Tag Archives: share market information in marathi

HAPPY 6th BIRTHDAY TO YOU – ‘मार्केट आणी मी ‘

Guru Purnima 2014

HAPPY BIRTHDAY TO YOU

मार्केट आणि मी हे माझे बाळ आता मोठे झाले. चांगले ६ वर्षाचे झाले. मला खूप उचंबळून येत आहे. २०१२ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण एवढा मोठा प्रवास करू असे वाटले नव्हते.

‘मार्केट आणि मी’ चा शिल्पकार माझा मुलगा सुरेंद्र आणि मदतनीस प्रकाश फाटक, माझी मुलगी स्वरश्री आणि माझी सून किरण, माझे जावई अमेय जोगळेकर यांच्या मदतीशिवाय हा पल्ला गाठणे अशक्य होते.

त्याचबरोबर माझ्या ब्लॉगच्या वाचकांनी, हितचिंतकांनी नव्या नव्या गोष्टी करण्यास उत्तेजन दिले त्यांची मी शतशः आभारी आहे. वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच माझ्या पुस्तकाचा म्हणजेच ‘मार्केट आणि मी’ चा जन्म झाला, ‘गोवन वार्ता’, ‘मनी प्लस’, ‘चारचौघी’, ‘माझी वहिनी’, या मासिकात, वर्तमानपत्रात लिखाण करू शकले. ‘नवशक्ती’ मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने आलेल्या लेखाने याची पोचपावती मिळाली.

असेच आपण उत्तेजन देत रहा. पण नुसते उत्तेजन देऊन भागणार नाही. चुकांमधून शिकता शिकता भरपूर पैसे मिळवा. एक साखळी तयार करा. तुम्हीही मोठे व्हा इतरांनाही मार्केट करायला मदत करा. मार्केटविषयीचे गैरसमज दूर करा. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ‘

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

HAPPY BIRTHDAY TO YOU – ‘मार्केट आणी मी ‘

‘मार्केट आणी मी ‘हे माझे बाळ ३ वर्षांचे झाले आहे. त्यानिमित्त आपण सर्व वाचक केक कापुन गोड गोड घास घेवून या बाळाचा तिसरा वाढदिवस साजरा करू.
Guru Purnima 2014
३ वर्षापूर्वीचा दिवस मला अजून आठवतो आहे. त्यावेळी माझ्या मुलाने मला ब्लॉग लिहिण्याची कल्पना सुचवली. ४ दिवसांनी गुरुपोर्णिमा होती. त्या दिवसापासून ब्लॉग लिहिण्यास प्रारंभ केला. शेअरमार्केटविषयीचे गैरसमज दूर करणे, लोकांच्या मनातील शेअरमार्केटची भीती घालवणे, मातृभाषेत शेअरमार्केट समजावून देणे, आणी टिपा न देतां लोकांना स्वावलंबी गुंतवणूकदार बनवणे, अतिशय सोप्या भाषेंत लिहिणे हे उद्देश डोळ्यांसमोर होते. त्याचबरोबर वाचकांची फसवणूक होऊ नये, नुकसान होऊ नये, म्हणून काही सुचनावजा माहिती द्यावी असे वाटले. हे उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच लेखांची रचना केली आणी करीत आहेआणी भविष्यांत करणार आहे.
माझ्या कामांत माझे यजमान श्री. प्रकाश भास्कर फाटक आणी माझा मुलगा सुरेंद्र प्रकाश फाटक यांची मदत झाली. मी लेख लिहायचा ,यजमानांनी तो टाईप करायचा, मुलाने तो ब्लॉगवर टाकायचा असे हे काम अव्याहत चालू आहे. माझी सून किरण गोवेकर या ब्लॉगची पहिली वाचक आहे. ती आम्हाला उत्तेजन देते. काही अडचण आली की मुलगी स्वरश्री फाटक हिला विचारायचे. सगळ्यांच्या प्रयत्नातून माझ्या या बाळाने इथपर्यंत मजल मारली आहे. अनेक वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया, अपेक्षा कळविल्या त्याप्रमाणे ब्लॉगमध्ये सुधारणा होत गेल्या. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळून माझे बाळ मोठे झाले, माझ्या या बाळाने बाळसे धरले त्या सर्वांची मी आभारी आहे, ऋणी आहे.
माझे बाळ आता गुटगुटीत झाले आहे हे बघून मला आनंद होतो. काही वाचक आता ट्रेडिंग करू लागले आहेत. त्यामुळे माझा उद्देश अंशतः कां होईना साध्य होतो आहे. एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे आपण जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा माझी उत्तरे हे सदर वाचा. त्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल . त्यामुळे तुमची शंका लगेच दूर होईल.
मी या बाळाकडे आईच्या नजरेतून पाहते त्यामुळे ब्लॉगमधील दोष काढून टाकून गुणवत्ता आणी उपयोगिता सतत वाढवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझे हे बाळ आपल्याला सतत प्रगतीची योग्य वाट दाखवेल, शेअरमार्केट मध्ये ट्रेडिंग, गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करेल, आपला आत्मविश्वास वाढवेल,आणी वेळोवेळी समस्यांचा, धोक्यांचा लाल दिवाही दाखवील हा माझा विश्वास आहे. आपण वाचकही प्रतिक्रिया, सुचना देऊन माझे बळ वाढवत आहांत. मला आनंद देत आहांत.
शेवटी एक विसरू नका – माहिती, प्रोसीजर, ज्ञान, धैर्य आणी निर्णय घेण्याची क्षमता हे सर्व स्तुत्य गुण आहेत. पण शेअरमार्केट मध्ये व्यवहार करून आपल्याला पैसा मिळालाच पाहिजे हे ध्येय विसरू नका. पण समजा एखाद्यावेळेला तोटा झाला तर घाबरून न जाता ती चूक सुधारा आणी भविष्यांत पुन्हा त्या पद्धतीची चूक होऊ नये ही काळजी घ्यावी.ही विनंती
पुन्हा एकदा सर्व वाचकांना धन्यवाद . भेटू पुन्हा———–

आठवडा मार्केटचा – १६ ते २० फेब्रुवारी २०१५

हा आठवडा म्हणजे ‘TRUNCATED ’आठवडा होता.अहो ‘TRUNCATED’ म्हणजे काय ? तर माझ्या भाषेंत ज्या ट्रेडिंग आठवड्यांत मार्केटला सुट्टी असते.
ह्या आठवड्यांत बजेटचचं वातावरण होतं. मुळातच फुगा फुगल्यासारखे फुगलेले मार्केट काहीतरी छोट्याश्या कारणांनी पट्कन १५० ते २०० पाईंट पडत होते. आणी पुन्हा तेव्हढ्याच वेगाने बजेटसंबंधीची बातमी आल्यामुळे वाढतही होते. असा उनपावसाचा खेळ म्हणजेच गेला आठवडा.
सोमवारी इमारतीचा FSI वाढवून देणार अशी बातमी आली. ताबडतोब विश्लेषकांनी रिअलीटी सेक्टरमधील अमुक अमुक शेअर खरेदी करा असे सांगायला सुरुवात केली. थोडा वेळ गेल्यानंतर वाहिनीवाल्यांनी खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हां त्यांनी सांगितले की – “आम्हाला ही बातमी मिडीयामार्फतच समजली आहे. सकाळी वर्तमानपत्रातूनही वाचले. परंतु अधिकृत फाईनप्रिंट आमच्याजवळ नाही. त्यामुळे कुणाला फायदा होणार व किती फायदा होणार हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. अशा सवलती ठराविक इमारतींना, ठराविक एरियातील इमारतींना लागू असतात. सरसकट सर्व इमारतींना लागू होत नाही.” हे ऐकताक्षणी शेअर्सचे भाव कमी व्हायला सुरुवात झाली. सगळ्यांचाच गोंधळ उडाला. हे काही पहिल्यांदा घडलं नाही. अशावेळी फक्त घाई केल्यामुळे घात होतो. बातमीची पूर्णपणे शहानिशा करायला हवी आणि मगच काय ते करायला हवं.
मंगळवारी शिवरात्रीची सुट्टी होती.
हिरोहोंडाचे प्रमोटर ७०लाख शेअर्स ब्लॉकडीलमार्फत विकणार आहेत अशी मार्केटला खबर होती. त्यामुळे हिरोहोंडाचा शेअर तसा थंडच होता. Rs २६६४ ते Rs २७२३ या दरम्यान ७० लाख शेअर्सचा सौदा झाला. प्रमोटरनी  शेअर्स विकले म्हणून घाबरून जाऊन लोकांनी पण शेअर्स विकले असावेत. शेअरचा भाव जवळजवळ Rs१५०नी  पडला. तासाभरानंतर कंपनीने खुलासा केला की त्यांना ‘पिपावाव’ मध्ये गुंतवणूक कण्यासाठी पैशाची तरतूद करायची होती म्हणून त्यांनी त्यांच्या मालकीचे शेअर्स विकले. प्रमोटर जेव्हा स्टेक विकतो तेव्हा ते फारसे चांगले समजले जात नाही. कारण प्रमोटरना अंदरकी बात माहित असते. पण नेहेमीच असा अर्थ लावू नये. चांगल्या कंपनीचे शेअर्स कमी भावांत विकत घेण्याची ही एक संधीही असते. मध्यंतरी ‘INFOSYS’ प्रमोटरनी शेअर्स विकले तेव्हा ‘INFOSYS’ चा भाव Rs १९०० झाला होता. लोकांना कमी किमतीत शेअर्स घेण्याची संधी मिळाली होती.नंतर या शेअर्सचा भाव Rs३०० णे वाढला. म्हणजेच आलेली बातमी शेअर्सचा भाव आणी होणाऱ्या परिणामांचा अंदाज याचे गणित जर बांधता आले आणी ते अचूक ठरले तर चांगले यश मिळते.
सध्या मार्केटमध्ये बजेट आणी बजेट आणी त्या संदर्भांत येणाऱ्या बातम्या यांचेच पीक आले आहे. लेदर इंडस्ट्रीला ‘EXCISE’ मध्ये सूट मिळणार अशी बातमी येताक्षणी सर्वजण लेदर इंडस्ट्रीच्या संगीत खुर्चीमध्ये बसण्यासाठी धावले. ‘BATA’ ‘LIBERTY SHOES, MIRZA INTERNATIONAL या शेअर्सचे भाव चमकू लागले. त्याचवेळी बातमी आली की शैक्षणीक क्षेत्राला सवलत मिळेल. त्यामुळे ‘NIIT’ ‘ZEE LEARN’ ‘CAREER POINT’’NAVNEET’ या शेअर्सचे भले झाले. डिफेन्स सेक्टरकडे सरकारचे लक्ष वेधले आहे हे जाणून ‘BHARAT FORGE’ या कंपनीने ‘RAFAEL’ या कंपनीशी करारहि केला. त्यासरशी ‘BHARAT FORGE’  ‘B. F UTILITIES’ ह्या शेअर्सची किमत वाढली. डिफेन्सच्या भजनाचा लाभ ‘BEL’ ‘BEML’ या शेअर्सना होत आहेच. रेल्वेशी संबंधीत शेअर्सच्या किमती रोजच वाढत आहेत. ‘TITAGARH WAGON’ च्या शेअर्सच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
बजेटच्या संदर्भातील बातम्या लीक झाल्या आणी त्याचा फायदा ‘OIL&GAS INDUSTRY’ ला व्हावा अश्या इराद्याने बातम्या फुटल्या.  त्यामध्ये ‘RELIANCE INDUSTRY’ नाव गुरफटले. ‘RELIANCE’ चा शेअर आणी त्याबरोबर मार्केट पडणार हा अंदाज होताच. घडलेही तसेच. मार्केट २५० पाईंट पडले.
कोळसाखाणींचा लिलाव झाला ‘JSPL’ या कंपनीला Rs१०८ या दराने खाण मिळाली. संकटांत असलेला ‘JSPL’ चा शेअर वधारला. काल उरल्यासुरल्या सरकारी बँकसुद्धा वाढल्या.त्याचबरोबर अजयसिंगच्या ‘SPICEJET’ पुनरुज्जीवित करण्याच्या योजनेला सरकारने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे तोही शेअर वाढला. ‘SUZLON’ मध्ये संघवी गुंतवणूक करणार आहे ही बातमी आल्यावर त्या शेअरचा भाव वाढला. नेहेमी बजेटच्या वेळेला पडणारा ‘ITC’चा शेअर वाढतो आहे याचे आश्चर्य वाटले.
हे सर्व वातावरण डेट्रेड करणाऱ्यांना सोयीचे, शेअर्सच्या किमतीतील वाढ, वाढीचा वेग, आणी शेअरमधले ‘VOLUME’ अगदी हवे तसे. पण तुम्ही योग्यवेळी योग्य ठिकाणी राहून ट्रेड केला तरच. झाली तर दिवाळी नाहीतर शिमगा! पटकन गाडीत चढून पटकन उतरता आले पाहिजे.  राजापुरची गंगा आली की जसे लोक धावतात तश्यातलाच हा प्रकार. कारण ही गंगा फार थोड्या काळ  असते नंतर लुप्त होते.बऱ्याच जणांना त्यांचे अडकलेले शेअर्स चांगल्या भावाला विकायची संधी मिळाली. असा हा आठवडा उत्साहवर्धक होता. म्हणले तर फारसं काही घडलं नाही , मार्केट ठराविक रेंजमध्ये फिरत राहिले पण विशिष्ट शेअर्सच्या बाबतीत मात्र मार्केटने चांगला हात दिला.बहुतेक पुढचा आठवडा असेच वातावरण असेल.बजेटच्या दिवशी म्हणजे २८ तारखेला म्हणजे शनिवारी मार्केट चालु आहे. आणी त्यातच ‘FNO EXPIRY’ चा ही गोंधळ आहे. बघू या काय होते ते.

भाग ३८ – बाजार करावा नेटका, असो नये फाटका

परी लाभाचा चटका असू द्यावा!!
पत्रिका जुळते का हे पाहून, कान्देपोह्याचा कार्यक्रम होतो . वधूवरची पसंती होते. त्यावेळी आईवडील एकच गोष्ट सांगतात ‘ सुखाने आनंदाने संसार करा” शेवटी आनंद सुख समाधान हेच संसाराचे अंतिम ध्येय असते.
त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा गेले वर्षभर तयारी करीत आहात . माहिती मिळवत आहात. DEMAT ACCOUNT,  ट्रेडिंग अकौंट सेविंग अकौंट ही उघडला असेलच थोडीशी भांडवलाची सोय केली असेल.. ज्या पद्धतीच्या व्यवहारासाठी भांडवल लागत नाही त्या पद्धतीचा ट्रेड म्हणजेच intra day ट्रेड तोही मी तुम्हाला समजावून सांगितला आहे ,
संसाराचे अंतिम ध्येय म्हणजेच सुख समाधान आनंद त्याचप्रमाणे कुठल्याही व्यवसायाचे मुख्य ध्येय नफा मिळवणे हे होय . शेअरमार्केट हा एक व्यवसायच आहे . यामध्ये आपण शेअर्स खरेदी करतो व काही काळाने वाढलेल्या भावाला तेच शेअर्स विकतो . विक्री किमत वजा खरेदी किमत म्हणजे नफा किंवा फायदा होय. संसारातील जे जे प्रश्न संसार करताना येतात तेच प्रश्न शेअर्स खरेदी करतानाही पडतात. मी जेव्हा मार्केटमध्ये शिरले तिचा माझ्या समोरही अनेक प्रश्न उभे राहिले. पण मी धैर्याने गुंता सोडवला.
प्रथम बँकेत खात्यावर किती पैसे आहेत ते पाहिले. यजमानांना विचारले
“आपल्याकडे किती पैसे असतील जे आपल्याला लगेच लागणार नाहीयेत? आणि अगदी लागलेच तर ते कधी लागतील?”
विचारायचा मुद्दा असा कि माझे अंथरूण  केवढे आहे आणि पाय किती पसरता येतील ? आणि ते तसे पसरून किती वेळ ठेवता येतील? म्हणजेच मार्केट मध्ये किती भांडवल गुंतवता येयील आणि किती कालावधीसाठी हे मला कळले.
आता प्रश्न आला नफ्याचा किंवा फायद्याचा, तिथे मी साधे व सोपे गणित घातले. त्या काळात बँक मुदत ठेवीसाठी १०%व्याज देत असे . ..हीच १०% वाढ मला १ वर्षापेक्षा कमी कालावधीत मिळाली तर सोन्याहून पिवळे असा विचार केला
आता माझ्या जवळ अनुभव आहे पण तेव्हा काहीच समजत नव्हते . परंतु माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी १०-१५ शेअर्सची निवड केली होती. ज्या शेअर्समध्ये सतात चढउतार असे. मी माझे जुने शेअर्स विकून भांडवल गोळा करीत होते आणि साईड बाय साईड  शेअर मार्केटचे जाणीवपूर्वक आकलन करीत होते .
लहान लहान मुली जसा भातुकलीचा खेळ खेळतात . त्याचप्रमाणे मी खोटा खोटा शेअर मार्केटचा  व्यवहार करीत होते. कारण आमच्या घरात शिकवायला किंवा सांगायला कुणीही नव्हते . मी माझ्या वहीतल्या वहीत खरेदी करीत असे . तेथेच भाव वाढला की शेअर्स विकले असे लिहित असे त्याच्या बाजूला नफ्याचा आकडा लिहित असे .. पण तेथे एक चूक झाली. मी त्या फायद्यातून दलाली व इतर कर वजा केले नाहीत. पण त्या वहीमुळे मालाविश्वास मिळाला की मला फायदा होऊ शकतो .
थोड्या पैशात जसा गृहिणी टुकीने संसार करते तीच अवस्था माझी मार्केटमध्ये होती . असलेल्या पैशात अनेक गरजा भागवावयाच्या होत्या.
माझे यजमान म्हणाले “ही रकम जूनपर्यंत लागणार नाही. तेव्हा तू हे पैसे जूनपर्यंत वापर.’
तेव्हा मला लक्षात आलं नाही पण यालाच मार्केटच्या भाषेत हा मध्यम कालावधीसाठी केलेला व्यवहार… आज १२ वर्षांनी ही आणि अशी बरीच अक्कल आलीये.
टीवीवरच्या वाहिनीवर जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा सुद्धा तुम्ही पाहिले असेल की शेअरचे नाव, खरेदीसाठी योग्य भाव व किती कालावधीसाठी शेअर्स खरेदी  करावा हे सांगतात. शार्ट टर्मसाठी म्हणजे ३ महिन्यापर्यंत, मिडीयम टर्मसाठी म्हणजे ३ महिने ते एक वर्षपर्यंत. दीर्घ मुदतीसाठी  म्हणजे १ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी म्हणजेच गुंतवणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेली खरेदी होय.
३ महिने, ६ महिने ठरवले म्हणून तुम्ही मुदत पूर्ण होईपर्यंत थांबायची गरज नाही. ती  काही मुदत ठेवीची पावती नाही की मध्ये तोडली तर तुम्हाला व्याजात नुकसान होईल. तुम्ही शेअर्स कधीही (४ दिवसानंतर कधीही म्हणजेच DEMAT अकौंटवर गेल्यावर) विकू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हढा फायदा जेव्हा होत असेल तेव्हा विकून रिकामे व्हा. गुरुकिल्ली काय तर किती दिवस पैसे गुंतले व फयदा किती होतो आहे याची सांगड घाला म्हणजे शेअर विकून आलेली रकम पुन्हा पुन्हा गुंतवता येते.
पूर्वी मला कळत नव्हते परंतु आतापर्यंत आलेल्या अनुभवावरून मी सांगू शकेन की तुमच्याजवळ जानेवारी ते जून एवढ्या कालावधीसाठी पैसे गुंतवायला उपलब्ध असतील तर तुम्ही शेअर्सची निवड कशी करावी . पण यासाठी पुढील भागाची वाट पहावी लागेल