Tag Archives: Surendra Phatak

भाग ३५ – दोन्ही ट्रेड शेजारी पण वेगळे शेअर मार्केटच्या बाजरी

मी तुम्हाला गेले २ – ३ भाग डे ट्रेडबद्दल सांगतीये पण त्याचा अर्थ असा नव्हे कि डे ट्रेड आणि नेहेमीची गुंतवणूक फार वेगळी आहे. काही गोष्टी वेगळ्या आहेत पण बरयाच सारख्या पण आहेत.
आपण मिरच्या कोथिंबीर खरेदी करताना, ड्रेसवर किंवा साडीवर  साजेशा बांगड्या , खोटे दागीनी खरेदी करताना खूप विचार करत नाहीत. परंतु  फ्रीज ,टी व्ही , संगणक खरेदी  करताना जास्त विचार करतो. त्यापेक्षा जास्त विचार घर खरेदी करताना करतो . जसं गोळ्या बिस्कीट,  पाणीपुरी खाणे व जेवण करण यात फरक आहे तोच फरक डे ट्रेड व गुंतवणुकीत आहे. डे ट्रेड साठी आपण त्या शेअर्सची गुणवत्ता विचारात घेत नाही तर शेअर्सच्या किमतीत होणारी हालचाल विचारात घेतो. त्यामुळे तो शेअर गुंतवणूक करून बरेच वर्ष ठेवण्याच्या लायकीचा असेलच असे नाही. त्यामुळे डेट्रेडचे रुपांतर गुंतवणुकीत करून फायदा होईलच असं नाही .
डे ट्रेड असो किंवा नेहेमीची गुंतवणूक असो काही नियम बदलत नाहीत. शेवटी दोन्हीकडे शेअर खरेदी करायचे आणि विकायचे. डे-ट्रेडमधे फरक इतकाच कि तुम्ही खरेदी विक्री एकाच दिवशी करता. त्यामुळे हि खरेदी विक्री होण्यासाठी त्या शेअरमधे liquidity हवीच, त्याशिवाय तुम्ही शेअर विकणार कसे? त्यामुळे liquidity चा विचार कायम मनात ठेवा. आपण याआधी liquidity बद्दल बोललोच आहे. तरी काही शंका असतील तर जरूर विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
डे ट्रेड sfचा दुसरा भाग म्हणजे त्याच दिवशी खरेदी विक्री. याचाच अर्थ असा कि एकाच दिवसात तुम्हाला पैसे मिळवायचेत. तुम्हाला असा शेअर सोधायचाय कि जो एका दिवसात वाढेल आणि तुम्हाला एकाच दिवसात खरेदी विकी करून पैसे कमवता येतील. मग आता पुढचा प्रश्न , कि असा शेअर शोधायचा कसा?
त्यासाठी मी तुम्हाला आता एक समीकरण सांगते
तुमचा डे ट्रेडचा फायदा = (तुम्ही निवडलेल्या शेअरमधे एका दिवसात झालेली प्रती शेअर वाढ x तुम्ही विकत घेतलेले एकूण शेअर) – (ब्रोकरेज आणि इतर taxes)
आता आपण या समीकरणाचा एक एक भाग नीट समजावून घेवू
१ – तुम्ही निवडलेल्या शेअरमधे एका दिवसात झालेली प्रती शेअर वाढ
तुम्ही 100 रुपायला १ असे १० शेअर घेतलेत आणि ११० ला विकलेत तर तुमची प्रती शेअर वाढ १०  रुपये. आणि तुम्हाला एकूण १०० रुपयाचा फायदा झाला. पण आता हे १०० रुपये सगळे तुमच्या हातात येणार का? तर नाही !!
शेअरची निवड करताना तो एका दिवसात किती वाढू शकेल हा एकच विचार करून उपयोग नाही.
मला सांगा १०० रुपयाचा शेअर ११० होणं सोपं कि १००० रुपयाचा शेअर ११०० होणं? नीट बघितलं तर दोन्ही शेअर १०% वाढले पण १०० चा शेअर ११० होणं सोप हे तर तुम्हालाही कळलच असेल.
अजून एक विचार करा,
तुम्ही १० रुपयाचे १०० शेअर ११ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे

  • तुमचा फायदा = १ (प्रती शेअर वाढ)  X  १०० (एकूण विकलेले शेअर) = १०० – (ब्रोकरेज आणि इतर taxes)

आणि १००० रुपयाचे १०० शेअर १००१ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे

  • तुमचा फायदा = १ (प्रती शेअर वाढ)  X  १०० (एकूण विकलेले शेअर) = १०० – (ब्रोकरेज आणि इतर taxes)

तुम्हाला काय वाटत कि कोणत्या व्यवहारात तुम्हाला जास्त नफा होईल? दोन्ही व्यवहारात एकूण फायदा १०० रुपये होणार पण तुमच्या हातात सारखेच पैसे येणार का? ते ठरणार आपल्या समीकरणाच्या पुढच्या भागांनी…
२ – ब्रोकरेज आणि इतर taxes
ब्रोकरेज म्हणजे ब्रोकेरच कमिशन. हे कमिशन तुमच्या व्यवहाराच्या एकूण रकमेवर लावल जात. तुम्ही कसला पण ट्रेड करा डे ट्रेड करा नाहीतर गुंतवणूक म्हणून करा ब्रोकर त्याचं कमिशन लावणारच. आता हे कमिशन तुमच्या ट्रेडच्या एकूण रकमेवर लागत. एकूण रक्कम जास्त असेल तर ब्रोकरेज जास्त आणि रक्कम कमी असेल तर ब्रोकरेज कमी. तुमचा फायदा किंवा तोटा किती झाला याचा ब्रोकर ला काही फरक पडत नाही. तुम्ही एकूण ट्रेड किती रक्कमेचा केला त्या हिशोबानी तुम्हाला ब्रोकरेज लागणार.
आता थोड्या वेळासाठी आपल्या उदाहरणाकडे जावूया
तुम्ही १० रुपयाचे १०० शेअर ११ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे

  • तुमच्या ट्रेड ची एकूण रक्कम = खरेदी (१० X १००) + विक्री (११ X १००) = २१००

आणि १००० रुपयाचे १०० शेअर १००१ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे

  • तुमच्या ट्रेड ची एकूण रक्कम = खरेदी (१००० X १००) + विक्री (१००१ X १००) = २,००,१००

हे तर तुम्हालाही लक्षात आलं असेल कि १००० रुपयाच्या ट्रेड वर ब्रोकरेज जास्त पडणार. आणि हे विसरू नका कि दोन्ही ट्रेडमधे तुम्हाला १०० रुपयेच मिळालेले आहेत. सागायचा मुद्दा असा कि १००० रुपयाच्या ट्रेड मधे तुमचा निव्वळ फायदा कमी होईल कारण तुमचं ब्रोकरेज जास्ती जाईल.
बाकीचे taxes थोडे कमी जास्त का होईना दोन्ही ट्रेडला लागणारच. महत्वाची गोष्ट म्हणजे कि या मला वाटत कि आपण या बाबतीत बोललोय आधी. तुम्हाला अजून काही शंका असतील तर नि:संकोच विचारा.
डे ट्रेड करताना हा हिशेब नेहेमी डोक्यात असण गरजेच आहे. त्याशिवाय तुम्हाला नक्की पैसे किती मिळतात हे तुम्हाला कळणार नाही. याबद्दल थोडं अजून सांगायचं पण ते पुढच्या भागात. असा विचार करतीये कि तुम्हाला माझ्या एकाद्या डे ट्रेड ची पावती दाखवूनच सगळं समजावून देईन. बघते काय जमतंय ते..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग ३४ – day-ट्रेडचं वेड 3 : आखूड शिंगी बहुगुणी !!

डे ट्रेड म्हणजेच आखूड शिंगी बहुगुणी, जास्त दुध कमीत कमी वेळात देणारी आणि कमीतकमी वैरण खाणारी गाय शोधायचा प्रयत्न. या प्रकारासाठी व्यासंग , थोडासा चाणाक्षपणा आणी मर्यादित धोका पत्करण्याची तयारी ठेवावी लागते.
आता असं बघा कि गणपती किंवा एखादा सण आला तर फळ फुलं महागच मिळणार, दिवाळीच्या दिवसात कपड्यांच्या साड्यांच्या किमती जास्तच असणार, पित्रुपन्धरवडा किंवा पौष महिना खरेदीसाठी शुभ मानत नाहीत म्हणून तेव्हा सोनं थोड स्वस्त असणार किंवा थंडी पावसाळ्यात पंखे स्वस्त असतात ,उन्हाळ्यात लिंब महाग तर पावसाळ्यात स्वस्त हे जसं गृहिणींच्या लक्ष्यात येतं तसच मार्केटच्या निरीक्षणावरून काही गोष्टी गुंतवणूकदारांच्या सहज लक्ष्यात येतात. तुम्ही जर लिंबाचे व्यापारी असाल आणि समजा लिंब एकदम खूप टिकाऊ झाली तर तुम्ही पावसाळ्यात घेवून उन्हाळ्यात विकून पैसे कमवू शकाल कि नाही? मार्केटमध्ये हीच गोष्ट तुम्ही एका दिवसात करू शकता आणि हे करायचा प्रयत्न म्हणजेच डे ट्रेड..
सकाळी टी . व्ही . लावल्यावर शेअर मार्केटवर ज्या बातम्यांचा परिणाम होतो त्या बातम्या सांगतात . जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम शेअरमार्केटवर होतो. त्यावरून शेअरबाजाराचा कल ओळखून डे ट्रेड करावा लागतो. बाजार तेजीत असेल तर आधी खरेदी करून नंतर विका , बाजार मंदीत असेल तर आधी विकून नंतर खरेदी करा .. हेच डे ट्रेड सूत्र.
एखादा शेअर चार दिवस सतत वाढतो आहे तर चार दिवसानंतर लोकांना वाटतं की हा शेअर महाग झाला आपण खरेदीचा निर्णय पुढे ढकलू त्यामुळे मागणी कमी होते व शेअरची किमत कमी होते. एखादा शेअर ४ दिवस पडत असेल तर आपल्याला वाटतं यापेक्षा स्वस्त हा शेअर मिळणार नाही त्यामुळे तो शेअर खरेदी करण्याचा कल वाढतो. हे सगळं लगेच समजत नाही पण थोडा अभ्यास केला, अनुभव आला कि समजतं.
४ दिवस वाढणारा शेअर आधी विकायचा आणि नंतर विकत घ्यायचा किंवा जो शेअर ४ दिवस सतत पडतो आहे तो आधी खरेदी करून नंतर विकायचा हे समजायला थोडा वेळ लागतो. आणि हे सगळं जरी समजलं तरी शेवटी हे सगळे अंदाजच ! पाउस जसा लहरी तसच शेअरमार्केटसुद्धा मूडी असतं. जशी लहान मुले वागतात तसंच काहीसे मार्केट समजा ना. ‘आमच्या मुलाला हा पदार्थ आवडत नाही’ असं सांगावं आणी नेमक त्याचवेळी मुलाला तो पदार्थ आवडावा आणी त्याने तो पदार्थ चापून खावा तसचं काहीस होण्याची शक्यता लक्षात ठेवूनच डे ट्रेड करावा लागतो.
मार्केटच्या बाबतीत कोणतीही शास्वती कोणीही देवू नये त्यामुळे फायदा होत असेल तर तो लगेच पदरात पाडून घ्यावा!! दुसर्या भाषेत सांगायचं तर वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत , कारण पाणी आटल्यावर तक्रार कुणाकडे करणार ? आपल्या अंदाजाप्रमाणे शेअरमध्ये हालचाल नसेल तर ताबडतोब निर्णय घेवून उलट ट्रेड करून ट्रेड संपुष्टात आणावा. म्हणजेच तुम्ही किती तोटा सहन करू शकता याचा विचार करावा. यालाच मार्केटच्या भाषेत ‘STOP LOSS’ असं म्हणतात . म्हणजेच समजा १००रुपये किमतीचा शेअर खरेदी केला याचा अर्थ शेअरचा भाव वाढणार असे तुम्ही गृहीत धरले पण तुमच्या अंदाजाप्रमाणे घडले नाही आणि भाव कमी होऊ लागला तर ९८ रुपयाला तुम्ही STOP LOSS ठेवा याचा अर्थ असा की तोटा झाला तर प्रत्येक शेअरमागे रुपये २चा तोटा सहन होऊ शकेल असा तुमचा विचार असतो.
आता STOP LOSS ठरवायचा म्हणजे कोणत्याही शेअरच्या किमतीमध्ये जी हालचाल होते त्याकडे लक्ष ठेवायला हवी. तो शेअर साधारणपणे वाढला तर किती वाढतो आणी भाव पडला तर किती पडतो याचा अंदाज घ्यायला हवा. काल मार्केट बंद होताना त्याचा भाव किती होता हे बघायला हवं. त्याप्रमाणे कोणत्या भावाला खरेदी , कोणत्या भावाला विक्री , फायदा किती घ्यावा व फायदा होत नसेल तर तोटा किती सहन करावा हे सगळं आधी ठरवायला हवं . काही शेअर्स दिवसाला १०-१५ रुपये तर काही शेअर्स ३-४ रुपये , काही शेअर्स २०० -४००रुपये आणी काही शेअर्स ४०पैसे ते ८०पैसे एवढेच वाढतात किंवा कमी होतात. त्याप्रमाणेच तुमच्या फायद्याचे प्रमाण ठरतं.
तसे डे ट्रेड मध्ये अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आधी समजून घ्यायला हव्यात पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. बोलूच आपण लवकर !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग २४ – शुभमंगल सावधान !!

