आजचं मार्केट – १३ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ मार्च  २०१९

आज क्रूड US $६६.८० प्रती बॅरल ते US $६६.९८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४४ ते US $१=Rs ६९.७२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०१ होता. फिअर आणि ग्रीड मीटर ६० वर होते.

मार्केटने आता भारतात स्थिर आणि सक्षम सरकार या निवडणुकीत निवडून येईल याची खूणगाठ मनाशी बांधली. सर्व प्रकारचे स्थैर्य (आर्थीक,सामाजिक, राजकीय) मार्केटला आवडते. त्यामुळे आज सेन्सेक्स, बँक निफ्टी ह्या निर्देशांकांनी ऑल टाइम हायपर्यंत मजल मारली आणि ब्ल्यू स्काय टेरिटरीत प्रवेश केला.

USA मध्ये क्रूडसाठी मागणी आणि पुरवठा दोन्हीही वाढत आहे. सौदी अरेबिया आपले क्रूडचे उत्पादन १ एप्रिल पासून ७० लाख बॅरलपर्यंत मर्यादित करेल.

मार्च २९ २०१९ ही ब्रेक्झिट अमलात आणण्याची तारीख आहे. UKची संसद या बाबतीत कोणताही निश्चित निर्णय घेत नसल्यामुळे या तारखेनंतर UK मध्ये सर्व प्रकारची अस्थिरता येण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रबराचा भाव कमी होत आहे कारण थायलंडमध्ये रबराचे प्लँटेशन खूप वाढले. त्या प्लांटेशनमधून आता रबराचे उत्पादन होऊ लागले आहे. उत्पादन वाढल्यामुळे रबराच्या किमती ३ आठवड्याच्या किमान स्तरावर आहेत. याचा फायदा टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल. उन्हाळा, सार्वत्रिक निवडणुकामध्ये मोटारसायकल आणि कार्स यांची वाढणारी मागणी, आणि रिप्लेसमेंट मागणी या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. उदा गुडईअर, JK टायर्स, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, केसोराम, CEAT, अपोलो टायर्स, TVS श्रीचक्र.
NMDC ने Rs ५.५२ प्रती शेअर्स अंतरिम लाभांश जाहीर केला. याची रेकॉर्ड डेट २५/०३/२०१९ आहे.

IOC या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी १९ मार्च २०१९ रोजी बैठक होईल.

MSTC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचा IPO १३ मार्च २०१९ ते १५ मार्च २०१९ या दरम्यान ओपन राहील. पहिल्या दिवशी IPO ३% सबस्क्राईब झाला.

टेक महिंद्राचा शेअर BUY BACK २५ मार्च २०१९ ते ५ एप्रिल २०१९ या दरम्यान ओपन राहील.

माईंड ट्रीमधील सिद्धार्थ यांचा स्टेक लार्सन आणि टुब्रो इन्फोटेक खरेदी करील. Rs ९५० ते १००० प्रती शेअर्स या भावाने हा स्टेक खरेदी केला जाईल अशी शक्यता आहे.

सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे GST किंवा RBI चा रेट कट अशा धोरणात्मक निर्णयांसाठी निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी काढावी लागेल. GST कॉन्सिलच्या १९ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीसाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली

IIP मध्ये विशेषतः कॅपिटल गुड्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात स्लो डाउन आणि CPI म्हणजेच महागाईत वाढ झाल्यामुळे आपल्या ४ एप्रिलच्या द्विमासिक वित्तीय धोरणात RBI कमीकमी ०.२५% रेट कट करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बजाज कन्झ्युमर केअर ( पूर्वीची बजाज कॉर्प) या कंपनीच्या प्रमोटर्सनी ६.८५% स्टेक ICICI PRU या कंपनीला विकला. ही कंपनी एक किंवा दोन ब्रॅण्डवर अवलंबून आहे. डाबर LTD या कंपनीकडून स्पर्धा वाढते आहे. कंपनी आपले बिझिनेस स्ट्रक्चर बदलत नाही.

TCI एक्स्प्रेस या कंपनीने UKETORU या जपानी कंपनीतील ७.७% स्टेक २ कोटी येनना खरेदी केला.
१९ मार्च २०१९ पासून २२ मार्च २०१९ या दरम्यान CPSE ( सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस) ETF चा Rs १०००० कोटींचा इशू ओपन राहील. यात ऑइल इंडिया, NTPC, NLC,ONGC, कोल इंडिया, IOC, BEL, SJVN, PFC, REC आणि NBCC या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाईल. यात कोणत्याही सरकारी बँकेचा समावेश नाही.
बोईंग ७३७ मॅक्स ह्या विमानांचा पुढील सूचनेपर्यंत उड्डाणासाठी वापर करू नये असे DGCA ने परिपत्रक काढले आहे. याचा फटका जेट एअरवेज (५ विमाने) आणि स्पाईस जेट(१३ विमाने ) या दोन कंपन्यांना बसेल. स्पाईस जेटने याच प्रकारच्या १०० विमानांसाठी कंपनीकडे ऑर्डर केली आहे. या परिस्थितीचा फायदा इंडिगो या कंपनीला होईल. जेटची बहुसंख्य विमाने आर्थीक अडचणींमुळे आधीच ग्राउंड झाली आहेत.

झायडस कॅडीला या कंपनीला पोटॅशिअम क्लोराईड कॅप्सूल विकण्यासाठी USFDA ची परवानगी मिळाली.
युनिकेम लॅबच्या झायलोप्रिम, आणि ALLOPURINOL या औषधांना USFDA ची मंजुरी मिळाली.

यात्रा ही कंपनी अबेक्स खरेदी करणार आहे. त्यासाठी यात्राचे व्हॅल्युएशन करण्याचे काम चालू आहे. यामुळे कॉक्स अँड किंग्स, थॉमस कूक याही कंपन्यांच्या व्हॅल्युएशनचा अंदाज येईल.

आता थोडे मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्याविषयी.

कोणत्याही शेअरची खरेदी करण्याआधी आपण तो ट्रेडिंगसाठी खरेदी करतो आहे का गुंतवणुकीसाठी हे निश्चित करावे. ट्रेडिंग हे शेअरच्या किमतीमध्ये अल्प मुदतीच्या चढउताराचा फायदा घेण्यासाठी केले जाते . तर गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठी सुप्रस्थापित प्रगतीशील कंपन्यांच्या शेअरमध्ये कंपनीचे फंडामेंटल विश्लेषण करून केले जाते. आपण ट्रेडिंग करत असलेल्या शेअरच्या किमतीतील चढ उताराचे तात्कालिक कारणांचा प्रभाव संपल्यामुळे शेअरच्या किमतीतील चढउतार कमी होतात. त्यामुळे ट्रेडिंगसाठी घेतलेला शेअर जर आपल्या बाजूने ट्रेड फायदेशीर झाला नाही तर जो स्टॉप लॉस तुम्ही ठरवला असेल त्या किमतीला विकून टाकावेत. ट्रेडिंगचे रूपांतर गुंतवणुकीमध्ये करण्याचे शक्यतो टाळावे. तसेच ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना तुमचा राजकीय, सामाजिक, नीतिमत्ता याविषयी कोणताही व्हू ट्रेडच्या आड येउ देऊ नका. तुमच्या आवडीनिवडीला थारा देऊ नका फक्त शेअरची नफा मिळवून द्यायची क्षमता लक्षात घ्या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७७५२ NSE निर्देशांक निफ्टी ११३४२ बँक निफ्टी २८८८४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.