Monthly Archives: September 2015

आठवड्याचे समालोचन – २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०१५ – बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

या आठवड्याच्या बाजाराचा खेळ भावभावनांचा होता. याचा परिणाम शेअर्सच्या किंमतीवर जाणवत होता. चीनच्या आर्थिक स्थिती विषयीची अनामिक भीती आणी त्याचे भारतीय शेअरमार्केटवर होणारे परिणाम यामुळे शेअरमार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अस्थिरता होती. पण ही अस्थिरता ‘इंडिया VIX’ हा अस्थिरतेचा इंडेक्स दाखवत नव्हता. कधी कधी आकडेवारी फसवी असते हे पटले. जसे प्रत्यक्षांत घर चालवताना खर्च भागवता भागवता गृहिणींच्या नाकीनऊ येतात पण महागाईचे आकडे मात्र वेगळेच चित्र दर्शवीत असतात तसंच काहीसं. आता मार्केटमध्ये होणारे करेक्शन ‘टाईमवाइज’ करेक्शन आहे. ‘प्राईसवाइज’ करेक्शन नव्हे. त्यामुळे ते त्याचा पूर्ण वेळ घेणार. किरकोळ गुंतवणूकदार हे करेक्शन संपण्याची वाट पहात काठावर उभे आहेत.
तसे या आठवड्यात मार्केटला रेट कटचे मधाचे बोट होते. अहो पण या रेट कटलाच मी बाजारातल्या तुरी म्हणते. रेट कट ०.२५% बेसं पाईंट होणार की ०.५०% बेस पाईंट होणार यावरून विश्लेषकांमध्ये मतभिन्नता दिसली. जरी रिझर्व बँकेने रेट कट केला तरी त्या रेट कटला अनुसरून बॅंका कर्जावर आकारले जाणारे व्याजाचे दर कमी करणार कां ? त्यातच शुक्रवार शनिवार रविवार अशी मोठी सुट्टी आणी मंगळवार २९ सप्टेंबर रोजी होणारी रिझर्व बँकेची आकाशवाणी.या गोंधळात सर्वजण . जर मंगळवारी मार्केट पडलं तर नुकसान होणार ही भीती आणी मंगळवारी मार्केट वाढल तर जास्तीचा फायदा पदरांत पडणार नाही ही हाव अशा भीती आणी हाव याच्या जंजाळात मार्केट अडकले आहे आणी त्यामुळे market तेजी मंदीचे हेलकावे घेत आहे. माझे काम मागोवा घेण्याचे.! ०.२५ बेस पाईंट रेट कटसाठी मार्केट्ची तयारी झालेली आहे.०.५० बेस पाईंट रेट कट झाला तर ती गोड बातमी असेल.
मार्केटमध्ये भीती आणी हाव यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात. मार्केटमध्येच कशाला आपल्या रोजच्या आयुष्यांतसुद्धा भीती आणी हाव परिणाम करतात. भीतीमुळे आरोग्यावर परिणाम होतो. हाव धरल्यामुळे भाव व गुणवत्ता यांचा मेल न घालताच खरेदी होते. कधीही शेअरमार्केटला आपल्या रोजच्या व्यवहाराप्रमाणे समजावून घ्यावे.
NTPC ( NATIONAL THERMAL POWER CORPORATION) ही उर्जा उत्पादन आणी उर्जा विक्री क्षेत्रांत असणारी आणी भारत सरकारने २०१० पासून महारत्न म्हणून गौरविलेली सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी २३ सप्टेंबर पासून ३० सप्टेंबर पर्यंत TAX FREE BONDS चा इशू आणीत आहे. हा इशू Rs ७०० कोटींचा असून यापैकी ४०% इशू म्हणजेच Rs २८० कोटींचे bonds किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. या bondsची दर्शनी किमत Rs १००० असून तुम्ही कमीतकमी ५ bondसाठी किंवा त्यानंतर १ च्या पटींत अर्ज करू शकता. तुम्ही किरकोळ गुंतवणूकदार म्हणून Rs १०,००,००० पर्यंत अर्ज करू शकता. त्यापेक्षा जास्त रकमेसाठी अर्ज केल्यास किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला व्य्जाचा दर तुम्हाला मिळणार नाही.
या bonds वरचे व्याज दरवर्षी दिले जाईल. व्याज आयकरमुक्त असल्यामुळे TDS कापला जाणार नाही. या bondsवरील व्याजाचे दर किरकोळ गुंतवणूकदारासाठी खालीलप्रमाणे आहेत ह्या bondsची BSE आणी NSE वर लिस्टिंग झाल्यावर नियमित खरेदीविक्री करता येईल. मुदत करमुक्त व्याजाचा दर वार्षिक यील्ड रेट –

  • १० वर्षे ७,३६ % १०,६५ % ( ३०.९% आयकर भरणाऱ्यासाठी)
  • ९.२७ % ( २०.६% आयकर भरणाऱ्यासाठी)
  • ८.२१ % ( १०% आयकर भरणाऱ्यासाठी)
  • १५ वर्षे ७.५३ % १०.९० % ( ३०.९% आयकर भारानार्यासाठी)
  • ९.४८ % ( २०.६% आयकर भरणाऱ्यासाठी)
  • ८.३९% ( १०% आयकर भरणाऱ्यासाठी)
  • २० वर्षे ७.६२% ११.०३% ( ३०.९% आयकर भरणाऱ्यासाठी)
  • ९.६०% (२०.६% आयकर भरणाऱ्यासाठी)
  • ८.४९% (१०% आयकर भरणाऱ्यासाठी)

हे रेट Rs १० लाख गुंतवणूक करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदरांसाठी आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांनी Rs१० लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास त्यांना इतर गुंतवणूकदारांना लागू असणारा ०.२५ ने कमी व्याजाचा दर दिला जाईल. वरील विवरणावरून असे दिसते की TAX- FREE BOND हे ३०% आणी २०% आयकर भरणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदाराना जास्त फायदेशीर आहेत. NTPC ने जाहीर केले की पहिल्या दिवशीच काही तासांत हा इशू ओवरसबस्क्राइब झाल्यामुळे २४ सप्टेंबर रोजी हा इशू क्लोज केला.
२३ सप्टेंबर २०१५ ही कोलगेट पामोलिव आणी डीवी labs या कंपनींच्या १:१ बोनस शेअरची एक्स डेट आहे.बुधवारी ह्या शेअर्सच्या किमतीत त्यानुसार बदल झाला.कॅडिला हेंल्थकेअरच्या शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट ७ ऑक्टोबर आणी बाटाच्या शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट ८ ऑक्टोबर ठरवली आहे. सीएमसी आणी टीसीएसच्या यांच्या मर्जरच्या बाबतीत १ ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे.
IDFC मधून IDFC बँकेच्या डीमर्जरसाठी ५ ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे..सरकार IDBI बँकेतील आपला स्टेक कमी करणार आहे. IDBI बँकेला जास्त अधिकार आणी स्वातंत्र्य देणार आहे. सध्या IDBI बँक ही IDBI ACT च्या प्रोविजनप्रमाणे चालते. आता IDBI बँकेलाही कंपनीज ACT लागू केला जाईल.
सरकारने जाहीर केले की ज्या कंपन्यांचे भारतांत ऑफिस नसेल त्यांना MAT ( MINIMUM ALTERNATE TAX) लागणार नाही. तसेच ज्या देशांबरोबर DTAT (DOUBLE सरकारने TAX AVOIDANCE TREATY) झाली असेल त्यां देशांतील कंपन्यांना MAT लागणार नाही. तसेच एप्रिल 2001 नंतर MAT लागणार नाही असे जाहीर केले DTH व्यवसायासाठी सरकार १००% FDI ला परवानगी देणार अशी बातमी आहे. त्यामुळे डिश टीव्ही या कंपनीच्या शेअरची किंमत वाढली.
अम्टेक ऑटो या कंपनीने ८०० कोटी परदेशी bondsचे पेमेंट केले नाही. अम्टेक ऑटो ग्रुपला IDBI बँकेने Rs १९६० कोटींचे कर्ज दिलेले आहे.
मदरसन सुमी या कंपनीचा ४४% रेवेन्यु VW या अमेरिकन कंपनीमधून मिळतो. VW(VOLKS WAGEN) या अमेरिकन कम्पनीची विक्री १०% ने कमी झाली. VW( VOLKS WAGEN) जास्त पोलूशन करणारी वाहने तयार केली. त्यामुळे त्याना USA सरकारने US$ १८ बिलीयन एवढा दंड लावला आहे VW या कंपनीच्या सीईओ ने राजीनामा दिला. मदरसन सुमी ही कंपनी भारतांत मारुती मोटर्सवर अवलंबून आहे. मदरसन सुमीने सांगितले की ‘आता आम्ही आमच्या धोरणांत बदल करायच्या विचारांत आहे’. स्कूटर्स इंडिया या कंपनीला BIFR मधून डिसचार्ज केले. टेक महिन्द्राला पेमेंट बँकेचे लायसेन्स मिळाले.
L & T ने लोनची परतफेड वेळेवर केली नाही अशी बातमी धडकली. पण मोठ्या कंपन्या लगेच या बातमीबद्दल स्पष्टीकरण देतात. त्यामुळे पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय घाबरून जाऊन असे शेअर्स विकून टाकू नयेत. L & T ने स्पष्टीकरण दिले की हा कायदेशीर आणी रेग्युलेटरी प्रश्न आहे. हा लिक्विडीटीचा प्रॉब्लेम नाही. ‘आम्ही या लोनच्या परतफेडीसाठी प्रोविजन केलेली आहे’ – असे कंपनीने सांगितले.
डीशमन फार्मा या कंपनीला टीबीसाठी लागणाऱ्या औषधाचे उत्पादन करण्यासाठी परवानगी मिळाली. बजाजऑटोला युरोपिअन रेग्युलेटरची परवानगी मिळाली. त्यामुळे बजाज ऑटो आता त्यांची ‘QUADRICYCLE’ बजाज RE 60 युरोपमध्ये निर्यात करू शकेल. प्रभात डेरी या कंपनीचे BSE वर लिस्टिंग झाले.
मेरिको, NCC, टीव्ही १८, BEML, कॅडिला हेल्थकेअर, भारती इन्फ्राटेल हे सर्व शेअर्स २८सप्टेंबरपासून F & O मध्ये सामील होतील. याच तारखेपासून NMDC निफ्टीतून बाहेर पडेल आणी अडाणी पोर्ट चा निफ्टीत समावेश होईल. २७ सप्टेंबर सोमवारी FMC आणी सेबीचे विलीनीकरण होईल. याचा MCXच्या शेअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. HCC ला NHAI कडून Rs १८०० कोटींची ऑर्डर मिळाली ह्या कामाला ४० महिने लागतील. लवासाच्या IPO ला परवानगी मिळाली. हा IPO ७ नोवेंबर रोजी उघडेल.VLCC या कंपनीने Rs ४०० कोटींच्या IPO साठी अर्ज केला आहे.
इथे तर बाजारातही तुरी आलेल्याही नाहीत. फक्त माननीय अर्थमंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष तसेच सर्व आर्थिक विशेषज्ञ आता रेट कट करण्यासाठी योग्य वेळ आहे असे सांगून राहिले आहेत.त्यामुळे एक प्रकारे रिझर्व बँकेच्या गव्हर्नवर अप्रत्यक्ष दबाव येत आहे. काहीजण तुरी येतील म्हणून तयारी करीत आहेत, तर काहीजण तुरी आल्या नाहीत तर काय करायचे या विचारांत आहेत.. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मात्र स्वस्थ बसून ही मजा बघणे पसंत करीत आहेत.
ऑक्टोबर महिन्यांत दुसऱ्या तिमाहीचे रिझल्ट्स यायला सुरुवात होतील. एड्वांस tax चे आकडे, रिझल्ट्सच्या तारखा आणी शेअर्सची किमत याचा ताळमेळ घालून short term ट्रेड करता येतो. BSE च्या साईटवर रिझल्ट्स कॅलेंडर मध्ये जाऊन तुम्हाला रिझल्ट्सच्या तारखा मिळू शकतील.
कोणत्या पारड्यांत रिझर्व बँकेचे गव्हर्नर किती जड माप टाकतात आणी ते कुठल्या बाजूला आणी किती झुकते ते आपण पुढील आठवड्यांत पाहू..
 

आठवड्याचे समालोचन – 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर २०१५ – गणरायाची स्वारी, शेअरमार्केटच्या द्वारी

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
DSCN9420
रविवारी होते खग्रास सूर्यग्रहण. सूर्यग्रहणाचे परिणाम काय काय होऊ शकतील हे सतत बोलले जात आहेच. या  नैसर्गिक ग्रहणापेक्षा FOMCच्या मीटिंगचे ग्रहण लागले आहे. FED रेट वाढवेल कां आणी फेडने रेट वाढवले तर  कोणकोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल याची चर्चा चालू आहे. १६ सप्टेंबर आणी १७ सप्टेंबर २०१५ असे दोन दिवस ही मीटिंग चालू होती. साऱ्या जगाचे लक्ष या घटनेकडे लागले होतं. हे जगावरचे संकट विघ्नहर्ता हरण करतो ते पाहू. फेड रेट वाढवते कां हा तर मुख्य प्रश्न आहेच पण जागतिक अर्थकारणाविषयी ते काय टिपणी करतात याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे. परंतु US अर्थव्यवस्थेच्या प्रगतीतील अनिश्चितता आणी महागाईचे २% लक्ष्य न गाठल्यामुळे फेडने व्याजाचे दर वाढवले नाहीत.
S & P (STANDARD AND POOR) या रेटिंग एजन्सीने जपानचे रेटिंग AA – वरून  A+ असे कमी केले. आउटलूक मात्र नेगेटिव वरून स्टेबल केला. बँक ऑफ जपानने जाहीर केले की ते सिस्टीममध्ये ८० लाख कोटी येन टाकत राहतील.
या आठवड्यांत महत्वाचा डेटा प्रसिद्ध झाला. IIP चे आकडे ३.८% वरून ४.२ % झाले. ऑगस्ट WPI (WHOLSALE PRICE INDEX) चे आकडे आले हे -४.०५ वरून -४.९५ झाले म्हणजे सुधारणा झाली. ऑगस्ट CPI (CONSUMER PRICE INDEX) चे आकडे आले. ते ३.६९ वरून ३.६६ झाले. यातही सुधारणा दिसली. प्रत्यक्षांत आपल्यासारख्या बायकांना बाजारांत गेल्यावर महागाईला तोंड देणे भाग पडते. पण महागाईच्या आकडेवारींत सुधारणा कशी ? ह्या कोड्याचे उत्तर मिळत नाही.
सरकारने स्टीलच्या काही प्रकारांवर २०० दिवसांसाठी २०% सेफगार्ड ड्युटी बसवली. त्यामुळे स्टील उद्योगाला सरंक्षण मिळेल असे वाटत आहे. काहीही म्हणा पण या एकप्रकारच्या कुबड्याच आहेत.
सरकारने श्यामाप्रसाद रुरलअर्बन मिशनला मंत्रिमंडळाच्या बैठ्कींत मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या संमतीने ३०० खेड्यांचा एक क्लस्टर तयार करून त्या खेड्यांना सडक बिजली पाणी स्कील डेव्हलपमेंट हेल्थकेअर, सार्वजनिक आरोग्य अशा सुविधा पुरवल्या जातील. यासाठी सरकारने Rs ५१८२ कोटींची तरतूद केली आहे.मनरेगा योजनेअंतर्गत कामाचे दिवस १०० वरून १५० केले. सरकारने येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी बीयाण्यासाठी सबसिडी, गुरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी रकमेची तरतुद केली.
ज्या भारतीय INFRASTRUCTURE कंपन्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत व्यवहार करीत आहेत त्याना EXIM बँक सवलतीच्या दरांत कर्ज पुरवठा करेल असे सरकारने जाहीर केले. यामुळे या कंपन्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतील असे वाटते. रिझर्व बँकेने १० कंपन्याना छोट्या बँकांचे लायसेन्स दिले.या कंपन्यांनी १८ महिन्यांच्या आंत स्माल बँक सुरु करायची आहे. यांत बहुतांशकरून मायक्रोफायनांस कंपन्या आहेत. या बँक्स अल्पउत्पन्न गटांना, लहान उद्योगांना, शेतकऱ्यांना आणी unorganised सेक्टर्सला मुलभूत बँकिंग सोयी पुरवतील. आता या कंपन्या फक्त कर्जपुरवठा करीत आहेत. पण आता बँक लायसेन्सही मिळाल्यावर इतर बँकिंग सेवा चालू करू शकतील. या बॅंका त्यांच्या ग्राहकांना परदेशी विनिमय तसेच म्युचुअल फंड इन्शुरन्सही पुरवू शकतात. या बँकांनी त्यांच्या कर्जापैकी ५०% कर्ज प्रत्येकी Rs २५००००० च्यापेक्षा कमी रकमेसाठी दिलेले असले पाहिजे. या बँकांनी त्यांची ७५% कर्ज प्रायारीटी सेक्टरला दिली पाहिजेत. AU फ़ायनान्सिअल, जनलक्ष्मी फायनांसीअल, कॅपिटल लोकल एरिआ बँक, उत्कर्ष मायक्रोफायनांस,उज्जीवन फायनांसीअल सर्विसेस, या यापैकी काही कंपन्या. ही घोषणा करून सरकारने फ़ायनान्सिअल इन्क्लुजनमध्ये एक महत्वाचे पाउल टाकले आहे. तसेच RBI च्या गरजेप्रमाणे बँकेचा प्रकार या कार्यक्रमातील हे एक पुढचे पाउल आहे.हे जरी खरे असले तरी शेअर मार्केट मधील तज्ञांना ज्या कंपन्यांना ही लायसेन्स मिळतील असे वाटले होते त्यांच्यापैकी एकाही कंपनीला सध्यातरी हे लायसेन्स दिलेले नाही.
काही गोष्टी आपल्याला मार्केटच्या निरीक्षणावरून कळू शकतात. SKS मायक्रो हा शेअर ठराविक रेंज  मध्ये फिरत होता.छोट्या बँकांना लायसेन्स मिळण्याच्या शर्यतीत हा शेअर असूनही ह्या शेअरची किंमत ठराविक रेंजमध्ये कां राहते याचे कोडे उलगडत नव्हते. या कंपनीला लायसेन्स मिळणार नाही याची काही जणांना खबर असावी. दोन दिवसापूर्वी जेव्हा लायसेन्स मिळालेल्या कंपन्यांची नावे जाहीर झाली त्यांत SKS मायक्रोफायनान्स आणी S.E. INVESTMENT या कंपन्यांचे नाव आढळले नाही. त्यामुळे हा शेअर Rs ८० पडला.
आता क्रूडला शेल gas हा पर्याय उपलब्ध झाला आहे. शेल gas ची किमत US$ ६० एवढी आहे. याचाच अर्थ क्रूडच्या भाववाढीला आता एक प्रकारची मर्यादा येईल. क्रूड जास्तीतजास्त US$ ६० होईल. पूर्वीसारखे US$१०० च्या पुढे जाण्याची शक्यता कमी होईल. J K टायरने केसोराम इंडस्ट्रीजचे हरिद्वारचे उत्पादन युनिट Rs २१६५कोटींना खरेदी केले. M & M फायनान्स हेल्थ, लाईफ आणी ASSET इन्शुरन्सच्या व्यवसायांत उतरण्याच्या विचारांत आहे. IFCIने NSE ( NATIONAL STOCK EXCHANGE) मधला १.५ % स्टेक Rs २६३ कोटींना विकला. Rs ३९०० प्रत्येक शेअरला किमत मिळाली. टाटा स्टीलला त्यांच्या जमशेदपूर युनिटचा विस्तार करण्यासाठी पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली. VENKY’S ने २:१ (तुमच्याकडे असलेल्या २ शेअर्सला एक बोनस शेअर )  असा बोनस जाहीर केला. मारुतीचे शेअर विकत घेण्यासाठी FII ना मनाई होती. कारण त्यांची ४०%ची FII लिमिट संपली होती.म्हणून मारुतीचे नाव MSCI मधून काढले होते. आता मार्केट ढासळत असताना FIIनी मारुतीचे शेअर्स विकल्यामुळे FII होल्डिंग कमी झाले. त्यामुळे आता SEBIने पुन्हा परवानगी दिली.आता मारुती पुन्हा MSCI मध्ये सामील होईल. AMTEK ऑटोचे B + रेटिंग कमी करून CCC+ रेटिंग केले. AMTEK  ऑटो ग्रुपचे कर्ज खूप आहे तसेच त्यांचे काही कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे इशुही आहेत. कंपनीने एका दूरदर्शनच्या वाहिनीला दिलेल्या INTERVIEWमध्ये ते आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय उपाय योजणार आहेत त्यांची माहिती गेल्या पोस्टमध्ये दिली होती. HULने त्यांच्या पुण्यातील ६१०८ SQ फीट जागेसाठी बोली मागवली आहे. L & T ला बांगलादेशमधून ४०० MW प्लांट उभारण्यासाठी १७०० कोटींची ऑर्डर मिळाली आहे.
वेदांत आणी केर्न एनर्जी यांच्या विलीनीकरणाला BSE आणी NSE या दोन्ही STOCK EXCHANGE नी ना हरकत प्रमाणपत्र दिले. बाल्को आणी वेदांत यांनी आपली युनिट बंद करायला सुरुवात केली. त्यामुळे ३००० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. हा कमोडीटी मार्केटमध्ये सतत खाली येणाऱ्या धातूंच्या किंमतीचा परिणाम आहे.टाटा स्टीलमध्ये टाटा मेटालिक (डी आय) या कंपनीच्या विलीनीकरणाला हायकोर्टाने मंजुरी दिली. टाटा स्टीलने टाटा मोटर्सचे ३.८५ कोटी शेअर्स विकले.जुबिलीयंट लाईफ च्या Zolmitriptan या औषधाला UNDA मंजुरी मिळाली.
MAJESCOचे NYSE( न्यूयॉर्क STOCK EXCHANGE) वर लिस्टिंग झाले. सदभाव इंफ्राचे BSE वर Rs १११वर लिस्टिंग झाले. गुजराथ gasचे विलीनीकरणानंतर रीलीस्टिंग झाले. SEBIने इंडिगो या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या IPO ला परवानगी दिली.गोएअर ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी IPO आणण्याच्या विचारांत आहे. फारेस्ट्रीमध्ये जॉब क्रिएशनसाठी पब्लिकप्रायवेट पार्टनरशिपला परवानगी दिली आहे. ITC हे काम करीत आहेच.
१७ सप्टेंबरला गणेशचतुर्थीही होती, गणपती बाप्पा खरेच गुंतवणूकदारांच्या मदतीला धावून आले आणि मार्केट हॉस्पिटल मधून release झालं . फेडने दर वाढवले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी मार्केटने चांगलीच उसळी घेतली. २९ सप्टेंबरला होणाऱ्या रिझर्व बँकेच्या पॉलिसीमध्ये दर कमी होण्याची शक्यता आहे. गणरायाने पावसालाही आग्रहाचे आमंत्रण दिले त्यामुळे गौरीच्या स्वागतासाठी पावसाने हजेरी लावली.  दुष्काळाचे सावट थोडेसे कमी व्हायला मदत झाली. त्यामुळे आपण म्हणू या गणपती बाप्पा मोरया !

आठवड्याचे समालोचन – ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०१५ – जनरल वार्डमध्ये शेअर मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
Share Market terms in marathi
सोमवारी METने सांगितले की ‘अल-निनो’ च्या परिणामामुळे पावसाचा परतीचा प्रवास अपेक्षेपेक्षा लवकर सुरु झाला आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळाची शक्यता वाढली आहे ही बातमी येताच मार्केट पडू लागले आणी पुन्हा एकदा सोमवारने त्याची ख्याती कायम राखली आणी सेन्सेक्स ६०० पाईंट पडले.सर्वांनी आशा सोडून दिली. निफ्टी ७६०० च्या पेक्षा कमी झाला. विशेषज्ञ निफ्टी ७२००, ७०००, ६८०० अशी खालची खालची टार्गेट देऊ लागले.
मंगळवारी ग्लोबल निर्देशांक चांगले आले. चीनने ५% लाभांशावरील कर रद्द केला. आजच्या मार्केट रिकव्हरी मध्ये VOLUME कमी होते. UBS आणी MOODY या रेटिंग एजन्सीने भारताच्या GDPचे अनुमान ७% पर्यंत कमी केले. चीनमध्ये मागणी कमी होईल. व्याजाच्या दरामध्ये कपात झाली आणी वेळेवर रीफार्म्स होऊ शकले तरच स्थिती सुधारेल. आज पंतप्रधानांनी भारतातील दिग्गज उद्योगपती आणी बँकर्स तसेच नामांकित अर्थशास्त्री यांच्या बरोबर आर्थिकस्थिती आणी ती सुधारण्याचे उपाय यावर विचारमंथन केले.
आता जी RALLY सुरु आहे तिला ‘RELIEF RALLY’ असे म्हणतात. निफ्टी ९१०० पासून आणी सेन्सेक्स ३०००० पासून पडत आहे. मार्केट ओवरसोल्ड झोनला पोहोचले आहे. सोप्या मराठी भाषेंत सांगायचे झालं तर  मार्केट सतत पडण्याच्या ताणातून या RALLYने सुटका केली म्हणून ही RELIEF RALLY होय.
बुधवारी कमोडीटी मार्केटमध्येही सुधारणा झाली. सर्व धातूंच्या किमती थोड्याफार प्रमाणांत वाढल्या. त्याचा परिणाम म्हणून धातुशी संबंधीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वधारल्या. ब्राझीलला S&P ने जंक म्हणून डॉउनग्रेड केले.व्हेनिझुएलाची अर्थव्यवस्था कमजोर आहेच. हवेल्ल्स, ग्लेनमार्क TORRENT फार्मा या कंपन्या या देशांशी व्यापार करतात. त्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किमती कमी झाल्या.
JSW एनर्जी या कंपनीने JP असोसिएटच्या बीना थर्मल पॉवर प्लांट Rs ३५०० कोटींना विकत घेण्याचे ठरविले आहे.बीना पॉवर प्लांटची ‘installed capacity’ ५०० mw आहे आणी ही १५०० mw पर्यंत वाढवण्यासाठी पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध आहे. ही खरेदी धरून JSW एनर्जीची पॉवर उत्पादनाची capacity ३१४० mw वरून ६००० mw होईल. JP असोसिएटने आतापर्यंत Rs २५०००कोटींचे विविध प्लांट्स विकले आहेत. सिमेन्स एजी ही जर्मन कंपनी भारतांत ‘मेक-इन-इंडिया’ योजनेअंतर्गत युरो १ बिलियन गुंतवणूक करून ४००० लोकांना नोकरी उपलब्ध करून देईल.
हिंदुस्थान युनिलीवरने त्यांचा ‘MODERN’ या नावाने चालणारा ‘ब्रेंड आणी बेकरी’’ बिझीनेस त्यांच्या सहा प्लांटसहित ‘NIMMAN’ या एवरस्टोन ग्रूपच्या कंपनीला अन्दाजे Rs २०० कोटी ते Rs २५० कोटींना विकायचे ठरविले आहे. ही विक्री हिंदुस्तान लीवरच्या इतर बिझीनेसमधून बाहेर पडण्याच्या पॉलिसीअंतर्गत आहे. युनायटेड स्टेट्स मधील इन्फोसिस आणी टीसीएस या कंपन्यांची H1 विसाच्या संबंधांत चौकशी पूर्ण झाली आहे या मध्ये या दोन्ही भारतीय कंपन्यांनी H1 विसा नियमांचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही असे आढळून आले.पिरामल एनटअरप्राईझेस आपला फ़ायनान्सिअल सर्विसेस बिझीनेस वेगळा काढून तो ILFS खरेदी करून त्याच्यांत विलीन करण्याची शक्यता आहे.
नवकर या कंपनीचे (इशूप्राईस १५५ ) Rs १५२ ला लिस्टिंग झाले आणी हा शेअर Rs १६६ वर बंद झाला. गुरुवारी पेन्नार बिल्डिंग ब्लॉक्स आणी पुष्कर केमिकल्स या कंपन्यांच्या शेअर्सचे लिस्टिंग झाली. कोलगेट या कंपनीने १;१ या प्रमाणांत दिलेल्या बोनसवर शेअरहोल्डर्सनी शिक्कामोर्तब केले. वेदांतने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करायचे ठरवले आहे. AMTECH ऑटो ग्रूपच्या कंपन्यांचे स्पेशल ऑडीट झाल्यावरच त्याना कर्ज देण्याचा विचार केला जाईल असे जाहीर झाले.कंपनीने असे सांगितले की प्रमोटर्स कंपनीमध्ये गरज लागल्यास पैसे आणतील. कंपनी वेळ आल्यास काही प्लांट्स विकून किंवा परदेशातील स्टेक विकून पैसा उभा करेल. हे सांगताच शेअरची किंमत ७०% वाढळी अशी एखादी बातमी आल्यास इंट्राडे ट्रेड होऊ शकतो.
आज सरकारने स्पेकट्रम ट्रेडिंग नॉर्म्स जाहीर केले. जर एखाद्या कंपनीकडे एखाद्या राज्यामध्ये स्पेक्ट्रम शिल्लक असला तर ती कंपनी तो शिलकी स्पेक्ट्रम विकू शकते. या मध्ये सर्व BANDमधील स्पेक्ट्रममध्ये ट्रेडिंग होऊ शकते. जी कंपनी स्पेक्ट्रम खरेदी करेल तिला १% ‘TRANSACTION’ फी भरावी लागेल. कोणतीही कंपनी त्यांच्या स्पेक्ट्रमपैकी २५% स्पेक्ट्रम प्रती सर्कल आणी प्रती OPERATOR विकू शकते.मात्र हे स्पेक्ट्रम विकत घेवून किंवा साकारी लिलावांत विकत घेवून दोन वर्षे झालेली असली पाहिजेत. दोन्ही कंपन्याना या खरेदीविक्रीसाठी पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही. पण ४५ दिवसांच्या आंत असे एक डिक्लरेशन द्यावे लागले की आवश्यक त्या कायदेविषयक आणी प्रोसिजरल बाबी पूर्ण केल्या आहेत. यामुळे जे स्पेक्ट्रम कंपन्या काही कारणांमुळे वापरू शकत नाहीत त्यांचे मोनेटायझेशन आणी VALUE-UNLOCKING होईल. सरकारच्या या निर्णयानंतर सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स वाढले. सर्वांत जास्त फायदा Rcom या कंपनीला झाला. RCOM आणी रिलायंस जियो हे आपापसांत स्पेक्ट्रम ट्रेडिंग करू शकतात.
सरकारने आज राष्ट्रीय ऑफशोअर विंड एनर्जी पॉलिसीची घोषणा केली.या पॉलिसीअन्वये सरकार भारताच्या समुद्र किनाऱ्यावर ऑफशोअर विंड एनर्जी प्रोजेक्टची शक्यता पडताळून पाहिलं आणी त्याच्यासाठी टेंडर्स मागवेल. या योजनेअंतर्गत १०६००० MW पॉवर उत्पादन वाढेल अशी अपेक्षा आहे. सरकारने आज व्हाईट लेबल एटीएम मशीन उपलब्ध करणाऱ्या बँक्स सोडून इतर एजन्सीला १००% FDI(FOREIGN DIRECT INVESTMENT) ला मंजुरी दिली.
सरकारने सोवरीन गोल्ड बोंड आणी गोल्ड मोनटायझेशन योजनेला मंजुरी दिली. भारतांत २०००० टन सोने आहे असा सरकारचा अंदाज आहे. हे सोने जर मुख्या प्रवाहांत आणता आले तर भारताला करावी लागणारी सोन्याची आयात कमी होईल असा अंदाज आहे. सोवरीन गोल्ड बॉंडला (जे रिझर्व बँक इशू करेल) केंद्रीय सरकारची पूर्ण हमी असेल.हे बॉंड फक्त निवासी भारतीयच विकत घेऊ शकतील. हे बॉंड ५ ग्राम पासून १० ग्राम, ५० ग्राम, १०० ग्राम याप्रमाणे वेगवेगळ्या वजनाच्या परिमाणांत उपलब्ध केले जातील. या बॉंडची मुदत ५ ते ७ वर्षे असेल.या बॉंडची विक्री बँक्स. पोस्ट ऑफिसेस, नॉन-बँकिंग फायनांशीअल कंपन्या आणी इतर नेमलेल्या एजंटमार्फत केली जाईल. एक व्यक्ती एका वर्षांत ५०० ग्राम्पेक्षा जास्त सोवरीन गोल्ड बॉंड घेऊ शकणार नाही. या बॉंडच्या REDEMPTION साठी एजन्सीज नियुक्त केल्या जातील.या बॉडवर व्याजही मिळेल. हे बोंड EXCHANGEवर ट्रेड केले जातील. हे बॉंड कर्जासाठी collateral सिक्युरीटी म्हणून ठेवता येतील.
गोल्ड मोनटायझेशन योजनेअंतर्गत तुम्ही कमीतकमी ३० ग्राम सोने बँकेकडे १वर्ष ते १५ वर्षापर्यंत DEPOSIT ठेवू शकता. यावर तुम्हाला करमुक्त व्याज मिळेल. हे DEPOSIT तुम्ही सोने किंवा सोन्याच्या किमतीएवढ्या पैश्याच्या स्वरूपांत परत घेऊ शकता. हे सोने बँकेत ठेवण्यासाठी सोन्याची शुद्धी सांगणारे प्रमाणपत्र Assaying and Hallmarking केंद्राकडून घ्यावे लागेल.जर आपण अल्पमुदतीसाठी सोने ठेवले असाल तर आपल्यास सोने किंवा पैसे ह्या depositची मुदत संपल्यानंतर मिळू शकेल. पण आपण जर दीर्घ मुदतीसाठी सोने deposit केले असेल तर मात्र depositची मुदत संपल्यानंतर आपल्यास पैश्याच्या स्वरुपांतच पेमेंट घ्यावे लागेल.
नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी सांगितले की रिझर्व बँकेने रेट मध्ये .२५ ते १ % एवढी कपात करण्यासाठी हे योग्य वेळ आहे. भारताची पुढील वर्षांत ८% प्रगती होईल. त्यामुळे रेटकपात करण्यासाठी रिझर्व बँकेवर दबाव वाढत आहे. कमोडिटी मार्केट पडत आहे त्यामुळे वर्ष २०१६ मध्ये इंडस्ट्री मार्जीन आणी नफा वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सेबीनेसुद्धा लगाम टाईट करायला सुरुवात केली आहे.प्रत्येकाला लेवल प्लेईंग फिल्ड मिळावे अशी सेबीची इच्छा आहे. बँकेतील आपल्या depositसाठी असलेला विमा सरकार वाढवायच्या विचारांत आहे. आता हा विमा आपल्या सर्वप्रकारच्या depositसाठी फक्त Rs.१००००० एवढाच उपलब्ध आहे.
शेअरमार्केट मधील पडझडीचे निदान लागले की औषध लागू पडले की शेअर मार्केट्ची इच्छाशक्ती मजबूत आहे माहित नाही पण शेअरमार्केटने धीर धरला आणी मंगळवारपासून मार्केटमध्ये जीव आला मार्केट सुधारू लागले.जरी पडले तरी उसळी घेऊ लागले. गुंतवणूकदारांना व ट्रेडर्सना उत्साह आला. डॉक्टर्स म्हणजेच मार्केटचे विश्लेषक मार्केट सुधारल्याची ग्वाही देऊ लागले. आता मार्केट्ची तब्येत बरी आहे I C U मध्ये ठेवण्याची गरज नाही. जनरल वार्ड मध्ये ठेवू या. मात्र अजूनही दक्षता घ्यावी लागेल. त्यामुळे ८ तारखेपासून मार्केटला I C U मधून जनरल वार्ड मध्ये आणले आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कधी मिळतो ते बघू या.
 

तरुण भारत – लेख १ – शेअर करू या शेअर मार्केट

(हा लेख पहिल्यांदा ‘तरुण भारत’ या मराठी दैनिकात प्रकाशित झाला)
शेअर म्हणजे कंपनीच्या भागभांडवलाचा लहानसा वाटा. या शेअर्सची खरेदी विक्री करणारे मार्केट म्हणजेच शेअरमार्केट. ही खरेदी विक्री सुरळीतपणे होण्यासाठी BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) आणी NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) ही दोन मार्केट कार्यरत आहेत.गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी SEBI कार्यरत आहे.बरेच वर्षापासून चालत आलेला पण समाजाच्या फार मोठ्या वर्गासाठी अनोळखी असलेला हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. आपण सर्वजण इतके दिवस पोस्ट, बॅंका, मुचुअल फंड ,सोने, घर, शेतजमीन, विमा, कर्जरोखे, करमुक्त उत्पन्न असलेले सरकारी वा बिन सरकारी Bonds,यामध्ये गुंतवणूक करत असाल. केली असेल, करणार असाल . त्यामध्ये असणारे फायदे तोटे आपल्याला माहिती असतील पण या साऱ्या गुंतवणुकीमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीला स्थान आहे का ?