“या या MADAM लवकर या! जागा पकडायला लवकर आलेल्या दिसता!! आम्ही सगळयांनी एक ठराव पास केला आहे. तुमची एक जागा सोडूनच इतरांनी बसायचं.” कोणीतरी मी ऑफिसमध्ये आल्या आल्या म्हणालं.
मी म्हटल “बरररररर!! कुठे बसू ते तरी सांगाल की नाही?”
“ती बघा त्या BOLT च्या समोर डाव्या बाजूची भिंतीच्या जवळची जागा तुमची” मागून कुठून तरी आवाज आला. १०-१५ वर्ष झाली पण ऑफिस मधली माझी बसायची जागा अजूनही तीच आहे. कुणीही माझ्या गैरहजेरीत बसलं असेल तरी अजूनही मी आले की उठतात.
“आज आम्हाला पार्टी हवी.” अजून एक आवाज कुठूनतरी आला
“ देवू कि , अरे पण पार्टी  कशाबद्दल ?”
“ तुम्ही ओळखा पाहू.”
“माझा ट्रेडिंग अकौंट नंबर आला की  तुमच्यापैकी कोणाचं लग्न ठरलं?”.
“आईला MADAM अगदी बरोबर!. अहो अविनाशच लग्न ठरल कि”
“अरे मग पार्टी त्याने द्यायला पाहिजे ना?”.
“अहो MADAM तुमचा ट्रेडिंग अकौंट नंबर आलाय ना, म्हणून तुम्ही पार्टी द्यायची हो!!. तुम्हाला घरी तस पत्रही येईल . आता या नंबरवर तुम्ही शेअरचा व्यवहार करायचा. MADAM आता प्रोसीजर संपली. आता व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला मार्केटचे दरवाजे उघडले आहेत.”
अविनाश म्हणाला
“MADAM सेवींग अकौंट उघडला, DEMAT अकौंट उघडला. INSTRUCTION SLIP बुक मिळालं. आता वाट कसली पहावयाची द्या बार उडवून आणि करा सुरुवात. शुभ मंगल सावधान होऊन जावू द्या!! सर्वजण अक्षता  टाकायला आहेतच.” ते एकूण अख्या ऑफिसमध्ये हशा पिकला
मी म्हटलं “ अरे बाबा शुभ आणी मंगल होण्यासाठी आधी सावधान व्हाव लागतं !! तुझ लग्न ठरलय ना? मग कळेलच तुला लवकर !!”. ऑफिस मधला हशा अजूनच वाढला
“बर… आता मला अजून काय करायला लागणार?” काकांकडे बघत मी विचारल
“ काहीहि नाही !!” काका म्हणाले
“आता प्रत्यक्ष मैदानात  उतरायचं !! खरेदीची विक्रीची ओर्डर टाकायची आणी फायदा कमवायचा…  यशस्वी व्हा, इतकच!! काही अडचण आल्यास मी मदत करीनच . हे ऑफिस तुमचचं समजा.” तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, काकांचा शब्द अजूनही तीतीकच खरा आहे. काका आणि माझे ऑफिस मधले सहकारी यांच्या मदतीशिवाय मी काही मार्केटमध्ये टिकू शकले नसते इतकं नक्की !!
माझ्या डोक्यात परत चक्कर चालू !! ही ओर्डर टाकायची कशी?? हॉटेलमध्ये मेनू बघून देतो तशी की गस संपल्यावर नवीन सिलेंडरची देतो तशी? SCOOTER बुक करतो तशी की साधं वाण्याचं सामान ओर्डर  फोन करून सांगतो तशी? का बुट्टेदार पैठणीची ओर्डर द्यावी तशी.
हे सगळं घरी बसून तर कळणार नव्हतं!! ऑफिसमध्ये बसूनच ते समजून घ्यायचं होतं. त्यावरून माझ्या साठी मला स्वत:चे असे मार्केटचे नियम ठरवायचं होते.
“काका एक फोन करू कां ?”
“हो करा की त्यात काय विचारावयाचे” .
यजमानांना फोन करून सांगितलं की ट्रेडिंग अकौंट नंबर मिळाला एकदाचा!!. हे कळल्यावर त्यांनीही सुस्कारा सोडला. मला म्हणाले “आता तू आणी तुझं मार्केट, घाला गोंधळ”.
खरेदी करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण पैसेच नव्हते. ४-८ दिवस मार्केटमध्ये बसले असताना ते इतरांना बोलताना ऐकलं होतं की दुसरे दिवशी खरेदीच्या रकमेचा चेक द्यावा लागतो. सगळे व्यवहार चेकनेच होतात. म्हणजेच वाण्याचे जसे महिनाअखेर पैसे देतो किंवा दुधवाल्याचं बिल, पेपरचं  बिल  महिनाअखेर देतो असं मार्केटमध्ये चालत नव्हतं. त्यामुळे शेअर उधारीने खरेदी करण्याचा प्रश्न मिटलेला होता. माल विकूनच पैसे उभे करावयाचे होते. रद्दीतूनच मला माझा मार्केटचा व्यवसाय उभा करायचा होता हे पूर्वी ठरवलं होतं त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
ओर्डर कशी टाकायची ते आता पुढच्या भागात बघू !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग २२ – गुढी उभारा मार्केटची आणि काळजी घ्या या १० गोष्टींची

This is a picture of the Gudi that is raised o...
आज गुढीपाडवा! साडेतीन मुहूर्तापैकी एक!! माझ्या आयुष्यातला फारच महत्वाचा दिवस. दहा वर्षापूर्वी गुढीपाडव्याला मला माझा trading account नंबर मिळाला आणि माझं सगळं आयुष्य बदलून  गेलं. गेल्या दहा वर्षात शेअरबाजारातील प्रवासात मला अनेक अनुभवातून जावं लागलं आणि बरंच शिकता आलं. काही गुरुमंत्र मिळाले, आजच्या या मुहूर्तावर मी तेच तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरु करूया
1.       अंथरूण पाहून पाय पसरा
आपल्याजवळ असणारे भांडवल, फायदा मिळेपर्यंत थांबण्याची तयारी, तोटा सहन करण्याची ताकत याचा अंदाज घेवूनच शेअर खरेदी करा म्हणजे अंथरुणाबाहेर पाउल कधी जाणार नाही.
2.       ऐका जनाचे, करा मनाचे
ब्रोकेरच्या ऑफिसमध्ये, वर्तमानपत्रात, नियतकालिकात, टी .वी . च्या विविध channelवरून येणारे सल्ले अभिप्राय व शिफारशी अवश्य वाचा. पण त्या वाचून आपण आपल्या अभ्यासावर आधारित निर्णय घ्या
3.       प्रयत्नांती परमेश्वर
सतत माहिती मिळवा. आळस करू नका .शेअर किमत वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याची कारण शोधा .त्यामुळे खरेदीविक्रीचा सौदा योग्य होऊन फायद्याचा परमेश्वर भेटेल.
4.       नवरा मरो नवरी मरो, दक्षिणेशी मतलब
खरेदी किवा विक्रीचा कोणताही सौदा तुम्हाला फायदेशीर असेल तरच करा. अनावश्यक सौदेबाजी टाळा.
5.       धीर धरी रे धीरापोटी, फळे असती रसाळ गोमटी
मार्केट पडत असेल किवा वाढत असेल तरी धीरानं निर्णय घ्या त्यामुळे कमीतकमी किमतीला खरेदी आणि जास्तीत जास्त किमतीला विक्री होऊन जास्तीत जास्त फायदा होईल .
6.       तिने घातली सरी म्हणून तुम्ही नका घालू दोरी
कोणताही मुद्दा प्रतिष्ठेचा बनवू नका. अंधानुकरण करू नका. कोणाशीही स्पर्धा किवा बरोबरी करू नका. स्वता:ला पचेल, रुचेल आणि झेपेल तितकच करा.
7.       थांबातर संपाल  
मार्केटचा व्यासंग सतत आणि पुरेसा हवा. त्यात खंड पडल्यास मार्केट तुम्हाला दूर फेकून पुढे निघून  जातं. येथे विलंब घातक ठरतो.
8.       हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे
अफवांवर विश्वास ठेवू नका आणि वावटळीप्रमाणे येणाऱ्या बातम्यांच्या मोहजालात फसू नका.
9.       कशासाठी? पैश्यासाठी!! फायद्याच्या गोष्टीसाठी !! शेअरच्या खरेदीविक्रीसाठी !!
शेअर मार्केटमध्ये भावना, आवड, हेवादावा या गोष्टींना स्थान नाही. फायदा मिळवून देणारा शेअर चांगला आणि ठेवण्यास योग्य. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा असे शेअर्स घेवू नका.
10.   अति तेथे माती
आपल्याला किती फायदा हवा हे शेअर्स खरेदी करण्यापूर्वीच ठरवा. अमर्याद फायद्याची वाट बघत बसाल तर नुकसान होण्याची शक्यता वाढेल.
हे मंत्र मी चांगलेच गिरवले. त्यातून माझ्या शेअरमार्केट ची गुढी दिमाखात उभी राहिली आहे. कशी ते सविस्तर सांगेनच पण ते पुढच्या भागात.पण इतकं मात्र नक्की कि हे मंत्र तुम्ही लक्षात ठेवलेत आणी आचरलेत तर तुम्हालाही यश मिळेल.
गुढीपाडव्याला संकल्प करा आणि नियमानुसार आचरण करा. लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल. तुमचा दिवाळीचा पाडवा आनंदाने साजरा होईल .देव तुम्हाला “अनंत हस्ते कमलावरांनी देता, किती घेशील दो करांनी” असे भरभरून देईल आणि तुमच्या आयुष्यात प्रसन्नता ओसंडून वाहील !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग १९ – गोंधळ मांडीला ग मार्केटचा गोंधळ मांडीला !!!

गेल्या भागात सांगितलं तसं काका आणि ४ कप चहा यांच्या मदतीने trading account अध्याय संपवायचा प्रयत्न चालू होता.
“तुमचे चार चहा माझ्यावर उधार.” असं सांगून काकांचा निरोप घेतला. जास्तीचे forms घेतले आणि घरी आले.
घरातल्या कामापासून सुटका नाहीच. गृहिणीच ना मी ! फार्म ठेवले बाजूला. घरातले कामं पटापट आटपावी   आणि forms वाचावेत असं ठरवलं. संध्याकाळी माझे यजमान घरी आल्यानंतर त्यांना सगळा वृतांत कथन केला. चहापाणी झाले. नंतर माझ्या यजमानांनी forms भरले आणि मी सह्या केल्या. दुसर्या दिवशी यजमानांचा टिफिन, मुलांचं खाणपिण झाल्यानंतर मी भरलेले forms घेवून ऑफिसमध्ये गेले. अविनाशनी  forms वर नजर टाकली. दोन तीन ठिकाणी सह्या राहिल्या होत्या मी पुन्हा घरी आले. यजमान घरीच होते. त्यांना आज ऑफिसला उशिरा जायचे होते. त्यामुळे जिथे सह्या राहिल्या होत्या त्या घेतल्या .
पुन्हा ऑफिसमध्ये दाखल झाले. अविनाश म्हणाला की introducer ची सही राहिली होती. त्याने काकांकडे बोट दाखविलं आणि म्हणाला” घ्या त्यांच्याकडून”.  काकांची introducer म्हणून सही घेतली आणि forms दिले .
काका म्हणाले “पाच सहा दिवस लागतील Trading Account नंबर मिळायला.”
मी विचार केला आता घरी जावूनही काही मला महत्वाचं आणि तातडीचं काम नाही . तेव्हा आज ऑफिसमध्ये मार्केटची वेळ संपेपर्यंत येथेच बसून आपल्या ज्ञानात काही भर पडते का ते पाहू .
ऑफिसमध्ये पंधरा वीस माणसं होती . ती आपापसात काहीतरी बोलत होती. मला काही समजत नव्हतं. TV चालू होता. CNBC channel चालू होता. पण गोंगाट एवढा की TV वरचं काही ऎकु येत नव्हतं. कॉम्पुटर वरचं काही दिसत नव्हतं. डोळे असून आंधळेपणा आला होता. दोन सोडून चार डोळे असून उपयोग नव्हता. माझी डाळ मलाच शिजवून घ्यायला लागणार होती.
मी माझ्या बाजूला असलेल्या गृहस्थांना म्हंटलं “थोडे सरकून बसता का? म्हणजे मलाही  दिसेल”
कर्णिक म्हणाले “ तुम्हाला दिसत नसेल तर डोळ्यांचा नंबर बदललेला असेल”. त्यांचं नाव कर्णिक ही माहिती मला नंतर अविनाशनी दिली. असे बरेच लोकं भेटले मार्केटमुळे. त्यातली बरीचशी पात्र आपल्या गोष्टीमध्ये येणारच आहेत. येतील तेव्हा सांगीनच त्यांच्याबद्दल.
मी जेव्हा शेअर मार्केटचा विचार सुरु केला होता तेव्हाहि शेअर मार्केट विषयी क्लासेसबद्दल, पुस्तकांबद्दल चौकशी केली होती. आज वाटलं पुन्हा चौकशी करावी कारण ही सगळी माणसं शेअर्समध्ये व्यवहार करणारी आहेत म्हणजे त्यांना अचूक माहिती असेल.
मी कर्णिकांनाच विचारले “मार्केट शिकण्यासाठी काही पुस्तकं किवा क्लासेस आहेत का? म्हणजे मग कोणाचे उपकार नकोत”
“पुस्तक?? क्लास?? म्हणजे शिकवणी??” अख्या ऑफिस मध्ये हशा पिकला.
“पुस्तकात वाचून किवा क्लासला जावून कुणी मार्केट शिकलय का? आम्हाला तरी माहित नाही हो madam!!” कुणीतरी मागून ओरडलं..
जरा ओशाळल्यासारख झालं खरं पण उसनं अवसान आणून मी म्हणाले  “अहो असे का  हसता ? पूर्वी स्वयंपाक आईकडून , सासूकडून  आजीकडून  शिकावा लागे .पण आता रुचिरा अन्नपूर्णा अशी पुस्तके आहेत की !! म्हणून मी विचारले.”
मग काका मध्ये पडले. “ BSE (Bombay Stock Exchange) मध्ये पंधरा दिवसांचे लहान लहान कोर्स चालतात. तुम्ही चौकशी करा हवी तर, सर्वांनाच उपयोग होईल.”
एवढ होईपर्यंत बारा वाजून गेले . अविनाश म्हणाला “तुम्ही डबा आणलाय का? कि घरी जाणार आहात?. आमच्याबरोबर येता का आमच्या डब्यातला मासला घ्यायला? का मार्केटनीच पोट भरलं तुमचं ?”.
मी म्हटले “तुम्ही जेवा “. सगळे जेवायला गेले पण आमच्या ऑफिसचा शिपाई दीपक मात्र मुंबईला जाण्यास निघाला.  तेवढ्यात एका माणसाचा call आला त्याला range मिळत नव्हती म्हणून तो बाहेर गेला रे गेला आणि मी त्याची खुर्ची ढापली. त्यावेळी मार्केट तेजीत होतं, त्यामुळे माणसं जास्त आणि खुर्च्या कमी असा प्रकार असायचा आणि मी नवखी त्यामुळे तेव्हातरी खुर्ची ढापावी लागली.
ती खुर्ची जरा पुढे होती त्यामुळे अविनाश जेवून यॆइपर्यन्त कॉम्पुटरवर काय दिसतय ते बघायचा प्रयत्न चालू केला . कॉम्पुटरवर काही कंपन्यांची नावं होती. चार पाच रकान्यामध्ये काय काय आकडे होते. आमच्या घरी कॉम्पुटर होता आणि आजही आहे. पण प्रत्येक सेकंदाला त्या कॉम्पुटरवर  काही बदलत नाही. मला ते बदलते आकडे पाहून मजाही वाटली आणि उत्सुकताही वाटली. पण तिथे कुठेही माझ्या शेअर्सची नावं नव्हती.
अविनाश जेवून आल्यावर मी त्याला विचारले
“मला जे शेअर्से विकायचे आहेत ते कुठे बघायचे बाबा?  हा कॉम्पुटर आहे का काय आहे.”
“Madam हा कॉम्पुटरच आहे. पण याला  BOLT  म्हणजे ‘B . S .E ऑन लाईन ट्रेडिंग सिस्टीम’ असं म्हणतात.  शेअर खरेदी विक्रीची माहिती याच्यावर दिसते”
मग माझ्या शेअर्सची नावे कुठे आहेत त्यांचा भाव काय? अविनाशने माझे शेअर्स पाहून मला भाव सांगितला.
मला म्हणाला “तुम्हाला तुमचे हे शेअर विकायचेत आहेत का?  तसे असेल तर मी हे शेअर समोर घेतो.”
त्याने काहीतरी केलं आणि मला समोर गिनी सिल्क , HDFC ,कोणार्क SYNTHETICS असे सगळे शेअर्स दिसू लागले. HDFC चा भाव सारखा बदलत होता. मी अविनाशला विचारले  हे असे का ? तेव्हा तो म्हणाला HDFC ही  BLUE  CHIP कंपनी आहे . या मध्ये LIQUIDITY चांगली असते.VOLUME असतो. बाकीच्या कंपन्यात तसे नाही. कित्येकदा ट्रेडही  होत नाही.
तुम्ही जर कधी शेअरमार्केटच्या वाटेला गेला नसाल तर आता तुमच्या चेहेर्यावर जे भाव आहेत तेच माझ्या चेहेर्यावर त्यावेळी होते. माझी कापूसकांडयाची गोष्ट सुरु झाली.
“BLUE CHIP ,, LIQUIDITY, VOLUME , ट्रेडही होत नाही हे तू काय म्हणतो आहेस.ते मला समजत  नाही.”  तो म्हणाला “सांगतो थांबा जरा.”
तेवढ्यात दोन वाजले आणि चहा आला. एकजण म्हणाले “ घ्या चहा घ्या.. कुलकर्णींची मेहेरबानी..”
माझ्या डोक्यात गोंधळ उडाला होता पण माझ्या आजूबाजूला त्यापेक्षा मोठा गोंधळ चालू होता. कोणी cheque घ्यायला येत होते, कोणी cheque द्यायला येत होते कोणी statement मागत होते.समोरच्या टेबलावर वेगवेगळ्या forms चे गठ्ठे होते. लोक त्यातले forms घेवून जात होते. सारखे फोनवर फोन येत होते . बहुतेकजण शेअर्सची किमत विचारात होते.
आता सव्वातीन झाले. सगळ्यांची POSITION CLOSE करायची घाई सुरु झाली. साडेतीन वाजताची घंटा TV वर वाजली. मार्केट बंद झाले . बदलणाऱ्या किमती स्थिर झाल्या. आता उद्या मी BLUE CHIP ,VOLUME , LIQUIDITY ट्रेड होत नाही, POSITION CLOSE ही सगळी  कोडी उलगडून घेईन आणी तुम्हाला सांगीन. माझ्या शेअर्सच्या विक्रीमध्ये पुढे काय झालं तेही पाहू पुढच्या भागात.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग ४ – सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे !!!

रद्दी  आणि ती पण लाख मोलाची 🙂 .. आणि तशी ती होती पण . कारण ती रद्दी होती share certificates ची. जर मी त्याचा काही उपयोग करू शकले तर खरच ती रद्दी मला लाखांनी पैसे मिळवून देवू शकत होती. असं काही नाही कि त्या वेळी मला हे सगळं माहित होतं पण इतकं नक्की कळत होतं कि यातून काही तरी चांगलं निष्पन्न होवू शकेल.
पहिलं काम होतं ते ती रद्दी समजून घेण्याचं. Share विकण्या आधी, आपल्या कडे कुठ कुठ ले Share आहेत हे कळायला तरी हवं. त्या नंतर मग पुढचे प्रश्न, Share विकतात कसे, कुठल्या कंपन्या अजून चालू आहेत, कुठल्या बुडल्या .. प्रश्न खूप होते, म्हटलं कि एक एक करून उत्तरं शोधूया.
मग पुढचा प्रश्न, कि share च्या किमती कुठून कळणार ? ते त्यातल्या त्यात सोपं होतं. त्या किमती रोज पेपर मध्ये येतात. मी म्हटलं चांगलं आहे, लगेच दुसऱ्या दिवशी यजमानांना कामाला लावलं. Share च्या किमती शोधा आणि घेवून जा ती certificates विकायला. गेले बिचारे, तसं न जावून सांगतायत कुणाला ? 🙂
गेले,  ते इतकसं तोंड करून परत आले, मी विचारलं – ‘अहो काय झालं? Share मार्केट मध्ये लुटलं कि काय तुम्हाला कुणी ?’ तसा त्या काळी Share मार्केट हा एकूण लुटारू लोकांचा कारभार असाच एक समज होता. हे म्हणाले – ‘बाई, तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. तो ब्रोकर म्हणाला , कि पेपर मध्ये येतात ते कालचे भाव, तो भाव तुम्हाला आज नाही मिळणार साहेब. इथे दर मिनिटाला भाव बदलत असतो. तुम्ही विकायला सांगितल्या वर जो भाव असेल, तो तुम्हाला मिळेल किवा तुम्ही सांगा तुम्हाला काय भाव पाहिजे तो आणि मग तो भाव जेंव्हा येयील तेंव्हा तुमचे Share विकले जातील.’
लग्ना नंतर पहिल्यांदा मला वाटलं कि हे बरोबर म्हणत आहेत. आधी वाटलं तेवढं काही हे सोपं नाहीये. आता आपल्याला काय माहित कि कोणती किंमत बरोबर आणि ती केंव्हा मिळणार? त्या साठी प्रमाण काय ? ते कळणार कुठून? विचार केला कि पुस्तक वाचून कळेल, पण त्या काळी तशी काही पुस्तक मिळत नव्हती, किंवा मला मिळाली नाहीत. काही क्लास चालतात का याची पण चौकशी केली पण तिथे हि नकार घंटाच. आमच्या ओळखीत पण कोणाला या बद्दल काही माहित नव्हतं
म्हणजे जर पैसा उगवायचा असेल तर मलाच या अग्निदिव्यातून जायला लागणार होतं. आपण मेल्या शिवाय स्वर्ग दिसेल असं वाटत नव्हतं. अडकलेला पैसा हा कष्टाचा, घाम गाळून कमावलेला होता. तो वसूल तर करायचाच होता. मागे वळणं हा आता पर्याय नव्हताच.. सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे.. असच काही तरी मनात गुणगुणत मी पुढे निघाले. पुढचा प्रवास आता पुढच्या आठवड्यात. बोलूच लवकर..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा