मार्केट आणि मी हे माझे बाळ आता मोठे झाले. चांगले ६ वर्षाचे झाले. मला खूप उचंबळून येत आहे. २०१२ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण एवढा मोठा प्रवास करू असे वाटले नव्हते.
‘मार्केट आणि मी’ चा शिल्पकार माझा मुलगा सुरेंद्र आणि मदतनीस प्रकाश फाटक, माझी मुलगी स्वरश्री आणि माझी सून किरण, माझे जावई अमेय जोगळेकर यांच्या मदतीशिवाय हा पल्ला गाठणे अशक्य होते.
त्याचबरोबर माझ्या ब्लॉगच्या वाचकांनी, हितचिंतकांनी नव्या नव्या गोष्टी करण्यास उत्तेजन दिले त्यांची मी शतशः आभारी आहे. वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच माझ्या पुस्तकाचा म्हणजेच ‘मार्केट आणि मी’ चा जन्म झाला, ‘गोवन वार्ता’, ‘मनी प्लस’, ‘चारचौघी’, ‘माझी वहिनी’, या मासिकात, वर्तमानपत्रात लिखाण करू शकले. ‘नवशक्ती’ मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने आलेल्या लेखाने याची पोचपावती मिळाली.
असेच आपण उत्तेजन देत रहा. पण नुसते उत्तेजन देऊन भागणार नाही. चुकांमधून शिकता शिकता भरपूर पैसे मिळवा. एक साखळी तयार करा. तुम्हीही मोठे व्हा इतरांनाही मार्केट करायला मदत करा. मार्केटविषयीचे गैरसमज दूर करा. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ‘
‘मार्केट आणी मी ‘हे माझे बाळ ३ वर्षांचे झाले आहे. त्यानिमित्त आपण सर्व वाचक केक कापुन गोड गोड घास घेवून या बाळाचा तिसरा वाढदिवस साजरा करू. ३ वर्षापूर्वीचा दिवस मला अजून आठवतो आहे. त्यावेळी माझ्या मुलाने मला ब्लॉग लिहिण्याची कल्पना सुचवली. ४ दिवसांनी गुरुपोर्णिमा होती. त्या दिवसापासून ब्लॉग लिहिण्यास प्रारंभ केला. शेअरमार्केटविषयीचे गैरसमज दूर करणे, लोकांच्या मनातील शेअरमार्केटची भीती घालवणे, मातृभाषेत शेअरमार्केट समजावून देणे, आणी टिपा न देतां लोकांना स्वावलंबी गुंतवणूकदार बनवणे, अतिशय सोप्या भाषेंत लिहिणे हे उद्देश डोळ्यांसमोर होते. त्याचबरोबर वाचकांची फसवणूक होऊ नये, नुकसान होऊ नये, म्हणून काही सुचनावजा माहिती द्यावी असे वाटले. हे उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच लेखांची रचना केली आणी करीत आहेआणी भविष्यांत करणार आहे.
माझ्या कामांत माझे यजमान श्री. प्रकाश भास्कर फाटक आणी माझा मुलगा सुरेंद्र प्रकाश फाटक यांची मदत झाली. मी लेख लिहायचा ,यजमानांनी तो टाईप करायचा, मुलाने तो ब्लॉगवर टाकायचा असे हे काम अव्याहत चालू आहे. माझी सून किरण गोवेकर या ब्लॉगची पहिली वाचक आहे. ती आम्हाला उत्तेजन देते. काही अडचण आली की मुलगी स्वरश्री फाटक हिला विचारायचे. सगळ्यांच्या प्रयत्नातून माझ्या या बाळाने इथपर्यंत मजल मारली आहे. अनेक वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया, अपेक्षा कळविल्या त्याप्रमाणे ब्लॉगमध्ये सुधारणा होत गेल्या. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळून माझे बाळ मोठे झाले, माझ्या या बाळाने बाळसे धरले त्या सर्वांची मी आभारी आहे, ऋणी आहे.
माझे बाळ आता गुटगुटीत झाले आहे हे बघून मला आनंद होतो. काही वाचक आता ट्रेडिंग करू लागले आहेत. त्यामुळे माझा उद्देश अंशतः कां होईना साध्य होतो आहे. एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे आपण जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा माझी उत्तरे हे सदर वाचा. त्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल . त्यामुळे तुमची शंका लगेच दूर होईल.
मी या बाळाकडे आईच्या नजरेतून पाहते त्यामुळे ब्लॉगमधील दोष काढून टाकून गुणवत्ता आणी उपयोगिता सतत वाढवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझे हे बाळ आपल्याला सतत प्रगतीची योग्य वाट दाखवेल, शेअरमार्केट मध्ये ट्रेडिंग, गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करेल, आपला आत्मविश्वास वाढवेल,आणी वेळोवेळी समस्यांचा, धोक्यांचा लाल दिवाही दाखवील हा माझा विश्वास आहे. आपण वाचकही प्रतिक्रिया, सुचना देऊन माझे बळ वाढवत आहांत. मला आनंद देत आहांत.
शेवटी एक विसरू नका – माहिती, प्रोसीजर, ज्ञान, धैर्य आणी निर्णय घेण्याची क्षमता हे सर्व स्तुत्य गुण आहेत. पण शेअरमार्केट मध्ये व्यवहार करून आपल्याला पैसा मिळालाच पाहिजे हे ध्येय विसरू नका. पण समजा एखाद्यावेळेला तोटा झाला तर घाबरून न जाता ती चूक सुधारा आणी भविष्यांत पुन्हा त्या पद्धतीची चूक होऊ नये ही काळजी घ्यावी.ही विनंती
पुन्हा एकदा सर्व वाचकांना धन्यवाद . भेटू पुन्हा———–
आपण डेट्रेडच्या चक्रव्युहात शिरलो आहोत. गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसा हा चक्रव्यूह तितकासा कठीण नाही बाहेर पडायला. हे ज्ञान फ़क़्त अर्जुनालाच माहित आहे असं काही नाही. आपल्याला पण ते कळू शकतं कारण शेअरमार्केटच्या व्यवहारात पारदर्शकता आहे. प्रत्येक व्यवहार लेखी होतो. अगदी डेट्रेड सुद्धा ! कोणत्याही व्यवहाराचं बील मिळ्तं. हे बील computerised असतं .तुमची प्रत्येक शंका त्यामुळे दूर होते. मग आता असं करूया कि मी केलेल्या डेट्रेडची बिलं बघूया आणि पडूया या चक्रव्यूहातून बाहेर !! बिलामध्ये खालीलप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची माहिती असते :
ऑर्डर नंबर
तुम्ही ऑर्डर दिलेली वेळ
तुमचा ट्रेड झाला असेल तर त्याचा ट्रेड नंबर
ट्रेड झालेल्याची वेळ
शेअरचे किंवा सिक्यूरिटीचे नाव
खरेदी किंवा विक्री झाली
खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या
विक्री केलेल्या शेअर्सची संख्या
शेअरचा भाव ( जो टिकरवर दाखवला जातो.)
शेअर्सची संख्या गुणिले gross दर प्रत्येक शेअरचा = gross total
दलाली (total खरेदी किंवा विक्रीच्या किमतीवर)
खरेदीचा gross भाव अधिक दलाली किंवा विक्रीचा gross भाव वजा दलाली (प्रत्येक शेअरसाठी)
खरेदीचा gross भाव अधिक दलाली गुणीले खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या किंवा विकीचा gross भाव वजा दलाली गुणिले विकलेल्या शेअर्सची संख्या
सेवा कर
Security Transaction Tax
याशिवाय खालीलप्रमाणे वेगवेगळे charges आकारले जातात.
Security turnover tax
stamp charges
T. O. CHARGES
आधी सांगितल तसं, डेट्रेड दोन प्रकारे करता येतो. आधी विकत घ्या नंतर विका किंवा आधी विका आणि नंतर विकत घ्या. आपण प्रत्येक प्रकारच्या डेट्रेडचं एक एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला मी नक्की काय सांगतीये ते कळेल. उदाहरण १ – आधी विकत घ्या नंतर विका
Click on the image to enlarge
बील क्रमांक १ मध्ये मी ‘BHEL’ कंपनीचे १० शेअर्स प्रत्येकी रुपये २१८२ प्रमाणे खरेदी केले याची एकूण खरेदी किमत रुपये २१८२० झालेली दाखवली आहे .१० शेअर्सला एकूण रुपये ८.७० दलाली आकारली आहे (म्हणजेच प्रत्येक शेअरला ८७ पैसे दलाली ) त्यामुळे मला प्रत्येक शेअरची किमत (दलालीसकट ) रुपये २१८२.८७ एवढी पडली याप्रमाणे १० शेअर्सची दलालीसकट एकूण किमत रुपये २१८२८.७० झाली .
हे शेअर्स मी त्याच दिवशी प्रत्येक शेअर रुपये २२०५ या दराने विकले .विक्रीची एकंदर किमत रुपये २२०५० झाली या रकमेवर रुपये ११ दलाली आकारली गेली. (प्रत्येक शेअरला रुपये १.१० या दराने ) प्रत्येक शेअरच्या किमतीमधून दलाली वजा केल्यानंतर शेअरचा भाव प्रत्येकी रुपये २२०३.९० झाला .त्यामुळे १० शेअर्सची दलाली वजा जाता विक्रीची किमत रुपये २२०३९.०० झाली.म्हणजेच रुपये २१०.३० फायदा झाला , खरेदी साठी ८९ पैसे व विक्रीच्या दलालीवर रुपये १.१३ सेवा कर आकारला गेला . T. O. charges रुपये १.६५ , S.T.T. रुपये ५ Stamp charges ८८ पैसे या प्रमाणे आकारले गेले .एकंदर फायद्यातून हे सर्व charges म्हणजेच रुपये ९.५६ वजा जाता रुपये २००.७४ निव्वळ नफा झाला. उदाहरण २ – आधी विका नंतर विकत घ्या
Click on the image to enlarge
या बिलामध्ये प्रथम शेअर्स विकले आणी नंतर खरेदी केले आहेत . विकलेले शेअर्स आपल्याजवळ असले पाहिजेत असे बंधन नसते म्हणूनच याला ‘short’ करणे असे म्हणतात. मी १० शेअर्स विकण्याची ऑर्डर दिली होती . पण एकदमच १०शेअर्स एकाच लॉट मध्ये जातील/ येतील असे नाही (६-४, २-८ ५-५ अश्या वेगवेगळ्या लॉटमध्ये तुम्ही खरेदी/ विक्री करू शकता.)
यामध्ये मी titan कंपनीचे १० शेअर्स २६४ रुपये प्रती शेअर या भावाने विकले . दलाली एका शेअरला १२पैसेप्रमाणे आकारली आहे. हे १० शेअर्स (१-९) अशा लॉट मध्ये मिळाले . दलाली वज जाता २४५.८८रुपय भाव या १०शेअर्स साठी मिळाला . एकूण रकम (२४५.८८गुणिले १० ) रुपये २४५८.८० झाली .विक्री साठी १४पैसे सेवा कर आकारला गेला Security Transaction Tax (STT) 61 पैसे आकारला गेला. विकलेले १० शेअर्स २४५ रुपये भावाने नंतर खरेदी केले .एकंदर खरेदीची किमत रुपय्र २४५१ झाली प्रत्येक शेअर्सवर १० पैसे दलाली आकारण्यात आली .ती खरेदीच्या किमतीत मिळवून शेअर्स्चा भाव रुपय २४५.१० झाला . यासाटी १२ पैसे सेवा कर आकारला गेला . रुपये ७.८० फायदा झाला . त्यातून १ रुपया STT १०पैसे stamp charges , T. O. charges 16 पैसे व २९ पैसे सेवा कर वजा जाता निव्वळ फायदा रुपये ६.२५ झाला.
आशा अशी आहे कि तुम्हाला वरच्या २ उदाहरणावरून आणि गेल्या २-३ भागांमधून डेट्रेडबद्दल बर्यापैकी माहिती मिळाली असेल. या विषयावर आपण परत बोलूच पण पुढच्या भागात आपल्या मार्केटच्या वाटचालीकडे परत जावूया. भेटूच लवकर.. पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मी तुम्हाला गेले २ – ३ भाग डे ट्रेडबद्दल सांगतीये पण त्याचा अर्थ असा नव्हे कि डे ट्रेड आणि नेहेमीची गुंतवणूक फार वेगळी आहे. काही गोष्टी वेगळ्या आहेत पण बरयाच सारख्या पण आहेत.
आपण मिरच्या कोथिंबीर खरेदी करताना, ड्रेसवर किंवा साडीवर साजेशा बांगड्या , खोटे दागीनी खरेदी करताना खूप विचार करत नाहीत. परंतु फ्रीज ,टी व्ही , संगणक खरेदी करताना जास्त विचार करतो. त्यापेक्षा जास्त विचार घर खरेदी करताना करतो . जसं गोळ्या बिस्कीट, पाणीपुरी खाणे व जेवण करण यात फरक आहे तोच फरक डे ट्रेड व गुंतवणुकीत आहे. डे ट्रेड साठी आपण त्या शेअर्सची गुणवत्ता विचारात घेत नाही तर शेअर्सच्या किमतीत होणारी हालचाल विचारात घेतो. त्यामुळे तो शेअर गुंतवणूक करून बरेच वर्ष ठेवण्याच्या लायकीचा असेलच असे नाही. त्यामुळे डेट्रेडचे रुपांतर गुंतवणुकीत करून फायदा होईलच असं नाही .
डे ट्रेड असो किंवा नेहेमीची गुंतवणूक असो काही नियम बदलत नाहीत. शेवटी दोन्हीकडे शेअर खरेदी करायचे आणि विकायचे. डे-ट्रेडमधे फरक इतकाच कि तुम्ही खरेदी विक्री एकाच दिवशी करता. त्यामुळे हि खरेदी विक्री होण्यासाठी त्या शेअरमधे liquidity हवीच, त्याशिवाय तुम्ही शेअर विकणार कसे? त्यामुळे liquidity चा विचार कायम मनात ठेवा. आपण याआधी liquidity बद्दल बोललोच आहे. तरी काही शंका असतील तर जरूर विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
डे ट्रेड sfचा दुसरा भाग म्हणजे त्याच दिवशी खरेदी विक्री. याचाच अर्थ असा कि एकाच दिवसात तुम्हाला पैसे मिळवायचेत. तुम्हाला असा शेअर सोधायचाय कि जो एका दिवसात वाढेल आणि तुम्हाला एकाच दिवसात खरेदी विकी करून पैसे कमवता येतील. मग आता पुढचा प्रश्न , कि असा शेअर शोधायचा कसा?
त्यासाठी मी तुम्हाला आता एक समीकरण सांगते तुमचा डे ट्रेडचा फायदा = (तुम्ही निवडलेल्या शेअरमधे एका दिवसात झालेली प्रती शेअर वाढ x तुम्ही विकत घेतलेले एकूण शेअर) – (ब्रोकरेज आणि इतर taxes)
आता आपण या समीकरणाचा एक एक भाग नीट समजावून घेवू १ – तुम्ही निवडलेल्या शेअरमधे एका दिवसात झालेली प्रती शेअर वाढ
तुम्ही 100 रुपायला १ असे १० शेअर घेतलेत आणि ११० ला विकलेत तर तुमची प्रती शेअर वाढ १० रुपये. आणि तुम्हाला एकूण १०० रुपयाचा फायदा झाला. पण आता हे १०० रुपये सगळे तुमच्या हातात येणार का? तर नाही !!
शेअरची निवड करताना तो एका दिवसात किती वाढू शकेल हा एकच विचार करून उपयोग नाही.
मला सांगा १०० रुपयाचा शेअर ११० होणं सोपं कि १००० रुपयाचा शेअर ११०० होणं? नीट बघितलं तर दोन्ही शेअर १०% वाढले पण १०० चा शेअर ११० होणं सोप हे तर तुम्हालाही कळलच असेल.
अजून एक विचार करा,
तुम्ही १० रुपयाचे १०० शेअर ११ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे
तुमचा फायदा = १ (प्रती शेअर वाढ) X १०० (एकूण विकलेले शेअर) = १०० – (ब्रोकरेज आणि इतर taxes)
आणि १००० रुपयाचे १०० शेअर १००१ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे
तुमचा फायदा = १ (प्रती शेअर वाढ) X १०० (एकूण विकलेले शेअर) = १०० – (ब्रोकरेज आणि इतर taxes)
तुम्हाला काय वाटत कि कोणत्या व्यवहारात तुम्हाला जास्त नफा होईल? दोन्ही व्यवहारात एकूण फायदा १०० रुपये होणार पण तुमच्या हातात सारखेच पैसे येणार का? ते ठरणार आपल्या समीकरणाच्या पुढच्या भागांनी… २ – ब्रोकरेज आणि इतर taxes
ब्रोकरेज म्हणजे ब्रोकेरच कमिशन. हे कमिशन तुमच्या व्यवहाराच्या एकूण रकमेवर लावल जात. तुम्ही कसला पण ट्रेड करा डे ट्रेड करा नाहीतर गुंतवणूक म्हणून करा ब्रोकर त्याचं कमिशन लावणारच. आता हे कमिशन तुमच्या ट्रेडच्या एकूण रकमेवर लागत. एकूण रक्कम जास्त असेल तर ब्रोकरेज जास्त आणि रक्कम कमी असेल तर ब्रोकरेज कमी. तुमचा फायदा किंवा तोटा किती झाला याचा ब्रोकर ला काही फरक पडत नाही. तुम्ही एकूण ट्रेड किती रक्कमेचा केला त्या हिशोबानी तुम्हाला ब्रोकरेज लागणार.
आता थोड्या वेळासाठी आपल्या उदाहरणाकडे जावूया
तुम्ही १० रुपयाचे १०० शेअर ११ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे
तुमच्या ट्रेड ची एकूण रक्कम = खरेदी (१० X १००) + विक्री (११ X १००) = २१००
आणि १००० रुपयाचे १०० शेअर १००१ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे
तुमच्या ट्रेड ची एकूण रक्कम = खरेदी (१००० X १००) + विक्री (१००१ X १००) = २,००,१००
हे तर तुम्हालाही लक्षात आलं असेल कि १००० रुपयाच्या ट्रेड वर ब्रोकरेज जास्त पडणार. आणि हे विसरू नका कि दोन्ही ट्रेडमधे तुम्हाला १०० रुपयेच मिळालेले आहेत. सागायचा मुद्दा असा कि १००० रुपयाच्या ट्रेड मधे तुमचा निव्वळ फायदा कमी होईल कारण तुमचं ब्रोकरेज जास्ती जाईल.
बाकीचे taxes थोडे कमी जास्त का होईना दोन्ही ट्रेडला लागणारच. महत्वाची गोष्ट म्हणजे कि या मला वाटत कि आपण या बाबतीत बोललोय आधी. तुम्हाला अजून काही शंका असतील तर नि:संकोच विचारा.
डे ट्रेड करताना हा हिशेब नेहेमी डोक्यात असण गरजेच आहे. त्याशिवाय तुम्हाला नक्की पैसे किती मिळतात हे तुम्हाला कळणार नाही. याबद्दल थोडं अजून सांगायचं पण ते पुढच्या भागात. असा विचार करतीये कि तुम्हाला माझ्या एकाद्या डे ट्रेड ची पावती दाखवूनच सगळं समजावून देईन. बघते काय जमतंय ते.. पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
डे ट्रेड म्हणजेच आखूड शिंगी बहुगुणी, जास्त दुध कमीत कमी वेळात देणारी आणि कमीतकमी वैरण खाणारी गाय शोधायचा प्रयत्न. या प्रकारासाठी व्यासंग , थोडासा चाणाक्षपणा आणी मर्यादित धोका पत्करण्याची तयारी ठेवावी लागते.
आता असं बघा कि गणपती किंवा एखादा सण आला तर फळ फुलं महागच मिळणार, दिवाळीच्या दिवसात कपड्यांच्या साड्यांच्या किमती जास्तच असणार, पित्रुपन्धरवडा किंवा पौष महिना खरेदीसाठी शुभ मानत नाहीत म्हणून तेव्हा सोनं थोड स्वस्त असणार किंवा थंडी पावसाळ्यात पंखे स्वस्त असतात ,उन्हाळ्यात लिंब महाग तर पावसाळ्यात स्वस्त हे जसं गृहिणींच्या लक्ष्यात येतं तसच मार्केटच्या निरीक्षणावरून काही गोष्टी गुंतवणूकदारांच्या सहज लक्ष्यात येतात. तुम्ही जर लिंबाचे व्यापारी असाल आणि समजा लिंब एकदम खूप टिकाऊ झाली तर तुम्ही पावसाळ्यात घेवून उन्हाळ्यात विकून पैसे कमवू शकाल कि नाही? मार्केटमध्ये हीच गोष्ट तुम्ही एका दिवसात करू शकता आणि हे करायचा प्रयत्न म्हणजेच डे ट्रेड..
सकाळी टी . व्ही . लावल्यावर शेअर मार्केटवर ज्या बातम्यांचा परिणाम होतो त्या बातम्या सांगतात . जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम शेअरमार्केटवर होतो. त्यावरून शेअरबाजाराचा कल ओळखून डे ट्रेड करावा लागतो. बाजार तेजीत असेल तर आधी खरेदी करून नंतर विका , बाजार मंदीत असेल तर आधी विकून नंतर खरेदी करा .. हेच डे ट्रेड सूत्र.
एखादा शेअर चार दिवस सतत वाढतो आहे तर चार दिवसानंतर लोकांना वाटतं की हा शेअर महाग झाला आपण खरेदीचा निर्णय पुढे ढकलू त्यामुळे मागणी कमी होते व शेअरची किमत कमी होते. एखादा शेअर ४ दिवस पडत असेल तर आपल्याला वाटतं यापेक्षा स्वस्त हा शेअर मिळणार नाही त्यामुळे तो शेअर खरेदी करण्याचा कल वाढतो. हे सगळं लगेच समजत नाही पण थोडा अभ्यास केला, अनुभव आला कि समजतं.
४ दिवस वाढणारा शेअर आधी विकायचा आणि नंतर विकत घ्यायचा किंवा जो शेअर ४ दिवस सतत पडतो आहे तो आधी खरेदी करून नंतर विकायचा हे समजायला थोडा वेळ लागतो. आणि हे सगळं जरी समजलं तरी शेवटी हे सगळे अंदाजच ! पाउस जसा लहरी तसच शेअरमार्केटसुद्धा मूडी असतं. जशी लहान मुले वागतात तसंच काहीसे मार्केट समजा ना. ‘आमच्या मुलाला हा पदार्थ आवडत नाही’ असं सांगावं आणी नेमक त्याचवेळी मुलाला तो पदार्थ आवडावा आणी त्याने तो पदार्थ चापून खावा तसचं काहीस होण्याची शक्यता लक्षात ठेवूनच डे ट्रेड करावा लागतो.
मार्केटच्या बाबतीत कोणतीही शास्वती कोणीही देवू नये त्यामुळे फायदा होत असेल तर तो लगेच पदरात पाडून घ्यावा!! दुसर्या भाषेत सांगायचं तर वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत , कारण पाणी आटल्यावर तक्रार कुणाकडे करणार ? आपल्या अंदाजाप्रमाणे शेअरमध्ये हालचाल नसेल तर ताबडतोब निर्णय घेवून उलट ट्रेड करून ट्रेड संपुष्टात आणावा. म्हणजेच तुम्ही किती तोटा सहन करू शकता याचा विचार करावा. यालाच मार्केटच्या भाषेत ‘STOP LOSS’ असं म्हणतात . म्हणजेच समजा १००रुपये किमतीचा शेअर खरेदी केला याचा अर्थ शेअरचा भाव वाढणार असे तुम्ही गृहीत धरले पण तुमच्या अंदाजाप्रमाणे घडले नाही आणि भाव कमी होऊ लागला तर ९८ रुपयाला तुम्ही STOP LOSS ठेवा याचा अर्थ असा की तोटा झाला तर प्रत्येक शेअरमागे रुपये २चा तोटा सहन होऊ शकेल असा तुमचा विचार असतो.
आता STOP LOSS ठरवायचा म्हणजे कोणत्याही शेअरच्या किमतीमध्ये जी हालचाल होते त्याकडे लक्ष ठेवायला हवी. तो शेअर साधारणपणे वाढला तर किती वाढतो आणी भाव पडला तर किती पडतो याचा अंदाज घ्यायला हवा. काल मार्केट बंद होताना त्याचा भाव किती होता हे बघायला हवं. त्याप्रमाणे कोणत्या भावाला खरेदी , कोणत्या भावाला विक्री , फायदा किती घ्यावा व फायदा होत नसेल तर तोटा किती सहन करावा हे सगळं आधी ठरवायला हवं . काही शेअर्स दिवसाला १०-१५ रुपये तर काही शेअर्स ३-४ रुपये , काही शेअर्स २०० -४००रुपये आणी काही शेअर्स ४०पैसे ते ८०पैसे एवढेच वाढतात किंवा कमी होतात. त्याप्रमाणेच तुमच्या फायद्याचे प्रमाण ठरतं.
तसे डे ट्रेड मध्ये अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आधी समजून घ्यायला हव्यात पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. बोलूच आपण लवकर !! पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काल माझा मुलगा म्हणाला – ‘आपल्या ब्लोग वर खूप सारे लोक DEMAT अकौंटची माहिती काढायला येतात. DEMAT अकौंटची माहिती मराठीमध्ये बाकी कुठे पटकन मिळत नाही असं दिसतंय. तू एक काम का नाही करत? एक पोस्त लिही DEMAT अकौंटबद्दल.’
मग काय तर. तुम्हाला DEMAT अकौंटबद्दल माहिती पाहिजे म्हणजे दिलीच पाहिजे!!. DEMAT अकौंटमुळे शेअर्सच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता, वक्तशीरपणा आणी सुलभता शक्य झालेली आहे. असा बहुगुणी आणी शेअरमार्केटसाठी अत्यावश्यक असलेला DEMAT अकौंट कुठे आणी कसा उघडायचा तेही पाहूया या भागात.
चला तर मग.
DEMAT अकौंट म्हणजे आपण खरेदी केलेल्या आणि विक्री केलेल्या शेअर्सचा हिशोब ठेवणारा अकौंट.या अकौंटमध्ये तुम्ही खरेदी केलेले शेअर्स, बोनस शेअर्स, IPO मध्ये तुम्हाला ALLOT झालेले शेअर्स, तुम्ही खरेदी केलेले RIGHTS इशू मधील शेअर्स, TAX FREE BONDS, MUTUAL फंडाची UNITS आणी कर्जेरोखे जर ती लिस्टेड असतील वगैरे ठराविक मुदतीत जमा केले जातात. तुम्ही विकलेले शेअर्स या अकौंटमध्ये डेबिट केले जातात म्हणजे वजा केले जातात . या अकौंटचं विवरणपत्र (statement) आपल्याला आपल्या मागणीप्रमाणे दर आठवड्याला , पंधरा दिवसाला किंवा महिन्याला किंवा दर तीन महिन्याला जिथे आपला अकौंट असेल तो ब्रोकर किंवा बँक पाठविते. या statementमध्ये आपल्याकडे ज्या कंपन्यांचे शेअर्स असतील त्या कंपन्यांची नावे , कंपन्यांचा नंबर, प्रत्येक कंपनीचे जमा शेअर्सची संख्या, त्याचे दर्शेनी मूल्य , मार्केटमध्ये त्या तारखेला असलेला दर , जमा असलेल्या शेअर्सचे बाजारात त्या तारखेला असलेले मूल्य असते. तसेच त्या कालावधीत तुम्ही शेअर्समध्ये केलेल्या प्रत्येक व्यवहाराची माहिती असते .
DEMAT अकौंट उघडल्यावर आपण आपल्या घरच्या पत्त्यामध्ये झालेला बदल व नौमिनेशनमध्ये केलेले बदल किंवा आपली सही बदललेली असली तर जिथे तुमचा DEMAT अकौंट असेल तिथे दिला की तुम्हाला प्रत्येक कंपनीला स्वतंत्ररीत्या कळवावे लागत नाही. तसच खातेधारकाच्या मृत्युनंतर सगळी कागदपत्र जिथे DEMAT अकौंट असेल तिथे दिली की काम होतं.
हे झालं DEMAT अकौंटबद्दल. आता बघूया कि तो उघडायचा कुठे आणि कसा ?
DEMAT अकौंट कोणत्याही शेअरब्रोकरकडे किंवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत, सहकारी किंवा खासगी बँकेत उघडता येतो. DEMAT अकौंट उघडणाऱ्या ब्रोकरला किंवा बँकांना DEPOSITARY PARTICIPANT असे म्हणतात. DEPOSITORY दोन आहेत CENTRAL DEPOSITORY SECURITIES LTD. आणी NATIONAL SECURITIES DEPOSITORY LTD. या दोन DEPOSITORY त्यांच्या मेम्बर असलेल्या DEPOSITORY PARTICIPANTतर्फे शेअरमार्केटमधील सर्व व्यवहार बघतात.
DEMAT अकौंट उघडण्यासाठी खालीं दिल्याप्रमाणे कागदपत्रे,फोटो आणी माहिती द्यावी लागते तसेच DEMAT अकौंट उघडण्यासाठी DP (DEPOSITORY PARTICIPANTS ) काही चार्जेस लावीत असतील तर तेही भरावे लागतात तसेच आवश्यक तेव्हढा STAMP पेपरही विकत घ्यावा लागतो
आपण राहत असलेल्या पत्त्याची पुष्टी करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे पुरावा म्हणून चालतात
पासपोर्ट
रेशनकार्ड
मतदाता प्रमाणपत्र(VOTERS IDENTITY कार्ड)
DRIVING परवाना (LICENSE )
जेष्ठ नागरिक कार्ड
विद्यापीठाला सलंग्न असलेल्या कॉलेजने जरी केलेले ओळखपत्र
LANDLINE टेलीफोन, इलेक्ट्रिसिटी , तसेच GAS ची पैसे भरलेली पावती
आयकर विवरण
REGISTAR केलेला भाडेकरार किंवा खरेदी विक्री करार
राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाने दिलेले ओळखपत्र
LATEST बँक अकौंट विवरण किंवा पासबुक
IDENTITY पुरावा म्हणून पुढील सगळी कागदपत्र चालतात
आधार कार्ड
पासपोर्ट
मतदाता कार्ड
DRIVING LICENSE
फोटो क्रेडीट कार्ड
कोणत्याही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जारी केलेले ओळखपत्र
विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या माविद्यालयाने जारी केलेले ओळखपत्र
वरील सर्व कागदपत्रे सेल्फ-ATTESTED असली पाहिजेत .VERIFICATION साठी मूळ कागदपत्रे सोबत न्यावीत अथवा खालील उल्लेख केलेल्या AUTHORITIES कडून सत्यापीत करून घ्यावीत .
नोटरी
GAZZETED ऑफिसर
कोणत्याही बँकेचा शाखाव्यवस्थापक
COURT MAGISTRATE न्यायाधीश
आमदार खासदार नगरसेवक
SPECIAL EXECUTIVE MAGISTRATE
खालच्या यादीत दिलेले बँक अकौंट डीटेल्स पण द्यावे लागतात
बँकेचे नाव
बँकेच्या शाखेचे नाव आणी पिन कोडसह पूर्ण पत्ता
खात्याचा प्रकार बचत, चालू अथवा कोणत्याही अन्य प्रकारचे खाते
बँकेच्या खात्याचा संपूर्ण नंबर
बँकेच्या शाखेचा MICR तसेच IFSC कोड नंबर हे दोन्ही कोड नंबर बँकेच्या चेकबुकवर किंवा पासबुक वर दिलेले असतात
या माहितीच्या पुराव्यासाठी CANCELLED चेकची ‘X’ROX , बँक स्टेटमेंटची ‘X’ROX ,बँक पासबुकची ‘X’ROX किंवा बँकेच्या शाखाव्यवस्थापकाचं पत्र दिलेलं चालतं.
DEMAT अकौंट उघडण्यासाठी PAN कार्ड असणे अत्यावश्यक आहे . DEMAT अकौंट एका व्यक्तीच्या नावावर (SOLE HOLDERS NAME), किंवा दोन किंवा तीन व्यक्तींच्या नावाने संयुक्त (JOINT ) अकौंट उघडू शकतो .जास्तीत जास्त तीन नावावरच DEMAT अकौंट उघडता येतो. या सर्वांचे ADDRESSचा पुरावा , IDENTITYचा पुरावा तसेच बँक अकौंट डीटेल्स तसेच फोटो द्यावी लागतात . सर्व संयुक्त खातेधारकांचे PAN कार्ड असण जरुरीचं आहे.
DEMAT अकौंट १८वर्षाखालील व्यक्ती स्वताच्या एकट्याच्या नावावरच उघडू शकते . १८ वर्षाखालील व्यक्तीचा अकौंट उघडताना त्याच्या पहिल्या पालकाचा फोटो त्याच्या स्वताच्या फोटोबरोबर देणे आवश्यक आहे प्रत्येक १८वर्षाखालील व्यक्तीच्या जन्मतारखेचा पुरावा सेल्फ ATTESTED द्यावा लागतो . प्रत्येक खातेधारकाचा फोटो खाते उघडण्याच्या फार्मवर चिकटवून त्यावर ACROSS सही करावी लागते. संयुक्त खात्यामध्ये ज्या क्रमाने नावं असतील त्याचक्रमाने TRADING अकौंटमध्ये संयुक्त नावं असली पाहिजेत. आपण DEMAT अकौंटमध्ये सही इंग्लिश ,हिंदी किंवा भारतीय घटनेतील ८व्या SCHEDULE मधील कोणत्याही भाषेत करू शकतो . या व्यतिरिक्त कोणत्याही भाषेत सही करावयाची असेल किंवा खातेधारकाला THUMB IMPRESSION (अंगठा ) द्यावयाचा असेल तर MAGISTRATE किंवा SPECIAL EXECUTIVE MAGISTRATE ने त्यांच्या सही शिक्क्यानिशी ती सही किंवा अंगठा ATTEST करावा लागतो . सही शक्यतो काळ्या शाईत करावी. संयुक्त खात्याच्या अकौंट उघडण्याच्या फार्मवर जीथे जीथे सह्या आवश्यक असतील तीथे सर्व संयुक्त खातेधारकांनी सह्या कराव्यात.
जर तुम्हाला इ-मेल द्वारे खात्याचे विवरण , केलेल्या व्यवहाराची बिले इत्यादी पाठवावयाची असल्यास इ-मेल अड्रेस आणी ID देणे जरुरीचे आहे . एकदा इ -मेलचे ऑप्शन निवडले तर सर्व माहिती आपल्याला इ मेल वरून पाठविली जाईल व ती आपल्यावर बंधनकारक असेल . त्यामुळे आपण आपली इं-मेल रोज चेक केली पाहिजे. आपल्या इ – मेलच्या पासवर्डविषयी योग्य ती गुप्तता पाळावी आणी नियमितपणे तो बदलत जावा.
DEMAT अकौंटमध्ये NOMINATION करण्याची सोय आहे. DEMAT अकौंट उघडण्यासाठी एका व्यक्तीची ओळख लागते . ती व्यक्ती
सबब्रोकर
खातेधारक (ट्रेडिंग अकौंट , किंवा DEMAT अकौंट असलेला
DP चा कर्मचारी
इत्यादी असू शकतो. तसच दोन साक्षीदारांच्या सह्या नावे आणी पत्ता देण जरुरीचे आहे . DEMAT अकौंटमध्ये व्यवहार करण्यासाठी POA (POWER OF ATTORNEY) देता येते POA धारकाला अकौंट मध्ये व्यवहार करता येतात पण अकौंट उघडता किंवा बंद करता येत नाही POA साठी असलेल्या STAMP पेपर वर POA देणारा आणी POA स्वीकारणारा यांच्या सह्या नोटरी समोर करून DP कडे REGISTER करावी लागते.
मला वाटत कि आजसाठी माहिती खूप झाली. मी जी माहिती दिली आहे ती मला आजच्या तारखेत जेवढ मार्केट समजत त्या हिशोबानी बरोबर आहे. मी असा दावा बिलकुल करत नाही कि हि माहिती १००% बरोबर आहे. त्यामुळे फ़क़्त या माहितीवर विसंबून गोष्टी करू नका. चारकडे चौकशी करा आणि मगच काय ते करा. मार्केटचे नियम कायम बदलत असतात त्यामुळे चौकशी केल्यावर तुम्हाला कदाचित कळेल कि मी दिलेल्या माहितीतली काही बदलली आहे. मला जितकी मदत करता येयील तितकी करायचा माझा प्रयत्न आहे.
आशा आहे कि हि माहितीचा तुम्हाला उपयोग होईल. काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर जरूर विचारा. ब्लोग वर कॉम्मेंत करा आणि मी नक्की उत्तर देईन. पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेअरची वरात मार्केटच्या दारात वाट पहात उभी होती . वरात आली ,वरात आली असं म्हणताच होणारी धांदल गडबड आठवली .दुध पाणी पायावर,भाकरतुकडा ओवाळून आरती या सगळ्या गोष्टी झरझर डोळ्यांसमोर आल्या .पण ही लग्नाची वरात होती थोडीच ? हि वरात होती मार्केटची !!
‘पुनश्च हरी ओम’ असं म्हणत मी ऑफिसमध्ये जावून माझे HDFC बँकेचे शेअर्स ३६५च्या भावाने विकायला लावले. काल ३५५ च्या भावानी शेअर्स विकले गेले नव्हते त्यामुळे खरं पाहता मी ३५० चा भाव लावावायला हवा होता. कालच्या अनुभवातून काहीतरी शिकायला हवं होतं. पण मनुष्यस्वभावाला औषध नाही हेच खरं . मार्केट तेजीत दिसलं, म्हटलं पाहू या १० रुपये वरचा भाव लावून . तेवढ्यात अविनाशनी विचारलं “MADAM आज तुमची ओर्डर नाही टाकायची का? कि हार मानलीत इतक्या लवकर?”
“अरे बाबा टाकली !! आल्याबरोबर टाकली !! ‘गिनी सिल्क’ ची ओर्डर सुद्धा लावली . .” मी लगेच म्हणाले
तेवढ्यात अजून एक ओळखीचा आवाज आला. ऑफिसमध्ये जावून जावून माझी त्यांच्याबरोबर तोंडओळख झाली होती . ते गृहस्थ म्हणाले “madam मी तुम्हाला एक सुचवू का ?”
“सुचवा ना, काही हरकत नाही” असे मी म्हटल्यावर ते म्हणाले “तुम्ही दोन order टाका. ५० शेअर्स ३६५ भावाने आणि दुसरे ५० शेअर्स रुपये ३७० भावाने किंवा २५ – २५ शेअर्सच्या ४ Order ४ वेगवेगळ्या भावांना लावा . थोडे जास्त पैसे मिळतील.”
ही त्यांनी केलेली सुचना मला योग्य वाटली . मी अविनाशला ओर्डर बदलावयास सांगितली . ५० शेअर्स रुपये ३६५ भावाला, ५० शेअर्स रुपये ३७० भावाला विकावयास लावले. ४ – ४ Order टाकायच्या फांद्यात पडले नाही कारण मी मार्केटमध्ये नवीनच होते.
मग काय ? रोजच्यासारख ऐकण , पाहण , माहिती करून घेण, डोळे व कान उघडे ठेवून परीक्षण , निरीक्षण करत बसण, सगळं सुरु झालं. मार्केट सुरु होवून जेमतेम अर्धा तास झाला तितक्यात वीज गेली. AIR CONDITIONERS बंद… लाईट बंद.. ट्यूबलाईट बंद!! आम्ही खिडक्या-दारे उघडली . नुसती तारांबळ उडाली . ऑफिस मधले BOLT(BSE’S ONLINE TRADING ) म्हणजेच मार्केटसाठी असलेले खास संगणक तेवढे सुरु होते .
“हे संगणक कसे चालू रे अविनाश ?” तेव्हा तो म्हणाला “हे UPS आणी INVERTER च्या सिस्टीमवर चालतात . म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या BATTERYवर चालतात.”
ते आधीचे गृहस्थ म्हणाले “रात्रीसुद्धा ४ तास लाईट नव्हते .त्यामुळे चार्जिंग पुरेल की नाही कुणास ठाऊक !”
काका म्हणाले ” तुम्ही सगळे संगणक बंद ठेवा. सगळ्या ऑर्डर्स एकाच BOLT वर घ्या . २ च पंखे चालू ठेवा .म्हणजे चार्जिंग जास्त वेळ पुरेल.”
सगळीकडे फोन करून चौकशी केली तेव्हा समजलं की काहीतरी मोठा बिघाड झालाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज नाही . जशी जशी दुरुस्ती होईल तशी तशी वीज येईल . ३ ते ४ तास नक्कीच लागतील .
त्या गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे चार्जिंग संपत आले , वार्निंग बेल ऐकू येवू लागली . अरे बापरे आता आली का पंचाईत! १० मिनिटात आवरते घ्यावे लागेल . ऑफिस मधल्या लोकांनी पटापट शक्य झाल्या तेव्हढ्या ओर्डरS रद्द केल्या किंवा बदलल्या आणि संगणकांनी शेवटचा श्वास घेतला.
सगळ्यांना सक्तीची विश्रांती मिळाली . येणाऱ्या फोनना उत्तरे देणे एवेढेच काय ते काम ऑफिसमध्ये चालू होतं. मी थोडा वेळ बसले. पण नंतर विचार केला येथे नुसते बसून काय ज्ञानात भर पडणार आहे? त्यापेक्षा घरी जावू या. गहू निवडून दळण तरी टाकता येईल. तेव्हढ्यात जर लाईट आले तर परत येवू . घर जवळ असल्याने मी २ मिनिटात घरी आले .
लाईट येण्याचे चिन्हच नाही . गहू निवडून झाले. पण लाईट नाही तर पिठाची चक्की तरी कुठून चालणार ? मी बाहेरच्या खोलीत भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढू लागले तेव्हढ्यात पंखा सुरु झाला . सगळी सालं घरभर उडाली आणि माझं लक्ष घड्याळाकडे गेलं. ३ वाजून ५ मिनिटे झाली होती . मी घराला कुलूप लावले. ऑफिसकडे धावत सुटले . पहाते तो ऑफिसमध्येही लाईट आले होते . ऑफिसमधल्या सर्वानी एकच गोंगाट सुरु केला . मी सुद्धा माझं घोडं दामटलं. पण काही कळेना. ऑफिस मधल्या T.V. वर HDFC बँकेचा भाव रुपये ३७४ चा दिसत होता.
“अरे अविनाश माझे शेअर विकले गेले का ते विचार न जरा”
“३७४ चा भाव दिसतो आहे. म्हणजे तुमचे शेअर्स विकले गेले असतील नक्की !” त्याने सांगितले ” ३६७.५० च्या भावाला १०० शेअर्स विकले गेले तुमचे”
मला काहीच समजेना. मी ३६७.५० च्या भावाने विकावयास लावलेच नव्हते. मार्केट आहे कि मस्करी? तेवढ्यात अविनाश म्हणाला “घाबरू नका. तुमच्या दोन्ही Order पूर्ण झाल्या madam. त्याची सरासरी किंमत ३६७.५० येते”
मी डोक्यावर हात मारून घेतला . अविनाश म्हणाला ” तुमची बोहोनी झाली तरी आनंद झालेला दिसत नाही madam.”
“जरा डोकं लावल असतं तर माझे सगळे शेअर्स ३७२ ला विकले गेले असते त्यामुळे वाईट वाटतय.” मी म्हणाले
“ काय madam, अहो काल ३५५ च्या भावाने जाण्याऐवजी आज ३६७.५०च्या भावाने गेले हा फायदा नव्हे काय ? जास्त हाव बरी नव्हे madam. बर याचा चेक मात्र ४ दिवसांनी मिळेल . पण INSTRUCTION स्लीप मात्र उद्याच्या उद्या WORKING HOURS मध्ये तुमचा DEMAT अकौंट जेथे असेल तेथे नेवून द्या”.
अशा प्रकारे HDFC बँकेच्या शेअर्सची इतिश्री झाली!! शेवटी ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड नव्हे काय ! पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आता चला माझ्याबरोबर . तुम्ही हवी असल्यास १ शेअर खरेदी करण्याची ओर्डेर टाकू शकता . मला मात्र शेअर्स विकून भांडवल गोळा करायचे आहे त्यामुळे मी आधी विकणार आहे . तुम्हाला आता पाठ झाले असेल . सांगा बरं मी कोणते शेअर्स विकणार? GINI SILKS आणी HDFC बँक. मी ठरवूनच ऑफिसमध्ये गेले . आज सौदा करायचाच. नमनाला घडाभर तेल घालून झालं होतं आणि आता तेल वाहून जावयाची पाळी आली होती. HDFC बँकेचा भाव ३५० रुपये चालला होता. माझे शेअर्स IPO मधील होते . हे शेअर्स मला ‘AT PAR’ मिळाले होते ( IPO आणी AT PAR याचे अर्थ पुढील भागातून येतील.)
‘AT PAR’ म्हणजे १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर IPO मध्ये १० रुपयाला मिळतो . ‘AT PREMIUM म्हणजे शेअरच्या दर्शनी किमतीत premiumची रक्कम वाढवून येणाऱ्या रकमेला शेअर IPOमध्ये विक्रीला आणण्यात येतो . म्हणजेच आता AT १० रुपये premium शेअर असला तर १० रुपये दर्शनी किमतीचा शहरे २० रुपयाला दिला जातो . ‘AT DISCOUNT’ म्हणजे शेअरच्या दर्शनी किमतीतून “DISCOUNT ” वजा केला जातो . AT रुपये २ DISCOUNT म्हणजे १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर विक्रीसाठी IPO मध्ये ८ रुपयाला मिळतो . थोडक्यात PREMIUMची रक्कम शेअरच्या दर्शनी किमतीत वाढविली जाते आणी discountची रक्कम शेअरच्या दर्शनी लीमातीतून वजा केली जाते . हल्ली नजीकच्या काळांत “AT DISCOUNT ” IPO अभावानेच आढळतात .
मला “HDFC बॅंकेच्या शेअर्ससाठी फारच चांगला भाव मिळत होता . यापेक्षा जास्त भाव मिळेल की भाव कमी होईल याबद्दल ना कल्पना होती ना अक्कल !! मी रुपये ३५५ भावाने १०० शेअर्स विकण्यासाठी ओर्डेर लावली. ३५५ रुपयाचा भाव दिसत होता पण माझे शेअर्स विकले जाईनात तेव्हा माझा पुन्हा गोंधळ उडाला.
मी विचारल – “अविनाश माझे शेअर्स का विकले जात नाहीत बाबा?’
तो म्हणाला – “स्क्रीनच्या डाव्या बाजूला रुपये ३५२ चा भाव आहे . व उलट्या बाजूला ३५५रुपयाचा भाव आहे. हा हिशेब ध्यानात घ्या. म्हणजे दुसरया बाजूस असलेला माणूस ३५२ रुपयाला खरेदी करायला तयार आहे आणि ३५५ रुपयाला विकायला तयार आहे. Madam तुम्हाला विकायचे असले तर त्या भावाला दुसरा माणूस खरेदी करायला तयार हवा. त्यामुळे ३५२ रुपयाच्या भाव ३५५ रुपये होईल तेव्हा तुमचा नंबर लागला तर विकले जातील .
अविनाश म्हणाला ” आणि हो मार्केट बंद होण्याआधी तो भाव आला पहिजे. मध्येच मार्केट पडायला लागले तर भाव खाली सुद्धा जातो.
मी म्हणाले “शुभ बोल नार्या तर बोडक्या झाल्या सारया !! मार्केट पडेल असं का म्हणतोस बाबा?. तर म्हणतो कसा – ‘ अहो मार्केटच ते, भाव कमी जास्त होणारच. तुमच्या तालावर तुमचा नवरा नाचेल मार्केट नव्हे’.
ऐकूण काय माझी आजची बोहोनी उद्यावर गेली एवढ मात्र नक्की ! पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
English: Phiroze Jeejeebhoy Towers which houses the Bombay Stock Exchange (Photo credit: Wikipedia)
मार्केट केव्हा उघडतं व कसं उघडतं या गोष्टीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एका प्रश्नाचं उत्तर मी CNBC वरून शोधलं. स्क्रीनवर ‘उलटी गिनती’ चालू होती. खालच्या बाजूच्या चौकोनात किती वाजले हे दाखवत होते. वाजले होते ९-३० व मार्केट उघडण्यास ३० मिनिटे शिल्लक होती. त्यावरून मार्केट १० वाजता उघडतं हे कळलं. हल्ली मार्केट ९-१५ ला उघडतं. ९.०० ते ९.१५ या वेळेत प्री-ओपनिंग (एस. एस. सी ची जशी पूर्व परीक्षा असते तसा) प्रकार सुरु झाला आहे.
आता उरलासुरला प्रश्न मार्केट कसं उघडतं याचा. माझ्या मनात अनेक विचार आले. उत्सुकता शिगेला पोहोचली.
मार्केट कसं उघडत असेल??
शाळेसारखे कि काय घंटा वाजणार , प्रार्थना होणार, नंतर शाळा सुरु होणार??
कि भाजी मंडईप्रमाणे? विकणाऱ्या बायका पुरुष माल घेवून येणार, पाणी शिंपून तयारी करणार, खरेदी करणारे भाव विचारून घासाघीस करणार, भाव पटला नाही तर पुढे निघून जाणार?
कि दुकान उघडतं त्याप्रमाणे विश्वासू कामगार कुलूप काढणार, शटर उघडणार, साफसफाई झाल्यावर सुरु??
किवा हिरवा सिग्नल दिसल्यावर गाडी येते त्याप्रमाणे काहीच कळत नव्हतं!!
मी आमच्या घरमालक आजीना (आम्ही त्यांना ताई असे म्हणतो.) नमस्कार करायला गेले. त्यांनी हातावर साखर दिली. म्हणाल्या
” यशस्वी हो!. मी मुंबई सगळी पालथी घातली आहे. दलाल स्ट्रीट म्हणून भाग आहे तीथे BSE मध्ये शेअर्सची ओरडून ओरडून लीलावासारखीच खरेदी विक्री चालते. लंब्या चौड्या वहीत बघून काहीतरी सांगत असत. तसचं आहे का हल्ली?”
‘मला पण माहित नाही, बघते’ असे सांगून मी निघाले.
ऑफिसमध्ये पोहोचले. काका आले होते. त्यांना म्हणाले
“आज मी मुद्दाम वेळात वेळ काढून मार्केट कसं उघडतं हे बघायला आलीये. कसं हो उघडतं मार्केट.?
काका म्हणाले
” मार्केट म्हणजे क्रिकेटची match बघा. सामन्याला जशी सुरुवात होते तशीच मार्केटची सुरुवात होते. आधी ग्राउंड कसं आहे; बॉल वळेल कि नाही; कोणत्या बोलरची बोलिंग चालेल ह्या सगळ्याची चर्चा होते. नंतर पंच येतात,नाणेफेक होते. मग BAT हलवत फलंदाज येतात आणी पहिला बॉल टाकला जातो. फ़क़्त मार्केटचं pitch वेगळ आणि match पण वेगळी. पण सगळं मीच सांगितल तर तुम्हाला काय मजा येणार? बसा आणी प्रत्यक्ष बघा मार्केट कसं उघडतं ते”
ऑफिसमधल्या लोंकाचे रोजचेच रुटीन चालूच होतं . अविनाश म्हणाला
” तुम्हाला काही समजत नसेल तर मला विचारा. तुमची सुरुवात आहे म्हणून तुम्ही गोंधळला आहात. अहो तिसरी चौथी शिकलेली माणसे सुद्धा व्यवस्थित ट्रेडिंग करतात.”
डोळे व कान उघडे ठेवून मी लक्ष देवू लागले . लोक लगबगीने येत होते. वेगवेगळ्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या ओर्डेर्स त्यांना हव्या असलेल्या भावाला देत होते. एका BOLT वर अविनाश आणि दुसरया BOLT वर अमित काम करत होता.
आपण स्कूटरसाठी, कारसाठी order नोंदवतो तेव्हा आपल्याला त्याची नोंद मिळते. पण इथे सगळं computerवरच होते. नाव आडनावाची गरज नव्हती. प्रत्येकजण आपला ट्रेडिंग अकौंट नंबर सांगत होता. इथे ट्रेड पूर्ण होण्याआधी आपल्याला order बदलत येते असही कळलं. शेअर्सची संख्या, भाव बदलाता येतो किवा ओर्देर पूर्णपणे रद्द करता येते हे हि लक्ष्यात आलं.
“शेअरमार्केटमध्येच आपण आपल्याला हव्या त्या भावाला खरेदी किवा विक्री करू शकतो असेच आहे का रे अविनाश?”
तो म्हणाला “तो भाव स्क्रीनवर दिसायला हवा ना ! अहो थांबा दोन सेकंदात मार्केट चालू होईल.”
बर ते जावू द्या! दोन सेकंद जातात न जातात तोच घंटा वाजली . मला खूप मजा वाटली. खरोखरीच आपल्याला घंटा ऐकु येते तशीच . माझ्या देवाच्या मंदिराचे दार उघडले असेच म्हणावे लागेल . मार्केट उघड्ण्याआधीच्या screenवरच्या स्थिर किमती हळू लागल्या. शेअर्सचे भाव बदलू लागले. संगणकावर तळाला एक पट्टी फिरू लागली . ज्यांच्या ज्यांच्या ओर्डरस पूर्ण झाल्या त्यांचे नंबर त्यापुढे खरेदी असेल तर निळ्या रंगात व विक्री असेल तर लाल रंगात दिसू लागले. अविनाश व अमित हजर असलेल्या माणसाना सांगू लागले आणि जे हजर नव्हते त्यांना फोनवरून सांगू लागले.प्रत्येकाच्या ओर्डरच्या निकालाविषयी ! त्या दिवशी मार्केट तेजीत होते BSE व NSE चे निर्देशांक सतत वाढत होते. या निर्देशांकाविषयी पुढच्या भागात सांगते.
काका म्हणाले ” Madam तुमचा पायगुण चांगला आहे. गेला आठवडाभर मार्केट मंदीत होते. असेच मार्केट तेजीत राहणार असेल तर आम्ही तुम्हाला पुढे बसायला जागा देवू. ”
अविनाश म्हणाला ‘आता बोलताना तुम्ही बसल्या आहांत हे लक्ष्यात ठेवूनच बोलायला लागणार.’
मी थोड्याश्या रागातच म्हणाले “असे का म्हणता हो मी तुमचं काय घोडं मारलय?.”
“अहो तसे नाही madam आता काय तुमच्यासमोर शिव्या देवून बोलणार कि काय 🙂 ? चला ते सगळं नंतर बघू. बोलता बोलता लक्ष राहिलं नाही तर घाटा होईल.”
मीसुद्धा माझे शेअर्स स्क्रीनवर पुढे आणून घेतले. माझा ट्रेडिंग अकौंट नंबर आला नव्हता त्यामुळे फ़क़्त निरीक्षणच! पण एक गोष्ट मात्र नक्की झाली . माझ्या नवीन नोकरीची वेळ ठरली ती म्हणजे सकाळी १० ते दुपारी ३-३०:) . शनिवार रविवार सुट्टी कारण त्या दिवशी मार्केट बंद असेत. आता आपली भेट पुढील भागात. पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा