आता चला माझ्याबरोबर . तुम्ही हवी असल्यास १ शेअर खरेदी करण्याची ओर्डेर टाकू शकता . मला मात्र शेअर्स विकून भांडवल गोळा करायचे आहे त्यामुळे मी आधी विकणार आहे . तुम्हाला आता पाठ झाले असेल . सांगा बरं मी कोणते शेअर्स विकणार? GINI SILKS आणी HDFC बँक.
मी ठरवूनच ऑफिसमध्ये गेले . आज सौदा करायचाच. नमनाला घडाभर तेल घालून झालं होतं आणि आता तेल वाहून जावयाची पाळी आली होती. HDFC बँकेचा भाव ३५० रुपये चालला होता. माझे शेअर्स IPO मधील होते . हे शेअर्स मला ‘AT PAR’ मिळाले होते ( IPO आणी AT PAR याचे अर्थ पुढील भागातून येतील.)
‘AT PAR’ म्हणजे १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर IPO मध्ये १० रुपयाला मिळतो . ‘AT PREMIUM म्हणजे शेअरच्या दर्शनी किमतीत premiumची रक्कम वाढवून येणाऱ्या रकमेला शेअर IPOमध्ये विक्रीला आणण्यात येतो . म्हणजेच आता AT १० रुपये premium शेअर असला तर १० रुपये दर्शनी किमतीचा शहरे २० रुपयाला दिला जातो . ‘AT DISCOUNT’ म्हणजे शेअरच्या दर्शनी किमतीतून “DISCOUNT ” वजा केला जातो . AT रुपये २ DISCOUNT म्हणजे १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर विक्रीसाठी IPO मध्ये ८ रुपयाला मिळतो . थोडक्यात PREMIUMची रक्कम शेअरच्या दर्शनी किमतीत वाढविली जाते आणी discountची रक्कम शेअरच्या दर्शनी लीमातीतून वजा केली जाते . हल्ली नजीकच्या काळांत “AT DISCOUNT ” IPO अभावानेच आढळतात .
मला “HDFC बॅंकेच्या शेअर्ससाठी फारच चांगला भाव मिळत होता . यापेक्षा जास्त भाव मिळेल की भाव कमी होईल याबद्दल ना कल्पना होती ना अक्कल !! मी रुपये ३५५ भावाने १०० शेअर्स विकण्यासाठी ओर्डेर लावली. ३५५ रुपयाचा भाव दिसत होता पण माझे शेअर्स विकले जाईनात तेव्हा माझा पुन्हा गोंधळ उडाला.
मी विचारल – “अविनाश माझे शेअर्स का विकले जात नाहीत बाबा?’
तो म्हणाला – “स्क्रीनच्या डाव्या बाजूला रुपये ३५२ चा भाव आहे . व उलट्या बाजूला ३५५रुपयाचा भाव आहे. हा हिशेब ध्यानात घ्या. म्हणजे दुसरया बाजूस असलेला माणूस ३५२ रुपयाला खरेदी करायला तयार आहे आणि ३५५ रुपयाला विकायला तयार आहे. Madam तुम्हाला विकायचे असले तर त्या भावाला दुसरा माणूस खरेदी करायला तयार हवा. त्यामुळे ३५२ रुपयाच्या भाव ३५५ रुपये होईल तेव्हा तुमचा नंबर लागला तर विकले जातील .
अविनाश म्हणाला ” आणि हो मार्केट बंद होण्याआधी तो भाव आला पहिजे. मध्येच मार्केट पडायला लागले तर भाव खाली सुद्धा जातो.
मी म्हणाले “शुभ बोल नार्या तर बोडक्या झाल्या सारया !! मार्केट पडेल असं का म्हणतोस बाबा?. तर म्हणतो कसा – ‘ अहो मार्केटच ते, भाव कमी जास्त होणारच. तुमच्या तालावर तुमचा नवरा नाचेल मार्केट नव्हे’.
ऐकूण काय माझी आजची बोहोनी उद्यावर गेली एवढ मात्र नक्की !
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Tag Archives: Stock broker
भाग २२ – गुढी उभारा मार्केटची आणि काळजी घ्या या १० गोष्टींची
आज गुढीपाडवा! साडेतीन मुहूर्तापैकी एक!! माझ्या आयुष्यातला फारच महत्वाचा दिवस. दहा वर्षापूर्वी गुढीपाडव्याला मला माझा trading account नंबर मिळाला आणि माझं सगळं आयुष्य बदलून गेलं. गेल्या दहा वर्षात शेअरबाजारातील प्रवासात मला अनेक अनुभवातून जावं लागलं आणि बरंच शिकता आलं. काही गुरुमंत्र मिळाले, आजच्या या मुहूर्तावर मी तेच तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरु करूया
1. अंथरूण पाहून पाय पसरा
आपल्याजवळ असणारे भांडवल, फायदा मिळेपर्यंत थांबण्याची तयारी, तोटा सहन करण्याची ताकत याचा अंदाज घेवूनच शेअर खरेदी करा म्हणजे अंथरुणाबाहेर पाउल कधी जाणार नाही.
2. ऐका जनाचे, करा मनाचे
ब्रोकेरच्या ऑफिसमध्ये, वर्तमानपत्रात, नियतकालिकात, टी .वी . च्या विविध channelवरून येणारे सल्ले अभिप्राय व शिफारशी अवश्य वाचा. पण त्या वाचून आपण आपल्या अभ्यासावर आधारित निर्णय घ्या
3. प्रयत्नांती परमेश्वर
सतत माहिती मिळवा. आळस करू नका .शेअर किमत वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याची कारण शोधा .त्यामुळे खरेदीविक्रीचा सौदा योग्य होऊन फायद्याचा परमेश्वर भेटेल.
4. नवरा मरो नवरी मरो, दक्षिणेशी मतलब
खरेदी किवा विक्रीचा कोणताही सौदा तुम्हाला फायदेशीर असेल तरच करा. अनावश्यक सौदेबाजी टाळा.
5. धीर धरी रे धीरापोटी, फळे असती रसाळ गोमटी
मार्केट पडत असेल किवा वाढत असेल तरी धीरानं निर्णय घ्या त्यामुळे कमीतकमी किमतीला खरेदी आणि जास्तीत जास्त किमतीला विक्री होऊन जास्तीत जास्त फायदा होईल .
6. तिने घातली सरी म्हणून तुम्ही नका घालू दोरी
कोणताही मुद्दा प्रतिष्ठेचा बनवू नका. अंधानुकरण करू नका. कोणाशीही स्पर्धा किवा बरोबरी करू नका. स्वता:ला पचेल, रुचेल आणि झेपेल तितकच करा.
7. थांबाल तर संपाल
मार्केटचा व्यासंग सतत आणि पुरेसा हवा. त्यात खंड पडल्यास मार्केट तुम्हाला दूर फेकून पुढे निघून जातं. येथे विलंब घातक ठरतो.
8. हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे
अफवांवर विश्वास ठेवू नका आणि वावटळीप्रमाणे येणाऱ्या बातम्यांच्या मोहजालात फसू नका.
9. कशासाठी? पैश्यासाठी!! फायद्याच्या गोष्टीसाठी !! शेअरच्या खरेदीविक्रीसाठी !!
शेअर मार्केटमध्ये भावना, आवड, हेवादावा या गोष्टींना स्थान नाही. फायदा मिळवून देणारा शेअर चांगला आणि ठेवण्यास योग्य. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा असे शेअर्स घेवू नका.
10. अति तेथे माती
आपल्याला किती फायदा हवा हे शेअर्स खरेदी करण्यापूर्वीच ठरवा. अमर्याद फायद्याची वाट बघत बसाल तर नुकसान होण्याची शक्यता वाढेल.
हे मंत्र मी चांगलेच गिरवले. त्यातून माझ्या शेअरमार्केट ची गुढी दिमाखात उभी राहिली आहे. कशी ते सविस्तर सांगेनच पण ते पुढच्या भागात.पण इतकं मात्र नक्की कि हे मंत्र तुम्ही लक्षात ठेवलेत आणी आचरलेत तर तुम्हालाही यश मिळेल.
गुढीपाडव्याला संकल्प करा आणि नियमानुसार आचरण करा. लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल. तुमचा दिवाळीचा पाडवा आनंदाने साजरा होईल .देव तुम्हाला “अनंत हस्ते कमलावरांनी देता, किती घेशील दो करांनी” असे भरभरून देईल आणि तुमच्या आयुष्यात प्रसन्नता ओसंडून वाहील !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग २१ – उघडले स्वर्गाचे (मार्केटचे) चे दार !!
मार्केट केव्हा उघडतं व कसं उघडतं या गोष्टीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एका प्रश्नाचं उत्तर मी CNBC वरून शोधलं. स्क्रीनवर ‘उलटी गिनती’ चालू होती. खालच्या बाजूच्या चौकोनात किती वाजले हे दाखवत होते. वाजले होते ९-३० व मार्केट उघडण्यास ३० मिनिटे शिल्लक होती. त्यावरून मार्केट १० वाजता उघडतं हे कळलं. हल्ली मार्केट ९-१५ ला उघडतं. ९.०० ते ९.१५ या वेळेत प्री-ओपनिंग (एस. एस. सी ची जशी पूर्व परीक्षा असते तसा) प्रकार सुरु झाला आहे.
आता उरलासुरला प्रश्न मार्केट कसं उघडतं याचा. माझ्या मनात अनेक विचार आले. उत्सुकता शिगेला पोहोचली.
मार्केट कसं उघडत असेल??
शाळेसारखे कि काय घंटा वाजणार , प्रार्थना होणार, नंतर शाळा सुरु होणार??
कि भाजी मंडईप्रमाणे? विकणाऱ्या बायका पुरुष माल घेवून येणार, पाणी शिंपून तयारी करणार, खरेदी करणारे भाव विचारून घासाघीस करणार, भाव पटला नाही तर पुढे निघून जाणार?
कि दुकान उघडतं त्याप्रमाणे विश्वासू कामगार कुलूप काढणार, शटर उघडणार, साफसफाई झाल्यावर सुरु??
किवा हिरवा सिग्नल दिसल्यावर गाडी येते त्याप्रमाणे काहीच कळत नव्हतं!!
मी आमच्या घरमालक आजीना (आम्ही त्यांना ताई असे म्हणतो.) नमस्कार करायला गेले. त्यांनी हातावर साखर दिली. म्हणाल्या
” यशस्वी हो!. मी मुंबई सगळी पालथी घातली आहे. दलाल स्ट्रीट म्हणून भाग आहे तीथे BSE मध्ये शेअर्सची ओरडून ओरडून लीलावासारखीच खरेदी विक्री चालते. लंब्या चौड्या वहीत बघून काहीतरी सांगत असत. तसचं आहे का हल्ली?”
‘मला पण माहित नाही, बघते’ असे सांगून मी निघाले.
ऑफिसमध्ये पोहोचले. काका आले होते. त्यांना म्हणाले
“आज मी मुद्दाम वेळात वेळ काढून मार्केट कसं उघडतं हे बघायला आलीये. कसं हो उघडतं मार्केट.?
काका म्हणाले
” मार्केट म्हणजे क्रिकेटची match बघा. सामन्याला जशी सुरुवात होते तशीच मार्केटची सुरुवात होते. आधी ग्राउंड कसं आहे; बॉल वळेल कि नाही; कोणत्या बोलरची बोलिंग चालेल ह्या सगळ्याची चर्चा होते. नंतर पंच येतात,नाणेफेक होते. मग BAT हलवत फलंदाज येतात आणी पहिला बॉल टाकला जातो. फ़क़्त मार्केटचं pitch वेगळ आणि match पण वेगळी. पण सगळं मीच सांगितल तर तुम्हाला काय मजा येणार? बसा आणी प्रत्यक्ष बघा मार्केट कसं उघडतं ते”
ऑफिसमधल्या लोंकाचे रोजचेच रुटीन चालूच होतं . अविनाश म्हणाला
” तुम्हाला काही समजत नसेल तर मला विचारा. तुमची सुरुवात आहे म्हणून तुम्ही गोंधळला आहात. अहो तिसरी चौथी शिकलेली माणसे सुद्धा व्यवस्थित ट्रेडिंग करतात.”
डोळे व कान उघडे ठेवून मी लक्ष देवू लागले . लोक लगबगीने येत होते. वेगवेगळ्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या ओर्डेर्स त्यांना हव्या असलेल्या भावाला देत होते. एका BOLT वर अविनाश आणि दुसरया BOLT वर अमित काम करत होता.
आपण स्कूटरसाठी, कारसाठी order नोंदवतो तेव्हा आपल्याला त्याची नोंद मिळते. पण इथे सगळं computerवरच होते. नाव आडनावाची गरज नव्हती. प्रत्येकजण आपला ट्रेडिंग अकौंट नंबर सांगत होता. इथे ट्रेड पूर्ण होण्याआधी आपल्याला order बदलत येते असही कळलं. शेअर्सची संख्या, भाव बदलाता येतो किवा ओर्देर पूर्णपणे रद्द करता येते हे हि लक्ष्यात आलं.
“शेअरमार्केटमध्येच आपण आपल्याला हव्या त्या भावाला खरेदी किवा विक्री करू शकतो असेच आहे का रे अविनाश?”
तो म्हणाला “तो भाव स्क्रीनवर दिसायला हवा ना ! अहो थांबा दोन सेकंदात मार्केट चालू होईल.”
बर ते जावू द्या! दोन सेकंद जातात न जातात तोच घंटा वाजली . मला खूप मजा वाटली. खरोखरीच आपल्याला घंटा ऐकु येते तशीच . माझ्या देवाच्या मंदिराचे दार उघडले असेच म्हणावे लागेल . मार्केट उघड्ण्याआधीच्या screenवरच्या स्थिर किमती हळू लागल्या. शेअर्सचे भाव बदलू लागले. संगणकावर तळाला एक पट्टी फिरू लागली . ज्यांच्या ज्यांच्या ओर्डरस पूर्ण झाल्या त्यांचे नंबर त्यापुढे खरेदी असेल तर निळ्या रंगात व विक्री असेल तर लाल रंगात दिसू लागले. अविनाश व अमित हजर असलेल्या माणसाना सांगू लागले आणि जे हजर नव्हते त्यांना फोनवरून सांगू लागले.प्रत्येकाच्या ओर्डरच्या निकालाविषयी ! त्या दिवशी मार्केट तेजीत होते BSE व NSE चे निर्देशांक सतत वाढत होते. या निर्देशांकाविषयी पुढच्या भागात सांगते.
काका म्हणाले ” Madam तुमचा पायगुण चांगला आहे. गेला आठवडाभर मार्केट मंदीत होते. असेच मार्केट तेजीत राहणार असेल तर आम्ही तुम्हाला पुढे बसायला जागा देवू. ”
अविनाश म्हणाला ‘आता बोलताना तुम्ही बसल्या आहांत हे लक्ष्यात ठेवूनच बोलायला लागणार.’
मी थोड्याश्या रागातच म्हणाले “असे का म्हणता हो मी तुमचं काय घोडं मारलय?.”
“अहो तसे नाही madam आता काय तुमच्यासमोर शिव्या देवून बोलणार कि काय 🙂 ? चला ते सगळं नंतर बघू. बोलता बोलता लक्ष राहिलं नाही तर घाटा होईल.”
मीसुद्धा माझे शेअर्स स्क्रीनवर पुढे आणून घेतले. माझा ट्रेडिंग अकौंट नंबर आला नव्हता त्यामुळे फ़क़्त निरीक्षणच! पण एक गोष्ट मात्र नक्की झाली . माझ्या नवीन नोकरीची वेळ ठरली ती म्हणजे सकाळी १० ते दुपारी ३-३०:) . शनिवार रविवार सुट्टी कारण त्या दिवशी मार्केट बंद असेत. आता आपली भेट पुढील भागात.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग १८ – गुढी उभारूया Trading Account ची !!
मी शेअर मार्केटच्या बोगद्यात तर होते. आता पुढच्या टोकाशीच बाहेर पडू शकणार होते. मी trading account उघडण्याचा form घेवून आले . संध्याकाळी माझे यजमान घरी आल्यानंतर सगळा वृतांत कथन केला. ते म्हणाले २ दिवस थांब, विचार करू. मी ऑफिसमध्ये दुसर्या दिवशी पुन्हा गेले.
माझा चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून काका मला म्हणाले – ‘काय प्रगती?’
मी म्हणाले – ‘काल trading account उघडण्याचा form न्हेला’
काका म्हणाले – ‘ तुम्हाला ज्याच्या ज्याच्या नावावर शेअर्स असतील त्याच्या त्याच्या नावावर एक एक trading account उघडावा लागेल. Joint account मध्ये ज्या क्रमानी नावं असतील असतील त्याच क्रमानी joint नावावर account उघडावे लागतील’
‘अरे बापरे! मी एकच फार्म घेतला ’. मी जरा घाबरूनच गेले.
काका म्हणाले – ‘ काही नाही हो .. मी देतो तुम्हाला जास्तीचे forms’
काकांनी मला आणखी आवश्यक तेवढे forms दिले.
ते म्हणाले – ‘तुम्ही जरा जास्तीच घाबरलेल्या दिसताय. अहो अपघात होतात म्हणून काय लोक प्रवास करायचे थांबले आहेत का ? कार विकत घेणं आणि चालवणं सगळं सुरूच आहे कि !! योग्य ती काळजी घ्या म्हणजे झाले. या मार्केटमध्ये थोडा फरक आहे तो असा कि शेअर्स खरेदी करणारा आणि शेअर्स विकणारा दोघेही एकमेकांच्या समोर नसतात . त्यामुळे दलाल लागतो. शेअर्सची खरेदी-विक्री म्हणजेच Trade . हा Trade सुरक्षितपणे आणि पारदर्शक रीतीने व्हावा म्हणून जो account उघडला जातो तोच Trading Account.’
मग काका म्हणाले कि जरा चहा घेवूया का ? आणि मग पुढचं सांगतोच . चहा आला आणि मग एक घोट घेवून काकांनी पुढे सांगायला सुरु केलं.
‘हा शेअर्सच्या खरेदीविक्रीचा व्यवहार सुरक्षितपणे पुरा करण्याची जबाबदारी ब्रोकेरची असते.एक trade पुरा होण्यासाठी ४ दिवसाचा कालावधी लागतो. यासाठी ब्रोकर दलाली घेतो. त्याच्यावर stamp duty, Security turnover tax आणि service tax लावला जातो. हे सर्व तुमच्या शेअर्सच्या खरेदीची किंमत वाढवतात आणि तुमच्या शेअर्स विक्रीच्या किमतीमधून वजा केले जातात. शेअर्स विकताना या सगळ्या गोष्टींच तुम्हाला भान ठेवलं पाहिजे.’
थांबा , चहा संपला . अजून एक मागवावा लागेल’
मग अजून एक चहा आला 🙂 .. आणि मग काका पुढे सरकले ..
‘ अशी ही ट्रेडिंग अकौन्टची कथा.आणखी काही हवे असल्यास अविनाशला विचारा. जिथे सह्या हव्या आहेत तिथें खुणा केलेल्या आहेत. खातेधारकाच्या बँकेतून ह्या सह्या प्रमाणित करून आणाव्या लागतील. Age proof, address proof, १०० रुपयाचा stamp paper आणि २ फोटो लागतील..’
हे सगळं मला तोंडपाठ होतं, आता प्रश्न होता नामांकनाचा (nomination). माझ्या चेहेर्यावर परत प्रश्नचिन्ह दिसल्यावर काका म्हणाले –
‘अजून एक चहा मागवावा लागेल असं दिसतंय :). अहो Madam, trading account म्हणजे रोज नवा गाडी नवं राज्य असा प्रकार. सोमवारी विकलेल्या शेअर्सचे पैसे चेकद्वारे तुम्हाला गुरुवारी मिळतात. सोमवारी खरेदी केलेल्या शेअर्सचे किमत चेकद्वारे मंगळवारी द्यावी लागते. या tradeला पैसे मिळाले किंवा गेले कि पूर्णविराम मिळतो. Account मध्ये ना पैसे रहात ना शेअर्स रहात. मग नामांकनाची गरजच काय. शेअर्स खरेदी करणारा किवा विकणारा दोघेही नफा मिळवण्याकरिता व्यवहार करत असतात. त्यामुळे आपल्या stock marketच ध्येयवाक्य म्हणजे नफा आणखी फक्त निव्वळ नफा.’
काकांचे आधीच ४ कप झाले होते त्यामुळे अजून काही मी विचारत बसले नाही. पण हा नफा कसा कमवायचा हे अजून कुठे माहित होतं मला? ते कशी शिकले ते पुढच्या भागात सांगते ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग १६ – भाव तिथे देव पण माझा कुठला भाव आणि माझा कुठचा देव
तर आता मला माझ्याकडे असलेले शेअर्स विकण्यासाठी योग्य भाव कुठला हे ठरवायचं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गणित माझ मलाच मांडायला लागणार होतं. गेल्या भागात सांगितलं ना तुम्हाला , कि या मार्केटमधे योग्य भावाची प्रत्येक माणसाची अशी एक व्याख्या असते. ते मला समजलं त्याची पण एक मजेदार कहाणी आहे
आधी विचार केला कि ऑफिसमध्ये जाऊन बसले कि थोडं थोडं समजेल. तिथे गेले आणि विचारल काकांना – ‘कि तुम्ही हि खरेदी-विक्री कशी करता?’. तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल कदाचित पण माझ्याकडे जायला आता एक ऑफिस होतं आणि कुलकर्णी काका होते. काका म्हणाले – ‘ बसा जरा वेळ , बघा काही समजतंय का? तसं अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर लाल दिसत असेल तर विकत घ्या आणि हिरवा दिसत असेल तर विका’ . ते तितक सोप नव्हतं हे नंतर कळलं . त्याकडे नंतर वळूच..
तर मी तेव्हा म्हटलं कि बघूया थोडा वेळ बसून काही कळतंय का? बघते तर एका गृहस्थानी माझ्यासमोर एक शेअर घेतला आणि एका तासात विकून सुद्धा टाकला. मी थक्क होवून बघत राहिले. मी इतके महिने काय कराव ह्याचा विचार करत बसले होते आणि इथे हा माणूस एका तासात शेअर विकत घेवून विकून मोकळा सुद्धा झाला. माझ्यासाठी त्यावेळी तो एकदम सुपरहिरो होता.
मी काकांना विचारल – ‘ अहो काका, हा काय प्रकार ?’ ते म्हणाले – ‘काही नाही , त्याला १ रुपया हर एक शेअर मागे मिळाला, त्याची अपेक्षा तेवढीच होती. आता तुमचे शेअर विकताना तुमची किती अपेक्षा आहे याचा विचार करा. बाकी कोण काय करतायत याकडे फार लक्ष देवू नका नाहीतर सगळा गोंधळ होईल’ माझ्यासाठी गुरुवाणी ती त्यामुळे मी माझा विचार करायला चालू केला.
तसे काही आडाखे होते डोक्यात. काही एकदम साधे होते आणि काही काही तितके पटकन लक्षात येण्यासारखे नव्हते. सर्वात आधी पैसे किती गुंतलेले आहेत आणि किती वर्षापासून गुंतलेले आहेत याचा हिशेब मांडला. मी आपला मध्यमवर्गीय विचार केला , कि शेअरमध्ये पैसे घातले नसते तर ते बँकेत फिक्सला टाकणार. आता जर फिक्सला टाकले असते तर किती मिळाले असते याचा विचार केला आणि मग आताची शेअरची किंमत जर त्यापेक्षा जास्त असेल तर विकू नाही तर वाट पाहू, अस काहीतरी ठरवलं.
ते पण इतक सरळसोट नव्हत. आता समजा कि एखाद्या शेअरचा भाव पुढे अजून वाढणार असेल आणि मी आता घाई करून विकून टाकला तर काय करणार? उगाच नुकसान ना? आणि समजा कि मला वाटल कि हा शेअर वाढणार आहे म्हणून मी ठेवला आणि नंतर त्याचा भाव पडला तर? असे अजून खूप सारे विचार माझ्या मनात येवून गेले आणि मला माहित आहे कि तुमच्यातल्या प्रत्येकाच्या डोक्यात कधी न कधी येवून गेले असणार. पण घाबरून जावू नका अस होतच.. कारण जरतर हा मार्केटचा स्वभावच आहे. जोपर्यंत तुम्ही शेअर विकत नाही तोपर्यंत या जरतर ला काही अर्थ नाही. तोपर्यंत फायदा काय किंवा तोटा काय सगळाच पुस्तकी. त्यामुळे धीर करून पुढे जायलाच हव.
तसा सगळाच काही वेड्याचा कारभार नाही मार्केट मध्ये. थोडं डोकं लावल तर बराच अंदाज बांधता येतो. म्हणजे आता असं बघा कि आपल्याला एखाद्या शेअरचा गेल्या वर्षा – २ वर्षाचा इतिहास आरामात कळू शकतो. एक तर ब्रोकरच्या ऑफिस मधून कळेल किंवा इंटरनेटवरून कळेल. मी माझ्या मुलांना बसवलं कॉम्पुटर समोर आणि काढून गेतले त्यांच्याकडून सगळ्या शेअर चे इतिहास. तुम्ही पण कोणीतरी शोधा कॉम्पुटर येणारा आणि तो तुम्हाला पटकन हि सगळी माहिती काढून देईल. एकदा हि माहिती हातात आली कि मग तुमच्यावर आहे कि तुम्ही तिचा किती अभ्यास करता आणि त्यामधून कसले आडाखे बांधता. तरीही तुमचे अंदाज चुकू शकतात पण चुकण्याची संधी कमी होते इतक नक्की. तसे हे आडाखे तुम्हाला ब्रोकर पण सांगू शकतो पण त्याने तुमच ज्ञान वाढत नाही. या माहितीबद्दल थोडं अजून पुढच्या भागात सांगते. तोपर्यंत जमल तर बघा कि तुमच्याकडे असलेल्या शेअरबद्दल काही इतिहास खोदुन काढता येतोय का ते?
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग १५ – भाव तिथे देव… पण कुठला भाव आणि कुठला देव
तर भाव कसा कळणार याचं उत्तर तर मिळालं … पण प्रश्न तिथे संपत नव्हता. नुसता भाव माहित करून चालणार नव्हतं. विकायला योग्य भाव कुठला? हे कसं कळणार?? आता तुम्ही म्हणाल कि त्यात काय मोठं !! ज्या भावाला शेअर विकत घेतला त्या पेक्षा जास्त भाव असला कि विका … मला पण आधी तसच वाटलं पण तसं नव्हतं. का ते आधी सांगते. काही मुद्दे आता मी सांगणार आहे, त्याचा विचार करा. कारण याच मुद्द्यांवर आजचा भाग आधारित आहे
- शेअर मार्केट मध्ये शेअर विकायची किंवा खरेदी करायची जबरदस्ती नसते
- शेअरचा भाव हा रोज बदलत असतो आणि तो थोड्या वेळात जास्ती किंवा कमी होवू शकतो
- मार्केट मधून पैसे कमवायचे असतील तर शेअर विकायलाच हवेत. जो पर्यंत तुम्ही विक्री करत नाही तो पर्यंत नफा किंवा तोटा फ़क़्त कागदोपत्री…
- ‘योग्य भाव’ हि संकल्पना माणसामाणसा बरोबर बदलणारी. त्यामुळे जो भाव मला कमी वाटेल कदाचित दुसऱ्यालाच जास्ती वाटेल किंवा उलटहि होवू शकतं
- शेअर च्या भावावर तुमचा काही कंट्रोल नाही पण शेअर कधी/ किती/कोणत्या भावाला खरेदी करायचे किंवा विकायचे हे तुम्ही ठरवू शकता
- तुम्ही जरी ठरवलं तरी त्या भावाला तुम्हाला शेअर मिळतील किंवा तुमचे शेअर विकले जातील कि नाही हे मार्केट ठरवत असतं
त्याकाळी माझा प्रश्न शेअर खरेदी करण्याचा नव्हता. मी सांगितल ना तुम्हाला कि मला रद्दीतून पैसे कमवायचे होते. त्यामुळे मला आधी माझ्याकडे होते ते शेअर विकण्यासाठी योग्य भाव कुठला हे माहिती करून घ्यायचं होतं. इथे येतो पहिला मुद्दा , मला शेअर विकायची जबरदस्ती नव्हती किंवा कोणतीही शेवटची तारीख नव्हती. मला पाहिजे तितका वेळ मी थांबू शकत होते आणि पाहिजे तितकी माहिती काढून घेवू शकत होते. तशी मला स्वता:ला घाई होती पण ती वेगळ्या कारणामुळे. हे शेअर मार्केटचं लचांड चालू करून खूप दिवस झाले होते आणि अजून पैसे काही उगवले नव्हते. मला उगाच दडपण वाटत होतं.
असा विचार करा कि तुम्ही मार्केट मध्ये गेलाय, आणि तुम्हाला कांदे घ्यायचे आहेत. तुम्हाला असं लक्षात आलं कि आज कांदे खूप महाग आहेत. पुढे काय कराल? तुमच्याकडे २ पर्याय असतील, एक तर कांदे विकत घ्या किंवा नका घेवू. आता जर तुमच्या घरी कांदे संपले असतील आणि तुम्ही आज काही बेत केला असेल तर तुम्हाला खरेदी करावीच लागेल. पण जर तुम्हाला कांद्याशिवाय चालवता येत असेल तर?
तर कदाचित तुम्ही असं काहीतरी कराल, तुम्ही दुकानदाराला विचाराल कि ‘बाबा रे आज कांदे इतके महाग का?’. आता जर तो म्हणाला कि ‘वाहिनी कांदा आहे कुठे मार्केट मध्ये?, आता कांद्याचा भाव आसाच राहणार अजून १५-२० दिवस, त्यानंतर काही कमी झाला तर झाला’. तर तुम्ही कांदे विकत घ्याल , नाही का? पण आता जर तो असं म्हणाला कि ‘ या आठवड्यात जरा माल कमी आलाय, ४-५ दिवस थांबा होईल भाव कमी’ , तर तुम्ही कदाचित थांबाल , नाही का?
या सगळ्यात महत्वाचा मुद्दा कि कांदे साठवून ठेवता येत नाहीत जर ते साठवून ठेवता येत असते तर तुम्ही पुढच्या आठवड्यात जाऊन १० किलो कांदे कमी भावाला घेतले असते!! अजून एक मुद्दा असा कि कांद्याशिवाय जेवण बनवणं थोडं मुश्कील आहे :). हे शेवटचे दोन मुद्दे शेअर मार्केट थोडं कठीण करतात. माझ्या कडे जे ३-४ पडीक शेअर होते, ते वर्षानुवर्ष तसेच होते, आणि मी जर विकले नसते तर वर्षानुवर्ष तसेच राहिले असते. त्यामुळे ते कधी विकायचे आणि किती भावाला विकायचे हे मलाच ठरवायला लागणार होतं.
आज जर मला विचारलात तर मी तुम्हाला घडाघडा ‘या शेअर चा yearly high, yearly low, average, stop loss’ वगेरे सांगून एकदम मस्त सल्ला देईन. पण त्या काळी इतकं काही कळत नव्हतं. माहित होतं ते इतकचं कि आपण शेअर इतक्याला, इतके वर्ष आधी घेतले आहेत, आजच्या घडीला त्यांचा भाव इतका आहे. त्यामुळे मला स्वत:चं असं काही तरी गणित मांडायला लागणार होतं. ते कसं जमवलं ते पुढच्या भागात सांगतेच..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग १२ – बाजूला ब्रोकर आणि गावभर शोधून आले नोकर !!
Demat account उघडून झाले होते आणि माझे share accountमध्ये जमा पण झाले होते. पण सांगितलं ना तुम्हाला, की तसा माझ्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा पण माझा प्रवास इथे संपलेला नव्हता. अजुन broker शोधायचा होता , share च्या किमती शोधायच्या होत्या.. आणि महत्वाचं म्हणजे share विकायचे होते.. तर आज सांगते की मी ब्रोकर कसा शोधला, किंवा माझी ब्रोकर भेट कशी झाली असं म्हणा.. कारण किस्साच तसा आहे , काखेत कळसा आणि गावाला वळसा असा काहीतरी !!
किस्सा सांगण्याआधी एक गोष्टं समजून घ्यायला हवी , ती म्हणजे की share विकायचे असतील तर ते ब्रोकरतर्फेच विकता येतात आणि खरेदी करायचे असतील तरी तसचं.. त्यामुळे ब्रोकरला पर्याय नाही आणि माझ्यासारख्या नवखीला share market मध्ये घुसायचं म्हणजे ओळखीचा आणि विश्वासार्ह ब्रोकर सापडणं गरजेचं होतं. पण माझा stock ब्रोकर चा शोध चालू झाला तो शेअर खरेदी विक्री साठी नव्हे. त्या काळी divestment ची प्रक्रिया जोरात चालू होती. नवरत्न बाहेर निघत होती आणि सगळ्यांना ONGC सारख्या कंपन्यांचे share हवे होते. आमची अवस्था काही वेगळी नव्हती. मग काय तर, share चे forms कुठे मिळणार? ते भरून कुठे द्यायचे? या सगळ्यासाठी पेपर मध्ये येणाऱ्या जाहिराती वाचायला सुरु केलं.
असा विचार करा की नाटक किंवा सिनेमा आपल्या बघायचा असतो तेव्हा आपण काय करतो? आपल्या जवळच्या theatre मध्ये ते नाटक किंवा सिनेमा लागला आहे का ते बघतो. आम्ही share broker साठी पण असंच केलं.. एक दिवस आमचा शोध चालू असताना एकदम माझ्या यजमानांनी पेपर माझ्या समोर आणून आपटला 🙂 म्हणाले हे बघ आपल्या घरापासून २ मिनिटावर आहे हा ब्रोकर. त्या काळात ब्रोकर ची नावं इतकी प्रसिद्ध नव्हती, आज काल सारख्या TV वर जाहिराती येत नव्हत्या. त्यामुळे सगळेच अनोळखी होते. माझ्या साठी महत्वाचं म्हणजे की घरापासून ह्या ब्रोकर चं ऑफिस जवळ होतं.
मग म्हटलं की जावून बघूया की ब्रोकर चं ऑफिस असतं तरी कसं?? गेले तर रेशन च्या दुकानात एका काळी असायची तशी गर्दी होती. ‘शेअर चे फोर्मस इथेच मिळतात का?’ असं बऱ्याचदा विचारलं, पण काही उत्तर मिळत नव्हतं.. कदाचित त्यांच्याकडे माझ्या सारख्या कोणी जास्त येत नसणार J. पण तितक्यात ‘त्या’ व्यक्तीने मला विचारलं – ‘तुम्ही इकडे कश्या? तुम्ही फाटक ना? अहो मी ओळखतो तुम्हाला’. मी म्हटलं ‘अहो मी पण ओळखते तुम्हाला , तुम्ही कुलकर्णी ना? तुम्ही इथे कसे?’ म्हणाले की ‘ इथे कसे काय हो? माझच ऑफिस आहे असं समजा !! या branch चा मी व्यवस्थापक आहे. आता हे ऑफिस घरासारखं समजा. जे काही पाहिजे तुम्हाला ते सगळं तुम्हाला हा अविनाश देईल’
मला स्वर्ग दोन बोटं राहिला होता !! ती व्यक्ती/व्यवस्थापक/ब्रोकर म्हणजे आमचे काका उर्फ मधुसूदन कुलकर्णी.. मी १९८२ ते १९९२ LIC Agent म्हणून काम करत होते तेंव्हा पासूनची आमची ओळख..मी त्यांना लक्ष्यात राहायचा एक कारण होतं.. आता माझा जो मुलगा हा ब्लोग लिहितोय तो त्यावेळी तान्हा होता. त्याला अंघोळ घालून दुपट्यात गुंडाळून LIC ऑफिस मध्ये न्ह्यायला लागायचं. तिथे टेबल खाली त्याला झोपवायचं आणि आपलं काम करायचं असं माझं routine होतं. असो… त्या सगळ्या फार जुन्या गोष्टी !! 🙂
एकूण काय तर माझा फार मोठा प्रश्न सुटला होता आणि आता पुढचे प्रश्न सोडवायला एक विश्वासार्ह ब्रोकर ची मदत मला मिळणार होती. हा अजुन एक फार मोठा महत्वाचा टप्पा होता.. एक नवीन नातं त्या दिवशी सुरु झालं ते अजूनही शाबूत आहे. माझ्या वाटचालीत मधुसूदन कुलकर्णी आणि त्यांचं ऑफिस यांचा बराच हातभार लागलेला आहे. आजही माझं शेअर मार्केट चं सगळं काम त्यांच्याकडेच होतं.. आता माझ्याकडे पण जायला असं एक ऑफिस आहे!! जी बाई आयुष्य भर गृहिणी होती तिच्यासाठी हि पण एक छोटीशी achievementच आहे..
Demat account, share demat, ब्रोकर… एक एक करून कोडी उलगडत होती.. पुढच्या भागात अजुन एक कोडं उलगडायचं होतं , ते म्हणजे share च्या भावाचं !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा