नसतो तो उद्योग करतो. नोकरी नव्हे. त्यामुळे ८.३३% प्रमाणे त्याला बोनस मिळेल हा गैरसमज आहे. तो आधी दूर करा. कर्मचाऱ्याला जो बोनस मिळतो तो त्याने त्यावर्षी कंपनीत किती दिवस काम केले यावर आणी त्याला मिळणाऱ्या पगारावर अवलंबून असतो.
शेअरमार्केटच्या बाबतीत शेअरहोल्डर्सला जो बोनस मिळतो तो एकतर 5 वर्षे किंवा ७ वर्षे किंवा १० वर्षांनी मिळतो. हा कालावधी ठरलेला नसतो. कंपनी त्यांच्या सोयीप्रमाणे आणी आर्थिक परिस्थिती पाहून बोनसची घोषणा करते. बोनस दिलाच पाहिजे असे कंपनीवर बंधनही नसते.. द्यावा किंवा नाही, दिला तर किती आणी अगदी केव्हां हे सर्व कंपनीवर अवलंबून असते. कामगाराला किंवा कर्मचाऱ्यांला मिळणारा बोनस आणी शेअरमार्केटमध्ये मिळणारा बोनस या दोन्हीच्या नावातच साम्य आहे बाकी कोणतेही साम्य नाही.
बोनस, स्प्लीट, लाभांश, मर्जर, स्पिनऑफ, टेकओवर, BUYBACK,, ऑफर फॉर सेल,RIGHTS इशू या सगळ्याला कॉर्पोरेट एक्शन असे म्हणतात. आता प्रश्न कॉर्पोरेट एक्शन म्हणजे काय ?
कॉर्पोरेट एक्शन म्हणजे कंपनीने पुढाकार घेवून केलेली अशी कृती ज्याचा त्या कंपनीच्या शेअर्सवर आणी कर्जरोख्यांवर परिणाम होतो. काही कॉर्पोरेट एक्शनचा डायरेक्ट परिणाम होतो तर काही कॉर्पोरेट एक्शनचा इनडायरेक्ट परिणाम होतो इतकेच. काही कॉर्पोरेट एक्शन MANDATORY असतात, अर्थ एवढाच की शेअरहोल्डरला .काहीही करावे लागत नाही. किंवा त्याला कोणतीही निवड करायची नसते. समजा कंपनीने बोनस, स्प्लीट, लाभांश, स्पिनऑफ, मर्जर, डीमर्जर जाहीर केले तर एक्सडेट झाल्यानंतर तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर शेअर्स, बचत किंवा चालू खात्यांत तुमच्या सुचनेप्रमाणे लाभांश जमा होतात. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरायचा नसतो. शेअरहोल्डर फक्त एकच गोष्ट करू शकतो. त्याला जर बोनस स्प्लिट लाभांश, स्प्लीट, स्पिनऑफ याचा परिणाम नको असेल तर तो त्याच्याकडे असलेले शेअर्स विकू शकतो. जर
एखाद्या गुंतवणूकदाराला या सर्व कॉर्पोरेट एक्शनचा फायदा घ्यायचा असेल तर एक्सडेटच्या ४ दिवस आधीपर्यंत शेअर्स खरेदी करू शकतो. बोनससाठी शेअर खरेदी करताना त्याच्या वर्षांतील किंवा लाईफ टाइम कमीत किमतीकडे जरुर लक्ष द्या. म्हणजे बोनसच्या वेळेस किमतीत असाधारण आणी अचानक वाढ झाली असल्यास आपल्या लक्षांत येईल.
कॉर्पोरेट एक्शन आधी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये मंजूर केली जाते, नंतर त्याला शेअरहोल्डर्सच्या वार्षिक सर्वसाधारण मीटिंग किंवा EXTRAORDINARY GENERAL मीटिंगमध्ये शेअरहोल्डर्सची मंजुरी घेतली जाते.
कॉर्पोरेट एक्शनमुळे कंपनीचे नाव, शेअर्सची दर्शनी किमत, शेअर्सची संख्या, शेअर्सची मार्केटमधील किमत आणी मार्केट कॅपिटलायझेशन यावर परिणाम होतो.
आपण या भागांत बोनसचा विचार करू.कधी कधी असे होते की एखादी कंपनी बोनस देणार ही खबर लोकांना आधीपासूनच असते किंवा अंदाज असतो. कुणकुण असते. त्यामुळे लोक त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला लागतात.आता प्रश्न निर्माण होतो हे ओळखावे कसे?
जर कंपनी प्रगतीपथावर असेल, कंपनीकडे खूप कॅश BALANCE-SHEET मध्ये जमा असेल, कंपनीला कोणतेही मोठे EXTRAORDINARY INCOME होणार असेल किंवा कंपनीला २५,५०,७५ वर्षे होणार असली तर आणी कंपनीचे व्यवस्थापन INVESTOR-FRIENDLY असेल तर शेअरहोल्डर बोनस शेअर्सची अपेक्षा करतात.पडत्या मार्केटमध्येही जेव्हां काही शेअर्स पडत नाहीत किंवा त्यांची किमत वाढते अशावेळी गुंतवणूक करणारे अशा कंपन्यांकडे लक्ष ठेवतात.
बोनसची घोषणा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स करतात. त्या घोषणेत बोनसचे प्रमाण म्हणजे १:१, एका शेअरमागे एक बोनस शेअर २;५ म्हणजे ५ शेअर्स मागे २ बोनस शेअर्स, २:१ म्हणजे तुमच्याजवळ १ शेअर असेल तर तुम्हाला २ बोनस शेअर्स मिळतील. ज्या प्रमाणांत बोनस शेअर मिळतात त्याप्रमाणांत शेअर्सची किमत एक्स- डेटला कमी होईल.उदा जर कंपनीने १:१ असा बोनस दिला असेल तर शेअरची किमत अर्धी होईल..
बोनस जाहीर होताच त्या शेअरची किमत हळूहळू वाढू लागते. त्यामुळे इंट्राडे ट्रेड करतां येतो. जेव्हां मार्केट पडत असेल तेव्हां शेअर्स खरेदी करून मार्केट वाढल्यावर Rs २५-३० च्या फरकाने( हा फरक शेअर्सच्या किमतीप्रमाणे लक्षांत घ्यावा.) विकून SHORT TERM ट्रेड करतां येतो.किंवा दरवेळी मार्केट पडेल त्यावेळी खरेदी करून बोनसच्या एक्ष-डेटच्या आधी जास्तीतजास्त भावाला विकणे असा EVENT-BASED ट्रेड करतां येतो.
परंतु बोनस जाहीर झाल्याबरोबर तुटून पडून येईल त्या भावाला शेअर्स खरेदी करू नयेत. शेअर्स कुठेही पळून जात नाहीत. बोनस जाहीर झाल्यापासून बोनस शेअर्स ‘DEMAT’ अकौंटमध्ये जमा व्हावयास ४ ते ६ महिने लागतात.या साठी कंपनी बोनस इशुसाठी एक्ष-डेट आणी रेकॉर्ड डेट जाहीर करते तिकडे लक्ष ठेवावे. त्यामुळे जेव्हां मार्केट पडत असेल त्या वेळी कमी भावांत शेअर्स खरेदी करण्याच्या प्रयत्नांत असावे..
यावर्षी टेकमहिंद्रा (स्प्लीट आणी बोनस) आणी पर्सिस्टंट सिस्टिम्स (१:१ बोनस) या कंपन्यांच्याबाबतीत गुंतवणूकदारांना बोनसचा अनुभव चांगला आला नाही. उलट पश्चातापाची पाळी आली.बोनस जाहीर झाल्यावर टेकमहिंद्राचा शेअरची किमत Rs २९०० होती ( एकाचे शेअरचे चार शेअर झाले तरी किमत Rs७२५ झाली) आणी पर्सिस्टंट चा शेअरची किमत Rs १७०० होती ( म्हणजे बोनस मिळाल्यानंतर किमत Rs८५० झाली.) या दोन्ही कंपन्यांनी PROFIT वार्निंग दिल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची किमत खूपच कमी झाली. म्हणजेच बोनस जाहीर झाल्यापासून पुढील सहा महिन्यांत मार्केट कसे असेल यावर बोनस घेणे फायदेशीर किंवा तोट्याचे हे ठरते.
तसा विचार केला तर बोनस इशू ही केवळ एक बुकएन्ट्री असते. १:१ बोनस असेल तर तुमच्याजवळील शेअर्सची संख्या दुप्पट होते पण किमतही अर्धी होते.EPS (EARNING PER SHARE) आणी लाभांशाचे प्रमाणही त्याप्रमाणात कमी होते.बोनस शेअर खात्याला जमा झाले तरी त्या शेअर्समध्ये ट्रेडिंग एका ठराविक तारखेलाच सुरु होते. त्यामुळे चौकशी करूनच हे शेअर्स विकावेत.
बोनसशी असलेले भावनिक नाते विचारांत घेतल्यास बोनस म्हणजे बक्षिशी किंवा खुशी असे समजले जाते. बोनस जाहीर झाल्यापासून बोनस मिळेपर्यंत साधारणपणे त्या कंपनीच्या शेअर्सची किमत स्थिर राहते किंवा वाढते. बोनस देणारी कंपनी प्रगतीपथावर आहे, INVESTOR-FRIENDLY आहे असे समजले जाते. बोनस झाल्यानंतर त्याची किमत बोनसच्या प्रमाणांत कमी झाल्यामुळे जास्तीतजास्त लोकांच्या खरेदीच्या आवाक्यांत येतो. त्या शेअरमधला लोकांचा कल वाढतो व १ ते २ वर्षांत तो शेअर पहिल्या (बोनस होण्याच्या वेळच्या) भावाला येतो.
उदा.: २००४ मध्ये TCS (टाटा कंसलटनसी सर्विसेस) चा ‘IPO’ Rs ८५० प्रती शेअर या भावाने आला. २००६ आणी २००९ मध्ये TCS ने १:१ असा बोनस दिला. त्यामुळे जवळ असलेल्या १ शेअरचे चार शेअर्स झाले. म्हणजेच मुळ शेअर्सच्या खरेदीचा भाव Rs २१२.५० झाला. सध्या TCSच्या शेअर्सचा भाव [i]प्रती शेअर Rs २५०० च्यावर आहे. अशा प्रकारे दोन वेळेला बोनस घेतलेल्या लोकांच्या शेअर्सची किमत १० पट वाढली.
इन्फोसिस, विप्रो, ITC, बजाज ऑटो, महिंद्रा आणी महिंद्रा,मारुती, या अशाच काही कंपन्याच्या शेअर्सकडे बोनसच्या दृष्टीकोनातून लक्ष ठेवावे. अलीकडच्या काळांत कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक ,अनुह फार्मा , ऑरोबिन्दो फार्मा या कंपन्यांनी बोनस जाहीर केला.
तर अशी ही साठा उत्तरांची बोनसची कहाणी येथेच सफल संपूर्ण करू या.

7 thoughts on “भाग ५६ – कॉर्पोरेट एक्शन : बोनस इशू

  1. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५ | Stock Market आणि मी

  2. Pingback: भाग ५७ – कॉर्पोरेट एक्शन – स्प्लिट | Stock Market आणि मी

  3. Pingback: भाग ५८ – कॉर्पोरेट एक्शन भाग ३ ‘BUY BACK’ | Stock Market आणि मी

  4. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July, August 2016 | Stock Market आणि मी

  5. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : मार्च – जुन 2017 | Stock Market आणि मी

  6. सुहास वासुदेव क्षीरसागर Post author

    नूतन विलंबीनाम संवत्सर आपणास व सर्व ब्लॉगच्या सदस्यांना सुख,समाधान व ऐश्वर्यसंपन्न जावो।

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.