Tag Archives: bonus share information in marathi

भाग ६३ – डीलीस्टिंग चे details – Vedanta

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा 

भाग ६३ – डीलीस्टिंग चे details – Vedanta

वेदान्ता ही धातू क्षेत्रातील कंपनी आहे .वेदांताचे नाव आधी सेसा गोवा होते.स्टरलाईट इंडस्ट्री सेसा गोवा मध्ये मर्ज झाली नंतर सेसा स्टरलाईट असे नाव झाले. CAIRN चे तिच्यात मर्जर झाल्यावर ११ एप्रिल २०१७ मध्ये वेदांता असे नाव झाले. यात प्रमोटर होल्डिंग ५१.०६% आणि इतरांचे ४८.९४% शेअर होल्डिंग आहे. ही नॅचरल रिसोर्सेस कंपनी झिंक, लेड, सिल्व्हर, कॉपर, ऍल्युमिनियम, आयर्न ओअर, ऑइल &गॅस आणि पॉवर क्षेत्रात काम करते . एकवेळ अशी होती की वेदांताच्या शेअरचा भाव Rs ५००० प्रती शेअर होता तर शेअरची किंमत २०१६ मध्ये Rs ५६ होती. कारण त्यांच्या तुतिकोरिन आणि गोव्यामधील प्लांट्सचे काम ठप्प झाले. त्यामुळे रेव्हेन्यू कमी होत गेले आणि कर्ज वाढत गेले.

यावर्षी कोरोनामुळे मार्केट पडू लागले तेव्हा पुन्हा एकदा मार्चमध्ये वेदांताचा भाव Rs ६० प्रती शेअर झाला. ही डीलीस्टिंगसाठी चांगली संधी आहे. आमच्या शेअरला भाव येत नाही आम्ही डीलीस्ट करतो असे सांगता येईल. आणि डीलीस्टिंगसाठी रक्कमही कमी द्यावी लागेल.असा विचार वेदांताच्या प्रमोटर्सने केला. पण शेअर्स विकत घेण्यासाठी फंड हवेत म्हणून रक्कम गोळा करणे सुरु झाले. US $ ३.१५ बिलियन गोळा केले. US $१.७५ बिलियन बँकांकडून ३ महिन्यासाठी टर्म लोन घेतले. US $ १.४ बिलियन चे ३ वर्ष मुदतीचे अमॉर्टीझेशन बॉण्ड्स इशू करून रक्कम उभी केली.. त्यापैकी US $ १.९ बिलियन एवढ्या सिक्युरिटीज २०२१ मध्ये मॅच्युअर होतील. त्यामुळे कर्ज Rs १२५००० कोटींच्यावर गेले. याचवेळी कॉपर आणि आयर्न ओअर बिझिनेसमध्ये रेग्युलेटरी इशू आले. तुतीकोरिन आणि गोव्यामधील आयर्न ओअर चे प्लांट्स बंद राहिले. त्यामुळे वेळेवर कर्जाची फेड करणे कठीण झाले.

वेदांतामध्ये पब्लिक शेअरहोल्डिंग ४९.४९% आहे म्हणजेच १८३.९८ कोटी शेअर्स आहे कंपनीने मे २०२० मध्ये व्हॉलंटरीली डीलीस्ट करायचा निर्णय घेतला. डीलीस्टिंगसाठी इंडीकेटीव्ह फ्लोअर प्राईस Rs ८७.५० ठरवली.जी इंडीकेटीव्ह प्राईस ऑफर केली आहे त्याच किमतीला शेअर्स घेतलेच पाहिजेत असे कंपनीवर बंधन नाही तसेच शेअरहोल्डर्सनी या किमतीला शेअर्स दिले पाहिजेत असेही शेअरहोल्डर्सवरही बंधन नाही या शेअरची बुकव्हॅल्यू Rs १९२.९० होती. ऑइल ऍसेट राईट ऑफ आणि काही अडजस्टमेन्ट दाखवून बुकव्हल्यू कमी दाखवली. Rs १७१३२ कोटी इम्पेअरमेंट ऑफ ऍसेट्स इन ऑइल गॅस, कॉपर आणि आयर्न ओअर म्हणून राईटऑफ केले. आणि Rs १२०८३ कोटींचा तोटा दाखवला. त्यामुळे बुकव्हॅल्यू Rs ८९ झाली. यामागे शेअरहोल्डर्सची बारगेनिंग पॉवर कमी करण्याचा हेतू होता. नेमकी हीच गोष्ट गुंतवणूकदारांना खटकली. US $ ३.१५ बिलियन एवढी रक्कम वापरली तर वेदांता जास्तीतजास्त Rs १२८ प्रती शेअरचा भाव देऊ शकेल. यामध्ये हिंदुस्थान झिंकचा रोल मह्त्वाचा आहे. हिंदुस्थान झिंकनी Rs ६९७२ कोटी अंतरिम लाभांश दिला. तो वेदांताला मिळाला नाही. जर डीलीस्टिंग झाले तर हा डिव्हिडंड मिळणार नाही. डिव्हिडंड थेट शेअरहोल्डर्सना दिला जातो तो विथहोल्ड का केला ? हिंदुस्थान झिंककडे असलेले फंड्स डायव्हर्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंदुस्थान झिंक ने NCD काढून Rs ३५२० कोटी उभारले. ते डीलीस्टिंगसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान झिंक फंड रेझ करून पेरेंट कंपनीसाठी वापरू शकत नाही. वेदांता नेहमीच तिच्या ज्या कॅशरीच सबसिडीअरिज आहे तिच्यावर अवलंबून राहाते. हिंदुस्थान झिंक मध्ये सरकारचा २९% स्टेक असल्यामुळे सरकारचा रोलही महत्वाचा ठरतो.