शेअरमार्केटविषयी असणारे गैरसमज
दचकलात! घाबरलात! गोंधळलात! की बाचकलात! की बिथरलात! अहो,पण तुमची तरी काय चूक आहे म्हणा! तुमचेही बरोबर आहे .कारण आजपर्यंत तुम्ही शेअरबाजारात व्यवहार करून फसलेल्या लोकांच्या कथाच ऐकलेल्या आहेत . शेअर्स खरेदी केल्यानंतर मिळालेली शेअरसरटीर्फिकेट खोटी होती. शेअर्स विकल्यानंतर रक्कम मिळायला खूप उशीर लागला. आपले शेअर्स कोणत्या भावाला विकले गेले किंवा खरेदी केले याला कोणतेही प्रमाण नव्हते. ब्रोकर जी किमत सांगेल त्यावर विश्वास ठेवावा लागे.असे शेअरबाजाराबद्दल अनेक गैरसमज होते आणी आहेतही. शेअरबाजार हा एक बागुलबुवाच निर्माण केला गेला .राख फासून जाण्याची बुद्धी झाली का ? शेअरबाजाराच्या नादी लागून अमका देशोधडीला लागला हे व असे सर्वत्र बोललेले ऐकू येते. परंतु सध्या अशी परीस्थिती नाही . तंत्रज्ञानात होत असलेली सुधारणा व व्यवहारात आलेली पारदर्शकता व कायद्याचे संरक्षण या कारणामुळे तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विचार करू शकता वाचकहो !
शेअरमार्केटबद्दल समाजांत असलेले कुतूहल
मी जेव्हा समाजात वावरते लोकांबरोबर शेअरमार्केटबद्दल बोलते तेव्हा मला त्यांच्या मनात असणारे शेअरबाजाराबद्दलचे आकर्षण, कुतूहल जाणवते. लोक मला विचारतात शेअरबाजारात व्यवहार कसा चालतो, शेअरबाजारातील गुंतवणूक अनेक पटीने वाढते हे खरे आहे का?मार्केट मध्ये व्यवहार करण्यासाठी पदवीधर असावे लागते कां? परवाना लागतो कां ? हे आणी असे अनेक प्रश्न लोकांच्या मनांत घर करून बसले आहेत. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे “अपने बसकी बात नही” असे सामान्य माणसाला वाटते. हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला शेअरमार्केट नीट समजावून घ्यावे लागेल. अहो!मी सुद्धा तुमच्यातीलच एक आहे मी जेव्हा शेअरबाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तेव्हा मी एक गृहिणीच होते. परंतु मी सर्व माहिती करून घेवून शेअरमार्केटचे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. प्रयत्न, चिकाटी, जिद्द, सावधगिरी व परमेश्वरी कृपा या जोरावर गेली दहाबारा वर्षे शेअरमार्केटमध्ये यशस्वी वाटचाल करीत आहे . शेअरबाजारातील खाचखळगे धोके मला समजले आहेत . त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करताना ठेच लागू नये किंवा तुम्ही दूर फेकले जाऊ नयेत असे मला वाटते.त्याचबरोबर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळावे ही माझी इच्छा आहे.
शेअरमार्केटमध्ये बदललेली परीस्थिती
अहो आता काळ बदलला आहे व्यवहारात पारदर्शकता आली आहे. भाजी बाजाराप्रमाणेच प्रत्येक व्यवहार तुम्ही प्रत्यक्ष पारखून निरखून करू शकता. ब्रोकरमार्फत व्यवहार करायचा नसेल तर घरात बसून इंटरनेटचा उपयोग करून Online शेअर्सची खरेदी विक्री करू शकता. ग्राहकहितासाठी बरेच कायदे केले गेले आहेत . आजकाल “Investor forum “ मार्फत तुमची गुंतवणूक सुरक्षित व्हावी म्हणून काळजी घेतली जाते.गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्यासाठी SEBI(Securities & exchange Board of India) सज्ज आहे .जर आपण आपला मोबाईल नंबर व मेलअड्रेस दिला तर दरदिवशी आपण केलेल्या व्यवहारांची माहिती आपल्याला थेट STOCK EXCHANGEकडून कळवली जाते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते. सगळीकडे माहितीचा पूर लोटला आहे. भाषेचा अडसर येत नाही. शेअरबाजारातील व्यवहार इंग्लिशमध्ये तसेच हिंदीमध्ये सांगणारे बरेच channel दूरदर्शनवर उपलब्ध आहेत वर्तमानपत्रातूनही माहिती मिळवता येते. डोळे व कान उघडे ठेवून आपण माहिती मिळवली व त्याचा योग्य उपयोग केला तर शेअरबाजारातील उलाढालीत यश मिळवणे सहज शक्य आहे .
त्याहूनही फसवणूक झाली तर “Grievances Cell” याची दखल घेते आहे. प्रत्येक व्यवहाराचे बील मिळते. सर्व व्यवहार चेकने होतात. शेअर्स विकल्यानंतर चौथ्या दिवशी त्या रकमेचा चेक मिळतो.किंवा खरेदी केलेले शेअर्स तुमच्या DEMAT अकौंटमध्ये जमा होतात. आजपर्यंत मला मिळालेला कोणताही चेक परत आलेला नाही.यावरून तुम्हाला शेअरमार्केटवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही हे पटेल. कोणालाही, कुठेही कसल्याही प्रकारची लाच द्यावी लागत नाही. जो भाव समोर दिसतो आहे, त्या भावाला विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी कुणीही तुम्हाला अडवत नाही. बाकीच्या गुंतवणूकप्रकारात जसे व्याज मिळ्ते तसा येथे लाभांश (Dividend) मिळतो. लाभांशाच्या रकमेवर आयकर लागत नाही. शेअर खरेदी करून १ वर्षानंतर विकल्यास आयकर लागत नाही.
घरातून, घराबाहेरून, परदेशातून कुठूनही फोनचा, मोबाईलचा वापर करून व्यवहार करता येणे शक्य आहे. गुंतवणुकीला कमाल रकमेची किंवा किमान रकमेचीही मर्यादा नाही. .वयाची अट नाही. कळत्यासवरत्या वयाच्या माणसापासून अगदी जेष्ठ नागरिकापर्यंत कुणीही व्यवहार करू शकतो. व्यवसायातले सर्व फायदे आहेत परंतु कोणत्याही प्रकारचा परवाना लागत नाही.कसलेही दडपण नाही चोरी होईल किंवा अतिक्रमण होईल याचीही भीती नाही. शेतजमिनीत किंवा घरात गुंतवणूक केली तर जसे वार्षिक उत्पन्न किंवा घरभाडे मिळ्ते आणी शेतजमिनीच्या घराच्या किमती वाढतात त्याचाही फायदा होतो तसेच शेअर्सवर लाभांश मिळतो व शेअर्सचा भाव वाढतो त्याचाही फायदा घेता येतो.शेअर्स तारण ठेवून कर्जही मिळते. तुमच्या आर्थिक गरजेनुसार एक किंवा एकाच्या पटींत शेअर विकता येतात.
शेअर मार्केट मध्ये कोण व्यवहार करू शकतो ?
शेअरमार्केटमध्ये कोणीही व्यवहार करू शकतो स्त्री, पुरुष, जात, धर्म, आरक्षण, वय, कौशल्य, शिक्षण अशा कोणत्याही अटी नाहीत. शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या व्यक्तीसुद्धा शेअरमार्केटमध्ये व्यवहार करू शकतात.गृहिणी, विध्यार्थी, स्वेच्छा निवृत्ती घेतलेले. निवृत्त झालेले जेष्ठ नागरिक हे सर्व शेअरमार्केटमध्ये व्यवहार करू शकतात.
शेअरमार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी घ्यावयाची काळजी
परंतु शेअरमार्केटच्या बाबतीत चोहीकडून अनेक शिफारशींचा (ज्याला बोली भाषेत “टीपा” म्हणतात )वर्षाव होत असतो. या टीपा स्वीकारायच्या किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे कायम लक्षात ठेवावे ! लोकांकडून टीपा घेवून व्यवहार करण्यात लोक स्वतःला धन्य समजतात .त्यामुळे खरे शेअरमार्केट व त्यातील गुंतागुंत यापासून ते कोसो दूर असतात. डोळे असून आंधळेपणाने व्यवहार करत असतात असेच म्हणावे लागते ..शेअरबाजारात घाम न गाळता व कष्ट न करता पैसा मिळतो हा लोकांचा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कुणाकडून तरी गुंतवणुकीच्या “टिपा “ घेवून शेअरबाजारात खरेदी विक्री केल्यास धोका संभवतो. त्यामुळे व्यवस्थित माहिती करून घेणे हितावह आहे. या माहितीवर आधारीत शेअर्स खरेदी विक्रीचे निर्णय वेळेवर आणी स्वतः घ्यावयास शिका.
आपण व्यवहार करताना आर्थिक शिस्त पाळावी लागते.पैशाची देवाणघेवाण, शेअरची खरेदी विक्रीची किमत,,शेअर्सची संख्या पडताळून पाहा. व्यवहार चोख ठेवा.गुंतवणुकीच्या प्रत्येक प्रकारांत धोके आहेतच. परंतु आपण वेगवेगळे नियम पाळून या धोक्यांपासून बचाव करतो.त्याचप्रमाणे योग्य ती काळजी घेतली तर शेअरमार्केटमधील धोक्यांपासून आपला बचाव होऊ शकतो.
गेल्या १०-१२ वर्षांच्या काळात मी तेजीचा व मंदीचा दोन्ही काळ अनुभवला आहे.माझी ही सर्व “क्रियेवीण वाचाळता नाही””आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे मी प्रथम अनुभव घेऊनच आता तुमचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. शेअरबाजारातून कमीतकमी वेळात जास्तीतजास्त उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे. ही काही जादू नव्हे मेहेनत, कष्ट, माहिती,प्रयत्न यामुळे हे साध्य होऊ शकते..तुमचा निर्णय योग्य असेल तर तुम्हाला बक्षीस , तुमचा निर्णय चुकीचा असेल तर शिक्षाही तुम्हालाच हा शेअरमार्केटचा न्याय आहे. सत्कारही तुमचाच आणी धिक्कारही तुमचाच आणी त्याला कारणही तुम्हीच ! दुसऱ्यावर दोषारोप मात्र करता येत नाही आणी करूही नयेत एवढे लक्षात असू द्या
सर्व माहिती झाल्यावर स्वतःचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा व स्वावलंबी बनावे एव्हढीयेणाऱ्या गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर माझी इच्छा
“सामर्थ्य आहे चळवळीचे पण अधिष्ठान पाहिजे भगवंताचे” यासाठी आपण येणाऱ्या गणेशाची प्रार्थना करून या कार्याचा शुभारंभ करू शकता .शेअरमार्केट सध्या पडत आहे. चांगली संधी आहे. उत्कृष्ट कंपन्यांचे शेअर्स चांगल्या भावांत मिळत आहेत. तुम्ही तयारीला लागा. ‘DEMAT’ अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट उघडा.स्वस्तात शेअर खरेदी करा आणी चांगला फायदा मिळवा.
अधिक माहितीसाठी माझा ब्लोग www.marketaanime.com किंवा FACEBOOKवर MarketaaniMe येथे पहा
 

आठवड्याचे समालोचन – ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर – ICU मध्ये शेअर मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
Stock market crash information in marathi
शेअरमार्केट्ची तब्येत फारच बिघडली. बर्याच डॉक्टरना दाखवले. सर्वांच्या मते I C U मध्ये दाखल करावे लागले.अधूनमधून तब्येत सुधारते आहे. पण पुन्हा तब्येत बिघडते आहे. मंगळवारी पुन्हा मार्केट पडले. विश्लेषकांनी वर्तविल्याप्रमाणे मार्केट पडणे आता थांबायला पाहिजे. शुक्रवारी BSE सेन्सेक्स ५५८ पाईंट पडून २५२०१ आणी NSE निफ्टी १६५ पाईंट पडून ७६५५ वर बंद झाला
मंगळवारी मार्केट पुन्हा पडायचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी. त्याच बरोबर क्रूडचे भाव वाढले. रुपया आणी US$ चा विनिमय दर US$1 =Rs ६६ झाला. GST आणी LAND बिलावर अजूनही राजकीय झकाझकी चालू आहेत. रिझर्व बँकेने सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकेचा बेस रेट कसा ठरवावा याचा फार्म्युला बनविण्याची तयारी सुरु केली. भारताची आर्थिक प्रगती २०१५-२०१६ या वर्षाच्या १ ल्या तिमाहीत ७% एवढी (गेल्या तिमाहीत ७.५%) झाली. ही प्रगती पुन्हा वेगवान होण्यासाठी व्याजदरांमध्ये कपात आणी इतर आर्थिक सुधारणांची गरज आहे. INFRASTRUCTURE सेक्टरची प्रगती फक्त १.१% झाली. सरकारने गेल्या चार महिन्यांत भांडवली अंदाजपत्रकातील तरतुदीच्या ३६% भांडवली खर्च केला. पाउस ११% कमी होईल असा अंदाज वर्तविला गेल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण मागणीवर सणासुदीच्या काळांत होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबरोबरच सरकारच्या काही सुधारणा उदा:- जमीन अधिग्रहण बिल आणी GST बिल. विरोधी पक्षांच्या असहकारामुळे शक्य झाल्या नाहीत. निर्यात आणी शेतीमालाचे उत्पादन कमी झाले
सरकारने MAT (MINIMUM ALTERNATE TAX) च्या बाबतीत शह कमिशनचा रिपोर्ट स्वीकारला आहे. FII (FOREIGN INSTITUTIONAL INVESTORS), तसेच FPI (FOREIGN PORTFOLIO INVESTORS) यांना 1 एप्रिल २०१५ च्या आधीच्या काळासाठी MAT लागणार नाही असे जाहीर केले.
सरकारने सर्व हायड्रोकार्बन क्षेत्रासाठी मार्जीनल फिल्ड्स पॉलिसी जाहीर केली. या पॉलिसीअंतर्गत ६९ लहान आणी मार्जीनल ओईल फिल्ड्स्ची लिलावाद्वारे विक्री होईल असे जाहीर केले. तसेच या फिल्डमध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या हायड्रोकार्बन प्रोडक्शनसाठी एकच लायसेन्स जारी केले जाईल असे जाहीर केले. हा लिलाव रेवेन्यु शेअरिंग बेसिसवर होईल. GASप्राईस फॉर्म्युलाप्रमाणे ठरवलेली किंमत आधारभूत किंमत असेल. या लिलावाद्वारे सरकारच्या म्हणण्याप्रमाणे Rs ७०००० कोटींचे VALUE – UNLOCKING होईल. ओईल EXTRACTION हा भांडवलाडीष्ठीत उद्योग आहे. पण यांमध्ये मार्जीन चांगले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकाच्या NPA मधील वाढ चिंताजनक आहे. आपल्य BALANCE SHEETमधील NPA कमी करण्यासाठी सरकारी बँकांनी Rs ३०००० कोटीचे NPA विक्रीस काढले आहेत. यांत सेंट्रल बंकेचा नंबर पहिला आहे. हे NPA विकून सरकारी बॅंक्स आपल्या BALANCE SHEETSची साफसफाई करून सरकारने दिलेली लक्ष्ये पार करण्याच्या विचारांत आहेत
हायकोर्टाने TCS आणी CMC यांच्या मर्जरला मंजुरी दिली. अम्टेक ऑटो ग्रूपचे शेअर्स त्यांच्या कर्जबाजारीपणामुळे खूपच पडले. DLF आणी GIC यांनी दिल्लीच्या दोन प्रोजेक्टसाठी JOINT वेंचर केले. DLF आपल्यावरील कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे हे गुंतवणूकदारांना पसंत पडल्यामुळे शेअरची किंमत वाढली.
RISK MANAGEMENT करण्यासाठी CLEARING हाउसने १५ % मार्जिन पेमेंट अपफ्रंट मिळावे अशी सेबी कडे मागणी केली आहे. सगळ्या आर्थिक वेबसाईटवर १३ सप्टेंबरला होणाऱ्या सूर्य ग्रहणाची उलटसुलट चर्चा चालू आहे. हे सूर्यग्रहण आर्थिक दृष्टीने चांगले संकेत देत नाही. इतिहास पाहिल्यास दर सात वर्षांनी मार्केट कोसळते. 2001 २००८ साली मार्केट कोसळले होते. त्यामुळे पुम्हा सात वर्षांनी मार्केट जबरदस्त कोसळेल काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. सूर्यग्रहांयाच्या आसपास भरपूर पाउस पडेल असाही अंदाज वर्तवला गेल्यामुळे दुष्काळाचे संकट दूर होईल.
HENKEL AG ही जर्मन ग्राहकवस्तूउत्पादनक्षेत्रातील कंपनी JYOTHY LAB या भारतीय कंपनीत २६% हिस्सा मार्च २०१६ पूर्वी घेण्याच्या विचारांत आहे. जेव्हां JYOTHY LAB ने २०११ मध्ये तोट्यांत चालणारी हेंकेल इंडिया विकत घेतली होती तेव्हा ही BUYBACK ची ऑफर HENKELAG या कंपनीला केली होती. जर HENKELAG हे शेअर्स घ्यावयाचे ठरवले तर ते त्यांना Rs ५०० ते Rs ६०० या भावांत दिले जातील. हे शेअर HENKELAG मार्च २०१६ पर्यंत खरेदी करू शकते. हेंकेल(इंडिया) ही तोट्यांत चालणारी कंपनी विकत घेतल्यावर एका वर्षात JYOTHY LABने फायद्यांत आणली.
सिप्लाने हैदराबादच्या हेटेरो ड्रग्स या कंपनीचा USमधील दोन WHOLLYOWNED सबसिडीअरीस (INVAGEN आणी CAMBAR) US$ ५५० मिलियन्सला विकत घेतल्या. या खरेदीमुळे सिप्लाचा अमेरिकन जनरिक ड्रग्स मार्केटमध्ये प्रवेश होईल. ONGCने US$१.२५ बिलियन ला रोझनेफ्तच्या रशियामधील वान्कोर फिल्डमधील १५% स्टेक विकत घेतला या मुळे ONGC च्या ओईल उत्पादनांत 3MTPA वाढ होईल. या मार्केटच्या पडण्याचा प्रायमरी मार्केटमधील IPOवरही परिणाम झाला. प्रभात डेरी या कंपनीला त्यांच्या IPO चा प्राईसband कमी करून IPO संपण्याची मुदत वाढवावी लागली
सगळ्यांच्या मते आता मार्केटची घसरण थांबली पाहिजे. पण मी एक सांगू कां तब्येत बिघडायला वेळ लागत नाही पण सुधारायला वेळ लागतो. अधोगती झपाट्याने होते पण प्रगती होण्यास वेळ लागतो. या आठवड्यांत मार्केटमध्ये बातम्यांचा खुराक होता पण गुंतवणूकदार एवढे घाबरले आहेत की त्यांनी मार्केटची वाटच सोडून दिली. जिथे कुठे फायदा दिसेल ते शेअर विकून कॅशमध्ये बसणे सुरक्षित असे त्यांना वाटले. ब्रोकरच्या ऑफिसमध्येसुद्धा शुकशुकाट होता.
आपण सगळे इथेच चुकतो. तब्येत बिघडणे किंवा सुधारणे हे नैसर्गिक आहे. ती अन्न हवा पाणी भोवतालची परिस्थिती आणी मानसिकता यावर अवलंबून असते. तसेच शेअरमार्केटचेही आहे माणसाला I C U मध्ये ठेवल्यावर घाबरून चालत नाही उलट जास्त दक्षता घ्यावी लागते जास्त निरीक्षण करावे लागते. अशावेळी तुम्ही कसे निर्णय घेता आणी किती वेगाने घेता त्यावर तुमचे यश अवलंबून असते.

  • कोणते शेअर पडतायत
  • डिलिवरीबेस्ड विक्री आहे कां ट्रेडर्स विकत आहेत याकडे लक्ष द्यावे. ही माहिती दूरदर्शन वरील वाहिन्यांत दाखवली जाते.
  • शेअर्सचे भाव पडण्याचे कारण काय ?
  • मार्केटच्या सेक्टरवाईज आणी कंपनीवाईज रचनेत काही फरक झाला आहे कां ? आपल्या पोर्टफोलीओमध्ये
  • मार्केटच्या रचनेमधील बदलाप्रमाणे बदल करायची गरज आहे कां हे बघावे.
  • पडत्या मार्केटमध्ये stop loss ठेवूनच ट्रेड करावा.
  • विशिष्ट शेअरची किंमत पडत्या मार्केटमध्ये वाढत असेल तर त्याचे short-covering हे एक कारण असू शकते अशा वेळी खरेदी न करता तुमच्याजवळ असणारे शेअर्स विकून फायदा घरी आणावा.

मार्केटकडे बघण्याची नजर बदलली पाहिजे. जसे माणसाला औषधपाणी दिले, आहारांत बदल केला, पथ्य पाळले विश्रांती घेतली की तब्येत सुधारते त्याचप्रमाणे सभोवतालची परिस्थिती बदलली की आपले शेअर मार्केट सुद्धा I C U माद्जून जनरल वार्डमध्ये येईल. घाबरण्याचे कारण नाही. मार्केट खूप वाढल्यानंतर जेव्हां अव्वाच्या सव्वा फायदा होत असतो तेव्हां आपणाला आनंद होतो त्यावेळेला फसवणूक होते आहे असे वाटत नाही ? मग मार्केट पडल्यानंतरच आपण फसलो असे कां वाटावे. शेअरचा भाव वाढल्यानंतर शेअर्सची विक्री होणारच. विक्री वाढली की मागणीपुरवठा तत्वाप्रमाणे मार्केट पडणारच. मार्केट खूप पडल्यानंतर शेअर्स खूप स्वस्त झालेत म्हणून गुंतवणूकदार मार्केटमध्ये परत येतील व मार्केट वधारेल हे निसर्गाचे चक्र आहे. तुम्ही धीर धरा घाबरू नका एवढेच मी सांगू शकते. धीर धरी रे धीरापोटी फळे असती रसाळ गोमटी.