Tag Archives: 10 tips for stock market in marathi

आजचं मार्केट – ८ November २०२३

आज क्रूड US $ ८१.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १०५ आणि VIX ११.०४ होते.
चीनची  निर्यात ६.५% ने कमी झाली. USA मध्ये क्रूडची इन्व्हेन्टरी वाढली. क्रूडसाठी मागणी कमी झाली. .
ITDC चे प्रॉफिट,उत्पन्न, मार्जिन वाढले.
यथार्थ हॉस्पिटल प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
कॅप्टन पाईप्स, डॉलर इंडस्ट्रीजचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
SJVNला UPCL ( उत्तराखंड पॉवर कॉर्पोरेशन) कडून २००MW पॉवर पर्चेस खरेदी करण्यासाठी  Rs २.५७ प्रती युनिट दराने LOE (लेटर ऑफ इन्टेन्ट) मिळाले. ही पॉवर बिकानेर सोलर प्रोजेक्टमधून घेतली जाईल.
अपोलो टायर्स चे प्रॉफिट YOY १६४.४% ने वाढून Rs ४७४.३० कोटी तर रेव्हेन्यू ५.४% ने वाढून Rs ६२८० कोटी झाला.
कमिन्स इंडिया चे प्रॉफिट YOY ३०% ने वाढून Rs ३२८.५० कोटी तर रेव्हेन्यू YOY  .६% ने वाढून Rs १९०० कोटी  झाला.
पॉवर ग्रीड चे प्रॉफिट YOY ३.६% ने वाढून Rs ३७८१.१४ कोटी तर रेव्हेन्यू YOY १% ने वाढून Rs ११२६७ कोटी झाला. कंपनीने Rs ४ प्रती शेअर इंटरींम  लाभांश जाहीर केला.
इंडिगो ची ३५ विमाने पॉवडर मेटल इशू ह्या इंजिनमधील प्रॉब्लेममुळे FY २४ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०२४) ग्राऊंडेड होतील.
नॉव्हेलिसचे मार्जिन वाढले. हिंडाल्कोचा नफा १७.५% ने वाढला तर उत्पन्न ९% ने कमी झाले.
इझी ट्रिपचा प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
प्रिन्स पाईप तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले.
झोमॅटोच्या ०.०२% इक्विटीमध्ये ( १२.६० लाख शेअर्स) Rs १२४ प्रती शेअर या दराने सौदा झाला.
KIOCL ने मंगलोरमध्ये उत्पादन युनिट पुन्हा सुरु केले.
वोल्टासला टर्म लोन दवारा Rs  ५०० कोटी उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मंजुरी मिळाली.
ल्युपिनने ‘ROCURONIUM BROMIDE हे इंजेक्शन  USA मध्ये लाँच केले.
हिंद नॅशनल ग्लास तोट्यातून फायद्यात आली.
GENSOL चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
ग्लॅन्ड फार्माच्या विशाखापट्टणम युनिटचे इन्स्पेक्शन करून USFDA ने EIR दिला. CAMS चे QOQ  प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs १० इंटरींम  लाभांशाची घोषणा केली.
एस्कॉर्टस कुबोटा राजस्थानात गिलोड मध्ये ग्रीनफिल्ड मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी Rs ४०० कोटींची गुंतवणूक करून जमीन खरेदी करणार आहे.
गुजरात पिपावाव चे प्रॉफिट, उत्पन्न मार्जिन वाढले.
प्रेस्टिज इस्टेटीचे प्रॉफिट ६ पट  वाढले. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
DCW चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. निकाल कमजोर आले.
ताज GVK चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले निकाल कमजोर आले.
पनामा पेट्रोकेम चे प्रॉफिट,उत्पन्न, वाढले
फर्स्ट सोर्स चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
ऑटोमोटिव्ह अक्सल्स चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
कावेरी सीड्सचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
गोदरेज इंडस्ट्रीजचे प्रॉफिट, उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
मान इंडस्त्री तोट्यातून फायद्यात आली, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
मेगा स्टार फुड्सचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले.
ग्राईंडवेल नॉर्टनचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
बोरोसिलचे प्रॉफिट. उत्पन्न, मार्जिन वाढले.
MOIL चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
एरिस लाईफसायन्सेस चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
रेस्टोरंट ब्रॅण्ड्स  एशिया चा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
वोन्डरेला हॉलिडे चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
साई सिल्क चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सेंच्युरी  प्लायवूड चे प्रॉफिट वाढले उत्पन्न, मार्जिन वाढले.
EV ( इलेक्ट्रिक व्हेइकल) क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी सरकार गुंतवणूकीची मर्यादा, आयात ड्युटीमध्ये सूट देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. US $ ४०००० पेक्षा जास्त किमतीच्या कार्सवर १००% ड्युटी  तर US $ ४०००० च्या आत किंमत असलेल्या कार्सवर ७०% ड्युटी लावली जाते. जर EV उत्पादक भारतात उत्पादन करण्याची खात्री देत असेल तर अशा कंपन्यांना सवलत दिली जाईल. PLI, फेम, आणि ACC योजनांचा फायदा देण्याचा प्रस्ताव आहे.
महिंद्रा एअरोस्पेस ही M & M ग्रुपची कंपनी एअरोप्लेन्स उतपादन करण्याच्या बिझिनेस बंद करणार आहे.
रेमंड चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
CESC चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
रुचिरा पेपर्सचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
 टीमलीजचे QOQ प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
SMS फार्माचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
अडाणी ग्रीन Rs १४००० कोटी गुंतवणूक करून त्याची क्षमता १४GW करणार आहे.
आयडिया फोर्ज चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
सालासार  टेक चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले.
सार्थक मेटल्सचे प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी झाले.
GENUS पॉवरला  Rs २२६० कोटींची ऑर्डर मिळाली.
आज OMC, पेंट्स, फार्मा, ऑटो, FMCG, मिडकॅप स्माल कॅप मध्ये खरेदी तर IT आणि बँकिंग मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
माझगाव डॉक्स चे प्रॉफिट ५६% ने वाढूनRs ३३३ कोटी रेव्हेन्यू ७%ने वाढून Rs १८२८ कोटी तर मार्जिन वाढून ९.७% झाले. Rs १५.३४प्रती शेअर लाभांश नोव्हेंबर २० रेकॉर्ड डेट  निश्चित केली आहे.
टाटा पॉवर चे YOY ७% वाढून Rs ८७६ कोटी झाले. रेव्हेन्यू YOY १२% ने वाढून Rs १५७३८ कोटी झाले. मार्जिन १९.६% होते. कंपनी ग्रीन सोलर सेल, आणि मोड्यूल मॅन्युफॅक्चरिंग ह्या नवीन क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रित करत आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६४९७५ NSE निर्देशांक निफ्टी १९४४३ बँक निफ्टी ४३६५८ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Gudi Padwa Share Market

गुढीपाडवा सण मोठा नाही आनंदा तोटा…

आपल्या सगळ्यांबरोबर या ब्लॉगच्या माध्यमातून मी हा तिसरा गुढीपाडवा साजरा करीत आहे.
या तीन वर्षांत मी माझ्या ब्लॉगमधील लिखाणामध्ये अनेक बदल केले.वेळोवेळी आपण कौतुक केलेत. माझा उत्साह वाढला. सन २०१४ साल संपल्यामुळे आपल्याला माझी वहिनीचा अंक मिळणे कठीण होईल हे ध्यानांत आल्याने या अंकांत छापून आलेले माझे लेख ब्लॉगवर टाकले. लोकांच्या शंका दूर करण्यासाठी ‘तुमचे प्रश्न‘ ‘माझी उत्तर‘ हे सदर सुरु केले.      गेल्या महिन्यापासून ‘मागोवा गेल्या आठवड्याचा’ हे नवीन सदर सुरु केले.
मी खरे पाहतां अतिशय सोप्या भाषेत ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु प्रश्न-उत्तरे  या सदरातून आलेल्या आपल्या प्रश्नावरून असे आढळले की शेअरमार्केटमध्ये व्यवहार कसे होतात हे कोडे आपणास उलगडले नाही.
प्रत्येक बातमी आल्यावर त्याचा परिणाम कोणत्या शेअरवर व किती प्रमाणांत होईल हे समजावून घ्यावे लागते.गेल्या आठवड्यांत काय काय घडले, कोणत्या बातम्या आल्या व त्याचा परिणाम काय झाला हे मी ‘मागोवा गेल्या आठवड्याचा’ या सदरातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
एखादा शोध लागतो पण त्या शोधाचा उपयोग व्यवहारांत कसा होईल हा विचार अधिक महत्वाचा ठरतो. एखादी धून तयार होते. जर ती धून त्या धूनवर तयार झालेले गीत आणी त्याचे चित्रीकरण यांची सुंदर सांगड बसली तरच ते गाणे सुंदर होते. एखाद्या कथेवर आधारीत एखादा चित्रपट किंवा नाटक तयार झाले तर ते पुस्तक किंवा ती कथा प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे एखाद्या बातमीचा परिणाम काय  आणी किती आणी कोणत्या शेअरवर होईल याची योग्य पद्धतीने सांगड घालून शेअर खरेदी करणे किंवा विकणे म्हणजेच शेअरमार्केटचे व्यवहार होय.. त्याचप्रमाणे वेळेवर निर्णय घेण, निर्णयाची जबाबदारी घेण, निर्णय फायदेशीर नसेल तर त्या व्यवहारातील चुका शोधून काढून पुन्हा तशी चूक न करण हे जमायला लागलं कि  म्हणजेच तुमची शेअरमार्केटमध्ये प्रगती झाली असे समजा.

आठवडा मार्केटचा – १६ ते २० फेब्रुवारी २०१५

हा आठवडा म्हणजे ‘TRUNCATED ’आठवडा होता.अहो ‘TRUNCATED’ म्हणजे काय ? तर माझ्या भाषेंत ज्या ट्रेडिंग आठवड्यांत मार्केटला सुट्टी असते.
ह्या आठवड्यांत बजेटचचं वातावरण होतं. मुळातच फुगा फुगल्यासारखे फुगलेले मार्केट काहीतरी छोट्याश्या कारणांनी पट्कन १५० ते २०० पाईंट पडत होते. आणी पुन्हा तेव्हढ्याच वेगाने बजेटसंबंधीची बातमी आल्यामुळे वाढतही होते. असा उनपावसाचा खेळ म्हणजेच गेला आठवडा.
सोमवारी इमारतीचा FSI वाढवून देणार अशी बातमी आली. ताबडतोब विश्लेषकांनी रिअलीटी सेक्टरमधील अमुक अमुक शेअर खरेदी करा असे सांगायला सुरुवात केली. थोडा वेळ गेल्यानंतर वाहिनीवाल्यांनी खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हां त्यांनी सांगितले की – “आम्हाला ही बातमी मिडीयामार्फतच समजली आहे. सकाळी वर्तमानपत्रातूनही वाचले. परंतु अधिकृत फाईनप्रिंट आमच्याजवळ नाही. त्यामुळे कुणाला फायदा होणार व किती फायदा होणार हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. अशा सवलती ठराविक इमारतींना, ठराविक एरियातील इमारतींना लागू असतात. सरसकट सर्व इमारतींना लागू होत नाही.” हे ऐकताक्षणी शेअर्सचे भाव कमी व्हायला सुरुवात झाली. सगळ्यांचाच गोंधळ उडाला. हे काही पहिल्यांदा घडलं नाही. अशावेळी फक्त घाई केल्यामुळे घात होतो. बातमीची पूर्णपणे शहानिशा करायला हवी आणि मगच काय ते करायला हवं.
मंगळवारी शिवरात्रीची सुट्टी होती.
हिरोहोंडाचे प्रमोटर ७०लाख शेअर्स ब्लॉकडीलमार्फत विकणार आहेत अशी मार्केटला खबर होती. त्यामुळे हिरोहोंडाचा शेअर तसा थंडच होता. Rs २६६४ ते Rs २७२३ या दरम्यान ७० लाख शेअर्सचा सौदा झाला. प्रमोटरनी  शेअर्स विकले म्हणून घाबरून जाऊन लोकांनी पण शेअर्स विकले असावेत. शेअरचा भाव जवळजवळ Rs१५०नी  पडला. तासाभरानंतर कंपनीने खुलासा केला की त्यांना ‘पिपावाव’ मध्ये गुंतवणूक कण्यासाठी पैशाची तरतूद करायची होती म्हणून त्यांनी त्यांच्या मालकीचे शेअर्स विकले. प्रमोटर जेव्हा स्टेक विकतो तेव्हा ते फारसे चांगले समजले जात नाही. कारण प्रमोटरना अंदरकी बात माहित असते. पण नेहेमीच असा अर्थ लावू नये. चांगल्या कंपनीचे शेअर्स कमी भावांत विकत घेण्याची ही एक संधीही असते. मध्यंतरी ‘INFOSYS’ प्रमोटरनी शेअर्स विकले तेव्हा ‘INFOSYS’ चा भाव Rs १९०० झाला होता. लोकांना कमी किमतीत शेअर्स घेण्याची संधी मिळाली होती.नंतर या शेअर्सचा भाव Rs३०० णे वाढला. म्हणजेच आलेली बातमी शेअर्सचा भाव आणी होणाऱ्या परिणामांचा अंदाज याचे गणित जर बांधता आले आणी ते अचूक ठरले तर चांगले यश मिळते.
सध्या मार्केटमध्ये बजेट आणी बजेट आणी त्या संदर्भांत येणाऱ्या बातम्या यांचेच पीक आले आहे. लेदर इंडस्ट्रीला ‘EXCISE’ मध्ये सूट मिळणार अशी बातमी येताक्षणी सर्वजण लेदर इंडस्ट्रीच्या संगीत खुर्चीमध्ये बसण्यासाठी धावले. ‘BATA’ ‘LIBERTY SHOES, MIRZA INTERNATIONAL या शेअर्सचे भाव चमकू लागले. त्याचवेळी बातमी आली की शैक्षणीक क्षेत्राला सवलत मिळेल. त्यामुळे ‘NIIT’ ‘ZEE LEARN’ ‘CAREER POINT’’NAVNEET’ या शेअर्सचे भले झाले. डिफेन्स सेक्टरकडे सरकारचे लक्ष वेधले आहे हे जाणून ‘BHARAT FORGE’ या कंपनीने ‘RAFAEL’ या कंपनीशी करारहि केला. त्यासरशी ‘BHARAT FORGE’  ‘B. F UTILITIES’ ह्या शेअर्सची किमत वाढली. डिफेन्सच्या भजनाचा लाभ ‘BEL’ ‘BEML’ या शेअर्सना होत आहेच. रेल्वेशी संबंधीत शेअर्सच्या किमती रोजच वाढत आहेत. ‘TITAGARH WAGON’ च्या शेअर्सच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
बजेटच्या संदर्भातील बातम्या लीक झाल्या आणी त्याचा फायदा ‘OIL&GAS INDUSTRY’ ला व्हावा अश्या इराद्याने बातम्या फुटल्या.  त्यामध्ये ‘RELIANCE INDUSTRY’ नाव गुरफटले. ‘RELIANCE’ चा शेअर आणी त्याबरोबर मार्केट पडणार हा अंदाज होताच. घडलेही तसेच. मार्केट २५० पाईंट पडले.
कोळसाखाणींचा लिलाव झाला ‘JSPL’ या कंपनीला Rs१०८ या दराने खाण मिळाली. संकटांत असलेला ‘JSPL’ चा शेअर वधारला. काल उरल्यासुरल्या सरकारी बँकसुद्धा वाढल्या.त्याचबरोबर अजयसिंगच्या ‘SPICEJET’ पुनरुज्जीवित करण्याच्या योजनेला सरकारने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे तोही शेअर वाढला. ‘SUZLON’ मध्ये संघवी गुंतवणूक करणार आहे ही बातमी आल्यावर त्या शेअरचा भाव वाढला. नेहेमी बजेटच्या वेळेला पडणारा ‘ITC’चा शेअर वाढतो आहे याचे आश्चर्य वाटले.
हे सर्व वातावरण डेट्रेड करणाऱ्यांना सोयीचे, शेअर्सच्या किमतीतील वाढ, वाढीचा वेग, आणी शेअरमधले ‘VOLUME’ अगदी हवे तसे. पण तुम्ही योग्यवेळी योग्य ठिकाणी राहून ट्रेड केला तरच. झाली तर दिवाळी नाहीतर शिमगा! पटकन गाडीत चढून पटकन उतरता आले पाहिजे.  राजापुरची गंगा आली की जसे लोक धावतात तश्यातलाच हा प्रकार. कारण ही गंगा फार थोड्या काळ  असते नंतर लुप्त होते.बऱ्याच जणांना त्यांचे अडकलेले शेअर्स चांगल्या भावाला विकायची संधी मिळाली. असा हा आठवडा उत्साहवर्धक होता. म्हणले तर फारसं काही घडलं नाही , मार्केट ठराविक रेंजमध्ये फिरत राहिले पण विशिष्ट शेअर्सच्या बाबतीत मात्र मार्केटने चांगला हात दिला.बहुतेक पुढचा आठवडा असेच वातावरण असेल.बजेटच्या दिवशी म्हणजे २८ तारखेला म्हणजे शनिवारी मार्केट चालु आहे. आणी त्यातच ‘FNO EXPIRY’ चा ही गोंधळ आहे. बघू या काय होते ते.

भाग ५१ – एक ‘IPO’ , बारा भानगडी !

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
२३ तारखेला होते लक्ष्मीपुजन! लक्ष्मीपुजनाचा कालावधी जेव्हढा वेळ असतो तेव्हढा वेळ शेअर मार्केट चालू असते. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर त्यादिवशी मार्केटमधले व्यवहार होत असतात. म्हणूनच या दिवसाच्या व्यवहाराला मुहरत ट्रेडिंग असे म्हणतात.  जे लोक शेअरमार्केटचा व्यवसाय करतात त्यांच्या दृष्टीने  मुहरत ट्रेडिंग हा फार जिव्हाळ्याचा आणि कौतुकाचा विषय. ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.
मी  सुद्धा  तुमच्याबरोबर हे तिसरे मुहूरत ट्रेडिंग साजरे करत आहे. हा योग साधून मी माझ्या शेअरमार्केटच्या प्रवासातील माझे काही अनुभव तुम्हाला सांगितले, तुमच्याशी गप्पा मारल्या त्यामुळे खूप मजा आली.परतू आपण गृहिणी ते शेअरमार्केट हा प्रवास करीत आहोत हे विसरून चालणार नाही. नेहेमी आपण प्रवास करीत असतो तेव्हां आपण एखाद्या मोठ्या स्टेशनाची वाट पाहतो. ते स्टेशन आले की काही खरेदी करतो गाडीतून खाली उतरतो, पाणी तसेच खाण्याच्या वस्तू घेतो, डब्यांत पुन्हा जागेवर येवून  गप्पागोष्टी, गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळतो.ग्रीन सिग्नल मिळतो, घंटा वाजते व पुढील प्रवास सुरु होतो. त्याचप्रमाणे आपण आतां शेअरमार्केटच्या पुढच्या प्रवासाला जाऊ.
शेअरमार्केटचा आपला प्रवास तुम्हाला आठवत असेलच. प्रथम आपण रद्दी झालेले शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ब्रोकर शोधला,  DEMAT, अकौंट आणि ट्रेडिंग अकौंट उघडला.शेअर विकायचे कसे याची थोडीशी माहिती घेवून रद्दी झालेले शेअर्स विकून थोडे भांडवल गोळा केले. त्यातून काही नवे शेअर्स खरेदी केले. थोडेसे इंट्राडे  ट्रेडिंग सुद्धा केले. आतां आपण ‘IPO’ च्या महत्वाच्या टप्प्यावर येवून ठेपलो आहोत. ४७ साव्या भागापासून टप्प्याटप्प्याने आपण ‘IPO’ ची माहिती घेत आहोत. या भागांत आपण ‘IPO’ चा फार्म भरताना माझी कशी तारांबळ उडाली हे पाहणार आहोत.
‘IPO’ चे फार्म ऑफिसमध्ये आले होते. मी ते फार्म घरी आणले व फार्म्स भरायचे ठरवले. इथेच माझी सत्वपरीक्षा सुरु झाली. प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती. माझ्या यजमानांना ‘IPO’ फार्म भरतां येत होता. ते फार्म भरून द्यायला तयारही होते.
मग तुम्ही म्हणाल ‘माशी कुठे शिंकली??
अहो पण व्यवसाय माझा मग फार्म मला भरतां यायला नको कां? मला वेळ नाही किंवा  फार्ममधले column समजत नाहीत म्हणून त्यांनी फार्म भरला तर अलग बात आहे ! परंतु मी चांगली शिकली-सवरलेली असताना त्यांच्याकडून फार्म भरून घ्यायचा म्हणजे ‘वेड घेवून पेडगावला जाणेच झाले’ . आणि समजा जर कधी यजमानांना फार्म भरायला वेळ झाला नाही किंवा त्यांची बदली झाल्यामुळे ते फार्म भरू शकले नाहीत तर मग मी व्यवसाय बंद करणार की काय? फार्म भरता आला नाही तर कोणावर तरी अवलंबून राहणे ओघाओघाने आलेच. हा सगळा विचार आल्याबरोबर यजमानांकडून किंवा कोणाकडूनही ‘IPO’चा  फार्म भरून घ्यायचा नाही असं ठरवलं. माझ्या व्यवसायातील  प्र त्येक गोष्ट मला करतां आली पाहिजे, कितीही चुका झाल्या तरी चालतील पण चुका कां होतात याची कारण शोधून आपल्यात सुधारणा करायची असं ठरवलं.
काही वेळा काही गोष्टी करताना का चुका होतात हेच कळत नाही कि एका वेळी १० जागी लक्ष द्यावं लागतं म्हणून असं होतं का ते माहित नाही.  मुलांचा अभ्यास घ्यायचा,  शाळेची वेळ साधायची, आवडीनिवडी सांभाळायच्या, गाण्याचे विध्यार्थी घ्यायचे, तेवढ्यात दारावरची बेल वाजली तर कोण आलाय ते बघा, फोन आला असेल तर तो घ्यायचा , त्यांत मुलांची भांडण आणि त्यांत फार्म भरायची घाई!
चुका होणार म्हणून वैतागून तर चालणार नव्हते. सुरुवातीला एकदोन फार्म फुकट जायचे.  मग मी शहाणी झाले. आधी फॉर्म नीट वाचायची सवय लावून घेतली, अगदी शाळेत गेल्यासारखं वाटलं पण इलाज नव्हता.  फार्ममध्ये कुठेकुठे आणि कायकाय भरायचे हे यजमानांना विचारू लागले. भरतां भरतां असे लक्षांत आले नावासाठी किंवा पत्त्यासाठी ठेवलेली जागा पुरेशी नसते.  तेव्हां लहान अक्षर काढून लिहायला सुरु केलं. फार्मवर ‘DEMAT’ अकौंट नंबर,  ‘PAN’ नंबर,  बचत खाते नंबर आणि चेक नंबर लिहावा लागतो. बँकेचा पत्ताही लिहायचा असतो. कितीही लक्षांत ठेवून लिहिलं तरी मनांत शंकेची पाल चुकचुकायची. लिहिलेला नंबर बरोबर की चूक हे पुन्हा पुन्हा बघून खात्री करून घ्यायचे मी पण मला हे सगळं फार कटकटीचे वाटू लागले. आपण प्रवासाला जातो तेव्हां नेमकं असंच घडतं . घराला कुलूप लावलं की हटकून विचार येतो ‘GAS’ बंद  केला ना, नळ बंद केला ना ! पंखा विसरला कां? कधी कधी कुलूप उघडून खात्री करतां येते परंतु घरापासून दूर अंतरावर गेल्यावर पुन्हा घरी येवून पाहणे शक्य नसते.यावर काहीतरी विचार करावाच लागतो. एकदा आम्ही हॉटेलमध्ये पहिले होते एका खटक्याला किल्ली अडकवली होती. आपण रूममधून बाहेर येताना दरवाजा बंद करण्यासाठी ती किल्ली काढली की रूममधल्या सगळ्या गोष्टी बंद होत असत. शंकाकुशंका येण्यास जागाच उरत नसे. अशीच काहीतरी उपाययोजना आपण केली पाहिजे असे माझ्या मनाने घेतले.
मी एक वही केली त्यांत फार्म भरण्यासाठी लागणारे सर्व नंबर व माहिती अचूक मोठ्या अक्षरांत व कोणालाही वाचता येईल अशी नीटनेटकी लिहून ठेवली. एका फाईलमध्ये लागणाऱ्या कागदपत्रांच्या ZEROX प्रती ठेवल्या त्यामुळे फार्म भरताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्या.अहो काय सांगू तुम्हाला ! पावलापावलावर अडचण उभी असे. माझ्या नावाचे SPELLING लांब लचक आणि फार्मवर असलेली जागा कमी त्यामुळे हे सगळं जमायचं कसं ! काही ठिकाणी आधी आडनाव, नंतर आपलं नाव , नंतर यजमानांचे नाव असं लिहायचं असे. त्यावेळी हटकून मी नेहेमीप्रमाणे प्रथम माझे नाव, नंतर यजमानांचे नाव नंतर आडनाव असे लिहित असे. त्यामुळे खाडाखोड ठरलेली. मग पुनः दुसरा फार्म भरायला घ्यायचा.फार्म फुकट मिळतात म्हणून ठीक ! नाहीतर किती नुकसान झालं असतं  कुणास ठाऊक ! कधी नाव कॅपिटल लेटरमध्ये लिहायचे तर कधी SMALL लेटरमध्ये लिहायचं,  चेकवरील नंबर समजायचा नाही, फार्म भरण्याची शेवटची तारीख लक्षांत ठेवली असली तरी त्याचवेळी नेमक्या घरांत काही अडचणी अशा येत की नेमका ऐनवेळेला फार्म भरावा लागे. त्यामुळे नाहक धावाधावी होत असे .
खरे पाहतां फार्म भरण्यासाठी तीनचार दिवस ठेवलेले असतात.पहिल्याच दिवशी फार्म भरून दिला तर त्याच दिवशीच्या तारखेचा चेकही द्यावा लागतो त्यामुळे कळत नकळत नुकसान होतं . सुरवातीला कितपत response मिळाला हे समजत नाही, आकडेवारी जाहीर होते पण त्यातून नक्की काही कळत नाही.  शेवटच्या दिवशी फार्म भरला तर ईश्युला कितपत response मिळालाय याची आकडेवारी, त्या इश्यूबद्दलची चर्चा,  वर्तमानपत्रातून मिळणारी माहिती या सर्वांचा विचार करून किती रकमेचा फार्म भरायचा हे ठरवता येतं. त्याप्रमाणे आपला निर्णय बदलताही येतो.त्यामुळे घाई गर्दी होऊ नये चुका होऊ नयेत म्हणून आधीपासून फार्म भरून देणे यीग्य नाही असे जाणवले .कधी कधी ऐन वेळेला अशी काही माहिती मिळत असे की भरलेला फार्म पाठवायचा नाही असा निर्णय घ्यावा लागे किंवा कमी रकमेचा फार्म भरावा लागे. कधी कधी पूर्ण रकमेसाठी फार्म भरला नाही तर शेअर्स मिळणार नाहीत असे वाटे. त्यामुळे भरलेल्या फार्ममध्ये बदल करून जास्तीतजास्त शेअर्ससाठी फार्म भरावा लागे त्यावेळी मात्र बँकेच्या खात्यावर तेव्हढे पैसे आहेत की नाही त्याची खातरजमा करून घ्यावी लागे. फार्मला जोडलेला चेक कधी पेमेंटसाठी येईल त्याप्रमाणे खात्याला रकम जमा करावी लागे.
हे आख्यान इथेच थांबत नसे. .फार्म पूर्ण भरून झाला की प्रथम भरलेल्या फार्मची ZErox काढूनच मी ऑफिसमध्ये देत असे. दुपारचे साडेतीन वाजले की नेमका यजमानांचा फोन येई.
‘फार्म देण्याच्या आधी तू नीट बघितलास ना?’
त्यावेळी पुन्हा एकदा मनाचा गोंधळ उडे . परंतु फार्मची ZErox कॉपी त्यांना मी दाखवीत असे.
त्यादिवशी त्यांनी मला फोनवर विचारलं –  ‘तू या वेळेला रकमेमध्ये फेरफार केल्यामुळे नवा चेक भरलास पण तो चेक क्रॉस केलास ना ?’
तेव्हां माझे धाबे दणाणले. मी चेक क्रॉसही केला नव्हता व चेकच्या मागील बाजूस APPLICATION  नंबर मोबाईल नंबर लिहिला नव्हता. मी घाबरत घाबरत ऑफिसमध्ये फोन केला तेव्हां त्यांनी सांगितले  – ‘तुम्ही चेक क्रॉस करायला विसरला होतात व माहितीही लिहिली नव्हती.परंतु आम्ही चेक क्रॉस  करून माहिती लिहूनच फार्म पाठविला आहे. काळजीही करू नका आणि घाबरूनही जाऊ नका. पुन्हा अशी चूक करू नका म्हणजे झाले.’
संध्याकाळी यजमान घरी आले व मला म्हणाले आपण B.COM. करताना हे सर्व शिकलो आहे. क्रॉस  केलेला चेक हरवला तरी त्याचा गैरवापर होत नाही. परंतु क्रॉस केला नसेल तर तो बेअरर चेक होतो आणि त्याद्वारे कोणीही रोख रकम काढू शकतो. त्यामुळे मला पुस्तकी शिक्षण आणि व्यवहार यातील फरक लक्षांत आला. डोक्यात चांगलाच उजेड पडला. त्या दिवसापासून कधीही पुन्हा अशी चूक माझ्या हातून झाली नाही.
अहो हा अध्याय इथेच संपत नाही. तुमचा फार्म पोचला याची खात्री काय ? जसा तुम्ही अभ्यास करतां परीक्षेचा पेपर लिहिता परंतु लिहिलेला पेपर  गहाळ होऊ शकतो परीक्षेला बसूनही गैरहजर असा निकाल येऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी HALL तिकिटावर निरीक्षकाची सही घेणे जरुरीचे असते. त्यामुळे तुम्ही परीक्षेला हजर होतात हे तरी सिद्ध होते. माझे यजमान या बाबतीत अतिशय ‘‘PARTICULAR’… ऑफिसला निघाले की मला आठवण करीत.  ‘आज भरलेल्या फार्मची पावती आठवणीने घेवून ये’ असे सांगत. ‘वेळांत वेळ काढून एवढे कर कारण मी घरी येईपर्यंत ऑफिस बंद होते’
त्यामुळे मी आठवणीने पावती आणून फाईलला लावून ठेवीत असे. चार दिवसांनी चेक पास झाला कां हे पाहायचे इश्यू किती वेळा SUBSCRIBE झाला, प्राईस BANDप्रमाणे कंपनी किती किमतीला शेअर्स देणार हे जाहीर होते याकडेही लक्ष ठेवायला लागे. अहो एक ‘IPO’ पण त्याच्या बारा भानगडी.
अशी ही ‘IPO’ चा फार्म भरण्याची साठां उत्तराची कहाणी व्यवस्थित काळजी घेतल्यास पांचाउत्तरी सफल आणि संपूर्ण होते. अशा या ‘IPO’ च्या नाटकाचे बरेच अंक आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्या बऱ्याच छटा अनुभवायच्या आहेत. पुढ्च्या भागांत आपण ‘IPO ‘ च्या ALLOTMENT  बद्दल थोडी थोडी माहिती दमादमाने घेवू.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भाग ५० – IPO – पुढच्यास ठेच मागचा शहाणा

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
सर्व वाचकांबरोबर दिवाळी साजरी करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. हा ५०सावा ब्लोग लिहिताना अत्यन्त आनंद होतोय. ५०साव्या भागापर्यंत नियमितपणे हा शेअरमार्केटचा प्रवास आपण सर्वजण  करीत आहोत. हा ब्लोग वाचून व माझी वहिनी मासिकातील लेख वाचून बरेचजण प्रत्यक्ष भेटण्यासाठी शनिवार रविवारी येत असतात. त्यांच्या शंकांना उत्तरे देतां देतां काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. बहुतेकांना न वाचता ,न जाणून घेता, न अभ्यास करतां ताबडतोब शेअरमार्केटचा व्यवसाय सुरु करायचा होता.
‘तुम्ही समजावून घ्या नंतर सुरुवात करा’ असे सांगितले तरी त्यांना पटत नसे. कोणी कोणी आपल्याजवळची स्टेटमेंट घेवून यायचे आणि म्हणायचे ‘यातील कोणते शेअर विकू, कधी आणि किती भावाला विकू’ म्हणजे त्यांना पांगुळगाडा बनण्यातच रस असायचा, आणि स्वावलंबी बनण्यात कोणालाच इंटरेस्ट नसायचा.  पण सर्वांचा एक प्रश्न मात्र जरूर असे “madam तुम्ही IPO मध्ये invest करतां कां? त्यात किती पैसे मिळतात.? तुम्हाला कधी घाटा झाला कां? घाटा झाला तर तुम्ही काय उपाय करतां?”
म्हणजेच माझे अनुभव ऐकण्यामध्ये त्यांना रस होतां. म्हणून मी या ५०साव्या ब्लॉगच्या निमित्ताने माझे ‘IPO’ च्या संदर्भातील वेचक अनुभव तुम्हाला सांगणार आहे. यावर्षी बरेच ‘IPO’ येणार आहेत. त्यामुळे  माझ्या या अनुभवांचा उपयोग तुम्हाला नक्की होईल असे वाटते.
मी मार्केटमध्ये शिरले तो काळ होता सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्याच्या निर्गुंतवणूक (DIVESTMENT) करण्याचा! त्या काळांत बरेच ‘IPO ‘ आले, बऱ्याच लोकांनी ‘DEMAT’ अकौंट उघडले. सामान्य लोकांनाही फायदा व्हावा व गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने किरकोळ गुंतवणूकदारांना ५% डिस्काउंट जाहीर झालेला होता. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी ‘ IPO’ साठी अर्ज करावेत व या नवरत्न कंपन्यांची मालकी  अधिकाधिक लोकांत वाटली जावी असे सरकारचे धोरण होते. हेच धोरण सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची  ‘ALLOTMENT’ करताना सरकारने राबविले.
त्यावेळी माझी आणि मार्केट्ची फारशी ओळख झाली नव्हती.मला ‘IPO’ चा फार्म भरतां येत नव्हता.  माझे यजमान फार्म भरत असत. कधी खाडाखोड होत असे. खाडाखोड झाली तर आपल्याला शेअर्स मिळणार नाहीत या भीतीपोटी फार्मचा बोळा करून फेकावा लागत असे.फार्म बरोबर भरला की नाही हे पुन्हापुन्हा तपासून बघून तो फार्म इमानेइतबारे ऑफिसमध्ये नेवून देण्याचे काम मी करीत असे.ही खबरदारी आवश्यक होती कारण फार्म भरताना काही चूक झाली तर शेअर्स तर मिळायचे नाहीत पण आपले पैसे मात्र २ महिने अडकून पडतील अशी भीती असायची.
पैशाची जूळवाजुळवी करणे हा नेहेमीचा उद्योग. या ‘IPO’ च्या वेळी आमच्या असं लक्षात आलं की आपल्या काही मुदत ठेवींची मुदत संपत आहे. तर या मुदत ठेवींचे renewal करण्यापेक्षा आपण हीच रक्कम ‘IPO’ साठी वापरून शेअर मिळाले तर उरलेली रक्कम पुन्हा मुदत ठेवींत गुंतवू.( दोन महिन्यानी पैसे परत आल्यावर) शेअर मिळाले नाहीत तर दोन महिन्यांनी पुनः मुदत ठेवी करता येतील. एक दोन महिन्याचे व्याज बुडेल एवढाच काय तो प्रश्न !  एवढा सगळा काथ्याकुट झाल्यानंतर मी त्या मुदत ठेवींच्या पावत्या बँकेत नेऊन दिल्या व त्या पावत्यांची रक्कम आमच्या बचत खात्याला जमा कराव्यात असं बजावलं. याच बचत खात्याचे चेक ‘IPO’ च्या अर्जाला जोडून आम्ही पाठवले आणि सुस्कारा सोडला. आठवडाभराने फार्म परत आले ‘FUNDS INSUFFICIENT’ असे कारण चेक ‘BOUNCE’ करताना बँकेने दिले होते. माझे डोके चालेनासे झाले. सर्व प्रकारची काळजी घेवूनही असे कां झाले हे कळत नव्हते. मी रागारागातच दाराला कुलूप ठोकले व बँकेच्या दारांत जावून उभी राहिले.  पासबुक कौंटरला जावून पासबुक भरून घेतले. माझ्या मुदत ठेवीची रक्कम खात्याला जमा झालेली नाही असे आढळले. त्यामुळे अर्थातच चेक पास होण्याएवढी पुरेशी रक्कम खात्यावर नव्हती हे उघड झाले. मी बँकेतल्या ऑफिसरला विचारले “माझी मुदत ठेवीची रक्कम माझ्या बचत खात्यावार जमा कां झाली नाही ?
“अहो तुमच्या मुदत ठेवीची मुदत संपली नसेल!
मी म्हणाले “ तुम्ही मला मूर्ख समजलात कां  मुदत संपली आहे की नाही हे पाहूनच तुम्ही माझ्याकडून मुदत ठेवींच्या पावत्या घेतल्यात”
“ तुम्हाला नक्की आठवते आहे ना की तुम्ही पावत्या दिल्यांत की तुमच्या पर्समध्येच राहिल्या”
मी त्यांना त्यांनी दिलेली पावत्यांची ACKNOWLEDGEMENT.दाखवली. मी त्यांना त्यांचा ड्रावर उघडून बघावयास सांगितला. त्यांच्या ड्रावरमध्ये माझ्या मुदत ठेवींच्या पावत्या जशाच्या तश्या होत्या. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. माझा पारा चढला आहे हे  पाहून ऑफिसर म्हणाले “अहो घाबरताय कशाला तेव्हढ्या दिवसांचे व्याज तुम्हाला देऊन टाकू.” त्या ऑफिसरला काय कल्पना की माझे किती नुकसान झाले त्याची! माझे चार चेक ‘BOUNCE’ झाले होते म्हणजेच चार फार्मला मला एकही शेअर मिळाला नाही. जर हे शेअर्स मला मिळाले असते तर मला भरपूर फायदा होऊ शकला असतां. कारण या शेअर्सचे लिस्टिंग दामदुपटीने झाले.एवढे झालेले हजारो रुपयांचे नुकसान ऑफिसर किंवा बँक नकीच भरून देणार नव्हते.त्याउलट माझे चार चेक ‘BOUNCE’ झाल्यामुळे माझी चूक नसतानाही Rs.४०० बँकेने माझ्या खात्याला वजा केले.म्हणजेच मला दंड पडला. मी हा दंड भरणार नाही आणि भरला नाही हे ओघाओघाने आलेच.माझी काहीही चूक नाही त्यामुळे माझा दंड माफ व्हावा असा मी बकेकडे अर्ज केला व बँकेनेही खुल्या दिलाने माझा दंड माफ केला.घरी आल्यावर मी एकदा विचार केला तेव्हां माझ्या लक्षांत आले ‘ज्याला आगत असेल त्याने स्वागत करायला शिकले पाहिजे’ जरूर मला होती नुकसान माझे होणार होते तर मग बँकेत जाऊन पासबुकमध्ये पैसे जमा केले आहेत की नाही हे पहिले असते आणि त्याच वेळेला १५ मिनिटे थांबून रक्कम खात्याला जमा करून घेतली असती तर पुढचे सगळे रामायण टाळता आले असते. शेअरमार्केट म्हणजे संधीसाधूगिरी असते. जर चेक पास झाले असते तर किती फायदा झाला असता या सर्व गोष्टी बँकेतील ऑफिसरच्या समजण्यापलीकडच्या होत्या.
हल्ली ‘ ECS  (ELECTRONIC CLEARING SERVICES ) पद्धतीने सर्व आर्थिक व्यवहार होतात. म्हणजेच रक्कम थेट खात्याला जमा होते किंवा खात्यातून वजा होते. त्यामुळे वेळ आणि खर्च दोहोंचीही बचत होते.एकदा एखादी पद्धत अमलांत असेल तर त्यापेक्षा काही वेगळे घडेल असे आपल्या ध्यानीमनीही येत नाही. असेच काहीसे ‘MOIL’या कंपनीच्या IPOच्या बाबतीत आमच्या अनुभवास आले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमाल मर्यादा Rs.२००००० होती. ‘MOIL’ ही कंपनी सरकारी शिवाय शेअर्स स्वस्त मिळणार म्हणून उधारउसनवार पैसे घेवून मुदत ठेवींवर कर्ज काढून फार्म भरला, ‘ALLOTMENT’ झाली शेअर्सही मिळाले. त्यानंतर लागलेल्या शेअर्सची रक्कम वजा जातां उरलेली रकम ‘ECS’ पद्धतीने थेट खात्याला जमा व्हायला हवी होती. ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. ज्यांनी ज्यांनी फार्म भरले होते त्यांची रक्कम खात्याला जमा झाली होती. त्याच पद्धतीने माझ्याही फार्मची रक्कम खात्याला जमा झाली असेल. दोन दिवसांनी जाऊन पासबुक भरून आणू असा विचार करत दोन दिवस गेले. बँकेत फोन केला त्यांनी सांगितले उद्या खात्याला रक्कम जमा केली जाईल . उद्या फोन करा. त्यानुसार दुसर्या दिवशी मी बँकेत गेले  माझ्या दोन खात्यांवर पैसे जमा झाले होते . पण एका खात्यावर मात्र पैसे जमा झाले नव्हते. मी बँकेच्या अकौंटटकडे चौकशी केली. ते म्हणाले ज्या खात्यांत जेव्हढे पैसे आले तेव्हढे आम्ही जमा केले. आम्हाला यापलीकडे काही माहित नसते. तुम्ही तुमच्या ऑफिसकडे चौकशी करा. नंतर मी पुन्हा ऑफिसमध्ये विचारले. तेव्हा ते म्हणाले प्रत्येक फार्मच्या शेवटी कोणत्या व्यक्तीकडे तक्रार करायची त्या व्यक्तीचे नाव आणि टेलीफोन/मोबाईल नंबर दिलेला असतो.
INVESTOR GRIEVANCES CELL ID, CONTACT PERSON AND COMPLIANCE ऑफिसरचे नाव आणि फोन नंबर दिलेला असतो. (48व्या भागामध्ये  जो फार्म दिलेला आहे त्याच्या मागच्या बाजूस ही माहिती दिलेली आहे.) तेथे तक्रार करा किंवा लेखी अर्ज करा. म्हणजे तुम्हाला खरी वस्तुस्थिती समजेल.तेव्हा आम्ही तेथे फोन केला. त्यांनी मला अर्जाचा क्रमांक आणि बाकी माहिती विचारली.आणि नंतर मला सांगितले तुमचा चेक रजिस्टर पोस्टाने पाठवला आहे. त्याचा रजिस्टर नंबर अमुक आहे. व हा चेक येथून अमुक तारखेला पाठवण्यात आला आहे. तुम्हाला दोनतीन दिवसांत मिळेल. पोस्टमन रजिस्टर देण्यास येणार घराला कुलूप बघून परत जाणार त्यामुळे चेक मिळण्यास उशीर होणार व आपले त्या रकमेवरचे व्याज बुडणार, हे सर्व टाळण्यासाठी मी स्वतःच पोस्टांत गेले. दोनतीन दिवस जावे लागले. त्यानंतर चेक मिळाला . तो जमा केल्यानंतर दोन दिवसांनी  पैसे मिळाले. या सर्व गोंधळामध्ये जवळजवळ सतरा दिवसांचा कालावधी लोटला.
त्यामुळे ‘ALLOTMENT ‘ झा;याबरोबर तुमची रकम खात्याला जमा झाली की नाही हे पहा. प्रत्येक वेळेला सिस्टीमप्रमाणे घडते असे नाही. तुमच्या बाबतीत विपरीत घडू शकते. आपली आपण काळजी घेतलेली बरी.
कधी कधी आळशीपणा चांगलाच भोवतो. खरे पाहतां ‘IPO’ येणार हे जाहीर झाले होते व मलाही माहित होते .फार्म भरायचा आहे हेही ठरलेले होते. चेकबुकांत दोन चेक शिल्लक होते. ‘IPO’ चा फार्म भरून झाला परंतु चेक भरताना खाडाखोड झाली. ऑफिसमधल्या काकांना विचारले “काय करू ?” तेव्हां ते म्हणाले “जेथे खाडाखोड झाली असेल ती सुधारा आणि त्याच्या बाजूला सही करा.म्हणजे हाच चेक चालेल. दुसरा चेक लावण्याची गरज नाही.” त्यामुळे खरे पाहतां प्रश्न मिटला होता. परंतु चेकबुकातून चेक काढून घेताना फाटला. आतां आली कां पंचाईत !तो चेक चालणार नव्हता. दुसरा चेक भरून द्या असे काकांनी सुचविले. पण चेकबुकांत चेक शिल्लकच राहिले नाहीत. बँकेतून नवीन चेकबुक आणायला हवे होते. चेकबुक रिक्विझिशन स्लीप भरून मी बँकेत गेले.  ती स्लीप बँकेच्या काउंटरवर दिली.आणि तेथेच थांबले.
तेव्हां बँकेतले ऑफिसर म्हणाले “तुम्ही कशाला थांबलात. हल्ली चेकबुक ताबडतोब मिळत नाही. चेकबुक तुमच्या घरी पोस्टाने पाठविले जाते.”
मी त्याना म्हटले “ पण मला चेकबुकची खूप गरज आहे. पोस्टाने चेकबुक मिळेपर्यंत १०-१२ दिवस लागतील. त्यामुळे दोन तीन लूज चेक दिलेत तरी माझी अडचण भागेल. मग १५ दिवसांनी चेकबुक मिळाले तरी चालेल”
ऑफिसर म्हणाले “ अहो लूज चेक हल्ली देता येत नाहीत आणि दिले तरी ते चेक कॅश काढण्यासाठी किंवा आमच्याच शाखेतील खात्यात रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी वापरता येतील.”
त्यामुळे प्रदक्षिणा पूर्ण करून मी ऑफिसमध्ये गेले.
काकांना सांगितले ‘१० -१२ दिवसांशिवाय चेकबुक मिळणार नाही असे बँकेचे म्हणणे आहे”. तेव्हां काका म्हणाले “ तुम्ही या वेळेपुरता डिमांड ड्राफ्ट /पेऑर्डर जोडून फार्म भरू शकतां.”
इलाजच नव्हता विनाशकाले समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः. मी यजमानांना फोन करून विचारले
“ काय करायचे. तेव्हां ते म्हणाले “शेअरमार्केटचा व्यवसाय तू करतेस तेव्हां तू निर्णय घे. पण मी तुला एकच सांगतो किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जी कमाल मर्यादा असते तेव्हढाच म्हणजे Rs.२००००० चा ड्राफ्ट काढल्यास Rs. ३०० ते ३५० ड्राफ्टसाठी कमिशन बसेल.”
हे सर्व ऐकून मी पूर्णपणे माघार घेतली.व ज्या ‘IPO’ बाबतीत सुरुवातीलाच एवढ्या अडचणी येत आहेत त्या ‘IPO’ चा नाद सोडलेला बरा. (ही पूर्वीची गोष्ट आहे आतां खाडाखोड झालेला चेक चालतच नाही.तसेच आतां तुम्ही दिलेला चेक दुसऱ्या दिवशीच पेमेंट साठी येऊ शकतो. तेव्हां आपल्या अकौटमध्ये आधी पैसे जमा करून मगच ‘IPO’ साठी चेक द्या.)
कधी कधी आपल्या हातून चूक होते पण ती इष्टापत्ती ठरते. परमेश्वरच आपणास वाचवितो असेच म्हणावे लागते.मध्यंतरी जेम्स & जुवेलर्री या क्षेत्राशी संबंधीत असलेल्या कंपनीचा ‘IPO’ आला. मी ‘IPO’चा फार्म भरला, सह्या केल्या, चेक भरला, तो जोडला, चेकच्या मागच्या बाजूस अर्जाचा प्रिंटेड नंबर आणि टेलिफोन नंबर लिहिला. मी व माझ्या यजमानांनी  पुन्हा पुन्हा तपासला. फार्म व चेक बरोबर भरला आहे याची खातरजमा करून घेतली व नंतरच फार्म दिला. आमच्या ऑफिसमध्ये फार्म बरोबर भरला आहे की नाही हे तपासूनच घेतात.ऑफिसमधला शिपाई भरलेले फार्म मुंबईच्या ऑफिसमध्ये घेवून गेला. दोन तीन दिवसांनी पास बुक भरण्यासाठी मी बँकेत गेले त्यावेळी माझा चेक पास झालेला नाही असे आढळले. बँकेत चौकशी केली तेव्हां त्यांनी मला सांगितले चेकवर लिहिलेली तारीख चुकीची होती त्यामुळे चेक पास होऊ शकला नाही. त्यामुळे ‘IPO’ फार्म रिजेक्ट झाला.
तेव्हां काका म्हणाले “ MADAMचा फार्म रिजेक्ट झाला म्हणजे शेअरचा भाव चांगला फुटणार नाही हे नक्की.”
बोलाफुलाला गाठ पडली. मध्यंतरीच्या काळांत गव्हर्नमेंटने नोटीफिकेशनद्वारे सरकारने सोन्याच्या आयातीवरचे निर्बंध वाढवले. यामुळे सोन्याच्या व्यवहारांत असणाऱ्या कंपन्यांचे नुकसान होणार होते. याचा या ‘IPO’च्या लिस्टिंगवरही परिणाम झाला.भाकीत केल्याप्रमाणे हा ‘IPO’ इशू प्राईसपेक्षा कमी किमतीला लिस्ट झाला. आणि भाव पडतच गेला. त्यामुळे परमेश्वरानेच मला वाचवले असे म्हणावे लागते. परंतु सगळ्यांच्याच नजरेतून चेकवरची चुकीची तारीख कशी निसटून गेली याचे आश्चर्य वाटले.
माझ्या चुका मीच माझ्या तोंडाने कबुल करणे हे योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. दुसर्या शब्दांत सांगायचं तर यालाचं लोक ‘अनुभव’ म्हणतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केल्यास तुमचाच फायदा होऊ शकतो. शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणे हा करमणुकीचा विषय नाही. सतत होणाऱ्या बदलांकडे लक्ष देवून आपल्या व्यवहारांत लवचिकता आणावी लागते. अखंड सावधानता बाळगावी लागते. तुम्ही शेअरमार्केटचा व्यवसाय सुरु करावा व त्यांत तुम्हाला यश मिळावे हीच इच्छा. दिवाळीच्या या शुभदिनी तुम्हाला पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा.

भाग ४७ – शेअरचं बाळंतपण अर्थात IPO

सकाळचे ८ वाजले. माझा डबा तयार झाला. यजमानांच्या कपड्यांना इस्त्री केली.त्यांचीही तयारी झाली.ते ऑफिसला जाण्यास निघाले. जातां जातां मला म्हणाले
“आज तू ऑफिसला जाणार असलीस तर फार्म्स घेवून ये. IPO (INITIAL PUBLIC OFFER )येतो आहे”
आतां तुम्हाला सांगायचं तर IPO म्हणजे शेअरमार्केटमध्ये बागडण्यासाठी,खेळण्यासाठी नव्याने दाखल होणाऱ्या बाळाची लागलेली चाहूल! बाळाची चाहूल लागली की जसं वातावरण बदलतं, अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण येतं, काय मग मुलगा की मुलगी? अशी चेष्टामस्करी सुरु होते त्याचप्रमाणे ब्रोकरच्या  ऑफिसमध्ये सुद्धा चर्चा चालू होते.
काही लोकांना याची माहिती आधीपासूनच असते. कोणत्या कंपनीने इशू आणण्यासाठी DRHP (DRAFT RED HERRING PROSPECTUS) दाखल केले आहे. ही कंपनी कोणत्या उद्योगांत आहे, इशू कधी येईल हे सगळं  माहित असतं. आता ज्या कंपनीचा इशू येणार आहे ती कंपनी ज्या उद्योगातील असेल त्या उद्योगातील शेअर्समधील खरेदी थोड्याफार प्रमाणांत वाढू लागते.या उद्योगातील शेअरला जास्तीतजास्त किती भाव मिळेल किंवा कमीतकमी भाव किती मिळेल याचा अंदाज येऊ शकतो.पण ज्या उद्योगातील शेअर्स मार्केटमध्ये लिस्टेड नाहीत तो शेअर किती रुपयाला लिस्ट होईल याचा अंदाज येऊ शकत नाही.कारण इतर शेअर्सच्या भावाशी या शेअरची तुलना करता येत नाही.उदा: स्टील उद्योगातील, हॉटेल उद्योगातील बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये आहेत परंतु “JUST DIAL” किंवा ‘JUBILANT FOODS’ या सारख्या उद्योगातील कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत.त्यामुळे स्पर्धाही नाही आणि काय स्वस्त काय महाग हेही समजत नाही. कधी कधी अश्या उद्योगातल्या शेअर्सच्या बाबतीत लोकांना खूप उत्सुकता असते. आणि अशा कंपन्यांचे “BUSINESS MODEL’ काय आहे PROFIT MARGIN’ किती आहे, आणि त्यांचा ग्राहकवर्ग कोणता यानुसार त्या कंपनीला काय भाव मिळेल हे ठरवाव लागतं.
अश्या नवीन उद्योगांत कार्यरत असणार्या कंपन्याना “ NICHE ‘ कंपन्या असे म्हणतात किंवा हिंदीमध्ये “जरा हटके” प्रकारच्या कंपन्या म्हणतात. मार्केटमध्ये हा इशू कुठला, लिस्टिंगला काही फायदा होईल कां ? किती रुपयाला इशू फुटेल,शेअर्स मिळतील कां ? असे एक ना अनेक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाभोवती रंगणाऱ्या चर्चा सुरु होतात. “ ग्रे मार्केट” मध्येसुद्धा वेगवेगळे अंदाज वर्तविले जातात. इशू प्राईसच्या वर किती रु. फायदा मिळेल याचा अंदाज व्यक्त होऊ लागतो. हे अंदाज खरे ठरतातच असे नाही या अंदाजांवर किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.
SEBI (SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA) च्या नियमाप्रमाणे प्रत्येक कंपनीचा “SWOT’ ANALYSIS’ देणे जरुरीचे असते. (STRENGTH, WEAKNESS, OPPORTUNITIES,THREATS ANALYSIS ) याचाच अर्थ कंपनीचे गुण-दोष, कंपनीला उपलब्ध असणाऱ्या वर्तमान तसेच भविष्यातील संधी आणि त्याबरोबर येणारे धोके यांची चर्चा केलेली असते.खरे पाहतां शेअर्ससाठी अर्ज करताना अर्जदाराने हे सर्व वाचणे जरुरीचे आहे. म्हणजे मग शेअर स्वस्त मिळतो आहे की महाग मिळतो आहे हे समजते.
पूर्वी अशी समजूत होती की ‘IPO’ मध्ये शेअर्स स्वस्त मिळतात. परंतु हल्ली मात्र असं दिसतं नाही. शेअर्सची प्राईस ठरवणार्यांकडून गुंतवणूकदाराचा काही फायदा व्हावा असा विचार होत नाही असं दिसतंय
वर्तमानपत्रातून, दूरदर्शनवरील वाहिन्यांवरून ‘IPO’ कॉर्नर सारख्या कार्यक्रमातून चर्चा होत असतात. तुम्ही त्या चर्चा ऐकून योग्य तो निर्णय घेत चला. मार्केटमध्ये मात्र काहीही घडू शकतं. तुम्हाला या गोष्टींचा अनुभव पदोपदी येतो. एखादा मुलगा एकुलता एक, देखणा , चांगली नोकरी, चांगला पगार सुस्थितीत असला तरी लग्न ठरता ठरत नाही.ते कां  याला काही उत्तर नाही. त्याचप्रमाणे एखाद्या कंपनीचे शेअर्स सर्व बाजू चांगल्या असूनही चांगल्या भावाला ( गुंतवणूकदाराला पुरेसा फायदा होईल अशा भावाला ) लिस्ट होत नाहीत. एखाद्या इशुच्या बाबतीत अनेक धोके असतात तरीही तो इशू चांगल्या किमतीला लिस्ट होतो . काय करावे काही कळेना अशी अवस्था होते!पण अशा गोष्टी अपवाद म्हणून सोडून देत चला.
शेअर्स मिळेल किंवा न मिळेल याची अनिश्चितता आलीच. त्यातून शेअर्स कोणाला व किती द्यायचे हे संगणक ठरवतो.  मार्केट मधले लोग तसे वेडेच, ते फार्मवरील प्रिंटेड नम्बरातील आकड्यांची बेरीज, फॉर्म भरायचा दिवस व ब्रोकरच्या ऑफिसमध्ये द्यायची वेळ हे सगळ बघतात!! अगदी ज्योतिष्याचाही सल्ला घेतात. ऐकून काय सगळी मजा चालू असते.
मी ऑफिसमध्ये गेले तेव्हां फार्मचा गठ्ठा ठेवला होता.लोक फार्म घेवून जात होते. परंतु फार्म भरून देण्याची शेवटची तारीख ३ आठवडे दूर होती. विचार केला आत्तापासून फार्म घेवून काय करायचे आहे? मी फॉर्म घेत नाही असं बघून ऑफिसमधल्या गृहस्थांनी आठवण केली
“अहो MADAM ‘IPO’ चा फार्म घेवून ठेवा. भरा किंवा भरू नका .फार्मला काही पैसे पडत नाहीत. २-३ फार्म जास्तच घ्या खाडाखोड झाली तर उपयोग होतो. कधी ऐनवेळी फार्म मिळत नाहीत. कधी फार्मचा काळाबाजार  होतो .एक ना अनेक अनुभव गाठीशी आहेत हो ! नंतर उगीचच कुणाचे OBLIGATION  घेण्यापेक्षा फार्म्स घेवून ठेवा.तसाही तुम्हाला अभ्यास करायचा असतो माहिती मिळवायची असतेत्यासाठी लवकर फार्म घ्या.”
फार्म्सबरोबर ABRIDGED PROSPECTUS म्हणून काही पानांत सेबीच्या नियमानुसार माहिती दिलेली असते.ण ऑफिसमधल्या फार्मबरोबर माहितीची पानं नव्हतीच.
काका म्हणाले “अहो कुणाला माहिती वाचायची नसतेच. मी तुमच्यासाठी अख्खा फार्म देतो.तुम्ही वाचा आणि मलाही सांगा. काय?”
मी एक फार्म घेतला व वाचायला सुरुवात केली. शेअर्स किती किमतीला देऊ केले आहेत, किती रकमेची जुळवाजुळव करावी लागेल, काही खर्चांना काटछाट करावी लागेल कां ?कुठल्या मुदतठेवी सुटत असतील तर रिन्यू न करतां ती रकम इशूसाठी वापरावी की दादांकडून म्हणजेच माझ्या वडिलांकडून उसने पैसे घ्यावेत. की सगळ्या खात्यांवरचे पैसे काढून एका खात्याला जमा करावेत.एक ना अनेक विवंचना असतात.
काकांना विचारलं – “ एका बँकेत एवढी रक्कम येणार कुठून? चार चेक दिले तर चालतील कां?” तर काकांना हसूच आले.
ते म्हणाले – “ अहो सगळी रक्कम एका खात्यावर जमा करून घ्या नंतर त्या खात्याचा चेक द्या. नाहीतर मुदत ठेवींवर कर्ज घ्या, शेअरचे लिस्टिंग झाल्यावर लागल्यास शेअर्स विकून किंवा शेअर्स लागले नाहीत तर पैसे परत आल्यावर कर्ज फेडून टाका. १ ते २ महिन्याच्या व्याजांत भागेल.अजून ३ आठवडे आहेत. तुम्ही बँकेत जा कर्ज मिळायला किती वेळ लागतो त्याची चौकशी करा. कर्ज मंजूर करून ठेवा, म्हणजे लागल्यास वापरता येते. संधी गमावली जात नाही. मुदत ठेवीवर जेवढे व्याज मिळते त्यापेक्षा २%व्याज जास्त आकारतात. समजा तुमची मुदत ठेव ९% व्याजाने असेल तर कर्जावर ११% व्याज द्यावे लागते. म्हणजे तुम्हाला २% चा फटका बसतो. म्हणजे साधारण २%ने  १ महिन्याचे व्याज जाते. परंतु ‘RETAILER’ साठी जास्तीतजास्त जेवढा फार्म भरतां येतो तेव्हढा भरल्यास शेअर्स लागण्याची शक्यता वाढते इतकेच ! पण तेथेही शेअर्स लागतीलच अशी खात्री देता येत नाही.परंतु आपल्या हातांत जे असते ते करावे.”
पूर्वी माझे यजमान जेव्हा फार्म भरत असत तेव्हा हे सगळं काही काही कळत नव्हतं. तेव्हां मिनिमम शेअर्ससाठी फार्म भरत होतो आणि शेअर्स लागत नव्हते.त्याकाळी ट्रेडिंग अकौंटही नव्हता आणि DEMAT अकौंटही नव्हता. फार्म बरोबर भरला किंवा नाही हे कळायला मार्ग नव्हता. हल्ली तसं होत नाही. स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ब्रोकर फार्म तपासून घेतो. त्यामुळे फार्म भरायला चुकला या कारणासाठी फार्म रिजेक्ट होत नाही.
मी त्यादिवशी साडेतीनपर्यंत ऑफिसमध्ये बसले नाही. फार्म घेतले,पाहुणे येणार होते म्हणून लवकर घरी आले. रात्री यजमान आल्यावर त्यांना फार्म दिले. सर्व वृतांत घडाघडा कथन केला.
ते वैतागले , मला म्हणाले – “पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू नकोस. तुला काय म्हणायचे ते मला समजले. पैशाची व्यवस्था कशी करायची ते पाहतो. गरज पडली तरच कर्जाच्या ‘OPTION’ चा विचार करू. ‘CALCULATED RISK’ घेण्यास काहीच हरकत नाही. पण आतां मिनिममसाठी फार्म भरायच्या ऐवजी ‘MAXIMUM’ साठी फार्म भरू या एवढे आश्वासन मी तुला देतो. झोप आतां उद्या बघू”
यजमान कंटाळले तसे तुम्ही पण कंटाळला असाल आता. थोडी विश्रांती घेवूया आणि पुढच्या भागात भेटूया..
भाग ४६ वाचायला इथे क्लिक करा

भाग ४५ – खरेदी विक्री करत रहावी !!

तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडेसे भांडवल जमा झाले. अर्थातच रद्दी झालेले शेअर्स विकुनच. परंतु एक गोष्ट मात्र खरी रद्दी विकून पैसे येवोत, जुनी भांडी मोडीला घालून पैसे मिळोत शेवटी पैसा तो पैसाच. या पैशाचे मूल्य व पगारातून मिळालेल्या पैशाचे मूल्य यांत काही फरक नसतो .पैश जपूनच वापरायचा हेच खरे !
बहुतेक गृहिणींना बाजारहाट करण्याची सवय असते. काय खरेदी करायचं, कधी खरेदी करावयाचं , कोणत्या भावाला खरेदी करावयाचं, किती खरेदी करावयाचं, कोणत्या गुणवत्तेचे खरेदी करावयाचं व प्राधान्य कशाला द्यायचं हे शिकवाव लागत नाही. परंतु शेअर मार्केटच्या बाबतीत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अनुभवातूनच शोधावी लागतात.
शेअरमार्केटशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही हे मला पटले होतं. मी त्यावेळी जे शेअर्स खरेदी केले त्याचा उपयोग आत्ता होईल असं वाटत नाही. त्यातल्या काही कंपन्या सध्या अस्तित्वात नाहीत. या कंपन्यांचे दुसऱ्या मोठ्या कंपनीत विलीनीकरण झाले अथवा दुसरया कंपनीने या कंपन्यांना विकत घेतल्यामुळे या कंपन्यांचे स्वतंत्र अस्तित्व उरले नाही, उदा. बोन्गाईगाव रिफायनरी, कोची रिफायनरी, IBP, UTI BANK.  CESC व G.E. SHIPPING या दोन कंपन्या मात्र त्याच नावाने अस्तित्वात आहेत. ही नावं वाचल्याबरोबर तुमच्या एक लक्षात आलं असेल ते म्हणजे अश्या कंपन्यामध्ये गुंतवणूक म्हणजे सुरक्षितता, कंपनी बुडण्याची भीती कमी आणि शेअरवर मिळणार्या लाभांशाचे प्रमाण जास्त. पण या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सरकारी धोरणावर अवलंबून आणि या कंपन्या संपूर्ण व्यापारी वृत्ती ठेवून काम करीत नाहीत. समाजाचे हित पाहिले जाते. असे बहुतेक शेअर्स सरकारच्याच मालकीचे असतात. त्यामुळे या शेअर्सचा भाव खूप वाढत नाही. या सर्व गोष्टी हळू हळू लक्षांत येत गेल्या. या शेअर्समधील गुंतवणूक म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक हे सुद्धा लक्षात आलं .
त्यावेळी माझी अवस्था अडाण्याप्रमाणेच होती. कोणता शेअर स्वस्त आणी कोणता शेअर महाग याचा गंध नव्हता. TV वर लाल रंगात दिसले की भाव पडला आणी हिरव्या रंगात दिसले की त्या शेअरचा भाव वाढला एवढीच काय ती तोडकी मोडकी अक्कल. परंतु हा शेअर बुक VALUE च्या कितीपट चालू आहे. मार्केटमध्ये या सेक्टरमधल्या कंपन्यांना किती भाव मिळतो हे काही मला माहित नव्हतं.
इतर प्रकारची बाजारहाट करण्यामध्ये माझा हात धरणारा कोणी नव्हता. मला लहानपणी बाजारमास्तरच म्हणत असत. मी चोखंदळ ग्राहक होते. बाजार करायला मला आवडायचं आणि यायचंसुद्धा . बाजारहाट करताना सगळ्यांची जी काय फजिती होते ती मी डोळ्यांनी पहिली आहे.एकदा माझ्या मैत्रीणीला आईनी अंबाडीची भाजी आणायला सांगितली पण तिला अंबाडीची भाजीच ओळखू येत नव्हती. आणी किती रुपयाला जुडी मिळते हेही माहित नव्हते. एकदा वैशालीला पोहे घ्यायचे होते पण कसले पोहे जाड की पातळ, तळायचे  पोहे की नायलॉनचे, ज्वारीचे की तांदुळाचे हे काहीच कळत नव्हते. या सगळ्या समस्या मला कधी आल्या नाहीत पण  शेअरमार्केटच्या बाबतीत मात्र मला अनेक प्रश्नांची उत्तरे चौकस बुद्धीने शोधावी लागली.
लहान लहान लॉटमध्ये खरेदी करायची आणी कमीतकमी भावाला खरेदी करायची एव्हढेच माहित होते. ,आमच्या जमान्यात जेव्हां बाजारहाट करायचो तेव्हां ती वस्तू आईला किंवा सासूला पसंत पडली की काम फत्ते. पण शेअर्स खरेदी केल्यानंतर तो पसंत पडो किंवा न पडो त्याचा भाव वाढायला हवा आणी विकल्यानंतर फायदा व्हावयास हवा हा कळीचा मुद्दा!
कमीतकमी भावाला खरेदी करायची हे पटले परंतु कमीत कमी भाव तरी कोणता, हा भाव ठरवायचा कसा! अहो १०० मार्कांचा पेपर असतो तेव्हां १००पैकी १०० मार्क मिळाले की सर्वांत जास्त आणी १०० पैकी ३५ मिळाले की उत्तीर्ण होण्यापुरते आणी त्यापेक्षा कमी मिळाले की तोच अभ्यास परत करायला लागतो. परंतु शेअरमार्केटच्याबाबतीत मात्र अशी काहीच व कोणतीच मर्यादा नाही.  ‘SKY IS THE LIMIT ‘  भाव कां वाढला किंवा कां कमी झाला याचे उत्तर सापडणे कठीण. प्रत्येक विश्लेषक ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु तेच विश्लेषण बरोबर असेल असे छातीठोकपाने सांगता येत नाही.त्यामुळे सातत्याने निरीक्षण करणे हाच एकच रामबाण उपाय.
समजा शेअरचा भाव ८८रुपये चालू आहे तर ८५रुपये या भावाला शेअर खरेदी करावेत असे मी ठरवत असे. १०० शेअर्स खरेदी करायचे असले तर प्रत्येकवेळी २५ २५ शेअर्स खरेदी करण्यासाठी ऑर्डर टाकत असे. कारण मीच माझी मुखत्यार होते. घरांत कुणाला शेअरमार्केटबद्दल समजत नव्हते. समजा मार्केट वाढत राहिले, ऑर्डर लावलेल्या भावाला शेअर्स मिळाले नाहीत तर शांतपणे दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑर्डर लावायची. पण समजा दुसऱ्या दिवशी मार्केट पडत असेल तर ८३रुपयाच्या ऐवजी ८१रुपयाला ऑर्डर लावायची. मार्केट पडण्याचा जोर जास्त असेल तर ८१रुपयाची ऑर्डर बदलून ७७रुपयाची ऑर्डर लावत असेल आणी मार्केट्ची वेळ संपत आली असेल तर ऑर्डर काढून टाकून पुन्हा दुसऱ्या दिवशी नवी विटी नवे राज्य चालू करायचे.
मी त्या काळामध्ये ऑफिसमध्ये जाऊन बसत असे. माझे दोन दिवस ऑर्डर लावण्यांत आणी काढण्यांतच फुकट गेले. मी लावलेल्या भावाला शेअर्स मिळालेच नाहीत.त्यावेळी मला एक गुरु भेटला.
ते गृहस्थ म्हणाले
“ madam, आपण कोणत्याही शेअरचा ‘TOP’ किंवा ‘BOTTOM’ अचूक पकडू शकत नाही. मोठ्या मोठ्या फुशारक्या मारणाऱ्यांची सुद्धा येथे गाळण उडते. त्यामुळे सारासार विचार करून खरेदी करा. शेअरमार्केटमध्ये गरज हा मुद्दाच नाही. जवळजवळ ६०००शेअर्स आहेत.अमुकच शेअर अमुकच भावाला आणी आजच घेतला पाहिजेअसे तुमच्यावर बंधन नाही.  नुसती ऑर्डर सातत्याने बदलून तुम्हाला काय साधणार . तुमचे शेअर्स खरेदी होणारच नाहीत त्यामुळे ते शेअर्स विकून फायदा मिळविणे ही दूरची बात! नुसते कष्ट मात्र होतील आणि पदरांत काहीच पडणार नाही.त्यापेक्षा तुम्हाला जो शेअर खरेदी करावयाचा असेल त्याची माहिती इंटरनेटवरून मिळवा. तुम्हाला त्या शेअरचा कमीतकमी भाव किती होता व जास्तीतजास्त भाव किती होता हे समजेल. LOW भावाच्या जवळपासच्या किमतीला खरेदी करा व HIGH भावाच्या जवळपास विका. म्हणजेच आपण धोका किती पत्करत आहोत व फायदा किती होणार आहे हे समजू शकेल.सुरुवातीला थोडी भीती वाटते पण त्याला इलाज नाही.”
मी ऑफिसमध्ये असतानाच दोन व्यवहारांकडे माझे लक्ष गेले. एका माणसाने त्याच दिवशी ८३रुपयाला घेतलेले १००शेअर्स ८५ रुपयाला त्याच दिवशी विकले एका तासांत खरेदी-विक्री करून २००रुपये गाठीला बांधून तो मोकळा झाला. पण त्याच वेळेला दुसऱ्या माणसाने ८५रुपयाला घेतलेले शेअर्स ८३रुपयाला विकले. वारंवार विचार करूनही या व्यवहारामागची त्या माणसाची भूमिका माझ्या लक्षांत आली नाही. अज्ञान उघडे केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही त्यामुळे लाज वाटत असली तर ती  खुंटीला टांगून ठेवली पाहिजे. असा विचार करून संकोच न बाळगता मी त्या व्यक्तीला त्याच्या व्यवहाराचे कारण विचारले.
तेव्हां तो माणूस म्हणाला
“ तासाभरांत फारशी मेहेनत न  करता दोनशे रुपये मिळत होते ते पदरांत पडून घेतले इतकेच.मी INTRADAY करण्याच्या उद्देश्याने शेअर्स खरेदी केले नव्हते. ८० रुपयाला हे शेअर्स मिळायला पाहिजे होते असे मला वाटते. उद्या ८०रुपयाला मिळतात कां हे पाहीन.”
मी त्यांना म्हटले “ माझ्यावर रागाऊ नका मी तुमच्या व्यवहारांवर लक्ष ठेवते असे समजू नका. शेअरमार्केट शिकणे एवढाच एक कलमी कार्यक्रम आहे.’
ज्या दुसऱ्या व्यक्तीने घाटा सोसून शेअर्स विकले त्यांनाही मी विचारले की
“नुकसान सोसून शेअर्स विकण्याचे कारण काय? कारण सांगण्यासारखे असेल तर मला सांगा.”
ते म्हणाले
“ ८३रुपये हा माझा “STOP LOSS’ होता. हा ‘STOPLOSS’ मी लावला होता त्यामुळे ८३रुपये भाव होताक्षणीच माझे शेअर्स आपोआप विकले गेले. MADAM आज रागाऊ नका आज मला घरी जायची घाई आहे. ‘STOPLOSS ’ म्हणजे काय तो का लावावा ही माहिती  मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगितली तर चालेल कां ?”
त्यांना जायचं होतं तसं आत्ता मला पण निघायचं पण आपणसुद्धा “STOPLOSS’ विषयीची माहिती पुढच्या भागांत घेवू… बोलूनच लवकर