डीलीस्टिंग साठी E -वोटिंग द्वारे मतदान झाले. २४ जून ते २६ जून २०२० दरम्यान डीलीस्टिंगच्या बाजूने ९३% मतदान झाले. वेदांताची डीलीस्टिंग ऑफर ५ ऑक्टोबर २०२० ला ओपन होऊन ९ ऑक्टोबर २०२० ला बंद होईल. ऑफर बंद झाल्यावर जर फायनल एक्सिट ऑफर चा स्वीकार झाला नाही तर २ दिवसात म्हणजे १३ ऑक्टोबरपर्यंत काउंटर ऑफर वेदांताने दिली पाहिजे. १० दिवसाच्या आंत म्हणजे २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत वेदान्ताने डीलीस्टिंगची रक्कम शेअरहोल्डर्सना दिली पाहिजे..

या डीलीस्टिंग बरोबरच अमेरिकन डिपॉझिटरी (म्हणजे फॉरिनबेस्ड कंपनीचे इक्विटीशेअर्स जे अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजवर खरेदीविक्री साठी उपलब्ध असतात) शेअर्सचे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवरून डीलीस्टिंग होईल.डिपॉझिटरी शेअर्स हे डिपॉझिटरी बँक फॉरीन कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार इशू करतात.

या डीलीस्टिंगमध्ये आम्ही काय करावे असा विचार ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदार करत असतील.

(१) वरील चर्चेतून एक गोष्ट तुम्हाला कळली असेल की Rs १२८ ते Rs १३० पर्यंतचा भाव तर नक्कीच मिळेल. ज्या कोणी Rs ९० ते Rs १०० च्या किमतीच्या आसपास शेअर्स खरेदी केले असतील त्यांना २५% प्रॉफिट होतो आहे. त्यामुळे त्यांनी प्रॉफीटबुकींग करावे किंवा Rs १३० चा ट्रेलिन्ग स्टॉपलॉस लावावा. जसा भाव वाढत जाईल तसा ट्रेलिन्ग स्टॉपलॉस वाढवत न्यावा.

(२) गेल्या वर्षीचा हायेस्ट भाव Rs १७५ होता. त्यामुळे Rs १७० ते Rs १७५ दरम्यान डीलीस्टिंग होईल असा अंदाज वर्तवला जातो. एवढा भाव झाल्यास होल्डिंग पैकी ९०% शेअर्स विकावेत.

(३) पण ज्यांची खरेदी Rs २०० किंवा जास्त भावावर झाली आहे त्यांनी शेअर्स तोट्यात दिले पाहिजेत असे नाही. कंपनी बंद होत नाही आहे फक्त डीलीस्ट होत आहे. यामध्ये BSE, NSE वर ट्रेडिंग होणार नाही पण डिलिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार करणारे काही ब्रोकर्स असतात त्यांच्यामार्फत शेअर्स विकता येतील.अशा डीलीस्ट झालेल्या कंपनीच्या शेअर्सवर डिव्हिडंड बोनस अशासारख्या गोष्टी मिळतात . ही चांगली कंपनी आहे कदाचित काही काळानंतर परिस्थिती बदलल्यावर कंपनीचे शेअर्स रिलिस्ट होण्याची शक्यता असते.

आता जे जे होईल ते ते पहा आणि आपल्यास योग्य आणि फायदेशीर असा निर्णय घ्या.

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

भाग ५६ – कॉर्पोरेट एक्शन : बोनस इशू

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Corporate action information in marathi
 
 
 
काही दिवसापुर्वीची ही घटना . मी घरातले सर्व काम आटपून ऑफिसमध्ये गेले. ५ ते १० मिनिटातच मार्केट उघडणार होते.रोजचे मेंबर हळूहळू येऊ लागले. घंटा वाजली..मार्केट सुरु झाले. किमती दाखवणारा टीकर दूरदर्शनच्या वाहिनीवरून फिरू लागला.तितक्यांत कोणीतरी ओरडला –  ‘ इन्फोसिसचा भाव Rs ९७० दिसतो आहे काहीतरी लफडे दिसते आहे जरा जपून”
मी म्हटलं “ अरे भानगड काही नाही. आज इन्फोसिसच्या बोनस इशुची एक्स-डेट होती. त्यामुळे १:१ या हिशेबाने त्याचा भाव अर्धा झाला.”
तेवढ्यांत एक गृहस्थ मला म्हणाले – “ आम्हाला दिवाळीच्या आसपास बोनस मिळतो ८.३३% प्रमाणे. प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस मिळतो. त्यासाठी वेगळे असे काही काम करावे लागत नाही.पण शेअरमार्केटमध्ये केव्हांही बोनस मिळतो कि काय?. बोनस ठरलेला असतो की कितीही मिळतो ? पण किती कां असेना आता मी सुद्धा शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करतो मग मलाही बोनस मिळेल… द्या टाळी ! ……”
“नुसती टाळी देवून भागणार नाही तोंड गोड करावे लागेल”
‘हो! हो ! करुकी घाबरतो की काय.’’”
त्यांना बोनस बद्दल जे सांगितलं ते आता तुम्हाला पण सांगते
शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करणारा माणूस मजूर किंवा कर्मचारी नसतो. जास्तीतजास्त त्याला गुंतवणुकदार म्हणतां येईल.तो काही BSE(BOMBAY STOCK EXCHANGE) किंवा NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) चा कर्मचारी नसतो तो उद्योग करतो. नोकरी नव्हे. त्यामुळे ८.३३% प्रमाणे त्याला बोनस मिळेल हा गैरसमज आहे. तो आधी दूर करा. कर्मचाऱ्याला जो बोनस मिळतो तो त्याने त्यावर्षी कंपनीत किती दिवस काम केले यावर आणी त्याला मिळणाऱ्या पगारावर अवलंबून असतो.
शेअरमार्केटच्या बाबतीत शेअरहोल्डर्सला जो बोनस मिळतो तो एकतर 5 वर्षे किंवा ७ वर्षे किंवा १० वर्षांनी मिळतो. हा कालावधी ठरलेला नसतो. कंपनी त्यांच्या सोयीप्रमाणे आणी आर्थिक परिस्थिती पाहून बोनसची घोषणा करते. बोनस दिलाच पाहिजे असे कंपनीवर बंधनही नसते.. द्यावा किंवा नाही, दिला तर किती आणी अगदी केव्हां हे सर्व कंपनीवर अवलंबून असते. कामगाराला किंवा कर्मचाऱ्यांला मिळणारा बोनस आणी शेअरमार्केटमध्ये मिळणारा बोनस या दोन्हीच्या नावातच साम्य आहे बाकी कोणतेही साम्य नाही.
बोनस, स्प्लीट, लाभांश, मर्जर, स्पिनऑफ, टेकओवर, BUYBACK,, ऑफर फॉर सेल,RIGHTS इशू या सगळ्याला कॉर्पोरेट एक्शन असे म्हणतात. आता प्रश्न कॉर्पोरेट एक्शन म्हणजे काय ?
कॉर्पोरेट एक्शन म्हणजे कंपनीने पुढाकार घेवून केलेली अशी कृती ज्याचा त्या कंपनीच्या शेअर्सवर आणी कर्जरोख्यांवर परिणाम होतो. काही कॉर्पोरेट एक्शनचा डायरेक्ट परिणाम होतो तर काही कॉर्पोरेट एक्शनचा इनडायरेक्ट परिणाम होतो इतकेच. काही कॉर्पोरेट एक्शन MANDATORY असतात, अर्थ एवढाच की शेअरहोल्डरला .काहीही करावे लागत नाही. किंवा त्याला कोणतीही निवड करायची नसते. समजा कंपनीने बोनस, स्प्लीट, लाभांश, स्पिनऑफ, मर्जर, डीमर्जर जाहीर केले तर एक्सडेट झाल्यानंतर तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर शेअर्स, बचत किंवा चालू खात्यांत तुमच्या सुचनेप्रमाणे लाभांश जमा होतात. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरायचा नसतो. शेअरहोल्डर फक्त एकच गोष्ट करू शकतो. त्याला जर बोनस स्प्लिट लाभांश, स्प्लीट, स्पिनऑफ याचा परिणाम नको असेल तर तो त्याच्याकडे असलेले शेअर्स विकू शकतो. जर
एखाद्या गुंतवणूकदाराला या सर्व कॉर्पोरेट एक्शनचा फायदा घ्यायचा असेल तर एक्सडेटच्या ४ दिवस आधीपर्यंत शेअर्स खरेदी करू शकतो. बोनससाठी शेअर खरेदी करताना त्याच्या वर्षांतील किंवा लाईफ टाइम कमीत किमतीकडे जरुर लक्ष द्या. म्हणजे बोनसच्या वेळेस किमतीत असाधारण आणी अचानक वाढ झाली असल्यास आपल्या लक्षांत येईल.
कॉर्पोरेट एक्शन आधी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये मंजूर केली जाते, नंतर त्याला शेअरहोल्डर्सच्या वार्षिक सर्वसाधारण मीटिंग किंवा EXTRAORDINARY GENERAL मीटिंगमध्ये शेअरहोल्डर्सची मंजुरी घेतली जाते.
कॉर्पोरेट एक्शनमुळे कंपनीचे नाव, शेअर्सची दर्शनी किमत, शेअर्सची संख्या, शेअर्सची मार्केटमधील किमत आणी मार्केट कॅपिटलायझेशन यावर परिणाम होतो.
आपण या भागांत बोनसचा विचार करू.कधी कधी असे होते की एखादी कंपनी बोनस देणार ही खबर लोकांना आधीपासूनच असते किंवा अंदाज असतो. कुणकुण असते. त्यामुळे लोक त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला लागतात.आता प्रश्न निर्माण होतो हे ओळखावे कसे?
जर कंपनी प्रगतीपथावर असेल, कंपनीकडे खूप कॅश BALANCE-SHEET मध्ये जमा असेल, कंपनीला कोणतेही मोठे EXTRAORDINARY INCOME होणार असेल किंवा कंपनीला २५,५०,७५ वर्षे होणार असली तर आणी कंपनीचे व्यवस्थापन INVESTOR-FRIENDLY असेल तर शेअरहोल्डर बोनस शेअर्सची अपेक्षा करतात.पडत्या मार्केटमध्येही जेव्हां काही शेअर्स पडत नाहीत किंवा त्यांची किमत वाढते अशावेळी गुंतवणूक करणारे अशा कंपन्यांकडे लक्ष ठेवतात.
बोनसची घोषणा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स करतात. त्या घोषणेत बोनसचे प्रमाण म्हणजे १:१, एका शेअरमागे एक बोनस शेअर २;५ म्हणजे ५ शेअर्स मागे २ बोनस शेअर्स, २:१ म्हणजे तुमच्याजवळ १ शेअर असेल तर तुम्हाला २ बोनस शेअर्स मिळतील. ज्या प्रमाणांत बोनस शेअर मिळतात त्याप्रमाणांत शेअर्सची किमत एक्स- डेटला कमी होईल.उदा जर कंपनीने १:१ असा बोनस दिला असेल तर शेअरची किमत अर्धी होईल..
बोनस जाहीर होताच त्या शेअरची किमत हळूहळू वाढू लागते. त्यामुळे इंट्राडे ट्रेड करतां येतो. जेव्हां मार्केट पडत असेल तेव्हां शेअर्स खरेदी करून मार्केट वाढल्यावर Rs २५-३० च्या फरकाने( हा फरक शेअर्सच्या किमतीप्रमाणे लक्षांत घ्यावा.) विकून SHORT TERM ट्रेड करतां येतो.किंवा दरवेळी मार्केट पडेल त्यावेळी खरेदी करून बोनसच्या एक्ष-डेटच्या आधी जास्तीतजास्त भावाला विकणे असा EVENT-BASED ट्रेड करतां येतो.
परंतु बोनस जाहीर झाल्याबरोबर तुटून पडून येईल त्या भावाला शेअर्स खरेदी करू नयेत. शेअर्स कुठेही पळून जात नाहीत. बोनस जाहीर झाल्यापासून बोनस शेअर्स ‘DEMAT’ अकौंटमध्ये जमा व्हावयास ४ ते ६ महिने लागतात.या साठी कंपनी बोनस इशुसाठी एक्ष-डेट आणी रेकॉर्ड डेट जाहीर करते तिकडे लक्ष ठेवावे. त्यामुळे जेव्हां मार्केट पडत असेल त्या वेळी कमी भावांत शेअर्स खरेदी करण्याच्या प्रयत्नांत असावे..
यावर्षी टेकमहिंद्रा (स्प्लीट आणी बोनस) आणी पर्सिस्टंट सिस्टिम्स (१:१ बोनस) या कंपन्यांच्याबाबतीत गुंतवणूकदारांना बोनसचा अनुभव चांगला आला नाही. उलट पश्चातापाची पाळी आली.बोनस जाहीर झाल्यावर टेकमहिंद्राचा शेअरची किमत Rs २९०० होती ( एकाचे शेअरचे चार शेअर झाले तरी किमत Rs७२५ झाली) आणी पर्सिस्टंट चा शेअरची किमत Rs १७०० होती ( म्हणजे बोनस मिळाल्यानंतर किमत Rs८५० झाली.) या दोन्ही कंपन्यांनी PROFIT वार्निंग दिल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची किमत खूपच कमी झाली. म्हणजेच बोनस जाहीर झाल्यापासून पुढील सहा महिन्यांत मार्केट कसे असेल यावर बोनस घेणे फायदेशीर किंवा तोट्याचे हे ठरते.
तसा विचार केला तर बोनस इशू ही केवळ एक बुकएन्ट्री असते. १:१ बोनस असेल तर तुमच्याजवळील शेअर्सची संख्या दुप्पट होते पण किमतही अर्धी होते.EPS (EARNING PER SHARE) आणी लाभांशाचे प्रमाणही त्याप्रमाणात कमी होते.बोनस शेअर खात्याला जमा झाले तरी त्या शेअर्समध्ये ट्रेडिंग एका ठराविक तारखेलाच सुरु होते. त्यामुळे चौकशी करूनच हे शेअर्स विकावेत.
बोनसशी असलेले भावनिक नाते विचारांत घेतल्यास बोनस म्हणजे बक्षिशी किंवा खुशी असे समजले जाते. बोनस जाहीर झाल्यापासून बोनस मिळेपर्यंत साधारणपणे त्या कंपनीच्या शेअर्सची किमत स्थिर राहते किंवा वाढते. बोनस देणारी कंपनी प्रगतीपथावर आहे, INVESTOR-FRIENDLY आहे असे समजले जाते. बोनस झाल्यानंतर त्याची किमत बोनसच्या प्रमाणांत कमी झाल्यामुळे जास्तीतजास्त लोकांच्या खरेदीच्या आवाक्यांत येतो. त्या शेअरमधला लोकांचा कल वाढतो व १ ते २ वर्षांत तो शेअर पहिल्या (बोनस होण्याच्या वेळच्या) भावाला येतो.
उदा.: २००४ मध्ये TCS (टाटा कंसलटनसी सर्विसेस) चा ‘IPO’ Rs ८५० प्रती शेअर या भावाने आला. २००६ आणी २००९ मध्ये TCS ने १:१ असा बोनस दिला. त्यामुळे जवळ असलेल्या १ शेअरचे चार शेअर्स झाले. म्हणजेच मुळ शेअर्सच्या खरेदीचा भाव Rs २१२.५० झाला. सध्या TCSच्या शेअर्सचा भाव [i]प्रती शेअर Rs २५०० च्यावर आहे. अशा प्रकारे दोन वेळेला बोनस घेतलेल्या लोकांच्या शेअर्सची किमत १० पट वाढली.
इन्फोसिस, विप्रो, ITC, बजाज ऑटो, महिंद्रा आणी महिंद्रा,मारुती, या अशाच काही कंपन्याच्या शेअर्सकडे बोनसच्या दृष्टीकोनातून लक्ष ठेवावे. अलीकडच्या काळांत कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक ,अनुह फार्मा , ऑरोबिन्दो फार्मा या कंपन्यांनी बोनस जाहीर केला.
तर अशी ही साठा उत्तरांची बोनसची कहाणी येथेच सफल संपूर्ण करू या.

भाग ५५ – लक्ष्मण-रेषा – एक्स-डेट आणी रेकार्ड-डेट

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
 
उन्हाळ्याचे दिवस होते. लोड-शेडींग होते. त्यामुळे अर्थातच लाईट्स नव्हते. लाईट्स नाहीत म्हणजे टी व्ही नाही. इन्टरनेट नाही. आधुनिक साधनांचा उपयोग शून्य. त्यामुळे अर्थातच झाली पंचाईत. म्हणून उठले , स्वयंपाक उरकून घेतला.माझी धोपटी उचलली आणी आमच्या ऑफिसमध्ये गेले. आमचं ऑफिस आमच्या घरापासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे त्यामुळे सहज शक्य झालं. नाहीतर काय करायचं हा प्रश्नच.
ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर ऐकू येणारा एकच संवाद. “काय MADAM लाईट गेलेले दिसतात. तेव्हांच तुमचे पाय ऑफिसकडे वळले.”
“हो रे बाबांनो पण तुमचं काय नुकसान!”
“ काही नाही हो MADAM, चेष्टा आपली! पाणी हवंय कां ? विचारपूस करतोय नाहीतर म्हणाल पाणी सुद्धा विचारलं नाही. काकांचा ओरडा बसेल”
मी माझ्या जागेवर बसून मार्केट पाहू लागले. आज काही ट्रेड करतां येईल कां याचा विचार करू लागले. तेव्हढ्यात चार-पांच जण आले. मी विचारलं “ काय हवंय ? तेव्हां अविनाश म्हणाला “ क्लायंट आहेत ! MADAM, बसा हं!”
“आम्ही बसायला नाही आलो.”
“मग काय हवंय? चेक हवंय बील हवंय स्टेटमेंट हवंय की आणखी काही?आणखी काही हवे असेल तर मात्र साडेतीननंतर , मार्केट संपल्यानंतर सांगा”
तेव्हढ्यांत ऑफिसमध्ये काका आल्रे. त्यासरशी ते लोक काकांकडे आले.
“ काय अंदाधुंदीचा कारभार असतो मार्केटमध्य. आज तुम्ही शेअर्स घेतलेत तर बोनस किंवा डीव्हीदण्ड मिळेल की नाही याची कोणालाच नक्की माहिती नसतं . त्यावर अवलंबून लोक शेअर्स घेतात किंवा विकतात. आणि मग फसवणूक झाल्यासारख होतं.”
काकांचा स्वभाव खूपच शांत आहे. “ तुम्ही भांडू नका. मला काय झालं ते सांगाल कां ?”
“आम्ही खरे पाहतां बोनस आणी स्प्लिट हवा म्हणूनच घाईघाईने अकौंट उघडला.माझ्या मित्राला पैशाची गरज होती. बोनस जाहीर झाला की त्या शेअर्सचा भाव वाढतो तेव्हां विकावा असे समजले होते.त्यामुळे त्यांनी १९ तारखेला विकले. आता जर १९ मार्च ही EX-डेट होती व २० मार्च ही रेकॉर्ड डेट होती तर आम्हाला बोनस मिळायला पाहिजे ना?
“१९ मार्चला तुम्ही खरेदी केलेत तर ते शेअर्स तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर २१ तारखेला जातात. २० तारखेला ज्यांचे शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर असतील त्यांनाच बोनस मिळेल आणी शेअर्स स्प्लिटचाही फायदा मिळेल. त्यामुळे १९ तारखेला ज्यांनी शेअर्स खरेदी केले असतील त्यांना बोनस आणी स्प्लिटचा फायदा मिळणार नाही. उलटपक्षी तुम्ही १९ तारखेला शेअर्स विकले तर ते सर्व प्रक्रिया होऊन २१ तारखेला तुच्या ‘DEMAT’ वरून वजा होतात. त्यामुळे त्यांनी विकले असले तरी त्यांना बोनस आणी स्प्लिटचा फायदा मिळेल.या मध्ये दोष कुणाचा? कुणाचाच नाही. सध्या रोलिंग सेटलमेंट T+2 अशी आहे”
“ आम्हाला काहीच कळत नाही.आम्ही विकत घेतले तेव्हां तरी कोणी तरी सांगायला पाहिजे होतं.”
काकांना काही समजेना. काका मला म्हणाले “ काय करू आता ?”
तेव्हां मी पुढे झाले “ उद्या तुम्ही तुमचे बिल घेवून या. शनिवार आहे मार्केट नसते शांतपणे बसून बोलू.”
“ अहो तुम्ही सांगता शनिवारी या. आम्ही शनिवारी मुद्दाम येणार व नेमके आम्हाला शटर बघून परत जावे लागेल”
“ तुम्ही निघताना फोन करा. आम्ही ऑफिसांत आहोत की नाही याची खात्री करूनच मग निघा.” असे म्हटल्यावर ती माणसे थोडी शांत झाली.
शनिवारी येतो असे सांगून निघून गेली. ऑफिसमधला गोंगाट कमी झाला. मी काकांना म्हटलं
“कदाचित तारीख सांगताना काही गोंधळ होऊ शकतो. आपणही आपले रेकॉर्ड बघू. विचार करायला काय घडले, चूक कोणाची याची शहानिशा करायला थोडा वेळ मिळेल.”
ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शनिवारी आले. मला काकांनी बजावले होते “ MADAM, तुम्ही नक्की यायला पाहिजे.” त्याप्रमाणे मी ऑफिसमध्ये गेले. १९ तारखेला शेअरचा भाव बोनस आणी स्प्लिट झाल्यावर १:४ या प्रमाणांत विभागून आला.६९८ रुपये चा भाव होता.
” हे पहा फक्त समजुतीचा घोटाळा झाला. तुम्हाला Rs २८००चे शेअर्स Rs ७०० च्या जवळपासच्या किमतीला मिळाले म्हणून तुम्ही हरखून गेलांत. पण वस्तुस्थिती तशी नाही. कंपनीने १:१ बोनस आणी त्यानंतर एका शेअरचे २शेअर्स स्प्लिट असे जाहीर केले. म्हणजेच १० शेअर्सला १०शेअर्स बोनस आणी त्या २० शेअर्सचे स्प्लिट म्हणजेच ४० शेअर्स होणार. म्हणजेच ज्या माणसाकडे १ शेअर असेल त्याला ४ शेअर्स मिळणार. त्यामुळे १९ तारखेला म्हणजेच EX- डेट ला शेअरची किमत १/४ होऊन आली. म्हणजेच Rs.६९८ ला १ शेअर झाली. त्या हिशेबानेच तुम्ही ६९८ रुपयाला एक या प्रमाणे १० शेअर्स घेतलेत असे बिलाप्रमाणे दिसते आहे. जर तुम्हाला बोनस आणी स्प्लिट मिळायचे असते तर २८०० रुपयाच्या किमतीला १ शेअर खरेदी करावा लागला असता.
त्याचप्रमाणे तुमच्या मित्राने १९ तारखेला १० शेअर्स ६९० च्या भावाने विकले असतील तरी त्यांच्या ‘DEMAT’ अकौंटवर आणखी ३० शेअर्स रेकॉर्डडेटनंतर येतील. ते ३० शेअर्स तुम्ही नंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे आणी तुमच्या गरजेप्रमाणे विकू शकता. त्यांचाही काही फायदा नाही आणी तुमचेही काही नुकसान नाही फक्त समजुतीचा घोटाळा आहे.”
EX-डेट म्हणजेच लक्ष्मणाने सीतेसाठी घालून दिलेली मर्यादा आहे असे समजा. त्या तारखेच्या आधी खरेदी करणाऱ्याला बोनस DIVIDEND स्प्लिट , RIGHTS, मर्जर डीमर्जर , स्पिन ऑफ अशा प्रकारच्या कॉर्पोरेट ACTIONचा फायदा मिळतो. य़ा तारखेला किंवा या तारखेनंतर घेतलेल्या शेअर्सवर हे फायदे मिळत नाहीत.जसे रावणाने सीतेला लक्ष्मणरेखा पार केल्यावर पळवून नेले तसे एकदा ही तारीख निघून गेल्यावर ही सर्व फायदे मिळत नाहीत.
त्यामुळे शेअर्स खरेदी करताना तसे काही उद्देश असेल तर खरेदी केलेले शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर कधी येतील हे विचारूनच शेअर्स खरेदी घेत चला .
हे शेअर्स रेकॉर्ड डेटला तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर असतील तरच तुम्हाला हे सर्व फायदे मिळतील. तसेच शेअर विकताना ते तुमच्या ‘DEMAT” अकौंटवर कधी वजा होतील हे विचारून घ्या. जर ते रेकॉर्ड डेटला किंवा त्याच्या आधी तुमच्या अकौंटवरून वजा होणार असतील तरी तुम्हाला या सर्व कॉर्पोरेट ACTION चा फायदा मिळणार नाही. या सर्व माहितीसाठी ब्रोकरवर किंवा दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच इंटरनेटवर जाऊन (जे आता तुमच्या मोबाईलवरही असते) माहिती करून घ्या.
भेटू या पुढच्या भागांत…

भाग ५४ – लक्षात येयीना, मार्केट वाकडे – bonus आणि split

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
या आठवड्यामध्ये वाघ मागे लागल्यासारखं काम होतं. कितीही आटपण्याचा प्रयत्न केला तरी आटपत नव्हतं. वेळ पुरत नव्हता आणि काय करावं ते ही समजत नव्हतं. नुसता चिडचिडाट… प्रत्येकजण घरी आला की त्याची अपेक्षा मी आपल्या आवडीचे खायला द्यावे विचारपूस करावी. यजमानही लोकलमधून धक्के खात खात येत असत. त्यांनाही वाटे बँकेतल्या कहाण्या बायकोने ऐकाव्यात. आल्याबरोबर कटकट लावू नये. “रिमोट कुठे आहे तो सांग किंवा दे. मला match बघायची आहे”. इति मुलगा
मी कंटाळले होते. शनिवार रविवारची आतुरतेने वाट पहात होते.मी मनाशी ठरवलेच ह्या शनिवार-रविवारी काहीही चटकमटक खायला करायचं नाही, जेवणांतही काही बदल करायचा नाही, जादा कोणतंही काम नाही, कोणाला भेटायला जायचं नाही किंवा कोणाला बोलवायचंही नाही. फक्त विश्रांती घ्यायची
ठरवल्याप्रमाणे शनिवार आरामांत घालवला. पण माझ्या आरामाला दृष्ट लागली बहुतेक ! रविवारी सकाळी नऊ वाजतां एक गृहस्थ आणी त्यांच्याबरोबर एक मध्यमवयीन माणूस असे आमच्या घरी आले. वयस्कर गृहस्थ ठाण्याचे नव्हते. पण त्यांच्याबरोबरच्या माणसाची माझी तोंड ओळख होती असे वाटले.
त्यांनी बेल वाजवली. माझ्या यजमानानी दार उघडले. मी सकाळी काम उरकत होते. तशी अवतारातच होते. यजमानांनी विचारपूस केली तेव्हा ते गृहस्थ म्हणाले “मी माझी वहिनी अंकातील शेअरमार्केटचा लेख वाचला. ब्लोग वाचला. आपल्याकडे शेअरमार्केट कोण करतं ? “
यजमान म्हणाले “ माझी बायको करते. मी बँकेत नोकरी करतो.”
गृहस्थ “मला त्यांना भेटायचे आहे.”
यजमान “तुम्ही आधी कळवलं होतं कां ?”
गृहस्थ “ नाही नाही, आज रविवार त्या भेटतील असे वाटले! म्हणून आलो.”
यजमान आंत आले. मला म्हणाले “ कुणीतरी तुला भेटायला आले आहे.”
मी म्हणाले “ त्यांना बसायला सांगा, पाणी द्या. पंखा लावा . मी ५-१० मिनिटांत माझा अवतार ठीकठाक करून बाहेर येते.”
झाला सुरु रविवार असं बडबडत केसावर फणी फिरवून साडी नीट करून मी बाहेर गेले. मी स्वतःच विषयाला हात घातला. “ आज कसं काय अचानक येणं केलं ?
गृहस्थांना आपण कधी एकदा सर्व काही माझ्या कानावर घालतो असे झाले होते – “मी ज्या लायब्ररीतून अंक आणला त्या लायब्ररीतील बाई तुमच्याकडे गाण्याच्या क्लासला येतात त्यांनी पत्ता सांगितला, त्यामुळे मी येऊ शकलो.”
मी म्हटले “ बरं ते ठीक आहे. तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो तरी सांगा! आढेवेढे न घेतां मोकळेपणाने सांगा.”
“ अहो मी बोनस आणी स्प्लिट जाहीर झाले म्हणून काही शेअर्स घेतले. १:१ या प्रमाणांत बोनस आणी १:१ या प्रमाणांत असे स्प्लिट होणार होते. म्हणजे एका शेअरचे ४ शेअर्स होणार ना! मी काय म्हणतो ते बरोबर आहे ना?” दुसर्या कंपनीने फक्त बोनस दिला होता. अहो शेअरचा भाव होता Rs. २००० होतां. मला असे वाटले की एका शेअरचे ४ शेअर झाले की आपण ४ शेअर्स विकू तर आपल्याला Rs.८००० मिळतील. शेअर्स विकून पैसे आले की आपण घरातल्या सगळ्यांना काहीतरी देऊ. त्यामुळे मी नातवाला सायकल, नातीला मोबाईल, बायकोला पैठणी घ्यायचे प्रॉमिस केले.शुक्रवारी मी स्टेटमेंट पहिले तर एका शेअर्सचे ४ शेअर झाले होते. मार्केट उघडल्याबरोबर शेअर विकायची ऑर्डर लावायला फोन केला, भाव विचारला.
तो म्हणाला “ Rs.५०० भाव आहे. माझी त्याच्याबरोबर वादावादी झाली. काय गोंधळ झाला मला समजेना! “
तो म्हणाला “ मार्केट संपल्यावर विचारा. सध्या सारखे फोन चालू आहेत. “
गृहस्थांनी आपलं म्हणण चालू ठेवले “ शेअरमार्केट म्हणजे अंदाधुंदीचा कारभार, गडबड घोटाळे हे सर्व वाचलेले खरे झाले असे वाटले. फसवणूक झाली म्हणून डोके बडवून घेण तेव्हढेच बाकी राहिले होते. तेव्हा नातू म्हणाला आजोबा तुमचं बीपी वाढेल. पूर्ण चौकशी करा. उगीचच घाबरु नका. जो कोणी फसवणार नाही असं वाटेल तेथे जाऊन चौकशी करा. तुमच्या जिवापेक्षा मला काही नको. मला सायकल नको आहे आजोबा!”
मी म्हणाले “ थांबा जरा , काहीतरी गडबड आहे. १:१ बोनस आणी १:१ स्प्लिट झाले म्हणजे एकाचे ४ शेअर्स झाले. तर मग शेअर्सचा भाव १/४ (२५%) व्हायला हवा. Rs. ५०० सकाळी भाव असेल नंतर तो मार्केटप्रमाणे ४९७, ५०२, ५०४, ४९९ असा बदलला असेल ना ! की यापेक्षा काही वेगळे? “
गृहस्थ म्हणाले “ नाही madam अगदी बरोबर तुम्ही म्हणता तसेच झाले.
मी म्हणाले “ आजोबा तुमचे काही चुकले नाही. सगळ्यांचं हेच होते. बोनस किंवा स्प्लिट ज्या प्रमाणांत असेल त्या प्रमाणांत शेअर्सचा भाव कमी होतो. यामध्ये तुमची काहीही फसवणूक झालेली नाही.मी तुम्हाला थोडक्यांत सांगते जेव्हा शेअरचा भाव खूप वाढतो, लोकांना शेअर महाग वाटतो, त्या शेअरमध्ये होणारे ट्रेडिंग कमी होते आहे असे कंपनीला वाटते, त्याचबरोबर कंपनीकडे जर खूप ‘Accumulated Reserves’ असतील आणी भांडवली गुंतवणुकीच्या संधी नजीकच्या काळांत उपलब्ध नसतील तर कंपनी बोनस किंवा स्प्लिट जाहीर करते. या सर्व प्रक्रियेमध्ये तुमच्या शेअर्सची संख्या वाढते पण शेअर्सची किमत कमी झाल्यामुळे भागधारकाच्या गुंतवणुकीत फरक पडत नाही. परंतु हे सर्व लक्षांत कोण घेतो.
स्प्लिट’ मध्ये शेअर्सची दर्शनी किमतही कमी होते. बोनसचे उगीचच आकर्षण आहे हे मात्र खरे. पण होतं काय कि बोनसच्या आकर्षणाने शेअर्सची मागणी वाढते. बोनस जाहीर झाल्यापासून बोनस शेअर्स मिळेपर्यंत शेअर्सचा भाव वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे बोनस घेतलाच पाहिजे असे नाही. वाढलेल्या भावाचा फायदा शेअर्स विकून घेता येतो.. अहो आजोबा तुमची फसवणूक झाली नाही किंवा काहीही गडबड घोटाळाही नाही. तुम्हाला बोनस आणी स्प्लीत्ची प्रोसीजर माहित नव्हती इतकेच.”
“ MADAM, तुमचा ब्लोग वाचताना मी मनातल्या मनांत तुम्हाला हसलो होतो. शेअरमार्केट म्हणजे साधी खरेदीविक्री… त्यांत कसला अभ्यास करायचा कसलं निरीक्षण करायचे. पण आज तुमचा शब्द न शब्द पटतो आहे. आता मी नक्की प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवेन.
मी मनातल्या मनात म्हटलं – माझे ही डोळे उघडले. सध्या तीनचार कंपन्यांनी बोनस स्प्लिट जाहीर केले आहे लोकांचा गोंधळ होऊ नये म्हणून मला याच विषयावर ब्लोग लिहिला पाहिजे.
भेटू या पुढच्या भागांत…