Tag Archives: Marathi

भाग ६३ – डीलीस्टिंग चे details – Vedanta

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा 

भाग ६३ – डीलीस्टिंग चे details – Vedanta

वेदान्ता ही धातू क्षेत्रातील कंपनी आहे .वेदांताचे नाव आधी सेसा गोवा होते.स्टरलाईट इंडस्ट्री सेसा गोवा मध्ये मर्ज झाली नंतर सेसा स्टरलाईट असे नाव झाले. CAIRN चे तिच्यात मर्जर झाल्यावर ११ एप्रिल २०१७ मध्ये वेदांता असे नाव झाले. यात प्रमोटर होल्डिंग ५१.०६% आणि इतरांचे ४८.९४% शेअर होल्डिंग आहे. ही नॅचरल रिसोर्सेस कंपनी झिंक, लेड, सिल्व्हर, कॉपर, ऍल्युमिनियम, आयर्न ओअर, ऑइल &गॅस आणि पॉवर क्षेत्रात काम करते . एकवेळ अशी होती की वेदांताच्या शेअरचा भाव Rs ५००० प्रती शेअर होता तर शेअरची किंमत २०१६ मध्ये Rs ५६ होती. कारण त्यांच्या तुतिकोरिन आणि गोव्यामधील प्लांट्सचे काम ठप्प झाले. त्यामुळे रेव्हेन्यू कमी होत गेले आणि कर्ज वाढत गेले.

यावर्षी कोरोनामुळे मार्केट पडू लागले तेव्हा पुन्हा एकदा मार्चमध्ये वेदांताचा भाव Rs ६० प्रती शेअर झाला. ही डीलीस्टिंगसाठी चांगली संधी आहे. आमच्या शेअरला भाव येत नाही आम्ही डीलीस्ट करतो असे सांगता येईल. आणि डीलीस्टिंगसाठी रक्कमही कमी द्यावी लागेल.असा विचार वेदांताच्या प्रमोटर्सने केला. पण शेअर्स विकत घेण्यासाठी फंड हवेत म्हणून रक्कम गोळा करणे सुरु झाले. US $ ३.१५ बिलियन गोळा केले. US $१.७५ बिलियन बँकांकडून ३ महिन्यासाठी टर्म लोन घेतले. US $ १.४ बिलियन चे ३ वर्ष मुदतीचे अमॉर्टीझेशन बॉण्ड्स इशू करून रक्कम उभी केली.. त्यापैकी US $ १.९ बिलियन एवढ्या सिक्युरिटीज २०२१ मध्ये मॅच्युअर होतील. त्यामुळे कर्ज Rs १२५००० कोटींच्यावर गेले. याचवेळी कॉपर आणि आयर्न ओअर बिझिनेसमध्ये रेग्युलेटरी इशू आले. तुतीकोरिन आणि गोव्यामधील आयर्न ओअर चे प्लांट्स बंद राहिले. त्यामुळे वेळेवर कर्जाची फेड करणे कठीण झाले.

वेदांतामध्ये पब्लिक शेअरहोल्डिंग ४९.४९% आहे म्हणजेच १८३.९८ कोटी शेअर्स आहे कंपनीने मे २०२० मध्ये व्हॉलंटरीली डीलीस्ट करायचा निर्णय घेतला. डीलीस्टिंगसाठी इंडीकेटीव्ह फ्लोअर प्राईस Rs ८७.५० ठरवली.जी इंडीकेटीव्ह प्राईस ऑफर केली आहे त्याच किमतीला शेअर्स घेतलेच पाहिजेत असे कंपनीवर बंधन नाही तसेच शेअरहोल्डर्सनी या किमतीला शेअर्स दिले पाहिजेत असेही शेअरहोल्डर्सवरही बंधन नाही या शेअरची बुकव्हॅल्यू Rs १९२.९० होती. ऑइल ऍसेट राईट ऑफ आणि काही अडजस्टमेन्ट दाखवून बुकव्हल्यू कमी दाखवली. Rs १७१३२ कोटी इम्पेअरमेंट ऑफ ऍसेट्स इन ऑइल गॅस, कॉपर आणि आयर्न ओअर म्हणून राईटऑफ केले. आणि Rs १२०८३ कोटींचा तोटा दाखवला. त्यामुळे बुकव्हॅल्यू Rs ८९ झाली. यामागे शेअरहोल्डर्सची बारगेनिंग पॉवर कमी करण्याचा हेतू होता. नेमकी हीच गोष्ट गुंतवणूकदारांना खटकली. US $ ३.१५ बिलियन एवढी रक्कम वापरली तर वेदांता जास्तीतजास्त Rs १२८ प्रती शेअरचा भाव देऊ शकेल. यामध्ये हिंदुस्थान झिंकचा रोल मह्त्वाचा आहे. हिंदुस्थान झिंकनी Rs ६९७२ कोटी अंतरिम लाभांश दिला. तो वेदांताला मिळाला नाही. जर डीलीस्टिंग झाले तर हा डिव्हिडंड मिळणार नाही. डिव्हिडंड थेट शेअरहोल्डर्सना दिला जातो तो विथहोल्ड का केला ? हिंदुस्थान झिंककडे असलेले फंड्स डायव्हर्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंदुस्थान झिंक ने NCD काढून Rs ३५२० कोटी उभारले. ते डीलीस्टिंगसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान झिंक फंड रेझ करून पेरेंट कंपनीसाठी वापरू शकत नाही. वेदांता नेहमीच तिच्या ज्या कॅशरीच सबसिडीअरिज आहे तिच्यावर अवलंबून राहाते. हिंदुस्थान झिंक मध्ये सरकारचा २९% स्टेक असल्यामुळे सरकारचा रोलही महत्वाचा ठरतो.

डीलीस्टिंग साठी E -वोटिंग द्वारे मतदान झाले. २४ जून ते २६ जून २०२० दरम्यान डीलीस्टिंगच्या बाजूने ९३% मतदान झाले. वेदांताची डीलीस्टिंग ऑफर ५ ऑक्टोबर २०२० ला ओपन होऊन ९ ऑक्टोबर २०२० ला बंद होईल. ऑफर बंद झाल्यावर जर फायनल एक्सिट ऑफर चा स्वीकार झाला नाही तर २ दिवसात म्हणजे १३ ऑक्टोबरपर्यंत काउंटर ऑफर वेदांताने दिली पाहिजे. १० दिवसाच्या आंत म्हणजे २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत वेदान्ताने डीलीस्टिंगची रक्कम शेअरहोल्डर्सना दिली पाहिजे..

या डीलीस्टिंग बरोबरच अमेरिकन डिपॉझिटरी (म्हणजे फॉरिनबेस्ड कंपनीचे इक्विटीशेअर्स जे अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजवर खरेदीविक्री साठी उपलब्ध असतात) शेअर्सचे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवरून डीलीस्टिंग होईल.डिपॉझिटरी शेअर्स हे डिपॉझिटरी बँक फॉरीन कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार इशू करतात.

या डीलीस्टिंगमध्ये आम्ही काय करावे असा विचार ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदार करत असतील.

(१) वरील चर्चेतून एक गोष्ट तुम्हाला कळली असेल की Rs १२८ ते Rs १३० पर्यंतचा भाव तर नक्कीच मिळेल. ज्या कोणी Rs ९० ते Rs १०० च्या किमतीच्या आसपास शेअर्स खरेदी केले असतील त्यांना २५% प्रॉफिट होतो आहे. त्यामुळे त्यांनी प्रॉफीटबुकींग करावे किंवा Rs १३० चा ट्रेलिन्ग स्टॉपलॉस लावावा. जसा भाव वाढत जाईल तसा ट्रेलिन्ग स्टॉपलॉस वाढवत न्यावा.

(२) गेल्या वर्षीचा हायेस्ट भाव Rs १७५ होता. त्यामुळे Rs १७० ते Rs १७५ दरम्यान डीलीस्टिंग होईल असा अंदाज वर्तवला जातो. एवढा भाव झाल्यास होल्डिंग पैकी ९०% शेअर्स विकावेत.

(३) पण ज्यांची खरेदी Rs २०० किंवा जास्त भावावर झाली आहे त्यांनी शेअर्स तोट्यात दिले पाहिजेत असे नाही. कंपनी बंद होत नाही आहे फक्त डीलीस्ट होत आहे. यामध्ये BSE, NSE वर ट्रेडिंग होणार नाही पण डिलिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार करणारे काही ब्रोकर्स असतात त्यांच्यामार्फत शेअर्स विकता येतील.अशा डीलीस्ट झालेल्या कंपनीच्या शेअर्सवर डिव्हिडंड बोनस अशासारख्या गोष्टी मिळतात . ही चांगली कंपनी आहे कदाचित काही काळानंतर परिस्थिती बदलल्यावर कंपनीचे शेअर्स रिलिस्ट होण्याची शक्यता असते.

आता जे जे होईल ते ते पहा आणि आपल्यास योग्य आणि फायदेशीर असा निर्णय घ्या.

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

भाग ५८ – कॉर्पोरेट एक्शन भाग ३ ‘BUY BACK’

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

synchronize-150123_640

Buy back 


भाग ५७ and ५६ मधे २ corporate action समजून घेतल्या – BONUS आणि SPLIT. आज आपण अजून एक corporate action समजवून घेवू. ‘BUY BACK’ म्हणजे कंपनी स्वतःचेच इशू केलेले शेअर्स एका विशिष्ट किंमतीला एका विशिष्ट मुदतीत आणी ठराविक प्रमाणांत शेअरहोल्डर्स कडून किंवा ओपनमार्केटमधून विकत घेते. आणी ती रकम शेअरहोल्डर्सच्या खात्याला जमा करते. यालाच रिपर्चेस ऑफ शेअर्स असेही म्हणतात. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ‘BUY BACK’ चा निर्णय घेवून तो मंजूर करते.आणी नंतर शेअरहोल्डर्सची मंजुरीही घेतली जाते..या कॉर्पोरेट एक्शनचा अप्रत्यक्षरीत्या शेअरच्या किंमतीवर परिणाम होत असतो. ही कॉर्पोरेट एक्शन VOLUNTARY आहे.
कंपनी ‘BUY BACK’ कां करते
(१) शेअरची किमत वाढावी म्हणून
(२) ‘BUY BACK’ केल्यामुळे शेअर्सची संख्या कमी होते. त्यामुळे EPS (EARNING PER SHARE) वाढते.
(३) अनावश्यक आणी जास्त असलेले भाग भांडवल कमी करण्यासाठी
(४) जे भागभांडवल ‘ASSETS’ ने रिप्रेझेंट होत नाही ते कमी करण्यासाठी
(५) शिलकी रोख रकमेचा उपयोग करून शेअरहोल्डर्सला देण्यासाठी – कंपनीच्या BALANCE SHEET मधे भरपूर कॅश असणे जेवढं चांगलं तेवढंच धोक्याचेही असते. कारण ती कंपनी TAKEOVERसाठी टार्गेट बनते. कारण TAKEOVER केल्यानंतर त्याच रकमेचा उपयोग कर्जाची परतफेड करण्यासाठी करतां येतो. आणी नजीकच्या भविष्यकाळात रोख रकमेचा उपयोग चांगल्याप्रकारे करू शकणार नसेल तर ‘BUY BACK’ ची योजना जाहीर करते.
(६) प्रमोटर्सचा किंवा व्यवस्थापनाचा भागभांडवलातील हिस्सा वाढवण्याकरता
(७) दुसऱ्या कंपनीने आपली कंपनी घेण्याचा धोका टाळण्यासाठी
(८) एखाद्या देशातून कंपनीला बाहेर पडायचे असेल तर
(९) कंपनी बंद करायची असेल तर
(१०) डीलिस्टिंगच्या कायदेशीर बाबीतून सुटका करून घेण्यासाठी
(११) कंपनीची आर्थिक परिस्थिती काही आर्थिक निकषांवर ठरवली जाते. हे आर्थिक निकष सुधारण्यासाठीसुद्धा ‘BUY BACK’ ची योजना आणतात. यामुळे कंपनीची रोख रकम कमी होते त्यामुळे ‘ASSETS’ कमी होतात त्यामुळे ‘ROA’ (RETURN ON ASSETS) वाढतो. ROE (RETURN ON EQUITY) वाढतो. PE रेशियो सुधारतो.
(१२) कर्मचाऱ्यांना ‘ESOP’ दिल्यामुळे प्रमोटर्सचा स्टेक कमी होतो. हा स्टेक वाढवण्यासाठी.
(१३)सरकार जर कंपनीचे राष्ट्रीयीकरण करत असेल तर.
(१४)EMPLOYEE STOCK OPTION किंवा पेन्शन प्लान्साठी शेअर्स उपलब्ध व्हावेत म्हणून.
कंपनी ‘BUY BACK’ तीन प्रकारे करू शकते.
(१) कंपनी ‘BUY BACK’ साठी किती रकम वापरणार ती रकम, ‘BUY BACK’ प्राईस, ‘BUY BACK’ किती मुदतीत केले जाईल आणी किती प्रमाणांत केले जाईल हे जाहीर करते. शेअरहोल्डर्सना फार्म पाठविले जातात. तो फार्म व्यवस्थितरीत्या भरून शेअरहोल्डरची सही करून ठरलेल्या मुदतीत फार्ममध्ये उल्लेख केलेल्या ठिकाणी द्यावा. शेअरहोल्डर्सनी त्यांच्याजवळचे सर्व शेअर्स BUY BACK योजनेखाली द्यायलाच पाहिजेत असे बंधन नाही.
शेअरहोल्डर जे शेअर्स या योजनेखाली देऊ करतात ते ‘ESCROW’ अकौटला जमा होतात. समजा कंपनी ५०% ‘BUY BACK’ करणार असेल आणी शेअरहोल्डरने १०० शेअर्स देऊ केले असतील तर कंपनी ५० शेअर्स ‘BUY BACK’ करते आणी ५० शेअर्स त्या व्यक्तीच्या ‘DEMAT’ अकौंटला जमा होतात. जर समजा ‘BUY BACK’ प्राईस Rs १०० असेल तर Rs ५००० त्याच्या खात्याला जमा केले जातात. अशी ‘BUY BACK’ ऑफर शेअरहोल्डरच्या दृष्टीने फायदेशीर असेलच असे नाही. १००% ‘BUY BACK’ असेल तरच ते फायदेशीर ठरते कारण उरलेले शेअर्स अकौटला जमा झाल्यानंतर त्या शेअर्सचा भाव तुम्हाला फायदेशीर असेलच असे नाही.
तुम्हाला जर ‘BUY BACK’ योजनेखाली शेअर्स देऊ करायचे नसतील तर तुम्ही तसे स्पष्ट कळवले पाहिजे अशी सुचना काही कंपन्या देतात. जर तुम्ही तुमचा नकार कळवला नाही तर तुमचा होकार आहे असे गृहीत धरून तूमची इच्छा असो वा नसो तुमचे शेअर कंपनी ‘BUY BACK’ करते.
तुम्ही जागरूक राहणे आवश्यक आहे. तुम्हाला फॉर्म मिळाला नसेल तर हल्ली फॉर्म कंपनीच्या साईटवरून डाउनलोड करून भरतां येतो. ‘BUY BACK’ ऑफर कंपनी डीलिस्ट करण्याच्या उद्देशाने करत आहे कां याचा अंदाज घ्यावा. लोकांचा कल BUY BACK मध्ये शेअर्स देण्याकडे आहे कां हे पहावे. जर कंपनीला ‘BUY BACK’ साठी पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही तर कंपनी पुन्हा सुधारीत ऑफर आणते. निरनिराळ्या वर्तमानपत्रातून आणी दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून होत असलेल्या चर्चेकडे लक्ष ठेवावे. जर ‘BUY BACK’ योजनेखाली देऊ केलेली प्राईस सध्या मार्केटमध्ये असलेल्या शेअरच्या किमतीपेक्षा बरीच जास्त असेल तरच ‘BUY BACK’ शेअरहोल्डरच्या दृष्टीने फायदेशीर असते.
(२) कंपनी ठराविक मुदतीत ओपन मार्केटमधून शेअर्स खरेदी करणार असे जाहीर करते. या खरेदीसाठी किती रकम वापरणार, किती किंमतीपर्यंत शेअर्स खरेदी करणार हे जाहीर करते. रिलायन्सने दोन वर्षापूर्वी ‘BUY BACK’ ऑफर आणली होती. त्यावेळी शेअर्सचा भाव Rs ७६० च्या आसपास होता कंपनी Rs ८५० रुपयापर्यंतच्या भावाने काही रकम शेअर ‘BUY BACK’ करण्यासाठी वापरणार होती. अशावेळी शेअर्सचा भाव Rs ८५० होईल असे गृहीत धरून गुंतवणूकदारांनी फसू नये. याचा उपयोग एवढाच की कंपनीच्या शेअर्सचा भाव पडू लागल्यास कंपनी मार्केटमधून शेअर्स BUY BACK करीत असल्यामुळे शेअरचा भाव स्थिर राहण्यास मदत होते. या पध्दतीच्या ‘BUY BACK’ चा शेअरहोल्डरला जास्त फायदा होत नाही.
(३) कंपनी बुकबिल्डींगच्या पद्धतीने ‘BUY BACK’ योजना जाहीर करते.कंपनी जास्तीतजास्त भाव जाहीर करते आणी वेगवेगळ्या किमतीसाठी शेअर्स ‘BUY BACK’ साठी बिड मागवते.. आतां ‘JUST DIAL’ या कंपनीने Rs १५५० या किमतीला ‘BUY BACK’ जाहीर करून शेअरहोल्डर्सकडून बीड मागवल्या. ह्या प्रकारची ‘BUY BACK’ योजना शेअरहोल्डर्सना फायद्याची ठरत नाही. ज्या कमीतकमी किंमतीला जास्तीतजास्त बीड येतील त्या किंमतीला कंपनी ‘BUY BACK’ करते
शेअरहोल्डर्सनी ‘BUY BACK’ ऑफरच्या खालील बाबींकडे लक्ष द्यावे.
(१) कंपनी नवीन आहे कां ?
(२) खूप कर्जबाजारी असलेली कंपनी
(३) ‘BUY BACK’ जाहीर झाल्यावर किंवा होण्याच्या आधी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये असामान्य आणी अचानक बदल झाले आहेत. कां ?
शेअरची किंमत जर मार्केटमध्ये वाढत असेल तर शेअर मार्केटमध्येच विकावेत. ‘BUY BACK’ योजेखाली दिलेल्या शेअर्सचे पैसे BUY BACK ची प्रोसिजर पुरी झाल्यावरच मिळतात.
म्हणजेच कॉर्पोरेट एक्शनखाली कोणतीही योजना आली तर त्यांत स्वतःचा फायदा किती आहे हे ठरवून शेअरहोल्डरने निर्णय घ्यावा.शेवटी शेअरमार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने स्वतःच्या फायद्याकरता करावी. तोट्याचे खापर दुसऱ्यावर फोडू नये.
आता पुढची corporate action म्हणजे ‘Dividend’. पुढील भाघात त्याची माहिती करून घेवू ..

भाग ५५ – लक्ष्मण-रेषा – एक्स-डेट आणी रेकार्ड-डेट

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
 
उन्हाळ्याचे दिवस होते. लोड-शेडींग होते. त्यामुळे अर्थातच लाईट्स नव्हते. लाईट्स नाहीत म्हणजे टी व्ही नाही. इन्टरनेट नाही. आधुनिक साधनांचा उपयोग शून्य. त्यामुळे अर्थातच झाली पंचाईत. म्हणून उठले , स्वयंपाक उरकून घेतला.माझी धोपटी उचलली आणी आमच्या ऑफिसमध्ये गेले. आमचं ऑफिस आमच्या घरापासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे त्यामुळे सहज शक्य झालं. नाहीतर काय करायचं हा प्रश्नच.
ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर ऐकू येणारा एकच संवाद. “काय MADAM लाईट गेलेले दिसतात. तेव्हांच तुमचे पाय ऑफिसकडे वळले.”
“हो रे बाबांनो पण तुमचं काय नुकसान!”
“ काही नाही हो MADAM, चेष्टा आपली! पाणी हवंय कां ? विचारपूस करतोय नाहीतर म्हणाल पाणी सुद्धा विचारलं नाही. काकांचा ओरडा बसेल”
मी माझ्या जागेवर बसून मार्केट पाहू लागले. आज काही ट्रेड करतां येईल कां याचा विचार करू लागले. तेव्हढ्यात चार-पांच जण आले. मी विचारलं “ काय हवंय ? तेव्हां अविनाश म्हणाला “ क्लायंट आहेत ! MADAM, बसा हं!”
“आम्ही बसायला नाही आलो.”
“मग काय हवंय? चेक हवंय बील हवंय स्टेटमेंट हवंय की आणखी काही?आणखी काही हवे असेल तर मात्र साडेतीननंतर , मार्केट संपल्यानंतर सांगा”
तेव्हढ्यांत ऑफिसमध्ये काका आल्रे. त्यासरशी ते लोक काकांकडे आले.
“ काय अंदाधुंदीचा कारभार असतो मार्केटमध्य. आज तुम्ही शेअर्स घेतलेत तर बोनस किंवा डीव्हीदण्ड मिळेल की नाही याची कोणालाच नक्की माहिती नसतं . त्यावर अवलंबून लोक शेअर्स घेतात किंवा विकतात. आणि मग फसवणूक झाल्यासारख होतं.”
काकांचा स्वभाव खूपच शांत आहे. “ तुम्ही भांडू नका. मला काय झालं ते सांगाल कां ?”
“आम्ही खरे पाहतां बोनस आणी स्प्लिट हवा म्हणूनच घाईघाईने अकौंट उघडला.माझ्या मित्राला पैशाची गरज होती. बोनस जाहीर झाला की त्या शेअर्सचा भाव वाढतो तेव्हां विकावा असे समजले होते.त्यामुळे त्यांनी १९ तारखेला विकले. आता जर १९ मार्च ही EX-डेट होती व २० मार्च ही रेकॉर्ड डेट होती तर आम्हाला बोनस मिळायला पाहिजे ना?
“१९ मार्चला तुम्ही खरेदी केलेत तर ते शेअर्स तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर २१ तारखेला जातात. २० तारखेला ज्यांचे शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर असतील त्यांनाच बोनस मिळेल आणी शेअर्स स्प्लिटचाही फायदा मिळेल. त्यामुळे १९ तारखेला ज्यांनी शेअर्स खरेदी केले असतील त्यांना बोनस आणी स्प्लिटचा फायदा मिळणार नाही. उलटपक्षी तुम्ही १९ तारखेला शेअर्स विकले तर ते सर्व प्रक्रिया होऊन २१ तारखेला तुच्या ‘DEMAT’ वरून वजा होतात. त्यामुळे त्यांनी विकले असले तरी त्यांना बोनस आणी स्प्लिटचा फायदा मिळेल.या मध्ये दोष कुणाचा? कुणाचाच नाही. सध्या रोलिंग सेटलमेंट T+2 अशी आहे”
“ आम्हाला काहीच कळत नाही.आम्ही विकत घेतले तेव्हां तरी कोणी तरी सांगायला पाहिजे होतं.”
काकांना काही समजेना. काका मला म्हणाले “ काय करू आता ?”
तेव्हां मी पुढे झाले “ उद्या तुम्ही तुमचे बिल घेवून या. शनिवार आहे मार्केट नसते शांतपणे बसून बोलू.”
“ अहो तुम्ही सांगता शनिवारी या. आम्ही शनिवारी मुद्दाम येणार व नेमके आम्हाला शटर बघून परत जावे लागेल”
“ तुम्ही निघताना फोन करा. आम्ही ऑफिसांत आहोत की नाही याची खात्री करूनच मग निघा.” असे म्हटल्यावर ती माणसे थोडी शांत झाली.
शनिवारी येतो असे सांगून निघून गेली. ऑफिसमधला गोंगाट कमी झाला. मी काकांना म्हटलं
“कदाचित तारीख सांगताना काही गोंधळ होऊ शकतो. आपणही आपले रेकॉर्ड बघू. विचार करायला काय घडले, चूक कोणाची याची शहानिशा करायला थोडा वेळ मिळेल.”
ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शनिवारी आले. मला काकांनी बजावले होते “ MADAM, तुम्ही नक्की यायला पाहिजे.” त्याप्रमाणे मी ऑफिसमध्ये गेले. १९ तारखेला शेअरचा भाव बोनस आणी स्प्लिट झाल्यावर १:४ या प्रमाणांत विभागून आला.६९८ रुपये चा भाव होता.
” हे पहा फक्त समजुतीचा घोटाळा झाला. तुम्हाला Rs २८००चे शेअर्स Rs ७०० च्या जवळपासच्या किमतीला मिळाले म्हणून तुम्ही हरखून गेलांत. पण वस्तुस्थिती तशी नाही. कंपनीने १:१ बोनस आणी त्यानंतर एका शेअरचे २शेअर्स स्प्लिट असे जाहीर केले. म्हणजेच १० शेअर्सला १०शेअर्स बोनस आणी त्या २० शेअर्सचे स्प्लिट म्हणजेच ४० शेअर्स होणार. म्हणजेच ज्या माणसाकडे १ शेअर असेल त्याला ४ शेअर्स मिळणार. त्यामुळे १९ तारखेला म्हणजेच EX- डेट ला शेअरची किमत १/४ होऊन आली. म्हणजेच Rs.६९८ ला १ शेअर झाली. त्या हिशेबानेच तुम्ही ६९८ रुपयाला एक या प्रमाणे १० शेअर्स घेतलेत असे बिलाप्रमाणे दिसते आहे. जर तुम्हाला बोनस आणी स्प्लिट मिळायचे असते तर २८०० रुपयाच्या किमतीला १ शेअर खरेदी करावा लागला असता.
त्याचप्रमाणे तुमच्या मित्राने १९ तारखेला १० शेअर्स ६९० च्या भावाने विकले असतील तरी त्यांच्या ‘DEMAT’ अकौंटवर आणखी ३० शेअर्स रेकॉर्डडेटनंतर येतील. ते ३० शेअर्स तुम्ही नंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे आणी तुमच्या गरजेप्रमाणे विकू शकता. त्यांचाही काही फायदा नाही आणी तुमचेही काही नुकसान नाही फक्त समजुतीचा घोटाळा आहे.”
EX-डेट म्हणजेच लक्ष्मणाने सीतेसाठी घालून दिलेली मर्यादा आहे असे समजा. त्या तारखेच्या आधी खरेदी करणाऱ्याला बोनस DIVIDEND स्प्लिट , RIGHTS, मर्जर डीमर्जर , स्पिन ऑफ अशा प्रकारच्या कॉर्पोरेट ACTIONचा फायदा मिळतो. य़ा तारखेला किंवा या तारखेनंतर घेतलेल्या शेअर्सवर हे फायदे मिळत नाहीत.जसे रावणाने सीतेला लक्ष्मणरेखा पार केल्यावर पळवून नेले तसे एकदा ही तारीख निघून गेल्यावर ही सर्व फायदे मिळत नाहीत.
त्यामुळे शेअर्स खरेदी करताना तसे काही उद्देश असेल तर खरेदी केलेले शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर कधी येतील हे विचारूनच शेअर्स खरेदी घेत चला .
हे शेअर्स रेकॉर्ड डेटला तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर असतील तरच तुम्हाला हे सर्व फायदे मिळतील. तसेच शेअर विकताना ते तुमच्या ‘DEMAT” अकौंटवर कधी वजा होतील हे विचारून घ्या. जर ते रेकॉर्ड डेटला किंवा त्याच्या आधी तुमच्या अकौंटवरून वजा होणार असतील तरी तुम्हाला या सर्व कॉर्पोरेट ACTION चा फायदा मिळणार नाही. या सर्व माहितीसाठी ब्रोकरवर किंवा दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच इंटरनेटवर जाऊन (जे आता तुमच्या मोबाईलवरही असते) माहिती करून घ्या.
भेटू या पुढच्या भागांत…

भाग ५४ – लक्षात येयीना, मार्केट वाकडे – bonus आणि split

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
या आठवड्यामध्ये वाघ मागे लागल्यासारखं काम होतं. कितीही आटपण्याचा प्रयत्न केला तरी आटपत नव्हतं. वेळ पुरत नव्हता आणि काय करावं ते ही समजत नव्हतं. नुसता चिडचिडाट… प्रत्येकजण घरी आला की त्याची अपेक्षा मी आपल्या आवडीचे खायला द्यावे विचारपूस करावी. यजमानही लोकलमधून धक्के खात खात येत असत. त्यांनाही वाटे बँकेतल्या कहाण्या बायकोने ऐकाव्यात. आल्याबरोबर कटकट लावू नये. “रिमोट कुठे आहे तो सांग किंवा दे. मला match बघायची आहे”. इति मुलगा
मी कंटाळले होते. शनिवार रविवारची आतुरतेने वाट पहात होते.मी मनाशी ठरवलेच ह्या शनिवार-रविवारी काहीही चटकमटक खायला करायचं नाही, जेवणांतही काही बदल करायचा नाही, जादा कोणतंही काम नाही, कोणाला भेटायला जायचं नाही किंवा कोणाला बोलवायचंही नाही. फक्त विश्रांती घ्यायची
ठरवल्याप्रमाणे शनिवार आरामांत घालवला. पण माझ्या आरामाला दृष्ट लागली बहुतेक ! रविवारी सकाळी नऊ वाजतां एक गृहस्थ आणी त्यांच्याबरोबर एक मध्यमवयीन माणूस असे आमच्या घरी आले. वयस्कर गृहस्थ ठाण्याचे नव्हते. पण त्यांच्याबरोबरच्या माणसाची माझी तोंड ओळख होती असे वाटले.
त्यांनी बेल वाजवली. माझ्या यजमानानी दार उघडले. मी सकाळी काम उरकत होते. तशी अवतारातच होते. यजमानांनी विचारपूस केली तेव्हा ते गृहस्थ म्हणाले “मी माझी वहिनी अंकातील शेअरमार्केटचा लेख वाचला. ब्लोग वाचला. आपल्याकडे शेअरमार्केट कोण करतं ? “
यजमान म्हणाले “ माझी बायको करते. मी बँकेत नोकरी करतो.”
गृहस्थ “मला त्यांना भेटायचे आहे.”
यजमान “तुम्ही आधी कळवलं होतं कां ?”
गृहस्थ “ नाही नाही, आज रविवार त्या भेटतील असे वाटले! म्हणून आलो.”
यजमान आंत आले. मला म्हणाले “ कुणीतरी तुला भेटायला आले आहे.”
मी म्हणाले “ त्यांना बसायला सांगा, पाणी द्या. पंखा लावा . मी ५-१० मिनिटांत माझा अवतार ठीकठाक करून बाहेर येते.”
झाला सुरु रविवार असं बडबडत केसावर फणी फिरवून साडी नीट करून मी बाहेर गेले. मी स्वतःच विषयाला हात घातला. “ आज कसं काय अचानक येणं केलं ?
गृहस्थांना आपण कधी एकदा सर्व काही माझ्या कानावर घालतो असे झाले होते – “मी ज्या लायब्ररीतून अंक आणला त्या लायब्ररीतील बाई तुमच्याकडे गाण्याच्या क्लासला येतात त्यांनी पत्ता सांगितला, त्यामुळे मी येऊ शकलो.”
मी म्हटले “ बरं ते ठीक आहे. तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो तरी सांगा! आढेवेढे न घेतां मोकळेपणाने सांगा.”
“ अहो मी बोनस आणी स्प्लिट जाहीर झाले म्हणून काही शेअर्स घेतले. १:१ या प्रमाणांत बोनस आणी १:१ या प्रमाणांत असे स्प्लिट होणार होते. म्हणजे एका शेअरचे ४ शेअर्स होणार ना! मी काय म्हणतो ते बरोबर आहे ना?” दुसर्या कंपनीने फक्त बोनस दिला होता. अहो शेअरचा भाव होता Rs. २००० होतां. मला असे वाटले की एका शेअरचे ४ शेअर झाले की आपण ४ शेअर्स विकू तर आपल्याला Rs.८००० मिळतील. शेअर्स विकून पैसे आले की आपण घरातल्या सगळ्यांना काहीतरी देऊ. त्यामुळे मी नातवाला सायकल, नातीला मोबाईल, बायकोला पैठणी घ्यायचे प्रॉमिस केले.शुक्रवारी मी स्टेटमेंट पहिले तर एका शेअर्सचे ४ शेअर झाले होते. मार्केट उघडल्याबरोबर शेअर विकायची ऑर्डर लावायला फोन केला, भाव विचारला.
तो म्हणाला “ Rs.५०० भाव आहे. माझी त्याच्याबरोबर वादावादी झाली. काय गोंधळ झाला मला समजेना! “
तो म्हणाला “ मार्केट संपल्यावर विचारा. सध्या सारखे फोन चालू आहेत. “
गृहस्थांनी आपलं म्हणण चालू ठेवले “ शेअरमार्केट म्हणजे अंदाधुंदीचा कारभार, गडबड घोटाळे हे सर्व वाचलेले खरे झाले असे वाटले. फसवणूक झाली म्हणून डोके बडवून घेण तेव्हढेच बाकी राहिले होते. तेव्हा नातू म्हणाला आजोबा तुमचं बीपी वाढेल. पूर्ण चौकशी करा. उगीचच घाबरु नका. जो कोणी फसवणार नाही असं वाटेल तेथे जाऊन चौकशी करा. तुमच्या जिवापेक्षा मला काही नको. मला सायकल नको आहे आजोबा!”
मी म्हणाले “ थांबा जरा , काहीतरी गडबड आहे. १:१ बोनस आणी १:१ स्प्लिट झाले म्हणजे एकाचे ४ शेअर्स झाले. तर मग शेअर्सचा भाव १/४ (२५%) व्हायला हवा. Rs. ५०० सकाळी भाव असेल नंतर तो मार्केटप्रमाणे ४९७, ५०२, ५०४, ४९९ असा बदलला असेल ना ! की यापेक्षा काही वेगळे? “
गृहस्थ म्हणाले “ नाही madam अगदी बरोबर तुम्ही म्हणता तसेच झाले.
मी म्हणाले “ आजोबा तुमचे काही चुकले नाही. सगळ्यांचं हेच होते. बोनस किंवा स्प्लिट ज्या प्रमाणांत असेल त्या प्रमाणांत शेअर्सचा भाव कमी होतो. यामध्ये तुमची काहीही फसवणूक झालेली नाही.मी तुम्हाला थोडक्यांत सांगते जेव्हा शेअरचा भाव खूप वाढतो, लोकांना शेअर महाग वाटतो, त्या शेअरमध्ये होणारे ट्रेडिंग कमी होते आहे असे कंपनीला वाटते, त्याचबरोबर कंपनीकडे जर खूप ‘Accumulated Reserves’ असतील आणी भांडवली गुंतवणुकीच्या संधी नजीकच्या काळांत उपलब्ध नसतील तर कंपनी बोनस किंवा स्प्लिट जाहीर करते. या सर्व प्रक्रियेमध्ये तुमच्या शेअर्सची संख्या वाढते पण शेअर्सची किमत कमी झाल्यामुळे भागधारकाच्या गुंतवणुकीत फरक पडत नाही. परंतु हे सर्व लक्षांत कोण घेतो.
स्प्लिट’ मध्ये शेअर्सची दर्शनी किमतही कमी होते. बोनसचे उगीचच आकर्षण आहे हे मात्र खरे. पण होतं काय कि बोनसच्या आकर्षणाने शेअर्सची मागणी वाढते. बोनस जाहीर झाल्यापासून बोनस शेअर्स मिळेपर्यंत शेअर्सचा भाव वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे बोनस घेतलाच पाहिजे असे नाही. वाढलेल्या भावाचा फायदा शेअर्स विकून घेता येतो.. अहो आजोबा तुमची फसवणूक झाली नाही किंवा काहीही गडबड घोटाळाही नाही. तुम्हाला बोनस आणी स्प्लीत्ची प्रोसीजर माहित नव्हती इतकेच.”
“ MADAM, तुमचा ब्लोग वाचताना मी मनातल्या मनांत तुम्हाला हसलो होतो. शेअरमार्केट म्हणजे साधी खरेदीविक्री… त्यांत कसला अभ्यास करायचा कसलं निरीक्षण करायचे. पण आज तुमचा शब्द न शब्द पटतो आहे. आता मी नक्की प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवेन.
मी मनातल्या मनात म्हटलं – माझे ही डोळे उघडले. सध्या तीनचार कंपन्यांनी बोनस स्प्लिट जाहीर केले आहे लोकांचा गोंधळ होऊ नये म्हणून मला याच विषयावर ब्लोग लिहिला पाहिजे.
भेटू या पुढच्या भागांत…

भाग ४५ – खरेदी विक्री करत रहावी !!

तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडेसे भांडवल जमा झाले. अर्थातच रद्दी झालेले शेअर्स विकुनच. परंतु एक गोष्ट मात्र खरी रद्दी विकून पैसे येवोत, जुनी भांडी मोडीला घालून पैसे मिळोत शेवटी पैसा तो पैसाच. या पैशाचे मूल्य व पगारातून मिळालेल्या पैशाचे मूल्य यांत काही फरक नसतो .पैश जपूनच वापरायचा हेच खरे !
बहुतेक गृहिणींना बाजारहाट करण्याची सवय असते. काय खरेदी करायचं, कधी खरेदी करावयाचं , कोणत्या भावाला खरेदी करावयाचं, किती खरेदी करावयाचं, कोणत्या गुणवत्तेचे खरेदी करावयाचं व प्राधान्य कशाला द्यायचं हे शिकवाव लागत नाही. परंतु शेअर मार्केटच्या बाबतीत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अनुभवातूनच शोधावी लागतात.
शेअरमार्केटशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही हे मला पटले होतं. मी त्यावेळी जे शेअर्स खरेदी केले त्याचा उपयोग आत्ता होईल असं वाटत नाही. त्यातल्या काही कंपन्या सध्या अस्तित्वात नाहीत. या कंपन्यांचे दुसऱ्या मोठ्या कंपनीत विलीनीकरण झाले अथवा दुसरया कंपनीने या कंपन्यांना विकत घेतल्यामुळे या कंपन्यांचे स्वतंत्र अस्तित्व उरले नाही, उदा. बोन्गाईगाव रिफायनरी, कोची रिफायनरी, IBP, UTI BANK.  CESC व G.E. SHIPPING या दोन कंपन्या मात्र त्याच नावाने अस्तित्वात आहेत. ही नावं वाचल्याबरोबर तुमच्या एक लक्षात आलं असेल ते म्हणजे अश्या कंपन्यामध्ये गुंतवणूक म्हणजे सुरक्षितता, कंपनी बुडण्याची भीती कमी आणि शेअरवर मिळणार्या लाभांशाचे प्रमाण जास्त. पण या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सरकारी धोरणावर अवलंबून आणि या कंपन्या संपूर्ण व्यापारी वृत्ती ठेवून काम करीत नाहीत. समाजाचे हित पाहिले जाते. असे बहुतेक शेअर्स सरकारच्याच मालकीचे असतात. त्यामुळे या शेअर्सचा भाव खूप वाढत नाही. या सर्व गोष्टी हळू हळू लक्षांत येत गेल्या. या शेअर्समधील गुंतवणूक म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक हे सुद्धा लक्षात आलं .
त्यावेळी माझी अवस्था अडाण्याप्रमाणेच होती. कोणता शेअर स्वस्त आणी कोणता शेअर महाग याचा गंध नव्हता. TV वर लाल रंगात दिसले की भाव पडला आणी हिरव्या रंगात दिसले की त्या शेअरचा भाव वाढला एवढीच काय ती तोडकी मोडकी अक्कल. परंतु हा शेअर बुक VALUE च्या कितीपट चालू आहे. मार्केटमध्ये या सेक्टरमधल्या कंपन्यांना किती भाव मिळतो हे काही मला माहित नव्हतं.
इतर प्रकारची बाजारहाट करण्यामध्ये माझा हात धरणारा कोणी नव्हता. मला लहानपणी बाजारमास्तरच म्हणत असत. मी चोखंदळ ग्राहक होते. बाजार करायला मला आवडायचं आणि यायचंसुद्धा . बाजारहाट करताना सगळ्यांची जी काय फजिती होते ती मी डोळ्यांनी पहिली आहे.एकदा माझ्या मैत्रीणीला आईनी अंबाडीची भाजी आणायला सांगितली पण तिला अंबाडीची भाजीच ओळखू येत नव्हती. आणी किती रुपयाला जुडी मिळते हेही माहित नव्हते. एकदा वैशालीला पोहे घ्यायचे होते पण कसले पोहे जाड की पातळ, तळायचे  पोहे की नायलॉनचे, ज्वारीचे की तांदुळाचे हे काहीच कळत नव्हते. या सगळ्या समस्या मला कधी आल्या नाहीत पण  शेअरमार्केटच्या बाबतीत मात्र मला अनेक प्रश्नांची उत्तरे चौकस बुद्धीने शोधावी लागली.
लहान लहान लॉटमध्ये खरेदी करायची आणी कमीतकमी भावाला खरेदी करायची एव्हढेच माहित होते. ,आमच्या जमान्यात जेव्हां बाजारहाट करायचो तेव्हां ती वस्तू आईला किंवा सासूला पसंत पडली की काम फत्ते. पण शेअर्स खरेदी केल्यानंतर तो पसंत पडो किंवा न पडो त्याचा भाव वाढायला हवा आणी विकल्यानंतर फायदा व्हावयास हवा हा कळीचा मुद्दा!
कमीतकमी भावाला खरेदी करायची हे पटले परंतु कमीत कमी भाव तरी कोणता, हा भाव ठरवायचा कसा! अहो १०० मार्कांचा पेपर असतो तेव्हां १००पैकी १०० मार्क मिळाले की सर्वांत जास्त आणी १०० पैकी ३५ मिळाले की उत्तीर्ण होण्यापुरते आणी त्यापेक्षा कमी मिळाले की तोच अभ्यास परत करायला लागतो. परंतु शेअरमार्केटच्याबाबतीत मात्र अशी काहीच व कोणतीच मर्यादा नाही.  ‘SKY IS THE LIMIT ‘  भाव कां वाढला किंवा कां कमी झाला याचे उत्तर सापडणे कठीण. प्रत्येक विश्लेषक ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु तेच विश्लेषण बरोबर असेल असे छातीठोकपाने सांगता येत नाही.त्यामुळे सातत्याने निरीक्षण करणे हाच एकच रामबाण उपाय.
समजा शेअरचा भाव ८८रुपये चालू आहे तर ८५रुपये या भावाला शेअर खरेदी करावेत असे मी ठरवत असे. १०० शेअर्स खरेदी करायचे असले तर प्रत्येकवेळी २५ २५ शेअर्स खरेदी करण्यासाठी ऑर्डर टाकत असे. कारण मीच माझी मुखत्यार होते. घरांत कुणाला शेअरमार्केटबद्दल समजत नव्हते. समजा मार्केट वाढत राहिले, ऑर्डर लावलेल्या भावाला शेअर्स मिळाले नाहीत तर शांतपणे दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑर्डर लावायची. पण समजा दुसऱ्या दिवशी मार्केट पडत असेल तर ८३रुपयाच्या ऐवजी ८१रुपयाला ऑर्डर लावायची. मार्केट पडण्याचा जोर जास्त असेल तर ८१रुपयाची ऑर्डर बदलून ७७रुपयाची ऑर्डर लावत असेल आणी मार्केट्ची वेळ संपत आली असेल तर ऑर्डर काढून टाकून पुन्हा दुसऱ्या दिवशी नवी विटी नवे राज्य चालू करायचे.
मी त्या काळामध्ये ऑफिसमध्ये जाऊन बसत असे. माझे दोन दिवस ऑर्डर लावण्यांत आणी काढण्यांतच फुकट गेले. मी लावलेल्या भावाला शेअर्स मिळालेच नाहीत.त्यावेळी मला एक गुरु भेटला.
ते गृहस्थ म्हणाले
“ madam, आपण कोणत्याही शेअरचा ‘TOP’ किंवा ‘BOTTOM’ अचूक पकडू शकत नाही. मोठ्या मोठ्या फुशारक्या मारणाऱ्यांची सुद्धा येथे गाळण उडते. त्यामुळे सारासार विचार करून खरेदी करा. शेअरमार्केटमध्ये गरज हा मुद्दाच नाही. जवळजवळ ६०००शेअर्स आहेत.अमुकच शेअर अमुकच भावाला आणी आजच घेतला पाहिजेअसे तुमच्यावर बंधन नाही.  नुसती ऑर्डर सातत्याने बदलून तुम्हाला काय साधणार . तुमचे शेअर्स खरेदी होणारच नाहीत त्यामुळे ते शेअर्स विकून फायदा मिळविणे ही दूरची बात! नुसते कष्ट मात्र होतील आणि पदरांत काहीच पडणार नाही.त्यापेक्षा तुम्हाला जो शेअर खरेदी करावयाचा असेल त्याची माहिती इंटरनेटवरून मिळवा. तुम्हाला त्या शेअरचा कमीतकमी भाव किती होता व जास्तीतजास्त भाव किती होता हे समजेल. LOW भावाच्या जवळपासच्या किमतीला खरेदी करा व HIGH भावाच्या जवळपास विका. म्हणजेच आपण धोका किती पत्करत आहोत व फायदा किती होणार आहे हे समजू शकेल.सुरुवातीला थोडी भीती वाटते पण त्याला इलाज नाही.”
मी ऑफिसमध्ये असतानाच दोन व्यवहारांकडे माझे लक्ष गेले. एका माणसाने त्याच दिवशी ८३रुपयाला घेतलेले १००शेअर्स ८५ रुपयाला त्याच दिवशी विकले एका तासांत खरेदी-विक्री करून २००रुपये गाठीला बांधून तो मोकळा झाला. पण त्याच वेळेला दुसऱ्या माणसाने ८५रुपयाला घेतलेले शेअर्स ८३रुपयाला विकले. वारंवार विचार करूनही या व्यवहारामागची त्या माणसाची भूमिका माझ्या लक्षांत आली नाही. अज्ञान उघडे केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही त्यामुळे लाज वाटत असली तर ती  खुंटीला टांगून ठेवली पाहिजे. असा विचार करून संकोच न बाळगता मी त्या व्यक्तीला त्याच्या व्यवहाराचे कारण विचारले.
तेव्हां तो माणूस म्हणाला
“ तासाभरांत फारशी मेहेनत न  करता दोनशे रुपये मिळत होते ते पदरांत पडून घेतले इतकेच.मी INTRADAY करण्याच्या उद्देश्याने शेअर्स खरेदी केले नव्हते. ८० रुपयाला हे शेअर्स मिळायला पाहिजे होते असे मला वाटते. उद्या ८०रुपयाला मिळतात कां हे पाहीन.”
मी त्यांना म्हटले “ माझ्यावर रागाऊ नका मी तुमच्या व्यवहारांवर लक्ष ठेवते असे समजू नका. शेअरमार्केट शिकणे एवढाच एक कलमी कार्यक्रम आहे.’
ज्या दुसऱ्या व्यक्तीने घाटा सोसून शेअर्स विकले त्यांनाही मी विचारले की
“नुकसान सोसून शेअर्स विकण्याचे कारण काय? कारण सांगण्यासारखे असेल तर मला सांगा.”
ते म्हणाले
“ ८३रुपये हा माझा “STOP LOSS’ होता. हा ‘STOPLOSS’ मी लावला होता त्यामुळे ८३रुपये भाव होताक्षणीच माझे शेअर्स आपोआप विकले गेले. MADAM आज रागाऊ नका आज मला घरी जायची घाई आहे. ‘STOPLOSS ’ म्हणजे काय तो का लावावा ही माहिती  मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगितली तर चालेल कां ?”
त्यांना जायचं होतं तसं आत्ता मला पण निघायचं पण आपणसुद्धा “STOPLOSS’ विषयीची माहिती पुढच्या भागांत घेवू… बोलूनच लवकर

भाग ४३ – रुक जाना नहीं, तू कही हार के !!

गृहिणी ते शेअरमार्केट हा आपला प्रवास अजून संपलेला नाही. हा प्रवास खूप लांबलचक आहे. प्रवासांत काही लहान मोठी स्टेशने येतात तश्या माझ्या प्रवासात वाचकांच्या काही शंका आल्या होत्या. काही गोष्टी समजलेल्या नव्हत्या. काही बाबतीत मी दिलेली माहिती त्यांना अपुरी वाटली. त्यामुळे त्यांनी प्रेमाने मला मध्येच थांबवून त्यांना हवी होती ती माहिती विचारली शंकांचे निरसन करावयास सांगितले. मलासुद्धा माहिती सांगताना आणी शंका निरसन करताना आनंदच झाला.माझा ब्लोग वाचून लोकांना उपयोग होतो आहे हे समजलं. आता २९ व्या भागापासून शेअरमार्केटचा प्रवास पुढे चालू करू या.
मी माझे एच. डी एफ सी. चे शेअर्स विकले व गिनी सिल्कचे शेअर्स थोडे थोडे करून विकणे सुरूच ठेवले. जसा जसा जास्त जास्त भाव मिळेल तसे तसे वरच्या वरच्या भावाला विकत राहिले. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. अडकलेला पैसाही थोडा थोडा मोकळा झाला. व दरवेळी पहिल्यापेक्षा जास्त भावाला विकत असल्याने सरासरी चांगली होऊन भाव चांगला होत गेला.यालाच मार्केटच्या भाषेत ‘STAGGERED BUYING OR SELLING’ असे म्हणतात.
विक्री कशी करायची याची प्राथमिक माहिती मला मिळाली होती .जास्त डोके चालवण्याएवढा माझ्याजवळ वेळ होताच कुठे? कारण शेअरमार्केटचा व्यवसाय करण्यासाठी मला भांडवलाची गरज होती.आता माझ्याजवळ थोडफार भांडवल तयार झालं होतं. ‘बोलाचा भात बोलाची कढी’ संपली आणि आता खरा भात करायची वेळ आली. भात चांगला झाला तर सगळे पोटभर जेवतील, भात करपला , कच्चा राहिला किंवा भाताची खीर झाली तर नावं ठेवतील व सर्वजण उपाशी राहतील. त्यामुळे प्रत्येक पाउल जपून टाकण भाग होतं
किती भांडवल गुंतवायच ? जेवढ भांडवल जमा झालय तेवढ सगळ गुंतवावं कि ५०%आता गुंतवून बाकीचे थोडे दिवसांनी मार्केट पडलं तर गुंतवावं? असा प्रश्न पडला. अशावेळी आमच्या ऑफिसमध्ये लोक ज्या गप्पा मारत त्याचा मला उपयोग झाला. ऑफिसमध्ये एक गोष्ट होत असे . कुणीही कधीही घरगुती गोष्टी बोलत नसत,कुणाचा अपमान करण किंवा कुणाला कमी लेखण नाही, किंवा मला पैसे मिळाले त्याला मिळू नयेत अशी संकुचित दृष्टी मला आढळली नाही.
मी आपली फक्त सगळ्यांच्या गप्पा ऐकून किंचित हसून प्रतिसाद देत असे. पण मला त्या गप्पांचा उपयोग झाला. “अरे, १०० शेअर्स एकदम कां घेतलेस. २५-२५ च्या गटाने घ्यायचे होतेस. मार्केटचा अंदाज घेतला असतास तर बरे नाही कां? आज दुपारी ‘I. I. P’ चे आकडे येणार तेव्हा जर मार्केट पडले तर स्वस्त पडतील वगैरे वगैरे.
अहो, तेव्हा मला ‘I. I. P.’ ‘INFLATION ‘ ‘CAD’(CURRENT ACCOUNT DEFICIT ) म्हणजे काय हे काहीच कळत नव्हते. पण मला एवढे मात्र कळले की खरेदी छोट्या छोट्या लॉटमध्ये करावी.मार्केटचा अंदाज घेवून करावी. आणी मार्केटच्या अस्थिरतेचा फायदा करून घ्यावा. मार्केटमधील अस्थीरतेलाच “MARKET VOLATILITY ‘ असे म्हणतात.
त्याचबरोबर मार्केट पाहणे ऐकणे निरीक्षण करणे या सवयींचा उपयोग झाला.
काही शेअर रोज किती वाढतात किंवा मार्केट पडले तर किती पडतात किंवा शेअर्सचे जे निर्देशांक (SENSEX, NIFTY ) आहेत त्यांचा शेअरच्या किमतीतील वाढीशी किंवा कमी होण्याशी काही संबध जोडता येतो कां ? हे मी माझ्या सोयीसाठी निरीक्षणाने पाहिले. शेअर्सच्या खरेदीशी या सर्व गोष्टींचा फार घनिष्ट संबंध आहे.
मी तुम्हाला कित्येक वेळेला एक गोष्ट सांगितली आहे पुन्हा सांगते शेअर खरेदीचा उद्देशच फायदा घेवून विकणे हा असतो. जतन करणे, म्युझियममध्ये ठेवणे हा कदापि नसतो. ‘TO MAKE MONEY’ हाच उद्देश हेच अंतिम ध्येय व तुम्हाला पैसा किती सुटला यावरच तुमच्या यशाची मोजदाद होते.
इथे एक गोष्ट तुमच्या कानांवर घातल्याशिवाय मला राहवत नाही. मी ऑफिसमध्ये जाताना किंवा घरी येताना काही गरजेच्या गोष्टी खरेदी करीत घरी येत असते. हे माझ्यासारख्या गृहिणींना काही नवीन नाही. घरांत काय संपले आहे काय उद्यासाठी हवे आहे., घरातील मुलांच्या मागण्या काय आहेत हे सर्व डोक्यांत ठेवूनच गृहिणी वावरत असते. ऑफिसच्या बाहेरच बसणाऱ्या फळवाल्याकडून मी फळे घेत असे. कारण त्याचा दर वाजवी असे. मालही चांगला असे. तो माझ्या ओळखीचा झाला होता. मी त्याला एकदा विचारले “तुला एवढ्या भावांत विकणे परवडते कसे? “ तेव्हा तो म्हणाला “फायदा किती घ्यावयाचा हे माझे ठरलेले असते. आज कोणता माल लावायचा , किती किमतीला मिळायला हवा, किती किमतीला विकावा, खर्च जाऊन किती पैसे मिळाले पाहिजेत हा हिशोब करूनच मी माल घेतो .२-३ तास बसतो. दुकाने उघडण्याच्या आंत माझी पाटी रिकामी मी पण रिकामा. माल चांगला असल्यामुळे गिऱ्हाईकही फिक्स्ड असते “.
यशाचे केवढे मोठे गणित तो फळवाला मला कळत-न-कळत सुचवून गेला होता. हेच तंत्र बद्या–चढ्या भाषेत बोलायचे तर वाजवी नफा ठेवायचा, टर्नओव्हर जास्त हवा, भांडवल जास्त लवकर बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा गुंतवता येतं. व तेवढेच भांडवल वापरून जास्तीतजास्त फायदा मिळवता येतो. म्हणजेच १००००रुपये गुंतवायचे ठरवले तर १००रुपये प्रती शेअर किमतीचे शेअर खरेदी करायचे. महिन्याभरांत विकायचे व पुन्हा फायदा बाजूला काढून घेवून पुन्हा १००००रुपये गुंतवायचे. म्हणजेच आपण वर्षाला १,२०,००० रुपये गुंतवू शकतो.प्रत्येक महिन्यांत १००० रुपये फायदा झाला तर वर्षाअखेरीला १००००रुपयांवर १२०००रुपये निव्वळ फायदा होऊ शकतो.
म्हणजे ज्यावेळी आपल्याजवळ भांडवल कमी असते तेव्हा ‘QUICK ENTRY, QUICK EXIT ‘ करून पुन्हा पुन्हा तोच पैसा वापरून जास्त फायदा मिळवता येतो. त्यासाठी योग्य वेळ व योग्य वेळीच योग्य निर्णय ताबडतोब घेणे यावरच यशाचे गणित अवलंबून असते. त्याचबरोबर त्या फळवाल्याने अजून एक गोष्ट सांगीतली ती सुद्धा विचारात घेण्यासारखीच!
‘माल चांगला म्हणजे गिऱ्हाईकही फिक्स्ड’ म्हणजेच शेअरमार्केटच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास चांगले शेअरच घेतले पाहिजेत. म्हणजेच कंपनीच्या अस्तित्वाबद्दल, तिच्या प्रगतीशील वाटचालीबद्दल कोणत्याही प्रकारची शंका खरेदीच्या वेळीतरी आपल्या मनांत असू नये.नाहीतर आज कंपनी अस्तित्वांत होती उत्पादन तसेच विक्री जोरांत होती, पण थोड्याच दिवसांनी बंद पडली. शेअर्सचा भाव २०पैसे झाला.म्हणजेच ‘तेल बी गेलं तूप बी गेलं आणी हाती धुपाटणे आले’ अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्व प्रकारची खात्री झाल्यावरच खरेदी करावी. नाहीतर जमीन जशी धुपून नाहीशी होते तसे भांडवल संपून जाईल व हातांत करवंटी यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या भांडवलाची जपणूक करणे सर्वात जास्त महत्वाचं…
अजून पुढे बरंच काही बोलायचं , पण ते पुढच्या भागात …
  पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग ४२ – तुमची शंका आणि मार्केटची भाषा

वाचकांनी काही शब्दांचे अर्थ व खरेदी विक्री करताना त्यामुळे मिळणारे संकेत याची काही सांगड घालता येते कां अशी विचारणा केली त्यानुसार या ब्लोगमधूनच हे उत्तर द्यावे असे मी ठरविले.
Share Market terms in marathi
BETA
हा शब्द मार्केटच्या संदर्भांत नेहेमी वापरला जातो. कोणत्याही शेअरच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलाचे प्रमाण व त्याचा वेग व त्यामुळे निर्माण होणारा धोका यालाच ‘BETA’ असे म्हणावे.(हा मी माझ्यासाठी समजून घेतलेला अर्थ आणी व्याख्या आहे) म्हणजेच काही शेअर्सच्या किमतीमध्ये फार कमी वेळा व फार मोठ्या प्रमाणावर बदल होतात .अगदी होत्याचे नव्हते होते. त्या शेअरचे रूप पूर्णपणे  पालटते. अशा शेअरला ‘HIGH-RISK, HIGH-RETURN’ शेअर म्हणतात. असे शेअर खरेदी करण्याची योग्य वेळ साधता आली तर तासाभरात बराच फायदा होऊ शकतो . अर्थात नाण्याची दुसरी बाजू आहेच. योग्य वेळ साधता आली नाही, ट्रेंड बदलला तर बराच तोटाही होऊ शकतो . ‘BETA’ च्या टक्केवारीचे निरीक्षण करण्यापेक्षा रोज शेअरच्या किमतीचे निरीक्षण केले तर ही गोष्ट लक्षात येते. मी अशा शेअर्सना धावणारे शेअर्स म्हणते.
शास्त्रीय भाषेत बोलावयाचे झाल्यास SENSEX किंवा NIFTY मध्ये जी हालचाल होते तिला आपण १ मानले तर १पेक्षा जास्त हालचाल असेल तर ‘HIGH BETA’ आणी १ पेक्षा कमी हालचाल असेल तर त्या शेअरला ‘LOW BETAA ‘ असे समजा. तुमची धोका पत्करण्याची कितपत तयारी आहे याचा विचार करूनच “HIGH –BETA’ शेअर्सच्या वाटेला जावे. छोट्या आणी मध्यम कालावधीसाठी “BETA’ची संकल्पना विचारात घेता येते. परतू दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना या संकल्पनेचा फारसा उपयोग होत नाही.’BETA’  भूतकाळात किमतीत झालेल्या बदलांवर आधारीत असतो, परंतु दीर्घ मुदतीमध्ये कंपनीच्या प्रगतीप्रमाणे किंवा काही अन्य कारणांमुळे शेअरची प्रवृत्ती व गुंतवणूकदारांचा त्या शेअरकडे बघण्याचा कल बदलू शकतो .
काही शेअर्सच्या किमतीत निर्देशांकाप्रमाणे बदल होतो तर काही शेअर्सच्या किमतीत निर्देशांकाच्या विरुद्ध बदल होतो. म्हणजेच हे किमतीत होणारे बदल मार्केटच्या समप्रमाणात किंवा मार्केटच्या व्यस्त प्रमाणांत असतात.मार्केट पडत असेल तर हे शेअर्स वाढतात व मार्केट वाढत असेल तर हे शेअर पडतात.
अशा शेअर्सना ‘NEGATIVE BETA’ असलेले शेअर्स म्हणतात.
E. P. S.
E.P.S. म्हणजेच ‘EARNING PER SHARE’ म्हणजेच कंपनीच्या प्रत्येक साधारण शेअरच्या वाटेला कंपनीचा किती नफा येतो.
E. P .S. = PROFIT AFTER TAX / NUMBER OF SHARES
सर्व देणी दिल्यानंतर कंपनीचे जे उत्पन्न उरते त्याला शेअर्सच्या संख्येने भागले असता प्रत्येक शेअरच्या वाट्याला किती उत्पन्न येते हे समजते. आपण जर ‘A ‘ आणी ‘B ‘ या एकाच प्रकारच्या उद्योगांत असलेल्या दोन कंपन्या निवडल्या ज्यांचा E. P. S. समान आहे परंतु ‘B’ कंपनी कमी भांडवलात व्यवसाय करू शकत असेल तर ती कंपनी जास्त कार्यक्षम आहे असे समजावे. जर E.P.S. जास्त असेल तर जास्त लाभांश मिळण्याची शक्यता असते. पण जर कंपनीला ‘EXPANSION’ करावयाचे असेल किंवा ठराविक %लाभांश देण्याचे कंपनीचे धोरण असेल तर लाभांशात वाढ होत नाही.जर दरवर्षी कंपनीच्या E.P.S. मध्ये वाढ होत असेल तर टी कंपनी प्रगती पथावर आहे असे समजण्यास हरकत नाही..
P. E. RATIO
P. E .RATIO म्हणजेच ‘PRICE EARNING RATIO.
P. E. RATIO = शेअरची किमत /EARNINGS PER SHARE
म्हणजेच प्रत्येक शेअरच्या उत्पन्नाच्या किती पटीत शेअरचा भाव चालू आहे हे समजते. प्रत्येक उद्योगाचा सरासरी P. E. RATIO असतो. या RATIOपेक्षा जास्त किमतीला तो शेअर मार्केटमध्ये असेल तर तो महाग समजावा आणी कमी किमतीला असेल तर तो शेअर स्वस्त समजावा. परंतु एखाद्या शेअरला एवढा भाव कां दिला जातो आहे किंवा एवढ्या चढ्या किमतीला गुंतवणूकदार कां गुंतवणूक करीत आहेत ते पाहिले पाहिजे.अशा वेळी गुंतवणूकदारांना असे वाटत असते की या कंपनीचे व्यवस्थापन चांगले आहे , ही कंपनी भविष्यकाळात प्रगतीपथावर राहील व आपली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.जर P. E. RATIO ० -१० मध्ये असेल तर ही कंपनी ‘UNDERVALUED’ समजावी परंतु ‘UNDERVALUED किंवा स्वस्त मिळते आहे म्हणून धावत सुटू नका.आपली गुंतवणूक सुरक्षित राहील ना हे ही पहावे लागते जर P. E. RATIO  १०ते १७ मध्ये असेल तर सर्वसाधारणतः कंपनीचा शेअर योग्या किमतीला मिळतो आहे असे समजावे.जर P. E. RATIO १७ ते २५ या दरम्यान असेल तर शेअर महाग आहे असे समजावे. जर P. E. RATIO २५ पेक्षा जास्त असेल तर तेथे काही तरी शिजते आहे असे समजावे त्याचा तपास करणे जरुरीचे आहे कारण काही काही शेअर्स गुंतवणूकदारांना उगीचच आवडतात.त्याला मार्केटच्या भाषेत ‘PUBLIC FANCY’ शेअर्स असे म्हणतात.P.E.RATIO तुम्ही गुंतवलेली रकम किती काळांत वसूल होईल हे दाखवतो.‘
OPEN INTEREST
OPEN INTEREST ही DERIVATIVE मार्केटमधली संज्ञा आहे. आता सोप्या शब्दांत सांगावयाचे झाले तर प्रत्येक गोष्टीसाठी लागलेली रांग विचारात घ्या. जर एख्याद्या सिनेमाच्या तिकिटासाठी भली मोठी रांग असेल पुढील आठ दिवसांचे बुकिंग झाले असेल तर तो सिनेमा पाहण्यात लोकांना रस आहे असे आपल्या लक्षांत येते.त्याचप्रमाणे OPEN INTEREST मध्ये होणारा बदल त्या शेअरमधल्या गुंतवणुकीचा कल दर्शवितो.OPEN इंटरेस्ट वाढत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की नवीन पैसा गुंतवला जात आहे  आणी  किमतीत होणाऱ्या बदलाची दिशा तीच राहील किंवा वाढत जाईल हे समजते. OPEN INTEREST कमी होत असेल तर पैसा बाहेर जात आहे किंवा गुंतवणूक कमी केली जात आहे  किमतीत होणाऱ्या बदलाची दिशा उलट होण्याची वेळ आली आहे असे ओळखावे. दिवसाच्या शेवटी OUTSTANDING असणार्या FUTURES आणी OPTIONSमधील CONTRACTS ची एकंदर संख्या, म्हणजेच OPEN INTEREST.
OPEN INTERESTची पातळी तीच राहिली पण शेअरची किमत मात्र वाढू लागली तर ‘BULL’ मार्केटचा शेवट जवळ आला असे समजावे. व किमत घटू लागली तर BEAR –RUN संपत आला असे समजावे.
शेअरची किमत                      ओपन इंटरेस्ट              अर्थ  
वाढते आहे                             वाढतो आहे                 मार्केट मजबूत आहे
वाढते आहे                             कमी होतो आहे            मार्केट WEAK होत आहे
कमी होत आहे                        वाढतो आहे                  मार्केट WEAK होत आहे
कमी होते आहे                        कमी होत आहे             मार्केट मजबूत होत आहे.
हे सर्व मी माझ्या अनुभवानुसार लावलेले अर्थ व स्पष्टीकरण आहे. अर्थ किंवा स्पष्टीकरण चुकीचे नाही पण ते माझ्या शब्दांत वर्णन केले आहे.  शेअर्स खरेदी-विक्री करताना सर्व संकल्पनांचा साकल्याने विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. कारण शेअरमार्केटवर परिणाम करणारे घटक पुष्कळ आहेत. ह्या सर्व घटकांचा कमी जास्त परस्परविरोधी परिणाम शेअरच्या किंमतीवर होत असतो .
 पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग ४० – मार्केटमधले Window Shopping !!

नुकताच रविवारी एका वाचकाचा फोन आला होता. त्याने चौकशी केली व विचारले

Stock market share buying

“Sale Sign Shop window night” by Paul§


“तुम्ही हल्ली ‘ब्लोग’ लिहिणे बंद केले कां?. असे करू नका आम्हाला तुमचा ‘ब्लोग’ वाचायला आवडतो. तुम्ही आम्हाला अर्ध्या वाटेवरच सोडलेत. आम्हाला सांगा आम्ही कोणते शेअर्स खरेदी करावेत? कोणत्या भावाला खरेदी करावेत.? कधी खरेदी करावेत ? कधी विकावेत ? किती फरकानी विकावेत? डोक्यात सगळा गोंधळ माजला आहे. काहीच कळत नाही. काही सुचत नाही. त्या शेअरमार्केटच्या भानगडीत जाऊ या की नको. तुम्ही हा गुंता सोडवून मार्ग  दाखवणार कि नाही?”
हो! हो! त्या वाचकाचे आणि तुम्हा सगळ्यांचे प्रश्न सोडवायला मला आवडेल. तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहाराची शेअरमार्केटशी सांगड घालून पहा म्हणजे प्रश्न पटापट सूटतील. नेहमी आपण बर्याच गोष्टी गरजेपोटी करतो. म्हणजे पावसाळा आला तर छत्री रेनकोट खरेदी करतो. शेअर मार्केट मध्ये २ फरक आहेत, एक तर शेअर खरेदी करायची कुणाला ‘गरज’ नसते आणि आपण खरेदी केलेल्या वस्तू आपण विक्री करण्यासाठी खरेदी केलेल्या नसून उपयोगात आणण्यासाठी खरेदी केलेल्या असतात. त्या वस्तूची संख्या किवा त्यांचे मूल्य वाढावे अशी आपली अपेक्षा नसते.पण शेअरमार्केटमध्ये खरेदी केलेल्या शेअर्सची किमत  वाढून ते विकल्यावर आपल्या पैसे सुटावेत अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते.
मार्केट मध्ये गुंतवणूक करताना आपले अंथरूण केवढे आहे ,पाय किती लांब करता येतील व किती वेळ अंथरुणावर लोळता येईल हे मात्र पहिले पाहिजे. आपल्याजवळ किती रक्कम आहे, ही रक्कम तुमच्याजवळ किती काळ पडून राहणार आहे याचा विचार करा. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर ऑर्डर देताना हा विचार करताच ना? कारण तुम्हाला ताबडतोब बिल द्यावयाचे असते. तोच शेअर्सच्या बाबतीत विचार करावा.तुम्हाला ६ महिने पैसे लागणार नसतील तर ४ महिन्यांसाठी योजना करा कारण शेअरमार्केटमध्ये निश्चित काही सांगता येत नाही.
मुलांच्या शिक्षणासाठी आपण रकमेची जुळवाजुळव करतो, कितीही आदर्श डोळ्यासमोर असतील तरी समाजातील काही गोष्टींचे बळी आपण ठरतो. डोनेशन भरावे लागतेच. डोनेशनसाठी जमा केलेले हे पैसे  ४-५ महिने पडून राहतात. आपल्याजवळ दोन पर्याय असतात. बचत खात्यात ठेवणे किंवा ४५, ९०, १८०, दिवसांसाठी मुदत ठेवीत ठेवणे. आता नवा पर्याय शेअरमार्केटचा.
मी ३८व्या भागात सांगितल्याप्रमाणे आपण जानेवारी ते जून हा कालावधी घेतला होता. कालावधी अशासाठी की कोणत्यावेळी कोणते शेअर्स खरेदी करण्याचा विचार करावा हे सांगण्यासाठी.
आता पहा उन्हाळ्यात छत्री विकत घेतली तर स्वस्त पडते व A. C. किंवा पंखा विकत घेतला तर महाग पडतो. किंवा सणासुदीच्या दिवसात कपडे साड्या दागिने महाग पडतात.असाच विचार आपण मार्केट संबंधात करावा.
(१) आता पहा जर कंपनीचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे असेल तर जानेवारीपर्यंत तीन तिमाहीचे निकाल जाहीर झालेले असतात. त्याच्यावरून कल्पना करता येते की कोणत्या कंपन्याचा वार्षिक निकाल चांगला असेल. आपण अशा कंपनीचे शेअर्स घ्यावेत.
(२)  काही कंपन्या ‘ INVESTOR FRIENDLY ‘ असतात, म्हणजेच चांगला लाभांश किंवा बोनस शेअर्स देतात. लाभांच्या बाबतीत त्यांचे रेकार्ड चांगले असते. अशा शेअर्सचे भाव लाभांशाच्या अपेक्षेप्रमाणे वाढतात.लाभांशाच्या उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही.
(३)   ‘ADVANCE TAX’ चे आकडे जाहीर होतात. ज्या कंपन्याना आपला नफा वाढणार असे वाटते त्या कंपन्या जास्त ‘ADVANCE TAX ‘ भरतात. काही कंपन्या मात्र नेहेनीच जरुरीपेक्षा जास्त ‘ADVANCE TAX ‘ भरतात. ज्या कंपनीने गेल्यावर्षीपेक्षा जास्त ‘ADVANCE TAX’भरला असेल त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत.
(४) सरकारचे अंदाजपत्रक याच काळात जाहीर होते. २५ फेब्रुवारीला रेल्वेचे अंदाजपत्रक व २८ फेब्रुवारीला रेग्युलर अंदाजपत्रक जाहीर होते. रेल्वेशी संबंधीत शेअर्स कमी किमतीत विकत घेवून बजेटच्या आधी १-२ दिवस आधी विकावेत.उदाहरणार्थ काही  रेल्वशी संबंधीत शेअर्सची नावे खालीलप्रमाणे (१) कालिंदी रेल (२) करनेक्स मायक्रोसिस्टीम्स (३)स्टोन इंडिया (४)हिंद रेक्टीफायर (५) बी ई एम एल.(६) TITAAGHAR WAGONS.या शेअर्समध्ये मिळत असेल तो नफा घेवून अंदाजपत्रक जाहीर होण्याच्या आधी बाहेर पडावे.या शेअर्सचे भाव पुन्हा वर्षभरात वाढत नाहीत. रेल्वे व खते यांच्या शेअर्सच्या भुयारात वेळेवर घुसून वेळेवर बाहेर पडावे लागते.
(५) सरकारचा भर नेहेमी शेती, शिक्षण, संरक्षण, उत्पादन, दळणवळण, लघुउद्योग आदी गोष्टींवर असतो. या क्षेत्रात विविध सवलती दिल्या जातात. करात सवलती दिल्या जातात. या क्षेत्रातील काही कंपन्यांकडे सुद्धा लक्ष ठेवू शकता
(६)या काळात दिला जाणारा हवामानाचा अंदाजही फार महत्वाचा ठरतो. विशेषतः पावसाचे प्रमाण, त्याची वेळेवर वाटणी ही फार महत्वाची ठरतात. शेतकरयाची खुशहाली शेअर मार्केटमध्येही आनंदाची लहर पसरवते. यावर्षी अल-निनो हा शब्द वारंवार कानावर येतो आहे. याचा परिणाम पावसावर होईल. पाउस कमी पडेल. तांदूळ पिकवणाऱ्या देशांवर याचा परिणाम होईल. सुदैवाने अल-निनोचे दुष्परिणाम भारतावर जास्त दिसणार नाहीत. भारत बासमती तांदुळाची निर्यात करतो. त्यामुळे तांदळाची निर्यात करणारया KRBL, LTFOODS कोहिनूर फुड्स या कंपन्यांचा फायदा होईल.अग्रो शेअर्सचा विचार करू शकता उदाहरणार्थ : जयंत अग्रो. एरिस अग्रो हेरीटेज फूड्स
(७) जानेवारी ते जून हा उन्हाळ्याचा मोसम असल्यामुळे HAVELLS(इंडिया), CROMPTON GREAVES, VOLTAS या शेअर्सचाही विचार करावा. कारण या कंपन्यांची विक्री या काळात वाढते.
(८) या काळात खतांचे शेअर्सही स्वस्त मिळतात.
महत्वाचा मुद्दा म्हणेज निरीक्षणाचा, कंपनीच्या शेअर्सचा LOWEST भाव आणी HIGHEST  भाव काय हे बघायला हवे. यात वार्षिक, महिन्यातील, आठवड्यातील, त्यादिवशीचा व आत्तापर्यंतचा असे कमीतकमी आणी जास्तीतजास्त भाव प्रत्येक शेअरच्या बाबतीत मिळू शकतात.जर शेअर त्याच्या कमीतकमी किमतीच्या जवळ मिळत असेल तर त्या भावाला विकत घ्यावा. म्हणजे RISK-REWARD RATIOचे प्रमाण चांगले राहते.आपण प्रत्येक माणसाची किंवा वस्तुची कुवत पहातो. या मुलाची बुद्धी किती, याला मार्क किती मिळतील किंवा कपडे घेताना हा कपडा किती टिकू शकेल हे बघतो . त्याचप्रमाणे प्रत्येक शेअर किती वाढू शकतो याचा अंदाज निरीक्षणावरून बांधता येतो. म्हणजेच बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होणार नाही हे लक्षात घ्यावे. म्हणजे शेअर कधी विकावा याचे गणित घालता येते. जर १०% फायदा ५-६ महिन्यात होत असेल तर तो खूप चांगला ! कधीही जास्त हव्यास करू नये.
आता सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे मोदी FACTOR चा विचार आहे. जर तुम्ही धाडशी असाल  धोका पत्करण्याची तयारी असेल तर ADANI ENTERPRISES, ADANI PORT , ADANI POWER, हे शेअर्स खरेदी करू शकता. गुजरातमध्ये असलेले किंवा गुजरात राज्याशी संबधीत शेअर्स म्हणजेच GNFC, GSFC , GUJARAAT GAS, GMDC इत्यादी. निवडणुकीचा फायदा मिडिया सेक्टर (प्रिंट मेडिया, इलेक्ट्रोनिक मेडिया ) याना होईल. कारण निवडणुकीच्या काळात जाहिरातीचे उत्पन्न वाढते. ENIL, जागरण प्रकाशन, HTMEDIA, ZEE ENTERTAINMENT हे शेअर्स पहा. मोदींच्या जाहीरनाम्यात बंदरे व उर्जा या क्षेत्रांवर भर दिला जाईल. गुजरातमधील अनुभव लक्षात घेता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना प्राध्यान्य मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे नफ्यात चालणारया व कार्यक्षमता दाखविणार्या सार्वजनिक उद्योगांचे शेअर्सही वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्येक गोष्टीचा विचार चहुबाजूनी करा. मोदि पंतप्रधान नाही झाले तर काय ? त्यामुळे ८-९ मेच्या जवळपास शेअर्स विकून कॅशमध्ये बसा आणी निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एन्ट्री घ्या. मोदि पंतप्रधान झाले नाहीत तर मार्केट कोसळेल तेव्हा शेअर्स स्वस्तात मिळतील.
तुमच्या भाषेत बोलावयाचे झाले तर शेअरमार्केटच्या फलाटावर गर्दी खूप आहे. सर्व लोकल्स भरून येत आहेत. तुम्ही चढू शकाल कां ? सुरक्षितपणे उतरू शकाल कां? घुसमट तर होणार नाही याचा विचार करा, लहानमुलाबाळांना घेवून लोकलमध्ये चढू नका. म्हणजेच दुसर्या शब्दात “A’ ग्रुपच्या   शेअर्समध्ये किंवा BLUE CHIP शेअर्स मध्येच राहा. वेळेवर खरेदी विक्री करा. आपल्याला उतरायच्या स्टेशनवर गाडी थांबते ना याचा विचार करा नफ्याचे प्रमाण ठरवून आपले उतरण्याचे ठिकाण नीट ठरवा.  ही खटपट मारामारी जमत नसेल तर निवडणुका होईस्तोवर भानगडीत पडू नका.
निघण्याआधी एक सांगते , मी उदाहरणासाठी ज्या शेअर्सची नावं सांगितली आहेत ती फ़क़्त उदाहरणासाठीच आहेत. ते शेअर घ्या असं मी सांगत नाहीये. या लेखातून घेण्यासारखं काही आहे तर ते विचार करायची एक पद्धत आणि शेअर मार्केटमध्ये लावता येतील असे काही निकष. बाकी मग कुठले शेअर घ्यावेत हा तुमचा तुमचा प्रश्न ..
भेटूच लवकर
 पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

गुढी पाडवा 2014 – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे

Gudi Padwa Share Market

Image – Redtigerxyz at English Wikipedia


आज गुढी पाडवा. नववर्षाचा पहिला दिवस. अशा शुभ दिवशी तुमच्याशी थोडेसे हितगुज करू असे मनात आले म्हणून हा blog post.
शेअरमार्केटने गुढी पाडव्याचे व नववर्षाचे दणदणीत स्वागत करून शेअरमार्केट्ची गुढी खूप उंच उंच नेली आहे. गेल्या गुढीपाडव्याला BSE SENSEX 21832.61 व NSE NIFTY 6516.55 होता. २९ मार्च २०१४ रोजी BSE SENSEX 22339.00 व NSE NIFTY 6695.90 आहेत . म्हणजेच आतापर्यंतच्या जास्तीतजास्त स्तरावर आहेत. अशा मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काही टिप्स देते आज –
(१)   आनंदाचे तोरण लागले आहे. हीच वेळ खरी खबरदारी घेण्याची असते . त्यामुळे तुम्ही अचूक वेळ साधून जास्तीतजास्त नफा मिळवा. बेसावध राहिलात तर बस चुकेल आणी पुढली बस केव्हा येईल याचा कोणी भरवसा द्यावा. परंतु त्याचबरोबर रेंगाळू नका, मोहात पडू नका किंवा अमुक एक भाव मिळाला तरच विकीन असे ठरवून बसू नका.सारासार विचार करून मिळणारे दान लवकरात लवकर पदरात पडून घ्या नाहीतर मिडास राजाच्या गोष्टीप्रमाणे होईल
(२)   मार्केटच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस करू नका.
(३)   इतक्या वाढलेल्या मार्केटमध्ये स्वस्त काय महाग काय हे शोधणे कठीण असते. त्यामुळे खरेदीच्या भानगडीत पडू नका
(४)   कमीतकमी किमतीचे व जास्तीतजास्त पैसा मिळवून देणारे असे काही विशिष्ट शेअर्स मार्केटमध्ये नसतात .आखूडशिंगी व बहुगुणी शेअर्स मिळणे नेहेमीच कठीण असते. शेअर एकतर चांगला म्हणजे फायदा करून देणारा असतो किंवा वाईट म्हणजे तोटा होणारा असतो .
(५)  काही काही लोकांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. जे लोक आमचे पैसे बुडाले म्हणून हाताची घडी घालून बसले असतील त्यांनी आपले ‘DMAT’ अकौंटचे स्टेटमेंट काढून त्यापैकी कोणते शेअर्स फायद्यात आहेत कां हे बघून झटपट निर्णय घेवून विकून टाका. जर कोणाजवळ फिझीकल फोर्ममधे शेअर्स असतील तर ते झटपट ‘DMAT’ करून विकून टाका.
(६)   ही शेअर विक्रीची वेळ आहे खरेदीची नव्हे संधी हुकली असेल तर पुढच्या संधीची वाट पहा.गर्दीमध्ये घुसून चेंगराचेंगरीत सापडू नका.
(७)  ही ‘ ELECTION RALLY’ आहे १६मेला निवडणुकीचे निकाल आहेत.10 मे पर्यंत आपापला फायदा वसूल करा. पुढे मार्केटचा रागरंग निवडणुकीच्या निकालाप्रमाणे बदलू शकतो.
या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे हा गुढीपाडवा आपल्या सर्वांच्या चिरंतन स्मरणात राहील व भरघोस दान आपल्या पदरात टाकेल.